भाग ३
त्रिंबकजीनें आपला खुनाशीं कांही संबंध नाहीं किंवा आपणांस त्यासंबंधीं कांहीं माहितीहि नाहीं असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटानें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावाच्या मागें लकडा लावला. पण बाजीराव त्यास इंग्रजांच्या हवालीं करण्यास कांकूं करूं लागला. शेवटीं नाइलाजानें बाजीरांवानें त्रिंबकजीस वसंतगड नामक किल्ल्यांत अटकेंत ठेविलें; तरीहि इंग्रजांचें समाधान न होतां त्यांनीं त्रिंबकजीस आपल्याच हवालीं करण्याचा तगादा लाविला तेव्हां गांगरून (आणि अंगीं धैर्य नसल्यानें) बाजीरावानें त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केलें (२५ सप्टेंबर १८१५).
इंग्रजांनीं त्रिंबकजीस ठाण्याच्या किल्ल्यांत अटकेंत ठेवले. याच्यावर जे पहारेकरी ठेविले होते त्यांत बहुधा, खबरदारी घेण्याचा उद्देशानेंच, एकहि हिंदी माणूस ठेवला नव्हता. ह्याचा फायदा घेऊन त्रिंबकजीनें सप्टेंबरच्या १२ दरम्यान तटावरुन उडी मारुन आपली सुटका करुन घेतली. त्रिंबकजी निसटून जाण्याच्या कांहीं दिवस अगोदर त्याची मित्रमंडळी व नोकरचाकर आसमंतांत येऊन त्याची वाट पहात होते. त्रिंबकजीस त्यांचा निरोप कळविण्याचें काम किल्ल्यांतील एका अधिकार्याच्या मोतद्दरानें केलें. त्रिंबकजीस ज्या खोलींत ठेविलें होतें तिच्या खिडकीखालीं आपल्या घोड्याची चाकरी करीत असतां हा मोतद्दार त्रिंबकजीस कळवावयाची माहिती अगदीं बेफिकीरपणानें गात असे. पहारेकर्यांस मराठी येत नसल्यामुळें त्यांनां ही लबाडी ओळखतां आली नाहीं. त्रिंबकजीनें ज्या अडचणींतून आपली सुटका करुन घेतली ती हकीकत ऐकून लोकांत त्याच्याबद्दल कौतुक व आदर वाढला. यानंतर त्रिंबकजीनें पुन्हां फौज जमवून कधीं नाशिक व संगमनेर यांच्या आसमंतांतील डोंगरांत, कधीं खानदेश बागलाणांत तर कधीं सातार्याकडील महादेव पर्वतांत फिरून इंग्रजांच्या विरुद्ध त्यानें दंगा उसळून दिला. त्याला पकडण्यासाठीं इंग्रजांनीं फार खटपट केली, परंतु पुष्कळ दिवस ती सिद्धीस गेली नाहीं. त्याचा खरा पत्ताच लागेना. तो आपल्या सासुरवाडीस (नाशिक जिल्हा, निफाड तालुका, निफाडहून वायव्येस ५ कोसांवर) अहिरगांवीं गुप्तपणें राहिला होता.
यावेळीं कोरेगांवची लढाई होऊन एलफिन्स्टननें आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता; त्याप्रमाणें पेशवाईंतील सर्व मराठे सरदार, इनामदार इंग्रजांनां मिळाले होते व रावबाजी एकटे पडले. इंग्रजांनीं तशाहि स्थितींत त्रिंबकजी हा पेशव्यांच्या तर्फे धुमाकूळ घालीत असल्यानें त्याला पकडण्यासाठीं मोठमोठीं बक्षिसें लाविलीं. तेव्हां एका स्त्रीनें व त्रिंबकजीचा नोकर नाना यानें फितूर होऊन, ब्रिग्ज यांस त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. कॅ. स्वान्स्टन हा एक हजार घोडदळाची पलटण घेऊन अहिरगांवीं आला. यावेळीं त्रिंबकजी तेथें एकटाच होता; फौजपांटा मुळींच नव्हता. गांवची नाकेबंदी करुन इंग्रजांनीं पहाटें त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा दिला. वाडा दोनदां तळघरें बळदासंकट शोधला, परंतु त्रिंबकजी सांपडेना. शेवटीं तिसर्यानें पुन्हां शोधला तेव्हां मात्र त्रिंबकजी सांपडला. एका बळदांत एका लोखंडी चोरदाराच्या पलीकडे बुरूजावर जाण्याचा एक जिना होता. तेथली भिंत त्रिंबकजी फोडीत होता. त्याला धरण्यास जात असतां जिन्यावरील एका मराठ्यानें त्यांनां अडथळा केला. जीं जीं माणसें धरण्यास गेलीं तीं या मराठ्यानें आपल्या भाल्यानें ठार केलीं. त्यांची संख्या तीस भरली. शेवटीं स्वान्स्टननें भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम केला व त्यामुळें मात्र तो मराठा पडला. असा तो शूर भालाईत पुरुष नसून (त्रिंबकजीची) स्त्री आहे हें समजल्यावर स्वान्स्टन यास फार आश्चर्य वाटलें. त्रिंबकजी भिंत फोडीत असतां, त्याच्या अंगावर जाण्याची हिंमत कोणाचीच होईना तेव्हां निराशेनें त्रिंबकजी आपणच होऊन इंग्रजांच्या स्वाधीन झाला. त्यास नंतर बंगालमध्यें एका किल्ल्यांत (चुनार) अखेरपर्यंत कैदेंत ठेविलें. त्याची ९० हजार रुपयांची मालमत्ता इंग्रजांनीं जप्त करुन ती स्वान्स्टन यास बक्षीस दिली (जून १८१८). (डफ; नाशिक ग्याझेटियर; राजवाडे खंड ४).
No comments:
Post a Comment