विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 August 2019

इतिहासातील सर्वात जास्त शापित राजपुत् शहाजीराजांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजी महाराज





संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हे तर ज्येष्ठ बंधू अर्थात
शहाजीराजांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजी महाराज. स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतींचं आयुष्यही शापितच होतं परंतु किमान त्यांचा राज्याभिषेक तरी झाला होता. त्यामुळे राजपुत्र या सदरात त्यांचं नाव लिहिणं तर्कसुसंगत ठरणार नाही.
शहाजी राजांना पहिल्या पुत्ररत्नाची प्राप्ती तेव्हा झाली तेव्हा शहाजीराजे निजामशाहीत होते. निजामशाही संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरला आले. मधल्या काळात मुघलांशी अभूतपूर्व झुंज दिली. याच काळात यवनांपुढे मुजरे झोडणारे ‘लखुजीराजे’ शहाजीराजांवर चालून आले होते. शहाजीराजे विजापूर वाचवण्यासाठी जेव्हा विजापूरास आले जवळपास त्याच काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
कालांतराने शिवाजी महाराज जिजाऊंंसोबत पुण्यात आले. शहाजी राजे ज्येष्ठ चिरंजीवासोबत विजापूरास राहिले. कर्नाटकातल्या नायंकाचा बिमोड करायला म्हणून विजापूर दरबाराने शहाजीराजांना पाठवलं. शहाजीराजांनी कर्नाटकचा मोठा प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. ते स्वतंत्र राजे म्हणूनच राहू लागले. त्याचबरोबर नायकांच्या बंडाळीला नवचैतन्य दिलं. यामुळे आदिलशहा संतापला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात थैमान घातलं होतं. यामुळे संतापलेल्या आदिलशहाने शहाजीराजांना अटक करुन शिवाजी महाराजांना शह देण्याचं ठरवलं. यासाठी बाजी घोरपड्याची नियुक्ती केली. बाटगा अधिक जोरात बांग देतो असं म्हणतात तसंच या घोरपड्याने शहाजी राजांना अटक केली.
यामुळे महाराष्ट्र शिवाजी महाराज व कर्नाटकात संभाजी महाराज चवताळून उठले. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे लचके तोडले तर संभाजी महाराजांनी बंगळूर आसपासच्या हाताखालचा परिसर ताब्यात घेतला. विजापूरने पाठवलेला प्रत्येक यवन या दोघांनीही कापून काढला. शिवाजी महाराजांनी फत्तेखान पळवला व मुसेखान मारला तर संभाजी महाराजांनी बंगलोर मधील एकूण एक यवन फौज कापली व विजापूरहून आलेल्या रुस्तमेजमावर स्वतःच चालून जाऊन त्या फौजा सुद्धा अल्लाकडे पाठवल्या.
यामुळे आदिलशाहीला दणदणीत हादरा बसला व आदिलशहाने शहाजीराजांची मुक्तता केली. याच कारणामुळे बाजी घोरपडे व अफझलखान यांचा द्वेष पराकोटीला पोचला. शहाजीराजे बंगलोरला आले. तिथे ते नावापुरते मनसबदार होते. त्यांचं पूर्णपणे स्वतंत्र राज्य होतं. राजांकडे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार सुसज्ज सैन्य होतं आणि मुख्य म्हणजे हे सर्व बघायला संभाजी महाराज समर्थ होते.

याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून शहजादा औरंगजेब आला. त्याने मीर जुम्ल्याला बंगळूरवर पाठवलं. हा जुम्ला मोठ्या झोकात बंगळूर वर चालून आला आणि नेहमी प्रमाणे शहाजी, संभाजी या जोडीने दिलेला सणसणीत व दणदणीत मार खाऊन परत आला. त्यानंतर शहाजीराजे व संभाजी राजांनी कर्नाटकात पुन्हा पराक्रमाची शर्थ केली व जवळपास संपूर्ण दक्षिण भारत आपल्या कह्यात आणला. याच काळात कनकगिरीला संभाजी महाराजांनी वेढा घातला. याच वेढ्यात अफझल खान सहभागी झाला आणि याच नीच अफझल्याने या वेढ्यात संभाजी महाराजांचा धोक्याने बळी घेतला.
शहाजी राजांनी संभाजी महाराजांचा युवराज म्हणून यौवराज्याभिषेक केला होता. संभाजी राजे हे शहाजी राजांच्या तालमीत तयार झाले होते. रणांगणात अपार पराक्रम गाजवला होता. महाराष्ट्रात शिवाजी व कर्नाटकात संभाजी या दोघांनी स्वतंत्र राज्य प्रस्थापित करावं हा शहाजी राजांचा मानस होता. स्वराज्य पूर्णपणे स्थिरस्थावर झाल्यावर वरुन शिवाजी महाराज व खालून संभाजी महाराज अशा दोघांनीही आदिलशाही संपवून दक्षिणेत यवनांची शेवटची कबर बांधली असती. यामुळे शिवाजी महाराज नर्मदा ओलांडून उत्तरेत जायला मोकळे झाले असते. कदाचित काशी, मथुरा त्यांनीच मुक्त केली असती आणि अशा रीतीने पूर्ण भारत हा यवनांच्या मगरमिठीतून मुक्त झाला असता. इंग्रजांची डाळ कधीच शिजली नसती.
हे सर्व झालं नाही याची अनेक कारणं आहेत परंतु संभाजी महाराजांचा अकाली मृत्यू हे प्रमुख कारण आहे. दक्षिण भारताचा भावी सम्राट म्हणून ओळखला जाणारा राजपुत्र राज्याभिषेक न होताच स्वर्गवासी झाला म्हणून त्यांना अभागी म्हणायचं की शहाजी राजांनंतर संभाजी महाराज नसल्याने एकोजीकडे सर्व सैन्य जाऊन शहाजी राजांच्या स्वप्नांची झालेली नासाडी पाहात असल्याने स्वतःला अभागी ठरवायचं हे ज्याचं त्याने ठरवावं.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...