विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!



गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!

पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेतील सुटलेली पकड मजबूत करण्यासाठी नवीन तरुण पेशवा माधवराव यांनी सुभेदार मल्हारराव होळकर, रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्णा बिनीवले याना नामजाद केले. खरे पाहता हे काम पेशव्यांचे काका रघुनाथराव यांनी करायचे असे ठरले होते, परंतु कर्तव्यशून्य राघोबाला ते पेलले नाही. दरम्यान सुभेदार होळकरांचा मृत्यू झाला. अशा परिस्थिती उत्तरेची जबाबदारी शिंदेच्या एकुलता एक वंशज महादजी शिंदे वर येणे क्रमप्राप्त होते आणि महादजींनी सुद्धा ती जबाबदारी समर्थपणे पेलली ह्यात शंका नाही.
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची उत्तरेतील पकड ढिली होऊ लागली. रोहिल्यानी उचल खाल्ली आणि दिल्ली काबीज केले. दुसऱ्या बाजूला प्लासी आणि बक्सारच्या लढाया जिंकून इंग्रजांनी दिल्लीला शाह द्यायची तयारी चालवली. पण प्रत्यक्ष दिल्लीवर कब्जा करण्याइतपत सामर्थ्य नसल्याने इंग्रजांनी मोगल बादशहा शहाआलमला ताब्यात घेऊन त्याला पाटणा, अयोध्या करीत शेवटी अलाहाबादेत स्थानापन्न केले.
यावेळी दिल्ली नजीबखानचा मुलगा झाबेतखानच्या ताब्यात होती. मराठ्यांनी अंतर्वेदीतील रोहिल्यांचा प्रदेश जिंकून झाबेताला शह दिला. दिल्लीमध्ये प्रवेश करून ७ फेब्रुवारी १७७१साली दिल्ली शहरात शहाआलमच्या सत्तेची द्वाही फिरवली. झाबेतखान लाल किल्ल्याचा ताबा द्यायला तयार नव्हता. महादजींनी एल्गार पुकारून अवघ्या ३दिवसात लाल किल्ल्यावर भगवा फडकवला..!
( अलिजाबहद्दर महादजी राणोजी शिंदे सरकार; १७३०-१७९४)
२५ डिसेंम्बर, १७७१ बादशहाचा दिल्ली प्रवेश महादजींच्या नेतृत्वाखाली झाला व बादशहा पुन्हा एकदा तख्तावर बसला. तिथे महाराष्ट्रात मृत्यूशय्येवर असलेल्या श्रीमंत माधवराव पेशव्यांनी याबाबत मराठा सरदारांना व विशेष करून महादजींचे अभिनंदन करताना म्हंटले, "इंग्रजांस जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळवला. इंग्रजांचा प्रवेश दिल्लीत होऊ नये. प्रवेश जालिया उखलणार नाही." असा इशारा द्यायलाही पेशवे विसरले नाही.
महादजींचा दरारा दिल्लीत वाढला. परंतु ते आता इथवर थांबणार नव्हते. त्यांनी झाबेतखानाच्या मुलूखवर हल्ला चढवला. तसा झाबेतखान पळत सुटला. शुक्रताल मराठ्यांच्या हातात आले. आता मराठी फौज आणि शाही फौज पत्थरगडकडे आली. हा किल्ला रोहिल्यांची राजधानी नाजीबाबादच्या पूर्वेला एक मैलावर नाजीबखान रोहिल्याने बांधला होता. मराठ्यांनी पत्थरगडला वेढा दिला. स्वतः बादशहा जलालाबादला आला होता. पत्थरगड बळकट किल्ला होता. तोफा आणि दारुगोळा मुबलक होता, परंतु अन्नसाठा कमी होता. गडावर फक्त बायका-मुले होती. अफगाण शेजारी असलेल्या तराईच्या जंगलात पळून गेले होते. पत्थरगडचा वयोवृद्ध किल्लेदार सुलतानखानचा आत्मविश्वास खचत चालला होता. शेवटी किल्ल्यातील बायकांच्या इभ्रतीला आणि किल्ल्यावरील लोकांच्या जीवितेला धक्का पोहोचू नये, ह्या अटीवर त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला. १६मार्चला पत्थरगड मराठ्यांना मिळाला. प्रत्येक अफगाणाची कसून झडती घेण्यात आली. मराठ्यांनी अफगाण स्त्रियांच्या अंगाला हात लावला नाही. पत्थरगडमध्ये मराठ्यांना खूप लूट मिळाली. मराठ्यांनी रोहिल्यांवर मोठा विजय मिळवला. ह्या विजयाचे शिल्पकार होते,
पत्थरगडमध्ये नाजीबाची समाधी होती ती फोडून त्याची हाडे फेकून त्यांवर नाचणारे, साऱ्या अंगाला त्याची भुकटी फासून आनंद साजरा करणारे विसजीपंत बिनीवले,
आणि..
..अख्ख्या रोहिलखंडात जमिनीवर २ वीट ही बांधकाम असेल तर तोफा लावून उडवण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेले महादजी शिंदे..!
दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मान्सुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबखानचे खानदान. हे वैर मराठ्यांना तीन पिढ्या पुरले आणि तिन्ही पिढ्यांचे साक्षीदार होते स्वतः महाराजा महादजी शिंदे! अर्थात पानिपतच्या वेळी महादजींना नजीबाविरुद्ध फार काही करायची संधी मिळाली नाही. पण नजीबचा मुलगा झाबेत आणि नातू गुलाम कादिर यांचा पुरता नक्षा उतरवून त्यांना घुडघ्यावर आणले.
दिल्लीच्या बादशहाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधीचे म्हणजे "वकिलीमूत्लक" पद पदरात पाडून त्याद्वारे सर्व हिंदुस्थानचा कारभार ताब्यात घेण्याचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जचा कावा महादजींनी हाणून तर पडलाच, परंतु हे पद स्वतःच्याच पदरात पडून त्याचा डाव उलटवला. महाराजा महादजी शिंदे "हिंदुस्थानचे पाटील" बनले.
४ डिसेंम्बर १७८४ला बादशहाने भव्य दरबार भरवून साम्राज्यातील देण्यात येणारी सर्वश्रेष्ठ पदवी "वकील-इ-मुतालिक" श्रीमंत महाराजा महादजी शिंदे ह्यांना मोठ्या आनंदाने दिली आणि त्याच्या नंतर तब्बल २०वर्ष म्हणजे १८०३पर्यंत लाल किल्ल्यावर भगवा डौलाने फडकत राहिला.
वकील-इ-मुतालिक, सुरमा-ए-हिंद, सिपाह सालार, फतेह जंग, नायाब-ए-मरहट्टा, श्रीमंत महाराजा आजम अलिजाबहाद्दर महादजी शिंदे सरकार ह्यांनी दत्ताजी शिंदेंच्या हत्येचा आणि पानिपतच्या पराभवाचा कलंक धुवून टाकला. मराठी पराक्रम उत्तरेत निनादु लागला. कुठे पुणे, कण्हेरगड आणि कुठे उत्तरेतील पत्थरगड ? पण ह्या भीमथडी तट्टांनी गंगा-यमुनेचा प्रदेश जोरदार तुडवला. रोहिल्यांचा त्यांच्याच प्रदेशात घुसून परभाव केला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...