विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 March 2019

श्रीमंत अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई साहेब

श्रीमंत अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई साहेब

मातोश्री अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई यांची सती जाणेबाबत कहाणी - 'सतीचा प्रताप'

माहिती आणि पोस्त सांभार :शार्दुलसिह नाईक निंबाळकर
mobile नो. 9096267474

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना चार राण्या होत्या. श्रीमंत सगुणाबाई, प्रतापसिंह गुजर यांच्या कन्या, श्रीमंत ताराऊसाहेब, मोहिते यांच्या कन्या, श्रीमंत राजसबाईसाहेब, घाटगे याच्या कन्या आणि श्रीमंत अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाई साहेब सरलष्कर शहाजी नाईक निंबाळकर, वैराग यांच्या कन्या.
छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन सिंहगडावर इ.स. १७०० साली झाले. त्यावेळी अंबिकाबाई राणीसाहेब विशाळगडावर होत्या. ज्यावेळी अंबिकाबाई यांना छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूची बातमी समजली तो तिसरा दिवस होता. अद्याप सूर्य अस्त झाला नव्हता चार सहा घटका दिवस शिल्लक होता. राजाराम महाराज यांचा काळ आला हे ऐकून अंबिकाबाई राणीसाहेब वाड्यातून सदरेवर आल्या. सदरेचे हवालदार सरनोबत यांनी मुजरा केला, ‘आम्ही सहगमन करणार’ असे राणीसाहेब यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी जमलेल्या सर्वानी ‘महाराजांचा काळ सिंहगडवर झालेला आहे आणि आज तिसरा दिवस आहे’ असे सांगून परावृत्त केले पण अंबिकाबाई साहेब यांनी ‘आपणास ज्या दिवशी समजले तोच मुख्य दिवस असल्याचे’ सांगून सती जाण्याचा त्याचा निर्धार असून ‘सतीचे साहित्य लवकर आणा तुम्हास छत्रपती महाराज साहेबांच्या पायाची आण आहे’ असे सांगितले. तेव्हा मालकापूरहून सतीचे साहित्य आणावे लागेल, तर आता दिवस थोडाच राहिला आहे, सध्या दिवस फार धामधुमीचे आहेत, तशातच किल्ल्याचे काम चालू आहे आणि सतीचे साहित्य आणावयास रात्र होईल असे सांगितल्यावर राणीसाहेबानी ‘स्वार पाठवून साहित्य आणावे मी सती गेल्याशिवाय सूर्य अस्ताला जाणार नाही’ असे सांगितले. त्यावर सरनोबताचे मनात शंका आलेली पाहून अंबिकाबाई राणीसाहेबानी सदरेवर सावली आलेली होती त्या ठिकाणी मातीचा एक छोटासा ढिगारा करून त्यावर पळसाचे एक पान खोचून ठेवले. ‘यास ओलांडून सावली जाणार नाही’ असे सांगताच सरनोबत यांनी ‘आज्ञेप्रमाणे स्वार करतो पण त्यास येण्यास वेळ लागेल सूर्य अस्त नंतर गडाचे दरवाजे बंद होतील राणीसाहेबानी राग मानू नये’ अशी विनंती केली. ‘आपण अस्तमान झालेस रागावणार नाही’ असे सांगितल्यावर स्वार रवाना झाला. स्वार रवाना झाले पासून पळसाचे पानापासून सावली गेली नाही, प्रकाश आहे तसाच होता, स्वार सतीचे साहित्य घेऊन गडावर परत आला. महाराजांचे पागोटे बरोबर घेऊन अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. गडावर सर्वानी स्नान विधी करे पर्यंत प्रकाश दिसतच होता, हे पाहून गडावरील सर्वाना आश्यर्य वाटले. 'सतीचा प्रताप' या बाबतचे वृत्त नंतर पन्हाळ गडावर रामचंद्र पंत अमात्य यांचे कडे लिहून पाठवण्यात आले ते वाचून सर्वाना आश्यर्य वाटले.
त्यावेळी नाईक निंबाळकर घराण्यातील या कन्येचे वय अवघे चोवीस पंचवीस वर्षाच्या आसपास होते. छत्रपतीची राणी झालेवर राजाराम महाराजांच्या निधनानंतर सती जाण्याचा दृढ निश्चय केलेल्या त्या राणीचे पतीव्रत, धर्म पारायनता, छत्रपती चरणी दृढभावना पाहून अशा या राणीस कुणीही वंदन केले शिवाय राहणार नाही.
आजही विशाळगडावर एका चौथर्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात; ती छत्रपती राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई यांची समाधी आहे.

संदर्भ - थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र, मल्हार रामराव चिटणीस
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, गोपाळराव देशमुख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...