saambhar: ओंकार ताम्हनकर (Omkar Tamhankar),
इतिहास अभ्यासक
' खानजमान शेख निझाम मुकर्रबखां '
मुघल साम्राज्याला/औरंगजेबाला सापडलेला एक हिराच! जबरदस्त माणूस ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडले.
शेखनिजाम हा मूळचा गोवळकोंड्याचा(हैद्राबाद) शियापंथीय दक्खनी मुसलमान शेख. आपल्या उदारता आणि साहस या गुणांमुळे कुतुबशाहीत शिपायापासून सरदारपर्यंत पदोन्नत झाला. औरंगजेबाच्या कुतुबशाही वरील आक्रमणावेळी याने पराक्रमाची शर्थ केली पण औरंगजेबाच्या फितुरीच्या अस्त्रास तो बळी पडला आणि पुढे औरंगजेबाच्या सेवेत दाखल झाला.
शेख निजाम मुकर्रबखां
औरंगजेबाने त्याला ६,००० जात आणि ५,००० स्वरांची मनसब दिली. त्याच्या मुलांना पण मोठ्या मनसबी दिल्या. कोणासही ४००० च्या खालची मनसब दिली नाही. तसेच या शेखनिजामाला 'मुकर्रबखां' हा किताब दिला. शेख निजाम मुकर्रबखां ! मराठी बखरकार या मुकर्रबखानाला इलचीबेग तकरिबखान संबोधतात.
या वेळी स्वराज्यात अशी परिस्थिती होती की औरंगजेबाने स्वराज्याला चोहीबाजूने आवळले होते. अनेक किल्ले फितुरीने किंवा जिंकून मुघलांकडे येत होते. मातरबखानाने नाशिक जवळील बहुतेक किल्ले जिंकून घेतले. अब्दुल्लाखान, निंबाळकर आणि कवी कलशाच्या मुलाबरोबर रायगड ला वेढा देऊन बसला होता. संभाजी महाराजांनी १६८८ सालीच रायगड सोडला होता. त्यानंतर त्यांचं वास्तव्य पन्हाळा किंवा विशाळगडावर असायचं.(येसूबाई आणि शाहू महाराज तसेच इतर राजपरिवार रायगडावरच होता.) औरंगजेबाने मुकर्रबखां आणि आपला मुलगा आझम याला संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यासाठी पाठवण्याचा बेत आखला.
मुकर्रबखां पन्हाळजवळ आला. त्यावेळी संभाजी महाराज खेळण्याहून रायगडच्या मार्गावर होते. संगमेश्वर भागात त्यांचे वास्तव्य होते. पुढे खेड-महाड मार्गे रायगडास जाण्याचा बेत होता.
मुकर्रबखां पन्हाळ्याला वेढा देऊन बसला होता. संभाजी महाराज साधारण १ फेब्रुवारी १६८९ ला संगमेश्वरला पोचले. या दिवशी रात्री ही बातमी हेरांकडवी मुकर्रबखानाला कळली. २ फेब्रुवारी ला पहाटे मुकर्रबखान आणि आझम अनुक्रमे ४-५ हजार आणि ३ हजार सैन्य घेऊन कोल्हापुरातून निघाले आणि कोकणात उतरले. ३ फेब्रुवारी ला संगमेश्वर ला पोहोचले. या सगळ्या मार्गाचे मार्गदर्शन शिर्क्यांनी केले असावे असा अंदाज आहे. यावेळी संभाजी महाराजांबरोबर मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडोबल्लाल आणि ४-५०० सैन्य होते.
खफिखान, मसिरे आलमगिरी नुसार हेरांनी संभाजी महाराजांना मुघल येत आहेत ही बातमी दिली होती पण महाराजांनी बातमीकडे दुर्लक्ष केले. पण इतर साधनात हेरांनी संभाजी महाराजांना बातमी दिल्याची नोंद आढळत नाही.
३ फेब्रुवारी ला सकाळी बहुतेक १०-११ वाजता मुकर्रबखान संगमेश्वरला पोचला. शिर्के आणि हेरांकरवी संभाजी महाराजांच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा शोध त्याने घेतला. आणि थेट वाऱ्याच्या वेगाने संभाजी महाराजांवर चालून गेला. थोड्याश्या लढाई नंतर संभाजीराजे आणि कवी कलश हवेलीत लपले. मालोजी घोरपडे मारले गेले होते. संताजी, धनाजी, खंडो बल्लाळ, संभाजीराजे सर्व पळून जाण्याचा मार्गावर होते. पण कवी कलशाला बाण लागला त्यामुळे संभाजीराजे थांबले. बाकीचे पळाले. पुढे संभाजीराजे आणि कवी कलश दोघेही पकडले गेले.
मुकर्रबखानाचे नियोजन अतिशय उत्तम होते. मराठ्यांचा प्रदेश किती दुर्गम आहे हे त्याला माहित नव्हते असे नाही. तरी त्याने प्राणपणाचा निर्धार करून मोहीम स्वीकारली. त्याचे हेरखातेही अतिशय कार्यक्षम होते.
संभाजी महाराज बेसावध होते. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीही भक्कम संरक्षणयंत्रणा उभी नव्हती. संगमेश्वर हे गाव सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रबळ नव्हते. कवी कलशकडून योग्य सल्ला संभाजी महाराजांना मिळाला नव्हता. कलशामुळे शिर्क्यांना महाराजांनी दूर केले होते. ऐन युद्धाच्या वेळी सुद्धा कवी कलशामुळे ते मागे थांबले.
विभव संवत्सरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेखनिजाम दौड करून येऊन उभयतांस जीवितच धरून नेले. वरकड लोक रायेगडास गेले.
No comments:
Post a Comment