विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 April 2019

परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------1


परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------1

हा सवाईमाधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतील मराठी सेनापति होता. त्याचें मूळचें गांव रत्‍नागिरी जिल्ह्यांतील कोतवडें. मूळ पुरुष हरिभट असून यानें पुण्याच्या गणपतीजवळ १२ वर्षें दूर्वारस पिऊन अनुष्ठान केलें. त्यास ७ पुत्र झाले; त्यांचाच विस्तार सांप्रतच्या दक्षिणमहाराष्ट्रांतील पटवर्धन संस्थानिकांचा होय. हरिभट हे घाटावर आल्यानंतर इचलकरंजीकरांचे उपाध्याय बनले. हरिभटाचा सहावा पुत्र रामचंद्रपंत व त्यांचे पुत्र परशुरामभाऊ होत. रामचंद्रपंत हे पुण्यास पेशव्यांजवळ असत व स्वार्‍याशिकारीस त्यांच्याबरोबर जात. त्यांचा पराक्रम पाहून थोरल्या बाजीरावानें त्यानां अडीच हजार स्वारांचे पथके केले. माळव्याची स्वारी (१७३५) व वसईची मोहीम (१७३९) यांत पंतानें पराक्रम गाजविला होता. त्यामुळें वसई किल्ल्याची फडणविशी त्यांना मिळाली. पुढें उत्तरेकडील एका स्वारींत भागिरथीकांठीं शिवपुरास पंत वारले (१७४३). परशुरामभाऊचा जन्म १७३९ सालीं झाला. बाप वारल्यावर मग भाऊंची मुंज झाली; बापाचे पथक त्यांच्यामागें भाऊकडे आलें. तेव्हां भाऊ लहान म्हणून पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे कारभार पहात असत. दमाजी गायकवाडाच्या सातार्‍यावरील स्वारींत हें पथक होतें (१७५१). सावनूर (१७५५-५६) च्या मोहिमेंत भाऊ प्रथम लढाइवर गेले. मुख्य सरदारी गोपाळराव पटवर्धन करीत असत. ते निजगलच्या लढाईनंतर (१७७०) थोडयाच दिवसांनीं वारले; मरणापूर्वीं त्यानीं भाऊंस माझें नांव तूंच रक्षण कर असें सांगितलें होतें. त्यानंतर भाऊंस सरकारचाकरी करण्यासाठीं नेहमीं पुण्यास राहावें लागे व मोहिमेवर जावें लागे. हैदरावरील एका स्वारींत भाऊंची एकामागून एक अशीं तीन घोडीं मेलीं, तरीहि भाऊंनीं शौर्य गाजवून हैदराचा पराभव केला. त्यामुळें पेशव्यानीं त्यांना वीस हजारांची तैनात दिली. पुढें १७७६ सालच्या पावसाळ्यानंतर पुन्हां भाऊंस हैदरावर पाठविलें होतें; परंतु त्यावेळीं त्यांचा मदतनीस निजामाचा सरदार धौशा यानें हैदराकडून लांच खाऊन लढाईचा मामला बिघडविला, त्यामुळें भाऊ परत फिरले. बारभाईचें कारस्थान सुरू होण्यापूर्वी दादासाहेबांच्या निजामावरील स्वारींत भाऊ दाखल होते. गंगाबाईस पुण्याहून काढून मिरजेस नेण्याचा भाऊंचा बेत होता पण तें जुळलें नाहीं (१७७३). पटवर्धनी फौजेवर भाऊंची मुख्य सरदारी १७७७ सालीं सुरू झालीं.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...