विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 July 2019

अठराशे सत्तावन्न चा महाराष्ट्र आणि ब्रिटिशांविरुध्दचा उठाव योजना ....


अठराशे सत्तावन्न चा महाराष्ट्र आणि ब्रिटिशांविरुध्दचा उठाव योजना .......
१८५७ च्या सशस्त्र क्रांती युद्धाची ठिणगी पडली.या उठावामुळे ब्रिटिश सरकार डळमळते की काय अशी अवस्था झाली होती.
रंगो बापुजी गुप्ते आणि त्यांच्या साथीदारांनी मनुष्यबळ, द्रव्यबळ, आणि साधन मिळवण्यासाठी प्रयत्न केले.येनवडे, वाठार, देऊर, वर्धनगड,वारुगड,अरबी, कळंबी,कर्हाड,अरळे,अर्जुनगड,येकमुल्ली, जकातवाडी,फलटण,पंढरपुर,बेळगाव,शहापुर आणि कोल्हापूर असे रंगरुट भरतीचे मुख्य अड्डे होते.
सातारा , सातारा -मेढा रस्त्यावरील हमदाबाद गाव हे मुख्य ठाणे होते. सातारा मंगळवार पेठेत बाळाजी शिंप्याचे घर,कृष्णेश्वर मंदिराजवळचा "गोसावी वाडा", आणि विठोबा नळाजवळील सखाराम दाजी काबाडे यांचे घर ही रंगो बापुजींची मुख्य आश्रयस्थळे होती.
कोल्हापूर ला असणारे सातार्याचे तात्या फाडणीस , कराडचे दौलता पवार कोकणातील रंगो बापुजींचा मेहुणा केशव निळकंठ उर्फ अण्णातात्या चित्रे भोरमधील शेट्ये बंधु तसेच सातारा च्या २२ वे नेटीव पलटणीकडे दफ्तरदार असलेले गणेश सखाराम कारखानीस हे सर्व रंगो बापुजींच्या योजनेत सहभागी होते.
रंगो बापुजी आणि त्यांचे साथीदार यांनी कमीतकमी दोन हजारची कुमक मिळवली होती.योजनाही तयार करण्यात आली होती. या कुमकीच्या सह्याने सातारा येथील तीनशे कैयांना कैदेतुन फरार होण्यास मदत करायचे असे ठरवण्यात आले होते.सातारा, महाबळेश्वर, यवतेश्वर येथे राहणार्या युरोपियन लोकांना लक्ष्य केले होते. त्यांच्यांवर हल्ला करायचा , सरकारी तिजोरी लुटायची आणि सातार्यात उठाव करायचा अशी योजना रंगो बापु गुप्ते आणि त्यांचे सहकारी यांनी मिळुन तयार केली होती.
सातार्यात पुन्हा गादी स्थापन कृरायची.... प्रतापसिंह यांचे दत्तक पुत्र शाहु उर्फ काशीराजा (जंगली महाराज) अथवा बोवा महाराज यांना गादीवर बसवायचे आणि इंग्रजांविरुद्धचा उठावाची संपुर्ण देशात उभारणी करायची अशी योजना करण्यात आली.सातार्यात असलेली इंग्रजांची बावीसावी नेटीव फितुरी करुन फोडायची...असेही खलबत झाले. यासाठी गुप्त योजना आखल्या जात होत्या.सभा घेतल्या जात होत्या.
मानसिंह नावाचा एक शिपाई जो सातारा तुरुंगाचा पहारेकरी होता रंगो बापुजींच्या योजनेत तोही सामिल झाला होता.बावीसावी पलटन तर फोडायचीच पण "घेंडा-रेजिमेंट"(स्थानिक घोडदळ) तसेच दक्षिण मराठा रेग्युलर घोडदळ(मुःगलाई सवार) यांनाही यात सामिल करुन घेण्यासाठी योजना बनवण्यात आली.या सैन्यासोबत दारुगोळा उपलब्ध होईल आणि भोरमधील दारुगोळ्याचे कोठार ही मिळेल.त्याच बरोबर तोफेचे कुल्फीगोळे रंगो बापुजींनी यार ठेवले होते.इतर सहकारी ही तयारीत होते त्यांनी तलवारीसारखी शस्त्रे जमवलेली ,आत्माराम उर्फ आप्पा ऐतवडेकर हे रंगो बापुजींचे सहकारी त्यांनी स्वतः आठशे वीस स्फोटक गोळे तयार ठेवले होते. दोन हजार माणसांसह हल्ला करायचा... कैदेतले तीनशे कैदी मुक्त करायचे आणि भोरच्या पंत सचीव यांनी या कामात सर्वर्थाने मदत करायची असे ठरवण्यात आले. पेशवे व इतर मांडलीकांनी या उठावाला संधी पाहुन येऊन सामिल व्हायचे,,..यातील सर्व बातम्या सातारा राजवाड्यातल्या राजघराण्यातल्या मंडळींपर्यत पोहचवायच्या, अशी गुप्त योजना ठरवली गेली.
या योजनेप्रमाणेच अजुन एक महत्वपुर्ण योजनेचा यात समावेश होता.....
ईस्ट इंडीया कंपनी कडील सातारा येथील पोलीसांचे प्रमुख अंबाजी शिर्के उर्फ बोवासाहेब यांनी प्रतापसिंहांच्या थोरल्या राणीसाहेब यांची भेट घेऊन त्यांनाही या कटात सहभागी करुन घेतले होते. उठावाच्या वेळी पोलीसांनी या क्रांतीकारकांना कोणताही अटकाव न करता निष्क्रिय रहायचे असे ठरवण्यात आले होते.
या उठावाच्या योजने आधी एक वर्ष...१८५६ साली सातार्यात चाळीस हजार रोहिला आणण्याचे काम(कारस्थान) अंबाजी राजेशिर्केंचेच होते.भोरपासुन खानापुर, बेळगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यत इंग्रजांच्या विरोधात उठावासाठी गुप्तपणे पैसाही उभारण्यात येत होता.
वाळवा-कोल्हापुर हे केंद्र होते. दक्षिण महाराष्ट्र केंद्र प्रमुख संचालक म्हणुन कोल्हापुरचे चिमासाहेब हे काम पाहत होते.त्यांच्या सल्ला मसलतीने रंगो बापुजी योजना आखत होते. या उठावाचे धागेदोरे सावंतवाडी पर्यत दुरवर पसरले होते.
१८५७ च्या उठावासाठी सर्व धर्मातले, जातीतले, उच्च -कनिष्ठ सर्व वर्गातले लोक एकत्र आले होते.
कानपुरात १२जुन १८५७ रोजी इंग्रजांविरुध्द उठावाची तयारी झालेली आणि इकडे त्याच तारखेस सातार्यात रंगो बापुजींनी उठावाची योजना ठरवली होती.
यासाठी छ.प्रतापसिंह यांचे दत्तक चिरंजीव शाहु (छ.प्रतापसिंहांचे सेनापती बाळासाहेब यांचे पुत्र) आणि सेनापती दुर्गासिंग यांचे घोडे सज्ज होते.परःतु फितुरीमुळे या योजनेच्या पुर्ततेआधीच सर्व योजना इंग्रज अधिकार्यांपर्यंत गेली.
मानसिंग ला पकडण्यात आले. त्यास १२जुन रोजी तोफेच्या तोंडी देण्यात आले.
याबाबत ज्ञानप्रकाश (२१जुन१८५७ आणि १७ आॕगस्ट १८५७) यात छापुन आलेला मजकुर असा की.......
" गेले गेले गुरुवारी साताराच्या थोरल्या राणीसाहेब यांचे दत्तक चिरंजीव काशी महाराज( म्हणजे जंगली महाराज उर्फ शाहु) यांना भल्या सकाळी सहा वाजता धरुन नेण्यात आले.राजवाड्याला मुगलसवार पलटणीतील दोनशे सोजीरांनी वेढा घातला. दोन भरुन आणलेल्या तोफाही आणण्यात आल्या होत्या. आपण बंडात सामिल असल्याचा वहिम कंपनी सरकारास आला असुन आपणाला पकडुन पुण्याला पाठवण्याबद्दल गव्हर्नर साहेबांनी हुकुम केला आहे असेही प्रथम काशीराजांना सांगण्यात आले.त्यांच्या मातोश्रींनाही तसेच सांगण्यात आले.
नंतर काशीमहाराज, प्रतापसिंहांच्या सेनापतींचे चिरंजीव आणि प्रतापसिंह यांच्या सेनापतींच्या चुलत्यांचे चिरंजीव परशुराम बाबा या तिघांना रथात घालुन त्यांच्या मागोमाग माईसाहेब,राणीसाहेब(आईसाहेब) आणि परशुराम बाबांच्या पत्नी या एका गाडीतुन चालवल्या व त्यांना थेट खडकीला नेण्यात आले."
* त्यानंतर लेफ्टनंट केर याचेमार्फत बोवासाहेब उर्फ अंबाजी शिर्केंचा वाडा पाडण्यात आला.मग "काकासाहेब" यांची चौकशी करण्यात आली. राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यांवर ठेऊन त्यांची मिळकत जप्त करण्यात आली.त्यांना जन्मठेपाची शिक्षा देण्यात आली.
(या प्रसंगाबाबत विनायक कोंडदेव ओक यांनी लेखन केलेले आहे)
**************
* संदर्भ -अठराशे सत्तावनचा महाराष्ट्र याबाबत पु. खृपा. गोखले(कराड) यांनी लिहलेल्या लेखनावर आधारित
*******------- **********---------*******

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...