विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

" प्रतापविजय "

" प्रतापविजय "

सन १६५६ , महाराजांनी चंद्रराव मोरे ,
याचा पाडाव करून , जावळी ही स्वराज्यात आणली , आता स्वराज्याला आकार आला .जावळीतून राजांस अपार धन , सरंजाम मोठ्या प्रमाणात मिळाला , तसेच मुरारबाजी देशपांडे नावाचा कडवा आणि महारापराक्रमी वीर मिळाला . जावळीचं क्षेत्र घनघोर होतं , त्यात
दऱ्या , डोंगर आणि जंगल होतं , जंगल इतकं घनदाट होतं की , हत्ती सुद्धा त्या जंगलात सापडणार नाही एवढंच काय तर सूर्यकिरण सुद्धा जमिनीवर पडत नसत , असा हा नैसर्गिकरित्या जावळीचा प्रदेश होता .

महाराजांनी जावळीचा भौगोलिक दृष्टीने अभ्यास केला , जावळीत रायरी नावाचा दुर्ग होता , रायरी बद्दल काय बोलावे , " गड खाशा मजबूत , गडाचे कडे तासलेले , तसेच पर्जन्य काळात गवत उगवत नसत , पृथ्वीवर देवगिरी हा श्रेष्ठ दुर्ग खरा , पण उंचीने कमी ,
पण रायरी देवगिरीच्या तुलनेत दहापट उंच , पुढे जाऊन , रायरी अर्थात , " रायगड ही हिंदवी स्वराज्याची राजधानी झाली " . तसेच तेथे ढोपऱ्या नावाचा डोंगर होता ,राजांनी तेथे एक दुर्ग उभारण्याचे ठरविले , दुर्ग बांधणीचे कार्य राजांनी मोरोपंत पिंगळे यांकडे दिले . पुढे काही काळातच पंतांनी हे कार्य उत्तमरित्या पार पाडले , अनेक सुंदर बांधकामे ह्या दुर्गावर उभारली , महाराजांनी ह्या दुर्गाचे नाव , हे " प्रतापगड " असे ठेविले , तसेच गडावर १५०० शिबंदी ठेवली , पहारेही बसविले , तोफा वैगेरे ठेविल्या . जावळी जिंकल्यामुळे , राजांस आता स्वराज्यावर चालून येणाऱ्या दुष्मनास आता , स्वराज्याबाहेरच अडवता येणार होते [ तशी संधीही लवकर मिळाली वा आली ] .

जावळीची राजांनी व्यवस्थितपणे
घडी बसविली , मग राजांचा घोडा जुन्नर नंतर नगरच्या दिशेने फिरला , राजांनी बराच मोगल आणि आदिलशाहीचा प्रदेश जिंकला , त्यावेळी
दिल्लीत शाहजहान बादशहा आजारी पडला , तेव्हा दक्षिणेचा सुभेदार , शहजादा औरंगजेब , उत्तरेत जाण्याकरिता निघणार अशी नामी खबर हेरांकडवी राजांस मिळाली , ह्या संधीचा राजांनी फायदा उचलायचा ठरविलं , आणि सोनोपंत डबीर यांस औरंगजेबाकडे पाठविले , पंतांनी राजांची औरंगजेबाकडे बाजू मांडली ,
राजे तुच्याबाजूने कसे आहेत हे बोलनीतून दाखविले , आणि जिंकलेल्या मोगल प्रदेशावर संमती मागितली , मुळात औरंगजेब अतिशय धूर्त , मात्र राजांनी अगदी योग्य वेळ बोलणीकरीता साधली होती , उत्तरेकडे जाण्याच्या घाईमुळे त्याने मनाविरुद्ध संमती दर्शविली ; परंतु त्याने आदिलशहास एक पत्र लिहले , की ,
' शिवाजीने तुमचे प्रांतात घुसून काही किल्ले जबरीने बळकावले आहेत , त्यास तुम्ही घालवून द्या , यदाकदाचित त्यास नोकरीची अपेक्षा असेल तर , त्याला दूर कर्नाटकात जहागीर द्या ' , वास्तविक आदिलशहाने कितपत मनावर घेतलं कोणास ठाऊक ; कारण इकडे महंमद आदिलशाह हा सुद्धा आजाराने त्रस्त होता , पुढे तो ही गेला , सगळा कारभार हा बडी बेगम पाहत असे आणि तख्तावर अलीआदिलशहा यास बसविले होते नाममात्र . शिवरायांच्या तक्रारी रोज दरबारात येऊ लागल्या , तेव्हा दाराबारातून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी , शहाजीराजे यांस पत्र पाठविण्यात आले , पण शहाजीराजांनी त्यास नकार दिला .

शिवरायांचे वाढते राज्य पाहून ,
आता आदिलशाहीत भय निर्माण झाले , कित्येक सरदार , राजांचे नाव ऐकून घाबरत असत , पुढे शिवाजीचा एकंदर बंदोबस्त करण्यासाठी बड्या बेगमेने दरबार भरविला , त्यादिवशी दरबारात सर्व मातब्बर मंडळी होती , बड्या बेगमेने सर्वांस सवाल केला की , " इस दरबारे दख्खन में सीवा नाम का लोहा लाने का किस में दम नही है क्या ? " पैजेचे विडे ठवण्यात आले , पण सर्वजण माना खाली घालून उभे होते , तेव्हा बेगम म्हणाली ह्या दरबारात कोई मर्द बचा है क्या नई , तेव्हा एक आवाज दरबारात दुमदुमला , " मै उस सीवा को
पकड के लाऊन गा " , हे बोल ऐकून बडी बेगम आणि दरबारातील लोग खूप खुश झाले , पण कोण होता तो वीर , तो होता , महापाताळयंत्री अफजलखान . त्याने पुढे येऊन पैजेचा विडा उचलला , आणि म्हणाला ' चढे घोड्यानिशी निघतो आणि सीवाला पकडून हजरत अली अदिलशहा बादशहांपुढे हाजीर करतो " . पुढे दरबार बरखास्त करण्यात आला , बादशहा , बडी बेगम आणि अफजलखान यांच्यात गुप्त चर्चा झाली . त्यादिवशी दरबारात शहाजीराजे सुद्धा हाजीर होते .

■ अफजलखान : -
खान-ए-आजम अफजल - - खान आजमशाही , अर्थात अफजलखान ,
हा विजापूर दरबारातील एक मुख्य सरदार . ह्याची कारकीर्द साधारणतः १६३२ साली सुरूवातीस हा रणदुल्लाखानाकडे होता , पुढे १६४९ मध्ये हा वाईचा सुभेदार झाला , विजापुर दरबारात नंतर दोन पक्ष निर्माण झाले , एक रणदुल्लाखान आणि शहाजीराजे यांचा आणि दुसरा मुस्तफाखान , अफजलखान वगैरे पण ह्यात अफजलखान हा प्रमुख होता , त्याचा शहाजीराजांवर विशेष राग होता . हा शरीरयष्टीने अतिशय धिप्पाड होता , ताकद तर एवढी की पोलादी पहार सहज हातांनी वाकवायचा , तसेच अकलेने हुशार , कपटी , आणि धैर्याने पुरा निधडा होता , न्याय करण्यात
निपक्षपाती होता , पण जेव्हा युद्धाची वेळ यायची तेव्हा जिंकण्याकरिता सर्व नीती वापरत असे . त्याने ३ ते ४ गावं आपल्या नावाने वसविली होती . अफजलखानाचा शिक्काही प्रभावी होता , त्यात मजकूर असा होता की ,
' उच्च स्वर्गाला जर इच्छा झाली की , उत्तम माणसं आणि अफजल ह्यांमध्ये श्रेष्ठ कोण , तर सर्वीकडून एकच आवाज येईल अफजल अफजल .... हा वाई सुभ्याचा दीर्घकाळ सुभेदार होता .

■ अफजलखानाची फौज : -
आदिलशहाने , खानास १२ हजार घोडदळ , १० हजार पायदळ , १५०० बंदूकधारी , ८० ते ९० तोफा [ १०० लहान तोफा ] , ९० हत्ती , ३०० ते ४०० उंट , तसेच बडा सय्यद , हिलाल खान , रिहानखान , अब्दुल सय्यद , शंकराजी मोहिते , पेहलवान खान , फाजलखान , अंबरखान , याकूतखान , मुसेखान , पिलाजी मोहिते व प्रतापराव मोरे इत्यादी नामांकित सरदार दिमतीस होते , आणि पुढे प्रत्येक किल्ल्यावरून सैन्य ह्या फौजेत येणार होत .

■ स्वराज्यावरील संकट : -
अफजलखान चाल करून येतोय , ही बातमी राजांस मिळाली , पण खान येणार हे राजांस पुरते ठाऊक होते , त्यामुळे राजांनी योग्य व्यवस्थापन केले होते .

■ फर्मान : -
अलीआदिलशहाने १२ मावळातील
देशमुखांस वतनदारांस फर्मान पाठविले , की अफजलखानाला सामील व्हा , तो सीवाजीवर
चाल करून येतोय , जमेल तसं साहाय्य करा ,
आणि जर तसं केलं नाही तर संपुर्ण घरादारावर
वरवंटा फिरेल , वंशाचा समूळ नाश केला जाईल [ कान्होजी जेधे यांच्या फर्मानातील मजकूर ] , तसेच आदिलशाहित असलेल्या गडावरील किल्लेदारांस आदेश देण्यात आले , की गडावर गरज असेल तेवढेच सैन्य ठेवा , इतर सैन्य , अफजलखानाच्या फौजेत दाखल करा .

■ स्वामिनिष्ठा : -
कान्होजी जेधे यांस फर्मान मिळताच त्यांनी आपल्या पुत्रांसह राजधानी राजगड गाठला , आणि राजांची भेट घेतली , कान्होजी राजांस म्हणतात , राजे आदिलशहाचं फर्मान आलय , त्यावर राजे म्हणाले , जावा म्हटले आदिलशाहीत , तेव्हा कान्होजी म्हणाले
, राजे आम्ही थोरल्या महाराजसाहेबांस शब्द दिलाय की मरेपर्यंत आम्ही शिवाजीराजांस सहाय्य करू , पण कान्होजीकाका घरादाराचा नाश होईल राजे बोलले , त्यावर कान्होजींनी शेजारी असलेल्या मदतनिसाला पाण्यानी भरलेला तांब्या घेऊन बोलविला , आणि कान्होजींनी राजांच्या पायावर पाणी अर्पण करून म्हणाले , " मी कान्होजी जेधे , आज मी माझ्या घरादारावर , वतनावर पाणी सोडतो " , हे बोल, ही स्वामिनिष्ठा पाहून सरनौबत , पेशवे शामराजपंत रांझेकर ( वा रोझेकर ) , मोरोपंत , सर्वजण अचंबित झाले , राजांनी कान्होजी यांस मिठी मारली , आणि स्वामीनिष्ठा पाहून गहिवरले . पुढे राजांनी जेध्यांचे कुटुंबाची योग्य
व्यवस्था लावली आणि कान्होजी नाईक जेध्यांवर एक महत्वाची कामगिरी सोपविली ,१२ मावळातील इतर देशमुखांस समज देण्याची , आणि स्वराज्याची साथ देण्याची .

■ शिवराय आणि महाराणी सईबाईसाहेब : -

राजधानी राजगडावर , महाराणी
सईबाईसाहेबांची तब्येत अतिशय वाईट होती ,
त्यांचा आजार दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता , कित्येक दिवस उपचार चालू होते , पण यश मिळत नव्हते , खरोखरच शिवराय खूप धैर्यवान होते , एकीकडे पत्नीचे आजारपण तर दुसरीकडे अफजलखानाचे संकट , पण अशा द्विधा मनस्थितीतसुद्धा शिवराय स्थितप्रज्ञ होते . अखेर दि. ५ सप्टेंबर १६५९ ला , हिंदवी
स्वराज्याच्या महाराणी सईबाईसाहेब यांचे दुःखद निधन झाले .

■ अफजलखान निघाला : -

खानाने ह्या मोहिमेची विशेष तयारी केली होती , पण मोहिमेस निघण्याच्या अगोदर एक विलक्षण घटना केली , त्याने त्याच्या ६३ बायकांस , विजापूर जवळील , ४ किमी अंतरावर असणाऱ्या , अफजलपूर येथील त्याच्या मुहम्मद सरोवर वा सुरुंग बावडी ह्या विहरीत , बुडवून मारले , का मारले याचं कारण स्पष्ठ होत नाही [ पुढे त्यांच्या ६३ कबरी उभारण्यात आल्या ] . अखेर खान आपल्या लवाजम्यासह निघाला , पहिल्या दिवशी त्याने २ कोसावरच तळ टाकला , खानाची छावणी एखाद्या गावप्रमाणे होती , त्या छावणीत सर्व काही होतं , सैन्य , बाजारबुंदगे , व्यापारी . दुसऱ्या दिवशी निघणारच तेव्हाच एक अपशकुन झाला , निशाण्याचा हत्तीच मेला , सैन्यात सर्वत्र हाहाकार माजला ; परंतु ऐनवेळी आदिलशहाने
स्वतःचा हत्ती खानाच्या दिमतीस पाठविला , कारण ही मोहीम अतिशय प्रतिष्ठेची झाली होती . खान सोलापूर मार्गे पुढे सरकत होता , त्यावेळी राजे राजगडावरच होते , खानाने येताना देवस्थानांना त्रास दिला , त्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न केले , जेणेकरून राजे बाहेर पडतील , असा त्याचा मूळ हेतू होता , कारण मैदानी लढतीत तो सहज विजयी होऊ शकत होता , अशी मनधारणा होती . पुढे तो फलटणला आला , नंतर तो वाईला आला .

■ शिवराय : -

शिवराय देखील प्रतापगडी आले
, गडावर याधी दि. ११ जुलै १६५९ ला आले होते , राजांनी गडावर सर्व व्यवस्था जातीने तपासली , तोफांची संख्या वाढविली , आणि प्रमुख सरदारांना बोलावले काही अगोदरच हजर होते , त्यात सरनौबत , पेशवे शामराजपंत रांझेकर / रोझेकर , माणकोजी दहातोंडे , मोरोपंत पिंगळे , बाजीप्रभू देशपांडे , नूर खान बेग , वीर जिवाजी महाले , येसाजी कंक , कोंडाजी कंक , काताजी इंगळे , सिद्दी इब्राहिम खान , संभाजी कावजी , सोरजी काटके , संभाजी करवर , विसाजी मुरंबक , दोरोजी , पंताजी गोपीनाथ बोकील , सोनोपंत डबीर , नारोपंत , रघुनाथपंत अत्रे , रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि कान्होजी जेधे यांनी बारा मावळातील , सर्व देशमुखांस यश मिळविल त्यात बांदल , ढमाले , पासलकर , डोहार , शिळीमकर , मारणे , मरळ , कोकाटे यांचा समावेश होता , काही फितुरही झाले . गडावर १० हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ , तसेच २५० बंदूकधारी आणि १५०० आधीचे सैन्य होते .

■ वकिली : -

ह्या संपूर्ण युद्धात वकिली बऱ्याच प्रमाणात झाली , शिवरायांचे वकील होते , ' पंताजी गोपीनाथ बोकील ' , तर खानाचे वकील होता , ' कृष्णा भास्कर ' [ दोघांमध्ये मेव्हणा - जावयाचं नातं होतं ] . खानाचा तळ वाईला असताना त्याने , कृष्णा भास्कर यास , राजांकडे पाठविले , तो थेट प्रतापगडी आला ,
राजांनी त्याला भेटायची अनुमती दिली . तो कक्षात आला , राजांनी त्याचे योग्य आदरातिथ्य केले , दोघांमध्ये बोलणी सुरू झाली , तेव्हा त्याकक्षात मोरोपंत व पंताजी बोकील सुद्धा होते .कृष्णा म्हणाला , राजन आपण खानासाहेबांना भेटायला या , ते आपणांस दस्तुरखुद्द हजरत अलीआदिलशहा यांकडून तळकोकणात मोठी जहागीर देतील , तसेच आता जे किल्ले तुमच्या
जवळ आहेत , ते तुमच्याकडेच ठेवावे , तसेच राजन आपल्या मनात जे काही असेल , ते मागावे , खानसाहेब नक्कीच आपणांस मिळवून देतील , याबद्दल आपण किंचितही शंका न करावी . यावर राजे म्हटले , आम्ही नक्कीच भेट घेऊ , आम्हांस जसे तीर्थरूप
महाराजसाहेब , त्याप्रमाणेच खानसाहेब . पुढे खानाने राजांस जे पत्र पाठविले होते , ते त्यांने राजांना दिले , राजे त्यास म्हटले याचं उत्तर आम्ही उद्या देऊ , आता आपण थोडं आराम करावा , राजांस मुजरा करून कृष्णा निघाला .

राजांनी मोरोपंतांकडवी पेशव्यांस ,
सोनोपंतांस , रघुनाथ बल्लाळ [ पंताजीकाका तेथेच होते ] , यांना खलबत खाण्यात बोलाविले , खानाचे पत्र पंताजीकाका बोकील पत्र वाचण्यास सुरुवात केली , खान म्हणतो , " आपण आजकाल बेजबाबदार वागता , ते हजरत अलिअदिलशहा बादशहा यांस पसंत नाही , खविंद आपल्यावर नाराज आहेत .हा डोंगरी किल्ल्यांचा मुलुख आपण आपल्या ताब्यात घेतला आहेत , त्यामुळे सिद्दीही आपल्यावर खफा आहे . आपण जावळी बळजबरी करून घेतलीत . कल्याण - भिवंडीवर कब्जा केलात , तेथील मुसलमानांच्या हवेल्या जमीनदोस्त केल्यात , सारी दौलत फस्त केलीत , तसेच तुम्ही स्वतंत्र राजे म्हणून वर्तन करता आहेत , मानमरातब आणि निशाण्या धारण करत आहेत ; त्यामुळे खविंदांनी आम्हांस नामजाद करून पाठविले आहे , खविंदांच्या हुकुमावरून ६ प्रकारचे लष्कर आमच्या बरोबर आले आहेत . आमच्या फौझेतील बहादूर सरदार हे लढाईकरीता उत्सुक आहेत . आपण सर्व मुलुख आमच्या
ताब्यात द्यावा , असा आम्ही हुकूम करतो " .

राजांनी दीर्घकाळ चर्चा केली ,
सर्वांनी राजकारण कसे साधायचे ते ठरविले .
दुसऱ्या दिवशी कृष्णा भास्कर भेटीकरिता आला , राजे त्यास म्हटले , आम्ही खानसाहेबांचे पत्र वाचले , आम्ही एवढं करून सुद्धा खानसाहेब आमच्यावर दया दाखवत आहेत . त्यांची ताकद , दरारा केवढा मोठा . पराक्रम असा की रणांगणावर मात्र तेच दिसतात , त्यांपुढे सर्वकाही अक्षम्य , त्यांच्यापाशी कपट अजिबात नाही . त्यांनी आम्हांस भेटीकरिता बोलाविले , पण आम्ही कुठल्या तोंडाने त्यांपाशी जाऊ , आम्हांस त्यांचे प्रचंड भय वाटते , त्यामुळे आमची त्यांस विनंती आहे की , त्यांनी जावळीतच यावे , ते आले तर आम्ही त्यांस सर्व किल्ले व जावळीही ताब्यात देऊ , खरं सांगायचं झालं तर आम्हांस त्यांच्या नजरेला नजर मिळविणे हेही कठीण आहे . खानसाहेब जर जावळीस आल्यास आम्हांस बरं वाटलं , तसेच इतर चर्चेस आम्ही पंताजी काकांस आपल्या बरोबर पाठवीत आहोत . आपण आता थोडा आराम करावा व निघावे .

पंताजी काकांना राजांनी खलबत
खाण्यात बोलावून, त्यांना एकांतात सांगितले ,
काका खानाची भेट घ्या , त्याच्याशी सावधपणे
बोला , आणि त्याचा मनसुभा काय आहे तो जाणावा , खानाकडे क्रियाशपथ मागणे , त्याने तुमच्याकडे शपथा मागितल्यास आपण देणे , अवमान न करणे , आणि " काका काहीही करा पण खानास जावळीत आणा " , वाटतेल त्या शपथा द्या , पण कुठल्याही मार्गाने त्यास जावळीस आणणे . याखेरीज युक्तीप्रयोग करून खानाच्या सैन्यातून आतील खबरा काढा , खानाच्या नेमकी मनात काय आहे ते ओळखा , बरं आहे की वाईट आहे ह्याचा छडा लावा , तसेच छावणीचे योग्य निरीक्षण करावे .

छावणीत गेल्यावर कृष्णा भास्कर
प्रथम खानास भेटला , खानही आतुर होता , त्याने सर्व आढावा तपशीलवार सांगितलं , थोडक्यात काय तर शिवाजी किती घाबरलाय , लढाईच नाव जरी काढलं तरी तो खूप घाबरतोय . आपली दया व्हावी त्याकरिता विनवण्या करतोय , आपला सर्व मुलुख , किल्ले आणि जावळी स्वाधीन करावयास तयार आहे .हे ऐकून खान स्मित करू लागला , खुश झाला , मोहीम यशस्वी फत्ते होणार त्यामुळे आनंदी झाला , मात्र आपण जावळीत यावे ही त्याची अट आहे कारण शिवाजी खूप घाबरलाय , त्यावर खान म्हणतो क्या चुहा है ये सीवा । सीवा युद्ध करून भेटणार नाही , त्याला राजकारण साधूनच धरता येईल , हे त्याने पुरते ओळखले होते .

पंताजींनी खानाची भेट घेतली , पंताजींनी खानास म्हटले , राजांस जसे महाराजसाहेब तसेच आपण . तरीही खानसाहेब आपण यावे , आपले शौर्य , बहादुरी , ताकद राजे पुरते ओळखून आहेत . राजांनी
नम्रपणे विनंती केली की , आपण जावळीस यावे , कारण राजे आपणांस फार घाबरतात , त्यामुळे आपण जावळीच येणे योग्य ठरेल , कारण राजांना जी आपली भीती घेतली ती ही नाहीशी होईल , तुम्ही आल्यास तिकडे , वैभव वाढेल , खान पंताजींचे बोलणे ऐकून अतिशय खुश झाला , आणि म्हणाला , " शिवाजीराजे आम्हास भेटण्यास भीत असतील तर आम्ही त्यास असतील तर आम्ही त्यास जावळीत येऊन भेटू " . त्यावर पंताजी खानास म्हटले , आपण संदेह न करणे , राजे आपल्या वाईटावरी नाहीत , आणि खानाने काकांस आदरातिथ्याकरिता जावयास सांगितले .

पुढे काकांनी छावणीचे निरीक्षण
केले , काही सरदारांना भेटले , माहिती काढली
एवढंच काय तर काही सरदारांस त्यांनी भेटी दिल्या , त्यामुळे त्यांस बऱ्याच आतील बातम्या काढल्या . त्यावरून खान राजांस पकडून घेण्याकरिता नव्हे तर ठार मारण्यासाठीच आला आहे , ह्याबद्दल काकांची पूर्णपणे खात्री झाली . आणि खानाची इजाजत घेऊन पंताजींनी प्रतापगडाचा रस्ता धरला .

पंताजी काकांनी घडलेला सर्व
प्रकार राजांस सांगितला , राजांनी पंताजींचं फार कौतुक केलं . काही गुप्त खबरा सुद्धा सांगितल्या . आणि खानाची एकूण शरीरयष्टी कशी ह्याचा अंदाज दर्शीविला .

■ शिवराय आणि अफजलखान: -

खानाबरोबर भेट होणार , आणि तो दगा करणार हे वास्तव होतं , त्यामुळे राजांनी त्यावर लक्ष केंद्रित केले . खानाची उंचीही जवळपास ६.८ ते ७ फूट होती , तर वजन १७५ किलो होतं . राजांची उंची होती ५.६ फूट आणि वजन ७२ किलो . जर आपण बघितलं
तर समजून शारीरिकदृष्ट्या खान राजांच्या वरचढ ठरत होता , पण राजे पण काही कमी नव्हते . राजांनी खान कसा घात करू शकतो याचा पूर्ण अभ्यास केला होता , त्यात पाहिलं होतं मल्लयुद्ध , त्यासाठी अफजलखानाच्या
ताकतीचा आणि देहशष्टीचा वीर विसाजी मुरंबक , राजांनी त्यांच्याबरोबर खूप सराव केला , जेणेकरून मल्लयुद्धात मात न मिळावी म्हणून ....

■ वाई सोडली : -
खान वाईतून निघाला , काही फौज तिथेच ठेवलं , जेवढं शक्य होतं तेवढं घेऊन तो निघाला , तो पारघाटाजवळ आला , पार येथे छावणी टाकली , बरोबर ३ दिवसांनी भेट ठरली होती , मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी , गुरुवार , दि. १० नोव्हेंबर १६५९ . दुसऱ्या दिवशी थोडं पुढे जाऊन छावणी टाकली , खानाने शिवरायांना प्रतापगड सोडून खाली येण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते सर्व निश्फल झाले .

■ भेटीची जागा आणि अटी : -

भेटीची जागा ही ,
प्रतापगडाच्या माचीच्या खालच्या बाजूस , जे
' जनीचे टेंब ' नावाचं मेट [ मेट म्हणजे थोडी सखल जागा , किल्ल्याच्या रखवालदारिकरिता जागा असते ] , भेट तेथेच होणार हे दोन्ही पक्षांकडून ठरलं . भेट गडावर असल्याने भेटीकरिता शामियाना राजांनी तयार करायचा
[ ते कार्य हिरोजींकडे दिले होते ] .

भेटीच्या अटी : -

● भेट सशस्त्र होईल .
● जर येण्याकरिता पालखी आणावयाची असेल तर त्यांबरोबर मात्र ४ भोई आणावेत .
● वकील हा बरोबर राहील , तसेच येताना
१० अंगरक्षक बरोबर आणावेत , पण ते
ठराविक बाणाच्या अंतरावर असतील .

■ बहिर्जी नाईक आणि राजे : -

नाईकांनी लहाणातली
लहान खबर राजांपुढे मांडली होती , त्याप्रमाणे
महाराजांनी सर्व व्यूहरचना केली होती , मात्र
दोघांनाच पूर्ण व्यूहरचना माहीत होती , मनसुभा एकच होता , एकही हशम जिवंत न जाऊन देणे .

■ शिवरायांची व्यूहरचना : -

महाराजांनी भेट झाल्यापासून काय , कसं आणि कोणी करायचं
याचं सूक्ष्म नियोजन केलं होतं . दि. ९ नोव्हेंबर
१६५९ , राजांनी प्रत्येक योध्याबरोबर वयक्तिक भेट घेतली . रणनीती अशी होती , ठरल्यावेळेप्रमाणे भेट होणार , भेटीच्या खानाला मारल्याच्यानंतर , तोफांना बत्ती दिली जाईल [ हीच इशारत होती ] . आता मुख्य योजना , राजांनी सैन्याचे ४ प्रमुख भाग केले होते , १ ला भाग नेतोजी पालकरांबरोबर ७ हजार घोडदळ दिलं , त्यांनी वाई सांभाळायची , २ रा मोरोपंतांजवळ ५ हजार फौज दिली आणि त्यांना पारघाटमाथा व उतार , ३ रा जेधे व बांदल देशमुखांकडे ३५०० सैन्य देवून , पार छावणीजवलील जंगल आणि ४ था शिळीमकर यांजवळ ३००० सैन्य देऊन वोचेघोळीची नाळ अडवून धरावे , ही मुख्य योजना होती [ ह्यांना इशारा म्हणजे तोफेचा आवाज ] , तर त्या दिवशी शिवाजींनी हशमाना मेजवानी द्यायचं ठरलं होतं ती सर्व जबाबदारी तानाजी मालुसरे यांवर होती , आणि तोफेचा आवाज झाल्यावर ह्यांची सुद्धा तिच अवस्था करणे , हे राजांनी बरोबर समजावलं होत , गडावर १५०० फौज होती , तसेच बाजीप्रभूंना १२०० फौज देऊन कामगिरी दिली होती . एकही माणूस जिवंत जाता कामा नये याची तजबीज केली होती . त्यारात्री सर्वांनी एकत्र भोजन केले .

■ भेटीचा दिवस : -

अखेर भेटीचा दिवस उजाडला , सकाळी पहाटे उठून राजांनी स्नान केले , नंतर भवानी मातेचे दर्शन घेतले , महादेवाचे दर्शन घेतले , आणि माँसाहेब जिजाऊंचे बोल आठवू लागले , " राजगडावरून निघताना माँसाहेब म्हटल्या , शिवबा स्थितप्रज्ञ राहणे , संभाजीचे उसने फेडने , महाराजसाहेबांचा केलेला अपमान न विसरणे , आणि खानाचे शीर आम्हांस राजगडी पाठविणे , विजय आपलाच आहे ". नंतर राजांनी थोडं भोजन केलं , पुढे सुरक्षेसाठी राजांनी चिलखत त्यावर अंगरखा , डोक्यावर जिरेटोप त्यावर मंदिल , डाव्या हातात तर्जनी आणि करंगळीमध्ये , २ अंगठ्या आहेत त्यावरून दिसायलाच अंगठ्या , तर त्या वाघनख्या आहेत ( ३ इंच ) , डाव्या हाताच्या अंगरख्यात
बिछवा , धारण केले होते आणि राजे तलवार घेऊन निघाले , गडावर सर्वत्र शांतता , राजांची काळजी , मावळे , सरदार बोलत होते राजे न जाणे , राजे सर्वांस धीर देत होते , आणि म्हटले यदाकदाचित आमचे काही बरे वाईट झाले तर , संभाजीराजांस गादीवर बसवून स्वराज्य चालविणे , राजांच्या लक्षात आले दाढी जास्त आहे , दाढी पकडून मान ???? राजांनी लगेचच
दाढी बारीक केली होती , एवढं सूक्ष्म नियोजन केले होते , राजे हळूहळू गडाच्या पायऱ्या उतरत होते , सूर्य डोक्यावर आला होता , खान सुद्धा शामियान्यात आला होता , राजे बरोबर शामियान्याच्या जवळ आले आणि बघतात तर काय बडा सय्यद शामियान्यात , राजांनी पंताजींना इशारा करून खानातर्फे त्याला दूर केले .

राजांबरोबर असणारे १० अंगरक्षक : -

●जिवाजी महाले .
●संभाजी कावजी .
●काताजी इंगळे .
●सिद्दी इब्राहिम खान .
●येसाजी कंक .
●कृष्णाजी कंक .
●संभाजी करवर .
●सोरजी काटके .
●कृष्णाजी गायकवाड
●विसाजी मुरंबक .

खानाबरोबर असणारे अंगरक्षक : -

●बडा सय्यद .
●शंकराजी मोहिते .
●अब्दुल सय्यद .
●हिलाल खान .
●पेहलवान खान .
●पिलाजी मोहिते .
●रिहान खान .
●इतर ३ खान .

आणि राजे शामियान्यात दाखल झाले , राजांना पाहून खानाने स्मित केलं , परंतु राजांनी आपली गरुडनजर खानावर ठेवली होती , खानाने राजांबरोबर बोलणी केली , आदिलशाहीचे महत्व सांगितले , राजे होकार देत होते , त्याने किल्ले आणि सारा मुलुख द्यायला सांगितलं राजांनी त्या प्रस्तावालाही होकार दिला , खानाने त्या बदल्यात जहागीर देण्याचे कबुल केले , आणि उभा राहिला , दोन्ही हात लांब करून राजांस अलिंगन करण्यास बोलविले , राजे प्रबळ आत्मविश्वासाने गेले , अलिंगन देण्यास सुरुवात तेवढ्यात खानाने घात केला , राजांची मान दाबण्यास सुरुवात केली , राजांनी ती सोडविली , मग त्याने कट्यार काढून राजांच्या पाठणीत वार केला पण अंगरखा तर्कन फाटला पण चिलखतामुळे बचावले , खान पुर्णतः हबकला , त्याला काय करायचं समजण्यापूर्वीच शिवरायांनी विद्युतवेगाने वाघनखे खानाच्या पोटात घुपसली आणि तलवारीचा वार केला , तलवार आतडी घेऊनच बाहेर आली , राजांनी सपासप वार केले , खानानेही एक वार केला पण निष्कामी केला राजांच्या कपाळाला थोडीशी जखम झाली , आणि आता खाना आतडी धरून दगा दगा बोंबलत आला , तेव्हाच कृष्णा भास्कराने राजांवर दोनदा वर केले , दोनवेळा सोडूनही ऐकत नसल्याने , राजांनी त्यालाही ठार मारले , तेव्हाच बडा सय्यद चालून आला , तो वार करणार , त्याक्षणी जीवाजींनी त्याचा हात दांडपट्ट्याने हवेत उडवला , व दुसरा वार करून त्यालाही ठार केली , कसातरी खान पालखीत बसला , पण संभाजी कावजींचे लक्ष बरोबर होते , त्यांनी प्रथम भोई लोकांचे पाय छाटले , नंतर " अफजलखानाचे शीर धडावेगळे केले " ,
खानाचे १० अंगरक्षक मारले गेले , आणि गडावरून इशर्तीची तोफ वाजली आणि मराठ्यांनी रणकंदन सुरू केले , प्रचंड कापकाप , कोण कुठून येतंय है हशमाना कळतच नव्हतच , काही इकडे पळाले काही तिकडे , मराठे सर्वांस सरळ कापत होते , ४ ही सेनापतींनी मोठा पराक्रम गाजविला , तानाजींनी आणि बाजींनीही कत्तल सुरू केली , हशमाना काही कळायच्या आतच ते कापले जात होते , काही सरदार व खानाच्या २ लहान मुलांस कैद केले , संध्याकाळ झाली तरी कापाकाप चालूच होती , असं म्हणतात त्या दिवशी मराठ्यांच्या तलवारीचं पात पूर्णपणे लाल झालं होतं .

काहीच माणसं विजापूरला पळाली
असतील , तेही प्रताराव मोरे यांनी मधील मार्ग
दाखविल्या कारणाने ( फाजलखान , अंबरखान ) वाचले . नेतोजी वाईला पोहचून पराक्रम गाजवू लागले .

■ प्रतापगड : -
गडावर सर्वत्र आनंद आनंद
होता , महाराजांनी मानाचा दरबार भरवून सर्वांचे यथोचित सत्कार केला , त्या दरबारातील सर्वोच्च मान हा , कान्होजीराव जेधे यांस मिळाला , राजांनी रात्रीच कोल्हापूर दिशेने ,वीर दोरोजी यांनी कोकणच्या दिशेने , आणि नेतोजी आधीच विजापूरच्या दिशेने निघाले ,
स्वराज्याचा त्रिशूल यवनांचा नाश करनार हे अटळ होते .

राजांनी संध्याकाळी खानाचे शीर
राजगडी पाठविले , मुलाच्या खुनाचा आणि
पतीच्या अपमानाचा बदला घेतल्यामुळे जिजाऊंचे मन भरून आले , तर शंभूराजे खूप खुश आले , सर्वत्र आनंद झाला .

अफजलखान मेला ही खबर ऐकताच , बडी बेगमेच्या पाया खालील जमीनच सरकली , आदिलशहा ही हतबल झाला , आदिलशाही सुन्न झाली होती .

कर्नाटकात ही खबर पोहोचताच
महाराजसाहेबांचा आनंद गगनात मावत नव्हता
, राजांचे त्याने तेथूनच कौतुक केले .

दिल्लीला नवनिर्वाचित बादशहा
औरंगजेबास ही खबर कळली तेव्हा त्याने तर ,
शिवरायांचा धसकाच घेतला , अफजलखानाने
एकदा युद्धात औरंगजेबाला कैद केले होते , आदिलशाही सेनापतीने जर मदत केली नसती तर तो चांगलाच कचात्यात सापडला असता , त्या अफजलखानाला सीवाजीने ठार मारले त्यामुळे औरंगजेब सुद्धा हतबल झाला होता .

ह्या युद्धानंतर अपार द्रव्य , विपुल
शस्त्रसाहित्य , खूप तोफा , २५० उंट , ८० हत्ती
मिळाले , श्री च्या कृपेने सर्व चांगले झाले , लढाईत काही मावळे शहिद झाले .

पुढे राजांनी सातारा , मायणी , कराड , सुपे , पाली , उरण , विसापूर , कोल्हापूर आणि अजिंक्यतारा , चंदनगड , वंदनगड , वारुगड , वर्धनगड , वैराटगड , सदाशिवगड , गुणवंतगड , रांगणा , पारगड , विशालगड , पालगड , भिवगड , भूषणगड , सुंदरगड आणि दि. २८ नोव्हेंबर १६५९ ला पन्हाळा दुर्ग मात्र १८ दिवसात घेतला , नेतोजींनी पार विजापूर पर्यंत मजल मारली , ऐन समयी खवासखान ७ हजाराची फौज घेऊन आला नाहीतर ....वीर दोरोजी यांनी कोकणात मोठा पराक्रम केला , दाभोलपर्यंत प्रांत स्वराज्याला जोडला .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,
प्रबळ आत्मविश्वासाची जीत आणि अफजल -
- खानाच्या अहंकाराची हार झाली .

◆ विजयाचे कारण : -

प्रत्येकास दिलेले कार्य ,
प्रत्येकाने व्यवस्थित पूर्ण केले , व दुसऱ्याच्या
कार्यात लुडबुड न केली , विजयश्री मराठ्यांच्या
पारड्यात पडला .

संदर्भ ग्रंथ : -

● कवींद्र परमानंद लिखित " शिवभारत " .
● सभासद बखर .
● जेधे शकावली .
● इतर महत्वपूर्ण ग्रंथ .
● शिवरायांचे रणसंग्राम , निनाद बेडेकर .
● ऐतिहासिक कागदपत्रे .

----------- समाप्त ------------

# ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक्सना अवश्य भेट द्या , तसेच ह्या लेखाचा जोडून पुढील भाग " शिवप्रताप " अवश्य अभ्यासावा , इतिहासाखातर .....

■ जगविजेता संभाजी लिंक : -

https://www.facebook.com/जगविजेता-संभाजी-2212452729012520/M

" अखंड भारताचा विजय आहे " .

|| जय हिंद ||


~ राहुल रमेशजी पाटील .
शंभूमहितीगार

ई-मेल : rahulp1298@gmail.com
भ्रमणध्वनी : ७७४१९२३३४६ .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...