छत्रपति संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, '...राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...'. युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा आपण जर आढावा घेतला तर आपल्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
संतजनांस राजाश्रय:
१. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजन्त्रीची कायमची व्यवस्था लाऊन दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)
३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पुजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पदवी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)
४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या माणसांस, शेतापोतास तसेच गुरांढोरास काडीचाही तसविज देऊ नये यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोवेंबर १६८०)
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे ई. गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यास '...श्री चे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?...' अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना '...जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील...' अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी '...धर्मकार्यात खलेल न करणे..' अशा शब्दात ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून '...धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही...' असे अभिवचन दिले आहे.
No comments:
Post a Comment