saambhar ::राजेन्द्र म्हात्रे (Rajendra Mhatre),
औरंगजेब मरण पावला त्या दिवशी, म्हणजे १३ फेब्रुवारी, १७०७ या दिवशी महाराजा सूरजमल यांचा जन्म झाला होता. राजा सूरजमल यांना भरतपूर राज्याच्या पायाभरणीचे श्रेय जाते. भरतपूर राजसत्तेची स्थापना १७३३ मध्ये झाली.
सन १७५३ पर्यंत, महाराजा सूरजमलने आपले राज्य दिल्ली आणि फिरोजशाह कोटलापर्यंत वाढविले होते. यामुळे नाराज झालेल्या दिल्लीच्या नवाब गाझीउद्दीनने मराठा सरदारांना सूरजमल याच्याविरूद्ध भडकवले आणि मराठ्यांनी भरतपूरवर आक्रमण केले. त्यांनी अनेक महिने कुम्हेर किल्ल्याला वेढले. असे म्हटले जाते की आक्रमणानंतरही मराठ्यांना भरतपूर ताब्यात घेता आले नाही. उलट, मराठा सरदार मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव होळकर यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर मराठ्यांनी सूरजमलबरोबर तह केला होता.
सुरजमलने भरतपुरात अभेद्य लोहागड किल्ला बांधला. मातीने बनवलेल्या या किल्ल्याच्या भिंती इतक्या जाड झाल्या होत्या की, तोफांचे मोठमोठे गोळेदेखील त्यांना हादरवू शकल्या नाहीत.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली याच्याशी मराठ्यांची चकमक झाली. या युद्धात हजारो मराठा योद्धे ठार झाले. मराठ्यांची रसदही संपली होती. सूरजमलशी मराठ्यांचे संबंध बिघडले नसते तर या युद्धामध्ये त्यांची ही अवस्था झाली नसती. असे असतांनाही सूरजमलने आपली माणुसकी दाखवत जखमी मराठा सैनिकांसाठी वैद्यकीय उपचार आणि खाण्याची व्यवस्था केली.
इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की सूरजमलने मराठा सैन्यातील महिला व मुलांना ग्वाल्हेर, डीग व कुम्हेर किल्ल्यात सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली होती. युद्धात जेव्हा पेशवा आणि मराठा जखमी झाले होते, तेव्हा महाराजा सूरजमल आणि महाराणी किशोरी यांनी सहा महिने मराठा सैन्य आणि पेशव्यांना आश्रय दिला होता.
जर दिल्लीच्या नबाबाशी हातमिळवणी करून मराठ्यांनी सुरजमलशी शत्रुत्व घेतले नसते तर आज इतिहास काही वेगळाच घडला असता असे मानायला जागा आहे कारण सुरजमल हा त्यावेळी उत्तरेतील सर्वात प्रभावशाली राजा होता. किमान, अब्दालीशी संघर्ष होण्यापूर्वी मराठ्यांनी सुरजमलशी सूत बांधले असते, तरी या दिलदार राजाने मराठ्यांची साथ दिली असती.
पण तसे होणे नव्हते !
नमोस्तुते !
सर्व चित्रे व माहिती विकिपीडियावरून
No comments:
Post a Comment