saambhar : शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)
नारायणराव हे पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब व त्यांची धर्मपत्नी गोपिकाबाई याचे सर्वात धाकटे (५ वे) चिरंजीव (१० ऑगस्ट १७५५).
वयाच्या ५ व्या वर्षी त्यांनी पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर आपल्या तीर्थरूपांना गमावले. मुळात पानिपतच्या युद्धतच त्यांचे सर्वात ज्येष्ठ बंधू व पेशवेपदाचे वारस विश्वासराव मारले गेल्यामुळे त्यांचे दुसरे वडील बंधू माधवराव पेशवे झाले (१७६१).
माधवरावांच्या काळात त्यांचे आपल्या मातोश्री गोपिकाबाईंशी खटके उडाल्याने गोपिकाबाई पुणे सोडून गंगापूरला निघून गेल्या (१७६३). तेव्हा नारायणरावचा सांभाळ त्यांची चुलती व सदाशिवराव भाऊसाहेबांची विधवा पार्वतीबाईने केला. तसेच माधवराव व त्यांच्या पत्नी रमाबाई यांना मुलबाळ न झाल्याने त्यांनी नारायणरावांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले.
थेऊर येथे माधवरावांस राजयक्ष्म रोगाने देवाज्ञा झाली (१८ नोव्हेंबर १७७२). माधवरावांनी जाताना नाना फडणवीस व सखारामबापू बोकील यांना नारायणरावांचा सांभाळ व मार्गदर्शन करत पेशवाईचा कारभार पाहण्याची आज्ञा दिली , तसेच त्यांनी आपले चुलते रघुनाथराव दादासाहेब (राघोबादादा) यांना देखील त्यास अनुकूल राहण्याची विनंती केली होती.
माधवरावांच्या शेवटच्या काळात गोपिकाबाई पुण्यात परतल्या होत्या. नारायणराव पेशवे झाल्यावर त्यांनी माधवरावांच्या काळात नाईलाजाने थांबविलेला राजकारणातील हस्तक्षेप पुन्हा सुरू केला. यातच नारायणराव गोपिकाबाईंच्या सल्ल्याने कारभार करू लागल्याने नाना फडणवीस व सखारामबापू बोकील हे वचकून व थोडे अलिप्त राहू लागले.
नारायणरावांचा स्वभाव खूप तापट होता. माधवराव तापट असले तरी चूक झाल्यास मोठ्या मनाने ती स्वीकारत व म्हणून सर्व त्यांना वचकून होते पण नारायणराव मात्र याविरुद्ध दरबारात कुणाचाही अपमान करून बसायचे. त्यांनी कायस्थ प्रभूंच्या विरोधात निर्णय देऊन त्यांना देखील दुखावले होते.
माधवरावांच्या काळात राघोबादादा उपद्रव देत होते पण माधवरावांनी त्यांना गोडीगुलाबीनी व चातुर्याने दरवेळी जिंकून शांत केले पण हा प्रसंग ओढवून पुन्हा राघोबादादाने डोके वर काढू नये म्हणून नारायणरावांनी त्यांना नजरकैदेत टाकले. त्यामुळे त्यांनी दरबारातील सखारामबापू , भवानराव प्रतिनिधी , कायस्थ प्रभू मंडळी , मोरोबादादा फडणवीस यासारख्या असंतुष्ट व्यक्तींना जवळ करत नवीन कारस्थाने करायला सुरुवात केली.
त्याकाळी गारदी लोकं सतत दंगे करायचे व नेहमीच शनिवारवाड्यावर यांची वर्दळ असायची , याचाच फायदा घेत राघोबादादाने सखारामबापूंकरवी नारायणरावास धरावे अश्या मजकुराची चिठ्ठी तुळया पवार व सुमरेसिंह , खरकसिंह यासारख्या गारद्यांनाली , पण रस्त्यातच त्या पत्रातील मजकूर बदलून त्याचे नारायणरावास मारावे असा मजकूर राघोबादादाच्या पत्नी आनंदीबाईने केला अशी वदन्ती आहे. अर्थात याला ऐतिहासिक आधार नसून त्या चिठ्ठीतच मुळात मारावे असा मजकूर होता असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. या दिवशी अनंत चतुर्दशी असल्याने पेशव्यांच्या रक्षणाची जबाबदारी हरिपंत फडक्यांवर होती पण ते ही सध्या नेहमीच्या दंग्याची समजून दुर्लक्ष करीत होते. यामुळेच गारद्यांना आपला डाव साधला व नारायणरावांना मारायला धावले तेव्हा ते पहिले पार्वतीबाईंकडे व त्यांच्याच सांगण्याने मग राघोबादादाकडे मदतीस धावले पण उपयोग झाला नाही. त्यांची काका मला वाचवा ही किंकाळी व्यर्थ गेली व त्यांची हत्या झालीच (३० ऑगस्ट १७७३).
यावेळी सती जात असलेल्या त्यांच्या पत्नी गंगाबाई गर्भवती असल्याने त्यांना आनंदीबाईने अडविले. व यातूनच दरबारातील काही प्रमुख मंडळींना नवीन कल्पना सुचली. यात एकूण मोठे असे १२ असामी होते ज्यांची नावे अशी
बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस , मोरेश्वर बाबुराव भानू उर्फ मोरोबादादा फडणवीस , सखारामबापू भगवंतराव बोकील , हरि बल्लाळ फडके , भवानराव प्रतिनिधी , बाबूजी नाईक बारामतीकर जोशी , त्र्यम्बक सदाशिव उर्फ नाना पुरंदरे , त्र्यम्बकराव विसाजी पेठे , महादजी राणोजी शिंदे , तुकोजी मल्हारराव होळकर , मल्हार भिकाजी रास्ते , मालोजी घोरपडे , फलटणकर इत्यादी.
बारभाईंनी गंगाबाईस पार्वतीबाई , गोदूबाई यांच्यासोबत राघोबादादाच्या भीतीने पुरंदर किल्ल्यावर बंदोबस्तांत ठेविलें होते. जर गंगाबाईंना मूल झाले तर ठीक नाहीतर दत्तक विधान करवून कारभार चालविण्याचा निर्णय यांनी घेतला व त्यातच गंगाबाईंना मूल झाले तेथें (१४ एप्रिल १७७४). तदनंतर अवघ्या ४० दिवसांनीं त्या अर्भकास सवाई माधवराव पेशवे नाव देऊन पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं.
सवाई माधवराव , गंगाबाई , नाना फडणवीस व सखारामबापू बोकील या चौघांनां कैद करण्याचा कट राघोबाच्या पक्षानें केला पण तो फसला. तेव्हा इंग्रजांच्या मदतीने राघोबादादाने पेशव्यांशी भांडण सुरू केले. यात अनेक सखारामबापू , मोरोबादादा यासारख्या लोकांनी बंडाळी केली पण नाना फडनविसाने ते कट उलथून पाडले.
सवाई माधवराव साडेतीन वर्षांचे असतानाच पुरंदरावर त्याचे मातृछत्र हरवले व त्याचेंही संगोपन सदाशिवराव भाऊसाहेबांची विधवा पार्वतीबाईनेच केले. यांचे बालपणीचे जवळपास ४ वर्ष पुरंदर किल्ल्यावरच गेले.
१७७९ साली सवाई माधवरावाची मौंज पुण्यात मोठया थाटाने करण्यांत आली; पुढें १७८३ च्या फेब्रुवारीत त्याचे लग्न टोकेकर थत्ते यांच्या कन्येशी झाले ज्यांचे नांव रमाबाई ठेवण्यांत आले. पेशव्यांस लेखन व वाङ्मयाच्या शिक्षणसाठीं महादजीपंत गुरूजीस ठेवण्यांत आलें. शिवाय एक यूरोपीय शिक्षकहि ठेवण्यांत आला होता.
पेशव्यांच्या नावाने नाना फडणवीसच पूर्ण कारभार करत होते. पुढे घाशीराम कोतवालाचे प्रकरणही यांच्याच कारकिर्दीत होऊन पेशव्यांनी त्यात घाशीरामला देहान्त शासन केले. हाच सवाई माधवरावाने घेतलेला पहिला व शेवटचा निर्णय. यानंतर पेशवे साताऱ्यास जाऊन छत्रपतींची भेट घेऊन आल्याचेही उल्लेख आहेत.
१७९२ मध्ये पाटीलबाबा महादजी राणोजी शिंदे पुण्यात येऊन त्यांच्यात व नानामध्ये थोडा वाद झाला व पुढे समेटही झाली पण परततानाच महादजी वारले. पहिली बायको वारल्यामुळें पेशव्याचें दुसरें लग्न गणेशपंत गोखले यांच्या मुलीशी झाले तिचें नांव यशोदाबाई ठेवण्यांत आले (१७९४).
याच दरम्यान खर्ड्याच्या लढाईत स्वतः श्रीमंत निजामावर चालून गेले व त्यात निजामाचा पराभव झाला. तेथून परतताना त्यांनी हत्तीवरून खाली उडी मारली व त्यांच्या पायास इजा झाली. शनिवारवाड्यावर परतल्यावर हे दुखणे इतके वाढले की त्यांनी शेवटी आपल्या खिडकीतून खाली करंज्यावर उडी मारून आत्महत्या केली. बरेच जण म्हणतात की यास नाना फडणविसाचा जाच कारणीभूत होता (१५ आक्टोबर १७९५).
No comments:
Post a Comment