विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपरिचित घटना




स्वराज्याचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर स्फुरण चढत नाही असा मनुष्य विरळा. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी जे काम करून ठेवले आहे त्याला तोड नाही.
जसे जसे इतिहासात अधिक संशोधन होत जात आहे तसे महाराजांचे अनेक पैलू समोर येत आहेत.
शिवाजी महाराजांनी भक्कम स्वराज्य बांधणीसाठी आपले किल्ले अधिक मजबूत बनविले. दाण्यापाण्याची व्यवस्था ठेवली,किल्लेदार नेमले. पार ठेवण्यासाठी बुरुज बांधले.अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून भूमिगत कोठारे तयार केली,शत्रूचा वेढा पडलाच तर निसटून जाता यावे म्हणून चोरवाटा तयार केल्या.
अलीकडे शिवाजी महाराजांचे वास्तव्य १६७७ साली मद्रासपट्टनम(आजचे चेन्नई) परिसरात होते असे पुरावे सापडले आहेत.
आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज प्रत्येक क्षणी स्वराज्याचा विचार करायचे.स्वराज्य आणखी मजबूत कसे करता येईल असा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनात असायचा.
शिवाजी महाराजांना ब्रिटिशांकडे असलेल्या ज्ञानाची त्यांना कल्पना होती आणि खुद्द ब्रिटिश लोकही शिवाजी महाराजांना सुरतेच्या दोनदा झालेल्या लुटीपासून चांगलेच ओळखत होते.ब्रिटिशांनी मद्रासमध्ये थोडेफार बस्तान बसविले असतांनाच त्यांना शिवाजी वेल्लोर आणि जिंजीवर कब्जा मिळविण्याच्या रस्त्यावर असल्याची खबर मिळाली तेव्हा मद्रासमधील जनतेमध्ये खळबळ उडाली आता मद्रास शहर लुटले जाते की काय अशी धास्ती ब्रिटिशांना वाटू लागली.
९ मे १६७७ ला ब्रिटिशांनी एक शहर सुरक्षा परिषद भरविली आणि शहराची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
लवकरच शिवाजी महाराज शहराजवळ आले.१४ मे रोजी त्यांनी एक ब्राह्मण आणि दोन अन्य इसम ब्रिटिशांकडे संदेश घेऊन पाठविले.ब्रिटिशांनी जरा धास्तीनेच तो संदेश वाचला.त्यात महाराजांनी ब्रिटिशांकडे काही औषधी खडे आणि विषावरील उताऱ्यांची मागणी केली होती आणि त्याबद्दल पैसेही देऊ केले होते.
ब्रिटिशांना हायसे वाटले,त्यांनी अत्यंत नम्रपणे महाराजांचे पैसे नाकारले आणि भेट म्हणून त्यांची मागणी पूर्ण केली,वर त्या ब्राह्मणाचा सत्कार केला त्याला चांगले ३ यार्ड लांबीचे कापड भेट म्हणून दिले आणि काही चंदनापासून बनविलेल्या वस्तू दिल्या.
ब्रिटिशांकडे वैद्यकीय ज्ञानासोबत उत्तम प्रकारचे अभियंतेही आहेत आणि याचा उपयोग आपण स्वराज्य बळकट करण्यासाठी करून घेऊ शकतो असा विचार शिवाजी महाराजांच्या मनात होता.
महाराजांनीं त्यांच्या अभियंत्यांची मागणी करण्याकरिता २२ सप्टेंबर १६७७ या दिवशी त्यांनी आपले दोन हेर अभियंत्यांच्या मागणीचे पत्र घेऊन सेंट जॉर्ज येथील ईस्ट इंडिया कंपनीकडे पाठविले.
ईस्ट इंडिया कंपनी त्याकाळी नुकतेच कोठे बाळसे धरू लागली होती.ब्रिटिश आता मात्र शिवाजी महाराजांच्या ह्या मागणीने दचकले.ब्रिटिश मात्र आपले तंत्रज्ञान शिवाजी सारख्या बलाढ्य शत्रूला पुरवून स्वतःपुढेच संकट उभे करू इच्छित नव्हते.त्यांनी शिवाजीराजेंची मागणी विनम्रपणे नाकारली.त्यांनीही तसे पत्र शिवाजी महाराजांना पाठविले.
ब्रिटिश त्यांच्या अहवालात म्हणतात की,
'सेवेजी राजा याने २२ सप्टेंबरला त्याचे दोन हेर पाठविले आणि इंजिनिअर्स पुरविण्याची मागणी केली,आम्ही तात्काळ कार्यालयीन कारण दिले आणि त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका उत्पन्न केली आणि विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली. तुमच्या प्रशासकीय गोष्टींमध्ये आमचा हस्तक्षेप ही चुकीची गोष्ट होईल असेही सांगितले.'
जॉर्ज टाऊनमधील थंबू चेट्टी रस्त्यावर कालिकांबल मंदिर आहे.एके रात्री देवीची आरती महाराजांनी ऐकली आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी त्यांची पावले मंदिराच्या दिशेने वळाली.त्यांनी मनोभावे देवीची पूजा करून दर्शन घेतले.
फोटोस्रोत :द हिंदू
मंदिरातील कोनशिलेवर स्पष्ट अक्षरांत लिहिलेले आहे की '३ ऑक्टोबर १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले.'
तिथे एक फ्रेम केलेले चित्रसुद्धा दृष्टीस पडते जे 'मद्रास मराठा असोसिएशन'च्या ताब्यात आहे. चित्रात शिवाजी महाराज युद्धाच्या वेशभूषेत बसलेले आहेत,देवीसमोर लीन होत देवीला कमळपुष्प अर्पण करत आहेत.

तंजावूर आणि तामिळनाडूचा काही भाग शहाजीराजे यांच्या अधिपत्याखाली होता त्यांनी तो नंतर व्यंकोजी (शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ) यांना दिला होता. शिवाजी महाराजांनी तेथे काही सैनिकी अधिकारी आणि सैन्य पाठवले होते.त्यांना तेथे मराठा राव असे संबोधण्यात येई.आजही मुंबईत काही मराठा राव आहेत जे तामिळी संस्कृती जोपासतात.यासंबंधी अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
संदर्भ:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...