saambhar :ओंकार ताम्हनकर (Omkar Tamhankar),
इतिहास अभ्यासक
साल १७३१.
पेशव्यांसमोर त्र्यंबकराव दाभाडे यांचं प्रकरण आलं. वास्तविक पाहता खंडेराव दाभाडे आणि बाळाजी विश्वनाथ यांचे चांगले संबंध होते.
शाहू महाराजांनी गुजरात ची सुभेदारी दाभाड्यांना दिली होती. तर त्याच्याच बाजूचा मावळा हा प्रदेश पेशव्यांकडे होता.
पण दाभाड्यांना मावळा हवा होता कारण गुजरात पेक्षा माळवा सुसंपन्न आणि मोक्याचा होता.
यावर तोडगा म्हणून आणि अंतर्गत कलह नको म्हणून बाजीरावांनी अर्धा गुजरात आणि अर्धा माळवा दाभाड्यांकडे आणि उरलेले दोघांचे अर्धे भाग पेशव्यांना द्यावेत ही मागणी शाहू महाराजांकडे केली.
परंतु माळवा ही जागा मोक्याची होती. खंडेरावांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव अजून नवखा होता त्यामुळे माळव्यासारख्या मोक्याच्या जागेवर बाजीरावांसारख्या बलाढ्य सेनानीला ठेवावे हा निर्णय शाहू महाराजांनी घेतला.
या शाहूमहाराजांच्या निर्णयामुळे इकडे दाभाड्यांकडे त्र्यंबकरावांच्या आई उमाबाई चिडल्या. आणि पेशव्यांच्या विरुद्ध शत्रू शोधू लागल्या. आणि शत्रू मिळाला कोण? साक्षात निजाम उल मुल्क !
निजामाला आनंदच झाला. मराठा सरदारांमध्ये दुफळी माजवून माळवा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे कारस्थान होते त्याचे.
परंतु हे सगळे बाजीरावांना कळलेच. त्यांनी ते शाहू महाराजांनाही सांगितले. आणि शाहू महाराजांनी त्यांना गुजरात मध्ये घुसण्याची परवानगी दिली.
१ एप्रिल १७३१ रोजी त्र्यंबकराव दाभाडे आपल्या पिलाजी जाधवराव या सरदाराला घेऊन बाजीराव पेशव्यांविरुद्ध लढण्यास गेले. या दिवशी गुजरात मधील दभई नजीक भिलापूरच्या मैदानात युद्ध झाले. बाजीराव घोड्यावर होते, त्र्यंबकराव हत्तीवर होते. आणि त्र्यंबकरावांना गोळी लागून ते ठार झाले. आणि दाभाड्यांच्या सैन्याचा पराभव झाला. पिलाजी जाधवराव पळून तलेगावाच्या दिशेने गेले. पुढे बाजीरावांना मिळाले.
कितीही झालं तरी त्र्यंबकराव मराठा सरदार होते. त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्यासाठी रक्त सांडले होते त्यामुळे बाजीरावांनी विधिपूर्वक त्र्यंबकरावांचा अतिंसंस्कार केला.
No comments:
Post a Comment