विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 July 2019

चिमाजी अप्पा आणि मोघल सुभेदार

चिमाजी अप्पा साठी इमेज परिणामचिमाजी अप्पा आणि मोघल सुभेदार यांच्यात प्रचंड युद्ध झाले.
चिमाजी अप्पा स्वतः घोड्यावर स्वार होऊन मराठी फौजांचे नेतृत्व करत होते. फौज पूर्णपणे शिस्त पालन करून शत्रूवर तुटून पडत होत्या. गनिमी काव्याचा अतिशय यशस्वी उपयोग स्वराज्याच्या फौजांकडून होत होता. लढाईवर अगदी पहिल्या क्षणापासूनच त्यांची पकड होती, ती वेगाने अधिकाधिक घट्ट होत चालली होती. अनेक ठिकाणहून मारा होत असल्याने मोघलांना कुठेही फळी रचता येत नव्हती. राणोजी, मल्हारराव आणि उदाजी यांनी मोघल छावणीला दोन दिशांनी चांगलाच मार दिला होता. एका दिशेस चिमाजी अप्पा आणि अन्य बाजूस अनेक सरदार मोघलास सळो की पळो करून सोडत होते.
आपल्या हातून लढाई जात आहे असं लक्षात आल्यावर गिरीधर बहाद्दूरने स्वतःभोवती फौजेस कडे करायला सांगून स्वतः हत्तीवरून प्रत्यक्ष लढाई सुरु असलेल्या ठिकाणी घुसला. हातात धनुष्य घेऊन तो स्वराज्याच्या फौजांवर सपासप बाण सोडू लागला. प्रचंड वेगाने येणारे बाण सैनिकांना लागू लागले. गिरिधराच्या पराक्रमाने आजूबाजूच्या मोघल सैन्यास आणि सरदारास चेव आला. त्यांनी अंगीचे सर्व बळ एकवटून स्वराज्याच्या फौजेस कडवा प्रतिकार द्यायला सुरुवात केली. फौजेची एक बाजू पडू लागली हे कळताच चिमाजी अप्पा हुजुरातीच्या सैन्यासह त्या बाजूस वेगाने घुसले. खुद्द चिमाजी घोड्यावरून दोन्ही हातात तलवारी घेऊन मोघलांच्या कड्यात घुसले. चिमाजी सोबत अनेक सैनिक देखील कापाकापी करत मोघल सैन्याच्या फडशा पाडू लागले. बाणांनी वेध घेणाऱ्या गिरीधराकडील बाणांचा साठा संपत आलेला होता. बाणांनी भरलेले चार भाते त्याने मराठी फौजांवर रिते केलेले होते. आता तो खास बनवलेल्या मोठ्या भाल्याचा उपयोग करत होता.
स्वराज्याच्या फौजांवर लढाई बेतणार असे वाटू लागले होते इतक्यातच चिमाजी अप्पा मोघालांचे कडे भेदून आत शिरल्याने फौजांना पुन्हा चेव आला. त्यांनी नेटाने लढाई सुरु ठेवली. तसा मोघल फौजात आलेला जोश मवाळू लागला. आतापर्यंत मोघलांच्या सर्व तोफा मराठी फौजांनी पाडाव केलेल्या होत्या.
लढाईला तोंड फुटून दोन प्रहर होत आले होते. अजूनही कापाकापी सुरूच होती. प्रचंड शक्तीने दोन्ही फौजा एकमेकांवर हल्ले करत होत्या. मोघलांची छावणी आता रणांगण झालेली होती. गिरीधर बहाद्दूरचा शामियाना देखील स्वराज्याच्या तडाख्यातून वाचला नव्हता. मल्हारराव आणि दया बहाद्दूर ह्याच्या फौजा एकमेकांना भिडल्या होत्या. धुळीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरलेले होते.
इतक्यात चिमाजी अप्पा घोड्यावरून चक्रव्युहात घुसत गिरीधर असलेल्या हत्तीच्या सामोरे गेले. गिरीधरने हत्तीस अंकुश मारिला, हत्ती चवताळून सैरावैरा धावू लागला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक सैनिकास पायाखाली तुडवत, सोंडेत जे सापडतील त्यास सोंडेने उचलून गरागरा फिरवत दूर फेकू लागला. हत्तीस मोघल आणि मराठी ह्यातला भेद थोडीच कळणार होता, जो समोर येईल त्याचा चुराडा होत होता. हत्तीचे गंडस्थळ रक्तबंबाळ झाले तरी गिरीधर स्वतः त्यास अंकुशाने मारत होता. हत्ती अधिकच चिडून धावत होता. हत्तीच्या पायाखाली चिमाजी अप्पांना तुडवावे ह्या हेतूने गिरीधर वाटचाल करीत होता. चिमाजीच्या जवळ थोडकेच मराठी शिलेदार होते. त्यातल्याच एकाने चिमाजीस बंदुकीत बार भरून दिला. चिमाजीने गिरीधर बहाद्दुराचा वेध घेतला आणि बंदुकीचा चाप ओढला. वेगाने गोळी गिरीधराच्या दिशेने जात त्याच्या छातीत घुसली. क्षणात गिरीधर हत्तीवर हौद्यात कोसळला. मोघल फौजा अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गेल्या. सुभेदार पडला हे दिसल्यावर सर्वत्र धावाधाव सुरु झाली. गिरीधरचा हत्ती स्वराज्याच्या शिलेदारांनी कड करून आपल्या ताब्यात घेतला. सगळीकडे गोंधळ उडाला. मोघल सैन्य वाट मिळेल तिकडे धावू लागले. सरदार पाडाव होऊ लागले. मोघलांची अफाट फौज विस्कळीत झाली.

धन्यवाद.
~आदित्य रुईकर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...