विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 May 2020

◆॥ झाशीची राणी लक्ष्मीबाई ॥◆

◆॥ झाशीची राणी लक्ष्मीबाई ॥◆

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगात स्त्री ही उच्चशिक्षित आहे. तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही. मात्र झाशीची राणी ही १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला.

झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते.

धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या मनकर्णिका - मनु होत्या. महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.

दुसर्या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या ३-४ थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. मोठे, पाणीदार डोळे असणारी ही मोहक कन्या दुसर्या बाजीरावांचीच नव्हे तर सर्वांचीच लाडकी होती. बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व झाशीची राणी या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी ‘मल्लखांब’ नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

राणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांची ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली. ‘राणी’ पदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणाने उतरल्या. झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवली. एवढेच नव्हे तर कनिष्ठ समजल्या जाणार्या सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही तिने घोडेस्वारी, तलवारबाजीत पारंगत केले. या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी झांशीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झाला. घोडदळ-सैन्यातील महिलांचा वावर, दारुगोळ्याची ने-आण करणार्या महिला, एवढेच नव्हे तर तोफगोळ्यांची गोलंदाजी करणार्या महिला पाहून सर ह्यूज रोज हा इंग्रजांचा सेनापती आश्चर्यचकीत झाला होता. लक्षात घ्या, ही घटना आहे १८५७-५८ ची.

लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी गंगाधर रावांच्या निधनानंतर स्वत:च्या नावाची (उर्दू भाषेतील) मोहोर करून घेतली. त्या काळात उर्दूमधे मोहोर असणे याचा अर्थ ‘सत्ताग्रहण आणि राजमान्यता’ असा होता.

राणीला एक मुलगा झाल्याने संपूर्ण झाशी शहर आनंदीत होते. परंतु मुलगा तीन महिन्याचा असतानाच मरण पावला. परिणामी मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दु:खी झाले दत्तकपुत्र वारसा हक्कासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन ‘दामोदर’ असे नाव ठेवण्यात आले. पण दुर्दैवाने थोड्याच अवधीत गंगाधर रावांचे निधन झाले. (१८५३)

पूर्वीपासून झांशीच्या ब्रिटिशांशी असणार्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत: इस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात-झांशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानात लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्र्वास वाटेल का, अशी शंका व्यक्त करून-ब्रिटिश सरकारला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार, अनैतिक कृत्यांना, कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणार्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. हे धारिष्ट दाखविल्यामुळेच त्यांना स्वातंत्र्यदेवता म्हटले गेले.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झांशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने ‘मेरी झांसी नही दूँगी’ असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झांशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पद्च्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते. अर्थातच ही शांतता वादळापूर्वीची होती.

१८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मण रावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मण रावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वत:बरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वत:ही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने - आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वत:च्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या,आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.

लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जूनला (१८५८) सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरीत हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. परिणामी मागून आलेल्या सैन्याने राणींना जखमी केले. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली आणि एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. विजेसारखेच त्यांचे आयुष्य कडकडाट करून, दिव्यत्वाचा लख्ख प्रकाश देऊन गेले.

केवळ २७ वर्षांच्या या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप असणार्या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.

``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।''

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करायचा आदेश काढणारा औरंगजेब..!!



आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करायचा आदेश काढणारा औरंगजेब..!!

postsaambhar :Raj Jadhav

१६८१ साली औरंगजेबपुत्र शहजादा अकबर आपल्या बापाशी बंड करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला स्वराज्यात आला, त्यावेळी आलमगीर औरंगजेब हा अकबराचे बंड मोडून काढण्यासाठी तसेच दक्षिणेतील शाह्या जिंकण्यासाठी सप्टेंबर १६८१ मध्ये अजमेरहुन निघाला आणि नोव्हेंबर १६८१ मध्ये बुऱ्हाणपूर येथे पोहचला..

अखबारत-ए-दरबारच्या एका नोंदी नुसार बुऱ्हाणपूर येथे पोहचल्यानंतर औरंगजेब याने एक आदेश काढला होता
" माझ्या मार्गावर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करण्यात यावी " हा आदेश बेलदारांचा प्रमुख जवाहरचंद याच्या नावाने काढण्यात आला होता.

बेलदार म्हणजे दगड फोडणारे, बांधकाम करणारे तसेच रस्त्याचे कामे करणारे लोक...

आपण एक लक्षात घेतले पाहिजे की हा आदेश जुन्या आणि अलीकडे तयार केलेल्या मंदिरासाठी होता असे नाही तर बादशहाच्या डोळ्यांना दिसणारी सर्व मंदिरे जमीनदोस्त करावी असा सर्वसमावेशक आदेश आहे. दक्षिणेकडील मंदिरे आणि घरे दगड आणि लोखंडाने बांधली गेलेली आहेत याची औरंगजेबाला खंत होती. या कारणास्तव त्याने रुहउल्ला खानला लिहिले की " माझ्या मोर्चाच्या वेळी मला आणि माझ्या कुटूंबातील माणसांना वाटेवर डोळ्यांनी दिसणाऱ्या मंदिराचा नाश करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे सामर्थ्य, शक्ती म्हणजे वेळ मिळत नाही. त्यासाठी स्वतंत्र दरोग्याची नेमणूक करावी म्हणजे नंतर ते वेळ मिळेल तसे मंदिरे जमीनदोस्त करुन त्याचा पाया खोदू शकतील "

अलीकडच्या काळात औरंगजेब किती महान धर्मनिरपेक्ष शासक होता वैगरे मांडणी करताना दिसून येते, वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. औरंगजेब हा शूर, बुद्धिमान, राजकीय मुस्तद्दी जरूर असेल पण तो अतिशय संशयखोर, धर्मांध आणि क्रूर होता हा इतिहास आहे त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अनैतिहासिक आहे...

खांदेरीचा रणसंग्राम भाग ६

#स्वराज्याचे_वैभव

खांदेरीचा रणसंग्राम भाग ६

रोजच्या रोज खांदेरीच्या बातम्या इंग्रजांना मिळत होत्या. बेट घेण्यासाठी इंग्रजांचा प्रयत्न चालूच होता.

९ ऑक्टोबरला मुंबईकर लिहतात की सुरतेच्या पत्राप्रमाणे दोन गुराबा भाड्याने घेऊन तयार कराव्या आणि रिचर्ड कॅंग्विनला रिव्हेंज व सर्व गलबते यांचा मुख्य अधिकारी नेमावा. याचे मुख्य कारण म्हणजे रिचर्डला समुद्रावरील लढाईच सखोल ज्ञान होतं. कोणतीही परिस्थिती तो नीट हाताळू शकत होता. तो संथ वृत्तीचा तर होताच सोबतच धोरणी होता. कॅंग्विनच्या नेतृत्वाखाली २०० शिपाई खांदेरीला वेढा देण्यासाठी निघाले . इंग्रजांची कित्येक गलबते व्यापारासाठी बाहेर गेली होती त्यामुले काही जहाज त्यांना भाड्याने घ्यावी लागणार होती किंवा आहे त्याच परिस्थितीत युद्धाची आखणी करावी लागणार होती. या युद्धासाठी त्यांनी २ गुराब भाड्याने घेतली होती. हंटर हि युद्धनौका इंग्रजांना १० दिवसांनी येऊन मिळणार होती त्यामुळे मुंबईकर इंग्रज सुरतेला लिहतात हंटर येऊन मिळाली कि आम्ही ती २ गुराब परत पाठवून देऊ त्यामुळे होणार खर्च काहीप्रमाणात वाचेल.

इंग्रजांनी खांदेरीला पक्का वेढा देण्याची तयारी केली होती. त्यांचं असे मत होते जर बेटाला पक्का वेढा दिला तर पाण्याचा तुटवडा पडून तेथील लोक शरण येतील. युद्धावर इतके सैन्य पाठवल्यामुळे मुंबईत फक्त २० शिपाई राहिले होते. केजवीन च्या ताब्यात रिवेंज फ्रीगेट , २ गुराबा , ३ शिबाडे व ३ मचवे अशी ८ गलबते अशाप्रकारे केजवीन खांदेरीच्या युद्धासाठी तयार होता.

समुद्रावर आपले सगळे सैनिक पाठवल्यावर मुंबईत सैनिक तोडके पडले. ह्यात अजून एक खबर इंग्रजांना मिळाली की थेट मुंबईवरच हल्ला करण्यासाठी मुंबईच्या समोरच्या परिसरात मराठा सैन्य एकत्र येत आहे. ह्यावर शिक्कामोर्तब करणारी अजून एक गोष्ट मुंबईत घडली. ती म्हणजे सुंदरजी प्रभू नावाचा व्यक्तीला पकडण्यात आलं. हा व्यक्ती आधी शिवाजीच्या राजांच्या सैन्यात कामाला होता. आणि मराठ्यांच्या तर्फेने कामानिमित्त मुंबईलाही येऊन गेला होता हे इंग्रजांना माहीत होतं. त्याला मुंबईत येण्याचं कारण विचारण्यात आलं त्याच सुंदरजी उत्तर देऊ शकला नाही. हा मराठ्यांचा हेरच असणार अशी त्यांना खात्री होती. सुंदरजी ला तुरुंगात टाकण्याचे आदेश देण्यात आले.

" On the 11th instant was taken one sundergee purvoo just as he landed. Being a person well known to have served sevagee rajah many years and had negotiated for him in sereval affairs on this island. He could not esteemed otherwise then a spy "

इकडे खांदेरीला इंग्रजांना माहिती मिळाले दौलतखानाचे २० गुराबांचे आरमार बेटाच्या मदतीकरता येणार आहे. दौलतखान दिसल्यावर एक लहान बोट पाठवून दौलतखानाला इंग्रजांच्या खांदेरी बेटावर असलेल्या अधिकाराची जाणीव करून बेट इंग्रजांच्या मालकीच्या आहे ह्याची जाणीव करून द्यावी. तसे नाहीच झाल्यास दौलतखानाशी युद्ध करण्याची तयारीही इंग्रज करून बसले होते. मुंबईकर इंग्रज खांदेरीच्या युद्धात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना लिहितात. दौलतखान तुमच्याशी युद्ध न करता आखातात आडवा येऊन उभा राहील त्याचवेळी तुम्हीही नांगर उचलून त्याच्याबरोबर राहून त्याला मुंबई बेटावर उतरू देऊ नये.

इकडे मुंबईकरांची १३ ऑक्टोबर ला जी बैठक झाली त्यात काही निर्णय घेण्यात आले. " नवीन डेप्युटी गव्हर्नर हेन्री ऑझीडंनने अधिकाऱ्यांची बैठक भरवून मुंबई बेटाच्या सुरक्षितेबद्दल विचार झाला. मराठा सैन्य मुंबईवर चालून येणार हे नक्की झालंच होत. पण इंग्रजांना त्यांच्या नशिबाने साथ दिली. पोर्तुगीजांनी आपल्या मुलुखातून मराठ्यांना येऊ देण्याचे नाकारल्यामुळे या बेटाचा धोका काही प्रमाणात टळला. परंतु खाडी मधील पुष्कळ लहान लहान बोटींचा शत्रूला उपयोग होऊ शकेल त्याने तो आतपर्यंत येईल म्हणून दोन शिबाड भाड्याने घेऊन बंदोबस्त करावा. समोरच्या किल्ल्यावर शिवाजीचे सैन्य आल्याची बातमी आल्यामुळे येथे लोक भेदरून गेले होते.

इकडे खांदेरीला नागावच्या खाडीतून बेटावर सामानासाठी योग्य ती मदत होत होतीच. रसद पुरवठा खंडित करण्यात इंग्रजांना हवं तसं यश आलं नव्हतं. मराठ्यांच्या बोटी जरी लहान असल्या तरी त्यातून होणारी मदत बेटावरील गरज भागवत होती. त्यांचाही बंदोबस्त करण्याचा विचार इंग्रज सतत करत होते पण कायम त्यांना निराशाच पदरी पडत होती. १८ ऑक्टोबरचा दिवस उजाडला. सकाळीच खांदेरी जवळ काहीतरी धुमाकूळ उडालीय ह्याची इंग्रजांना जाणीव झाली. त्यांना सारखे तोफांचे, बंदुकांचे आवाज ऐकायला येत होते. शिवाजीचं आरमार तर चालून आलं नसेल ना म्हणून विचार होत होते. लांबवरून उठलेले धुराचे लोट आकाशात विरून जात असलेले त्यांना दिसत होते. पण त्यांच्याकडेही बघत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

क्रमशः

✍️ स्वराज्याचे वैभव

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )

शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचा अपरिचित इतिहास

मालोजीराजे यांचे पूर्ण नाव मालोजीराजे बाबाजीराजे भोसले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस मराठ्यांच्या इतिहासात भोसले घराणं सत्ताधीश झालं आणि वात्सल्यरूपी दबदबा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण केला. भोसले घराण्याची ओळख होते ती बाबाजीराजे भोसले. बाबाजीराजे यांना  दोन पुत्र रत्न होते मालोजीराजे आणि विठोजीराजे. मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा.

मालोजीराजे यांनी आपल्या कर्तृत्वावर खानदेश आणि आसपासच्या परिसरात दबदबा निर्माण केला होता. त्यांचा जन्म इ.स. १५५२ साली  वेरूळ येथे झाला. मालोजीराजे यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.  त्यांना शरीफजीराजे भोसले, आणि शहाजीराजे भोसले असे पुत्ररत्न प्राप्त झाले.

मालोजीराजे यांच्या पराक्रमाची सुरुवात होते ते १५८८ साली झालेल्या एका युद्धात निजामशाही च्या वंगोपाळ निंबाळकर हे जमालखानाच्या बाजूने आदिलशाही च्या विरोधात उभे होते.

आपल्या पराक्रमाची शर्थ दाखवण्यासाठी मालोजीराजे आपले बंधू विठोजीराजे यांच्या सह वंगोपाळ यांच्या सोबत कोल्हापूर येथे आदिलशाहाला रोखण्यासाठी आले. या लढाईत घनघोर युद्ध झालं मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर आदिलशाही फौजेचा अक्षरशः बिमोड केला. आदिलशाही सैन्याला रिकाम्या हाती परतावे लागले. वंगोपाळ यांच्या सैन्यात दोन्ही बंधूंच्या पराक्रमाने वाहवा मिळवली. 

मालोजीराजे यांचं या युध्दाबाबत वर्णन करताना कवींद्र म्हणतात, “याच समयी देवगिरी येथे राहून धर्मनिष्ठ निजामशहा पृथ्वीवर राज्य करत होता, निजामशाही आणि आदिलशाही यावंनांनी लढा पडला तेंव्हा बुद्धिमान निजामशहा ने मालोजीराजे हा शत्रूंचा कर्दनकाळ आहे असे ऐकूण त्यास मदतीस बोलाविले आणि अद्वितीय तेजस्वी मालोजी देवगिरीस येऊन राहिला त्याचा भिमाप्रमाणे भाऊ विठोजी आपल्या सैन्यासह निजामास येऊन मिळाला आणि उभयतां बंधूंच्या आगमनाने संतुष्ट निजामाने राजेंना गौरविले. 

मालोजीराजे आणि विठोजीराजे यांचा पराक्रम पाहून निजामाने दीड हजारी सरंजामी सह जुन्नर शिवनेरी प्रांत दिला. १५८८ ते १५९२ पर्यंत च्या काळात मालोजीराजे यांनी निजामशाही मध्ये राहून आपला पराक्रम दाखवत राहिले. दीड हजारी सरंजामी वरून पंच हजारी झाली त्या सोबत त्यांना सुपा परगण्याची सरंजामी देखील बहाल केली या सोबतच बुऱ्हाणपूर हुन खाजगी देणग्या ही येत असे.

मालोजीराजे यांचा खूप मोठा विश्वास निजामाने संपादन केला. त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजीराव रणक्षेत्रावर मरण पावले व भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरूपाने इंदापूरभूमीवर स्थापन झाले.

इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिलेली कोल्हापूर ची लढाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम जर पाहिला तर खरोखरच जगाला हेवा वाटेल असाच पराक्रम त्यांनी गाजवला. मुघल, आदिलशाही, निजाम, पोर्तुगीज, फ्रेंच किंवा मग इंग्रज असो यांना शेवटपर्यंत थोपवण्यासाठी मराठ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. फक्त परकीय आक्रमक यांच्या विरुध्द च नाही तर स्वराज्याची अस्मिता सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मराठ्यांनी अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावली.

मराठ्यांचा इतिहास तर अश्या लढाया भरपूर झाल्या आहेत. आज आम्ही अश्याच एका लढाई बद्दल माहिती घेऊन आलो आहोत ज्या लढाईत आपल्या निवडक शिलेदार दहा हजार आदिलशाही सैनिकांवर भारी पडले. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून मराठा साम्राज्याची ताकद दाखवून दिली.

प्रतापगडचं युद्ध जिंकून देखील छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नव्हते त्याची मोहीम चालूच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड वरून कोल्हापूर पर्यंत चा सर्व मुलुख स्वराज्यामध्ये सामावून घेण्याचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही योजना रोखण्यासाठी आदिलशाहाने रुस्तमजमान या त्याच्या विश्वासू सरदाराला दहा हजाराची मोठी फौज, घोडदळ आणि दारूगोळ्याच्या सोबतच तोफा घेऊन पाठवलं.

नुकत्याच झालेल्या अफझलखान वधामुळे रुस्तमजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीला जाणून होता म्हणून त्याने येतानाच मोठा फौज फाटा सोबत घेऊन येत होता.

तगड्या फौजेसोबत त्याने संताजी घाडगे, फाजल खान, मलिक इतबर, हसन खान आणि याकूब खान यांसारख्या लढाऊ सरदार देखील त्याच्या सोबत होते. तर मराठ्यांचे नेतृत्व खुद्द छत्रपती शिवाजी महाराज करत होते. यात त्यांना मोलाची साथ दिली ती नेताजी पालकर, भिमाजी वाघ, सरदार गोदाजी जगताप, तसेच हिरोजी इंगळे यासारख्या लढवय्या सरदारांनी आणि मावळ्यांनी. दोन्ही फौजा समोरासमोर आल्या ती तारीख होती २८ डिसेंबर १६५९.

रुस्तमजमान हा युध्द शास्त्रात तरबेज असावा कारण युद्धभूमीवर त्याने सुरवातीला हत्ती त्यामागे त्याचे सैनिक अशी तयारी त्यांनी केली होती सुरवातीला हत्ती असल्याने मराठ्यांनी आक्रमक पणा केला तरी हत्तींमुळे मराठे लवकर थकतील त्यामुळे आपल्या ताज्या दमाच्या सैनिकांच्या पुढे मराठा सैनिक फार काळ टिकाव धरू शकणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी योजना आखली त्याप्रमाणे युद्ध सुरू झालं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज युद्धात असल्याने जशी मोहीम आखली त्या पद्धतीने युद्धाची सुरुवात झाली. योजने प्रमाणेच मराठ्यांची तलवार वीज कडकावी तशी तळपत होती. बघता बघता मराठे आदिलशाही च्या सैनिकांवर सपासप वार करत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक ज्या पद्धतीने लढत होते हे पाहून आदिलशाहाचे कित्येक सैनिक घाबरून पळून जात होते तर काही शरण येत होते. त्यांचा मुख्य सेनापती रुस्तमजमानच युद्धभूमीवरून पळून गेला.

छत्रपती शिवरायांनी लढाई जिंकली. सोबतच रुस्तमजमान सोबत घेऊन आलेला दारुगोळा, सोन नाणं, हत्ती घोडे तसेच टाकून गेल्याने हा सारा मुद्देमाल स्वराज्यात आला होता. कोल्हापूर च्या या लढाई मुळे स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा डंका आदिलशाहच्या दरबारापर्यंत पोहोचला.

Friday, 29 May 2020

गनिमीकावा न करता रणांगणात जिंकलेली लढाई

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या लढाई म्हटली की ती लढाई गनिमीकावा च समोर येतो कारण एव्हढ्यामोठ्या शत्रूला मूठभर सैनिक घेऊन तुटपुंज्या हत्यारांनी जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमीकाव्याचा वापर करावा लागत होता. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना अशी एक लढाई आहे ज्यात मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा ती म्हणजे ‘कांचनवारीची लढाई’.

छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्याहून सुटून स्वराज्यात आले. तेंव्हा स्वराज्याची आर्थिक परिस्थिती जरा बिकट होती त्यात पुरंदरच्या तहामध्ये स्वराज्याचे २३ किल्ले तहामध्ये द्यावे लागले होते.

स्वराज्याची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी यशस्वी मोहिमा काढाव्या लागणार होत्या. मोहीम म्हटलं की युद्ध आलं, युद्धासाठी दारूगोळा रसद हवी त्यासाठी स्वराज्यात खजिना मजबूत हवा होता. खजिना वाढवण्यासाठी ‘सुरत’ वर छापा टाकावा लागणार होता. शिवाजी महाराजांची ही दुसरी सुरत मोहीम होती. निर्णय पक्का झाला सर्वांनी मोहिमेची तयारी सुरू केली.

सप्टेंबर १६७० च्या सुमारास पंधरा हजारांच्या फौजेनिशी छत्रपती शिवाजी महाराज कल्याणला उतरले. मोहिमेवर जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटीच्या बातम्या पेरल्या होत्या.

सुरत चा सुभेदार तयारी ने मराठ्यांना अद्दल घडवण्यासाठी साठी सज्ज असायचा. पण मराठे येत नसायचे. असं बऱ्याचवेळा सुरत वर छापा टाकण्याच्या बातम्या धडकू लागल्या. पण मराठे येतच नसे हे पाहून सुभेदार आता अश्या अफवांवर दुर्लक्ष करू लागला. आणि खरोखरच २ ऑक्टोबर १६७० रोजी महाराज सुरतेमध्ये हजर झाले.

लक्ष्मीपूजेच्या दिवशी लक्ष्मी प्रसन्न झाली, महाराजांना अंदाजे एक कोटींचा खजाना मिळाला. मिळालेला खजाना, पंधरा हजारांचे सैन्य आणि शेकडो घोडे, बैल वगैरे घेऊन महाराजांनी स्वराज्याची वाट धरली.

मुघल सैनिकांना हुल देत शिवाजी महाराज नाशिक जिल्यातुन सातमाळ पर्वत रांगेच्या आडोश्याने येत होते. या डोंगररांगेच्या दक्षिणोत्तर मोठी सपाट मैदाने आहेत. या भागात धोडप, कांचना, हातगड वगैरे किल्ले आहेत त्यापैकी बरेच मुघलांच्या ताब्यात आहेत. या रांगेतील ‘कांचनबारी किल्लाच्या आडोश्याने जाण्याचा मार्ग निवडला.

औरंगाबाद म्हणजे दक्षिणेचा सुभेदार होता औरंगजेबाचा मुलगा ‘शहजादा मुअज्जम’. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती. त्याने बुऱ्हाणपूर चा सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्याचे आदेश दिले.

प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेला निघाला. दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवून दक्षिणेच्या दिशेने जायचं ठरवलं.

कसं ही करून सातमाळ ओलांडून स्वराज्यात जाणं गरजेचं होतं पण खजाना, सैनिक आणि घोडेस्वार यांना घेऊन जाणं थोडं जिकिरीचं होतं. युद्धजन्य परिस्थिती होती. 

महाराजांना स्वराज्य वृद्धी वाढवण्यासाठी खजाना गरजेचा होता आणि स्वराज्यासाठी सैनिक देखील. युद्धाच्या आदल्या रात्रीच महाराजांनी खजाना वाहणारे घोडे बैल आणि पाच हजार सैनिकानांना सप्तश्रृंगी च्या दिशेने हळूच एका तुकडी ला पाठवलं.

दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचं नेतृत्व स्वतः शिवाजी महाराजांनी केलं. सहा – तास चाललेल्या या तुंबळ युध्दात छत्रपती महाराजांसह, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी मोठया धीराने पराक्रम गाजवला मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन मराठ्यांनी युद्ध जिंकलं. 

हे युद्ध स्वराज्याच्या अतिशय महत्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई होती. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर निधड्या छातीने ही लढाई महाराजांनी केली. पुढे या भागातील सर्वच किल्ले स्वराज्य वृद्धीसाठी जिंकून घेतले.

शिवरायांच्या गनिमीकाव्याचं सर्वोत्तम उदाहरण उंबरखिंड चं युद्ध

छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येत स्वराज्य आणि स्वराज्याचे गडकोट, पण आणखीन काय विचार येतो असं विचारलं तर दहा पैकी आठ जण तरी नक्कीच गनिमीकावा किंवा शिवाजी महाराजांच्या लढाया आठवतील.

स्वराज्यासाठी झालेले युद्ध किंवा युद्धतंत्राचा अभ्यास करताना प्रगल्भ युद्ध तंत्र कसं असावं किंवा युद्धशास्त्र म्हणजे काय असतं या युद्धशास्त्राची छोटीशी चुणूक आपल्याला शिवाजी महाराज आणि कारतलब यांच्यात उंबरखिंडीत झालेलं युद्धात दिसून येते.

पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याच्या वायव्य दिशेने कोकणात जाताना किंवा खोपोली ते पाली या रस्त्याने जाताना उंबरे गावांजवळ उंबरखिंड सह्याद्री हिरव्यागार झाडीत लपलेली आहे. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर स्वराज्याची ताकद आता हळूहळू वाढत होती. तिचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलबखानाला उत्तर कोकण ताब्यात करण्यासाठी मोहिमेवर पाठवले.

अफझलखानासारख्या बलाढ्य सुभेदाराला जर शिवाजी महाराज सहज मात करू शकतात हे कारतलब खान पुरता जाणून होता म्हणून कारतलबखाना ने त्याच्या सोबत २०,००० ची पायदळ आणि घोडदळसोबतच छोट्या तोफा, बंदुका, डेरे, हत्ती, घोडे, बैल असा मजबूत मोगली सरंजाम यांच्या सोबतच अनुभवी सरदार जसे कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव व रायबाघन ही कर्तृत्ववान स्त्री सरदार होती.

कारतलाब खानाचा तळ पुण्यात होता तो तळेगाव मार्गे मळवली आणि मग तिकडून तो लोणावळ्याच्या दिशेने कोकणात उतरणार होता. महाराजांना कारतालब खान कोकणात ताब्यात घेण्यासाठी येणार आहे याची कुणकुण होतीच.

पण खानाला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी, कारतलब खान ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावर असणाऱ्या लोहगड व विसापूरच्या किल्ल्यावर असणाऱ्या सैनिकांना हल्ला न करण्याचे सक्त आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते, म्हणून महाराजांच्या आज्ञेमुळे यादोन्ही किल्ल्यावरून खानाला कोणताच विरोध झाला नाही.

असं करण्याचं मुख्य कारण म्हणजे घाटावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक वळणावळणाच्या वाटा अन अवघड घाट आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट हा लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. सह्याद्रीचा नव्वद अंशाचा  खडा पहाड उतरून आलं की चावणी गावा जवळ अंबा नदी आहे.

या नदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी अरुंद चिंचोळी पायवाट घनदाट जंगलातून जाते. यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. ही नळीची वाट ठाकूरवाडीच्या टेकडी जवळ रुंद होत जाते. या नळीत एकदा शिरले की, मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकडय़ा व अंबा नदीचे पात्र व पुढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे मुख यामुळे शत्रू आपसुकच कोंडला जातो. उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.

कारतलबखानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेणजवळ सैनाचा पहारा मजबूत ठेवला. त्यामुळे खानाला  कुरवंडा घाटाने उतरण्यावाचून पर्याय नव्हता कारण खानाला कोकणात उतरायचं होतं, खान फौज घेऊन अवघड घाट उतरू लागली.

सह्याद्रीचा हा अवघड मार्ग चढत फौज दुपापर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी जवळ जवळ नव्हतेच. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अश्या अवस्थेत सुध्दा खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैनिक आता उंबरखिंडीच्या त्या चिंचोळ्या नळीत शिरले.

बाजूच्या टेकडयांमुळे व घनदाट जंगलामुळे मराठयांना नैसर्गिक संरक्षण मिळत होतं. शिवाजी महाराजांनी संधीचा फायदा घेत जंगलात लपलेल्या मराठयांनी खानावर हल्ला चढवला.

खानाची फौज मराठ्यांकडून सपासप कापली जात होती. खानाला आणि त्यांना हल्ला नेमका कुठून होतोय आहे तेच कळत नव्हते. त्यात खानाच्या सैन्याला खबर मिळाली की शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, त्यामुळे खानाचे सैन्य भीतीनेच गार झाले.

खानाला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, उत्तर कोकण च्या बाजूला नेताजी पालकर तयारीत च होते. अशा भयंकर परिस्थितीत शरण जाण्यावाचून खानाला पर्यायच नव्हता. पण खान हटायला तयार नव्हता. त्याच्या जवळ असलेल्या सरदारांनी खानाला दबावात आणले. सारी परिस्थिती पाहता कारतलबखानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला.

शेवटी नाराजीनेच त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. वकिलाने महाराजांजवळ बिनशर्त शरणागती पत्करली. आणि महाराजांजवळ अभयदान मागितले.

महाराजांनी खंडणी आणि मुद्देमाल आणि साधनसामग्री खानाला तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. नाईलाजाने खानाचे सैन्य रिकाम्या हातांनी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत झालेल्या या युद्धात खानाचा सपशेल पराभव झाला.

मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले. कारतलब खानाच्या एवढया मोठ्या सैन्याला काही मूठभर मराठयांनी गनिमीकाव्याने २ फेब्रुवारी १६६१ रोजी सहज मात दिली.

मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे ६ जून १६७४ रोजी रायगडावर संपन्न झाला. रयतेच्या हक्काच ३२ मण सुवर्ण सिंहासन मोठया दिमाखात उभे राहिले.

फक्त रायगडावरच नाही तर संपूर्ण स्वराज्यच आनंदात न्हाऊन निघाल. कारण लोकांच्या मनातलं लोककल्याणकारी स्वराज्य अभिमानाने उभं राहत होतं. कित्येक वर्षांचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि स्वराज्याची जडण घडण च मुळी शून्यातून झाली होती.

शिवाजी महाराज राज्यभिषेक करणार ही बातमी औरंगजेबास समजली. सोहळ्याच्या अगोदर औरंगजेबाने आपला दुधभाऊ खानजहां बहादूरखान कोकलताश जफरजंग याला महाराजांचा राज्यभिषेकास विघ्न आणण्यासाठी दक्षिणेत पाठवले.

कोकलताश श्रीगोंदयाजवळ भीमेच्या काठी एक गाव आहे पेडगाव. आता या पेडगाव चा थोडक्यात इतिहास म्हणजे इथे पूर्वी खूप मोठा पेठ वसवली होती या पेठ च अपभ्रंश होऊन पेडगाव झालं तर या पेडगाव येथील बहादूरगड येथे आला होता. तर या बहादुराने या गडाला बहादूरखानाचे नाव दिले होते.

बहादूर गडाची सर्वात भयंकर आणि दुर्दैवी आठवण म्हणजे आपल्या शंभुराजांना कैद करून बहादूरगडी बंदी करून ठेवलेले. बहादूरखानाने राज्याभिषेकाला बाधा आणण्याचे प्रयत्न खुप केले परंतु जेष्ठातील पावसाळ्यात त्याचं काही चाललं नाही.

राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर औरंगजेबाने खानाची कानउघाडणी केली. पण कोकलताश ने कुठे तरी छापा घालून एक करोड नगद आणि ताज्या दमाचे मजबूत अंगाचे दोनशे घोडे जमा केलेत जे पाऊस ओसरला की आगऱ्याला पाठवून देतो. बहादूर खानाच्या या कृती मुळे औरंगजेब थोडा शांत झाला.

पण ही खबर औरंगजेब ला पोहचण्या आधी बहिर्जी नाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ती खबर रायगडावर पोहोचवली. महाराजांनी योजना आखली आणि आपले जे सैन्य होतं त्यांना आदेशाची सूचना दिली. त्यावेळी बहादूरगड किल्ल्यावर जवळपास २५ ते ३० हजारांचे सैन्य असावे जे मराठा सैन्याच्या समोर खूप जास्त होते.

पण आपल्या सैन्याचा नेतृत्व त्यावेळी हंबीरराव मोहिते यांनी केल्याची शक्यता आहे. तर सेनाप्रमुखांनी हाताशी असलेल्या नऊ हजाराच्या आसपास मराठी सैन्य घेऊन बहादूर गडावर हल्ला चढवला.

या सैनिकांच्या पुन्हा दोन तुकड्या बनवल्या, या पैकी एक तुकडी ज्यात दोन हजार सैनिक होते ते, पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादुरगडाजवळ कुरकुंभ ला मुक्कामी थांबले.तर उरलेल्या सात हजाराची फौज आरडाओरडा करत आणि महादेवाची गर्जना करत पुणे-रांजणगाव-शिरूर-नगर मार्गे श्रीगोंदयाकडे रवाना झाले.

या आरडाओरड्या मुळे बहादूर खानच्या सैनिकांना वाटलं मराठयांनी हल्ला चढवला. त्यांनी हल्ल्याची बातमी बहादूरखानाला दिली. मोठ्याने आक्रोश करत मराठे येत असल्याने ते नक्की किती आहेत याचा अंदाज बहादूरखानाला आला नाही.

मराठयांनी गडावर येऊन हल्ला करण्याऐवजी मराठ्यांना मैदानी प्रदेशात गाठून त्यांचा कायमचा बंदोबस्त करू असं म्हणत संपूर्ण गड रिकामा करून बहादूरखान मराठयांच्या दिशेने मोठ्या त्वेषाने निघाले. मराठे देखील जबरदस्त जोशात आरोळ्या अन गर्जना करत पुढे पुढे सरकत होते.

पण समोर येणाऱ्या बहादूरखान आणि त्यांच्या सैनिकांना पाहून मराठ्यांनी माघार घेतली. माघारी पळणाऱ्या मराठ्यांना पाहून खान खुश झाला त्याला वाटलं आपण यांना आता सहज हरवू. त्यात औरंगजेबाने कानउघाडणी केल्यामुळे बहादूरखानाला काही करून मराठ्यांना धडा शिकवायचा होता. पण मराठा सैन्य जवळपास चार पाच मैल पुढे निघून गेल्यावर खानाने हताशपणे पुन्हा गडाची वाट धरली.

गडाकडे निघताना मध्येच पुन्हा मराठे माघारी येताना दिसले खानाने पुन्हा आपला मोर्चा मराठयांच्या दिशेने वळवला. खान येतोय हे पाहून  मराठा सैनिक पुन्हा माघारी फिरलं.

मराठयांनी असं दोन तीन वेळा झालं खानाला हा काय प्रकार चालू आहे ते कळालं च नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा मराठा सैनिक माघारी फिरलं. बहादूर खान आता खूप चिडला होता या मराठयांना धडा शिकवल्या शिवाय परतायचं नाही. खानाने मराठा सैनिकांचा पाठलाग तसाच सुरू ठेवला खान सैन्य आता नगर येथून निघून शिरूर जवळ पोहोचलं पण मराठा सैनिक कुठे गायब झालं खानाला कळलं नाही.

मराठयांच्या एका तुकडीने खानाला पुण्यापर्यंत नेलं हे समजताच उरलेल्या दोन हजाराची तुकडी जी पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादूरगडावर पोहोचली. त्या तुकडी ने गडावर हल्ला करत गडावरील असलेल्या मुद्देमाला सहित २०० अरबी घोडे घेऊन आल्या पावली रायगडावर निघाले. आणि जाता जाता त्यांनी गड पेटवून दिला. गडावर असलेल्या मोजक्याच बाजारबुणग्याना मराठा सैनिकांवर हल्ला करताच आला नाही.

इकडे खान मराठयांना धूळ चारत पुण्यापर्यंत पोहचवलं या आवेशात तो येत होता. पण बहादूरगडावर आल्यावर गडाची अवस्था पाहून खान हबकला. गडाची अवस्था अशी अवस्था कोणी केली तो अधिकच संतापला कारण गडाची अशी दुर्दशा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठेच होते.

रणभूमीवर न उतरता आणि युद्ध न करता, २५ हजारांच्या फौजेशी न लढता फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर, एक कोटी होनांची दौलत अन घोडी सहजच स्वराज्याला मिळाली आणि ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता. कदाचित या पेडगावला झालेल्या फजिती मुळेच मराठी मध्ये आला मोठा “पेडगावचा शहाणा” ही म्हण रुजू झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत. महाराष्ट्रासोबतच जवळ जवळ संपूर्ण भारतात कुठे ना कुठे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाहायला मिळतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प कधी व कुठे उभारले माहीत आहे का? 

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प उभारण्यात आले ते कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या गावात या शिल्प उभारणी चा देखील एक रंजक इतिहास आहे. मल्लवा देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या जिवंत असतानाच त्यांचे शिल्प आपल्या राज्यात साकारले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर महाराजांनी १६७८ साली दक्षिण दिग्विजय मोहीम काढली होती. ही मोहीम करून महाराष्ट्रात परत येत असताना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस काही कारणास्तव वेढा घालण्यात आला वेढा घालण्याचं कारण नीट स्पष्ट होत नाही. ही गढी प्रभुदेसाई यांची होती या वेळी या वेढ्याचे नेतृत्व सरदार सखोजीराव करत होते. वेढ्याचे नेतृत्व सखोजीराव यांना सोपवून महाराज पन्हाळगडावर आले. 

काही कारणास्तव प्रभुदेसाई आणि सखोजीराव यांच्यात लढाई झाली. गढी छोटी असली तरी प्रभुदेसाई यांचे सैनिकानी कडवी झुंज दिली. या युद्धात प्रभुदेसाई धारातीर्थी पडले. तरी देखील ही गढी निकराने झुंज देत होती.

पती मारले गेल्यानंतरही प्रभुदेसाई यांची पत्नी मल्लवादेवी यांनी लढाई सुरूच ठेवली. त्यांनी अक्षरशः  पुरुषवेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरविले होते. मराठी सैनिकांसमोर आपला टिकाव लागू शकत नाही हे हेरून मल्लवा देवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे तहाची मागणी केली.

तह करण्यासाठी स्वतः महाराज यादवाडजवळच्या आपल्या सैन्याच्या मुख्य छावणीत दाखल झाल्यानंतर मराठ्यांनी बेलवडीच्या सैन्यास माघार घ्यायला लावली. परंतु त्याचवेळी सरदार सखोजीराव यांनी युद्ध सुरू असताना काही स्त्रियांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांना जेंव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा त्यांनी सखोजीराव यांचे डोळे फोडण्याची शिक्षा दिली.

मल्लवा देवी यांचा पराक्रम पाहून महाराजांनी मल्लवांना त्यांचे राज्य आणि आजूबाजूची चार गावं त्यांना मुलाच्या दूधभातासाठी परत केली. पती च्या मृत्यूनंतर ही ज्या पद्धतीने त्यांनी झुंज दिली त्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना सावित्रीबाई म्हणून गौरविण्यात आले.

त्यामुळे महाराजांची आठवण आपल्या गढीत कायम राहावी, यासाठी त्यांनी महाराजांचे दगडी शिल्प कोरले. या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह घोड्यावरून जात आहेत अस दिसत.

तर शिल्पाच्या दुसऱ्या भागात छत्रपती शिवाजी महाराज एका आसनावर बसले आहेत आणि त्यांनी मल्लामा देवीच्या मुलाला मांडीवर घेतले आहे ज्यात शिवाजी महाराज हातात वाटी असून ते त्या मुलाला मुलाला दूध पाजत आहेत. त्यासोबत समोरच दोन महिला देखील त्या शिल्पात आहेत. त्यापैकी एक स्वतः मल्लवा देवी या आहेत.

स्वराज्याचे पहिले तोरण

संपुर्ण महाराष्ट्र जेंव्हा मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाहीच्या टाचे खाली दबला जात होता. त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं, इथल्या तरुणांना संरक्षण दिलं त्यांना तसेच स्वतःसाठी आणि मातीसाठी लढायला शिकवलं.

सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेंव्हा आपल्या सवंगाड्यांना सोबत घेऊन जेंव्हा स्वराज्याची संकल्पना मांडली तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर सर्वात महत्वाचं लक्ष होत स्वराज्याच्या किल्ल्याच. स्वराज्यला राखण्यासाठी सह्याद्रीच्या अभेद्य पर्वत रांगेचा मोठा हातभार होता.

पुणे परगण्यातील त्यावेळचा मोठा किल्ला शिवरायांनी हेरून ठेवला होता. तोरणा किल्ल्याचा डोंगर हा खुप उंच आणि अवघड असून महत्वाच्या अश्या मोक्याचा जागेवर होता.

आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून तसाच सोडून दिला होता. किल्ला अर्धवट असल्याने यावर कोणाच्या नजरेखाली नसल्याने किल्ल्यावरही पहारा बऱ्यापैकी शिथिल होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हाच किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले. 

सर्व नियोजन स्वतः शिवरायांनी आपल्या सवंगाड्यांना सांगितले. त्यानुसार योजना आखली गेली. आणि अखेर प्रत्यक्ष हल्ल्याचा दिवस उजाडला शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले, मिळेल त्या अवजारांची झालेली हत्यार यांच्या जोरावर शिवरायांनी प्रचंडगडावर हल्ला केला. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, कि पाहिजे तेवढा दारुगोळा नव्हता.

शिवरायांनी हे हेरलं आणि साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी सुध्दा भराभर ठरल्याप्रमाणे मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले.  आणि गड काबीज केला, तोही वयाच्या अवघ्या १६ वय वर्षी. स्वराज्याच पहिलं तोरण बांधलं गेलं.

या स्वराज्याच्या तोरणाची आठवण म्हणूनच की काय प्रचंडगडाचे नामांतरण “तोरणा” करण्यात आले असावे. तोरणा किल्ला तसा मजबूत किल्ला. किल्ल्यावर दोन भक्कम माच्या आहेत एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी झुंझारमाची वरून एकच अरुंद वाट आहे. हि वाट अतिशय अवघड आहे. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो.

हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा भांड्यांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचा कारभार सुरु झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. स्वराज्य स्थापनेचं तोरण या किल्ल्यापासून झालं म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा पडलं असं म्हणतात पण हे तितकं बरोबर नाही. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा असं म्हणतात.

महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. या किल्ल्याला प्रचंडगड, नबीशाहगड, ‘फुतूहल्घैब म्हणजेच दैवी विजय’, गरुडाचे घरटे असे देखील म्हटले जाते.

प्रजादक्ष शिवकल्याण राजा शिवछत्रपती!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावर सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष पारतंत्र्याची आणि अन्याय-अत्याचाराची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्र हा गुलामगिरी, पारतंत्र्य, उपेक्षा, अवहेलना, दु:ख आणि भीतीचा भयंकर काळोखा खाली होरपळत होता. या भीषण काळोखाला छेद देणारा तेजस्वी सूर्यकिरण सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराज्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला.

खडतर सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद दुर्गांच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य रयत, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा अग्नी धगधगत ठेवला.

तत्कालीन आक्रमकांच्या अन्याय्य अत्याचाराच्या गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र आणि लोकशाहीचा मूळ गाभा असलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत आणि मजबूत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी फक्त एकत्र केलं नाही तर शत्रु कितीही बलाढय असला तरी उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली त्याला नामोहरम करता येऊ शकतं याची जाणीव करून दिली. यांच्या सारख्या महान शिलेदारांच्या असीम त्याचमुळे च स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.

सामान्य रयतेला आपलं वाटावं असं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं. हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे मुख्य धोरण होते. स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आहे ही त्यांची भावना केवळ पत्रातूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त झालेली दिसून येते.

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे “केवळ आणि केवळ रयतेच्या हितासाठी झटणारा एकमेव राजा’ म्हणून पाहिले जाते. स्वराज्याच्या प्रत्येक व्यक्ती वर पोटाच्या पोराप्रमाणे काळजी घेतली. या कसोटीला छत्रपती शिवाजी महाराज उतरतात म्हणूनच ३९० वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती जनतेचे अपंरपार प्रेम अजुनही दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना संरक्षण दिले. शेतात ज्या प्रमाणे गोफण फिरवून आपल्या पिकांचं संरक्षण केलं त्याच शेतकऱ्यांना त्याच गोफणीच्या साहाय्याने मोगल, आदिलशाही, निजामशाही, फिरंगी अशा अनेक परकीय आक्रमकांना स्वराज्यातून हुसकावून दिलं. अश्या कर्तृत्ववान धारकऱ्यांना शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं.

“लोकशाही” आणि “धर्मनिरपेक्षता’ ही आत्ताच्या काळातील आधुनिक संकल्पनेचा गाभाच मुळात स्वराज्य स्थापनेमध्ये दिसून येतो. शिवरायांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे जितके सत्य आहे तितकेच अन्य धर्मीयांचा जाणीवपूर्वक असा छळ देखील केला नाही. एक शिवकालीन शाहीर आपल्या कंदनात म्हणतो, “शिवरायांच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव जाती। तेथे नाही भेदभाव।।

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची सुव्यवस्थित घडी बसविण्यासाठी कर्तृत्व दाखविणाऱ्या अनेक निर्भीड व्यक्तींची निवड केली. स्वराज्यामागचे मुख्य सूत्र प्रजाहित असल्याने त्यांनी काटेकोर आणि कडक धोरण अवलंबले होते. त्यांनी सैन्यात शिस्त निर्माण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखुनच आपल्या जवळ केली होती. महाराजांनी सतत निर्व्यसनी व्यक्ती, आपले कर्तव्यदक्ष सेनानी, स्त्रिया, संत महंत यांचा सन्मान केला त्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडचे अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता, दऱ्याखोऱ्या डोंगररांगाची भौगोलिक परिस्थिती, मर्यादित अशी लढाईची साधनसामुग्री, मर्यादित आर्थिक बळ ह्या गोष्टी विचारात घेऊन महाराजांनी आपली स्वतंत्र युद्धनीती आखलेली होती आणि स्वराज्याचा विस्तार वाढवला. कोणताही राष्ट्रीय नेता जनतेच्या संपूर्ण पाठबळाशिवाय आपले कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही.

शिवाजी महाराजांचे पहिले कार्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्व थरांतील लोकांची एकजूट करून त्यांची एकसंघ समाज म्हणून निर्मिती करणे हे होते. शिवरायांनी लोकांमध्ये ध्येयाची आणि जीवनाची एकरूपता उत्पन्न केली.

राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही. नेमके हेच महत्कृत्य शिवरायांनी करून दाखवले आहे. शिवाजी महाराज झालेच नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते; हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

आजही फक्त महाराष्ट्रतील नव्हे तर संपुर्ण भारतात नव्हे नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला.

छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. पण शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य हेतू प्रजाहीत असल्याने.

स्वराज्याची जनताही शिवरायांच्या साठी जीव ओवाळून टाकत असे. स्वराज्यात न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. स्वराज्याचा डोलारा सांभाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मुख्य अष्टप्रधान मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता जी व्यक्ती कर्तबगारी दाखवेल त्या धर्तीवर ठरवण्यात आले.

पंतप्रधान : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे महत्वाचे सर्व अधिकार पंतप्रधान यांच्या कडे असायचे. पंतप्रधानांचे मुख्य काम म्हणजे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर  देखरेख ठेवणे.

थोडक्यात महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी म्हणून जी महत्त्वाची व्यक्ती काम करायची, यावरूनच हे पद किती महत्वाचे आहे हे दिसून येते. राज्याभिषेकावेळी मोरोपंत त्रंब्यक पिंगळे हे पंतप्रधान होते आणि त्या पदासाठी पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन पगार होता.

पंत अमात्य : पंत अमात्य या पदाला पूर्वी मुजुमदार म्हणत असे. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या क्षेत्रातील अधिकार्‍याकडून येत असे तो जमाखर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम पंत अमात्य या मंत्र्यांकडे असायचं. हा जमाखर्च वेळोवेळी महाराजांसमोर सादर करावा लागत असे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र नीलकंठ पंत हे पंत अमात्य होते आणि त्यांच्या पदाला वार्षिक १२ हजार होन पगार होता.

पंत सचिव : पंत सचिव हे सुद्धा एक महत्त्वाचं पद असून राजधानीत किंवा छत्रपती शिवरायांना जाणार्‍या येणार्‍या सर्व पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.

शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी जी आज्ञापत्रे पाठवली जात असे त्याची नोंदणी आणि त्यावर लक्ष ठेवण्याचं काम सुरनीस म्हणजे च पंत सचिवांच असायचं. स्वराज्याचे लहान मोठे सर्व दफ्तर व जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्याचं काम पंत सचिवांच असायचं. राज्याभिषेकाच्या वेळी अण्णांजी पंत दत्तो हे पंत सचिव होते आणी त्यांच्या त्या पदासाठी वार्षिक १० हजार होन पगार होता.

मंत्री : महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. पायदळचा बंदोबस्त करणे. छत्रपती शिवरायांच्या महत्वाच्या नोंदी ठेवणं ही वाकनीसांची म्हणजेच मंत्र्यांची कामं त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

सेनापती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती पूर्वी याला सरनौबत म्हणत असे. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींचा अंमल असायचा. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी हंबीरराव मोहिते हे सेनापती आहे आणि त्या पदासाठी सेनापतीला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंत सुमंत : परराष्ट्रांना खलिते पाठविणे किंवा परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, त्यासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती देणे. खलिते पाठवताना त्यासंदर्भात सल्ला देणे. त्याच बरोबर परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे काम त्यांना करावे लागे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र त्रिंबक पंत सुमंत म्हणून काम पाहत होते ज्यासाठी त्यांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

न्यायाधीश : दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम न्यायाधीशांचं होतं. न्यायदानाचे महत्वाचे कार्य न्यायाधीशांचे असायचे. राज्याभिषेकाच्या वेळी निराजीपंत रावजी हे न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत. वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंडितराव दानाध्यक्ष  : धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वानांचा सन्मान करणे, धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे. ही काम पंडितराव दानाध्यक्ष संभाळत असे त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. प्रत्येक प्रधानाजवळ एक सहकारी मुतालिक असायचा अष्ट प्रधान मंडळाच्या गैर हजेरीत मुतालिक कामकाज पाहत असे.

वेडात मराठे वीर दौडले सात अंगावर शहारे आणणारा इतिहास

जेष्ठ साहित्यीक कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या या रक्त सळसळणाऱ्या ओळी वाचल्या की ओळख होते कर्तबगार मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याची.

हे लता मंगेशकरांनी गायलेलं गीत ऐकलं की, जवळ जवळ प्रत्येकालाच स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी १६७४ साली शौर्य गाजवलेला स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान.

छत्रपती शिवाजी महाराज, यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यात अनेक मातब्बर सरदार आणि लढवय्ये मराठा शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते.

या लढवय्या सैनिकांचे सरनोबत होते प्रताप राव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर होते पण त्यांच्या असीम पराक्रमा बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली. प्रताप राव गुजर खरोखरच एक कुशल रणनीतिकारक आणि कुशल सेनापती होते. त्यांनी मुघल व विजापुरी सुलतानांविरूद्ध अनेक महत्त्वपूर्ण व कित्येक निर्णायक युद्ध विजयांचे ते नायक होते.

शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की “खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे.

महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली.

पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे गयावया करीत अभयदान मागितले प्रतापरावांचे मन द्रवले.

खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.

या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.

महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. 

महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले.

पंधरा हजार सैन्यावर हल्ला करण्यासाठी ज्यात होते, विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोटजी, आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर त्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत.

पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले. या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला.

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात.

खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात.

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. हा इतिहास वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या या ओळी वाचल्यावर डोळ्यांच्या कडा मात्र आपोआप ओल्या होतात.

तुटेल मस्तक परी न उटा शब्द इमानी – स्वराज्यनिष्ठ सरदार कान्होजी जेधे

कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा पाठिंबा मिळवून दिला.

कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते. छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेराव यांनी देखील आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले. स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे

कान्होजी जेधे यांचा जन्म कारीगावी झाला. त्यांच्या जन्म्यापुर्वी त्यांच्या वडिलांची हत्या नंतर मात्रोश्रीची, अगदी काही दिवसाच्या लहान मुलांला पोरका होण्याचा महाशाप मिळाला. यावेळी कान्होजी जेध्याचा जीवावर भेटलेल्या प्रसंगात; जेध्याचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देवजी महाल्याच्या साह्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले.

रानावनांत फिरत तेंही कान्होजीचा सांभाळ केला. पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची दिखभाल करून योग्य मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण दिले. कान्होजी जेधे कारी गावी येऊन आपल्या मातापितरे बलिदानाचा सुढ मिळवून कारी-अंबवडे गावासह रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली.

संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता. कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते. ते म्हणजे शिडया व माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे व गड सर करणे. तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो.

त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते. सन इ.इ. १६१९ रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रा मध्ये ‘कान्होजी राजे जेधे’ असा उल्लेख दिसून येतो.

आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखाननी शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो. ही घटना साधारण इ.स. १६३५ च्या दरम्यानची आहे. नंतर इ.स. १६३६ च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा रणदुल्लाखानाकडून शहाजीराजांनी कान्होजीस आपणांकडे मागून घेतले. सन १६४८ साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजीत राहिले.

कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते. “कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहत. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.” असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली.

शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले, “महाराजांनी (शहाजीराजे) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाचजण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ” असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

शिवाजी महारांजानी इ.स. १६५५ ते ५६ च्या दरम्यान जावळीचा मोर्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलुख स्वराज्यात दाखल केला. कान्होजी जेधे व त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, वगैरे देशमुखानी या कामी छत्रपतींना सहाय्य केले. शिवाजीराजांनी रायगड या किल्याच कब्जा कान्होजी जेधे यांच्यामार्फत घेतला.

जरी कान्होजी जेधे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य इमानी करत होते.

आदिलशाहीचा बराच मुलुख व काही किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल केलेले होते. त्यामुळे आदिलशहा शिवाजीराजांवर चिडून होतो, शेवट आदिलशाहीतून अफजलखानाने शिवाजी महाराजांना धरून अथवा मारून आणण्याची घोर प्रतिज्ञा करून विडा उचलून मावळाकडे निघाला होतो.

१६ जून १६६५९ कान्हीजी जेधे यांना आदिलशहाने पाठविलेले फर्मान असे, “शिवाजी अविचारीने व अज्ञानाने निजामशाहीत. कोंकणातील मुसलमानांना त्रास देऊन लुट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याचे पराभवार्थ. शिवरायांना पराभव करून निर्मूळ फडशा करावा.

शिवरायांचे निसवतीचे लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानच्या सांगण्यावरून. तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.” आदिलशहाचे हे फर्मान कान्होजीस मिळताच त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला.

कान्होजी जेधे यांनी या फार्मांचा कोणताही मुलाहिजा दिला नाही. ते थेट आपल्या पुत्र व लष्करी जमाव घेऊन शिवाजीराजांकडे आले, “या पुढे खस्त होऊ ( मरण पत्करू ) तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली. आपल्या वतनावर पाणी सोडले” हे दर्शविण्यासाठी पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली.

छत्रपति शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की, “तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.” असे म्हणून शपथ दिली. त्यानंतर शिवाजीराजांनी कान्होजीस हुमूम केला की, वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिल कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तालेेगावास पाठवा.”

कान्होजी जेधे पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला सर्व वृतांत त्यांना कथन केला की, “स्वामींच्या पायासी इमान धरून वातनास देखील पाणी सोडीले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. मुसलमान (अफजलखान) बेईमान आहे.

कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील. हे ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ आहे. अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून, राजश्री स्वामीसंनिध राहोन, येक निष्ठेने सेवा करावी.” कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेधे यांचा किती मोठा सहभाग होतो हे कळून येते.

अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सर्वोतपरी सहकार्य केल. आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पडला. कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम दिले होते.

स्वराज्यावर आलेले दुसऱ्या संकटात बांदलाच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्या दरम्यान सैनिक मारले गेले होते. यामुळे महाराज विशालगडावर सुखरूप पोचले होते. बांदलाच्या या कामावर प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम देण्याचे ठरविले आहे. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत व्यक्त केले.

“महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?” कान्होजीनीही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे. जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला | तैसे जेधे बांदल शिवाजीला ||

आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास अंबवडेस जरूर जावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल.

शिवराय असे शक्तीदाता दुसऱ्या महायुद्धातील एका लढाई ची कहाणी

सह्याद्री च्या कुशीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले गडकोट म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय जणू जीव कि प्राण. शिवराय तर साक्षात महादेवाचे रूप घेऊनच आले प्रसंगी रुद्रावतार दाखवणारे तर कधी प्रेमळ आणि मायाळू.

आजही शिवाजी महाराजांच्या नावाची जादू ओसरली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने कित्येक मुघली सरदारांना घाम फुटायचा. ज्या औरंगजेबाला दक्खन काबीज करायचा होता त्या औरंग्याला शेवटी इथल्या मातीत गाडलं. त्याच्या सोबत लढण्याची ताकत आली कशी?? ती ताकद ती छत्रपती शिवाजी महाराज या जादुई मंत्राने शिवराय असे शक्तीदाता! आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपसूक मुठी वळल्या जातात.

शिवराय असे शक्तीदाता !! याची प्रचिती खुद्द इंग्रजांनी सुद्धा घेतली होती कधी ते आज आपण पाहुयात. सह्याद्री च्या कुशीतील महाराष्ट्रच्या कणखर,राकट आणि चिवट भूमी मधल्या रांगड्या आणि शूरवीर चपळ सैनिकांना घेऊन ब्रिटिश सरकार ने १७६८ साली लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट(बॉंबे सिपॉय) ची स्थापना केली.

हि रेजिमेंट देशातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. प्रत्येक सैनिक आपल्या रेजिमेंट साठी प्राणांची बाजी लावून लढत असतो. त्याच बरोबर प्रत्येक रेजिमेंट चा स्वतःचा असा खास असा एक गौरवशाली इतिहास असतो, त्यांच्या काही परंपरा असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने सरदार तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वाखाली कोंढण्याची लढाई झाली. आणि एका रात्रीत मराठ्यांनी कोंढाणा जिंकला, या लढाईची प्रेरणा घेऊन ‘मराठा लाईट इंफंट्री’ ची स्थापना झाली.

या रेजिमेंट चे घोषवाक्य आहे, ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय’. प्रत्येक रेजिमेंट ची युध्द घोषणा असते ज्याला Battle Cry म्हणतात. ही युद्ध घोषणा शक्यतो देव देवीच्या जय जयकाराची घोषणा असते. जेणेकरून सैनिक त्वेषाने लढू शकेल. परंतु “बोल श्री छत्रपती महाराज कि जय” अशी एखाद्या व्यक्तीच्या नावाने दिली जाणारी घोषणा जगाच्यापाठीवर बहुदा पहिलीच असेल.

या युद्ध घोषणेचा देखील रंजक इतिहास आहे. या गर्जना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांवेळी मराठा सैनिकांनी ब्रिटिश नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात जगभर दिल्या होत्या. पहिल्या महायुद्धाचा शेवट हा ‘Battle of Sharqat’ च्या लढाई ने झाला. ही लढाई जगभरातल्या सैन्य लढ्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पहिल्या महायुद्धाला संपावणारी अशी विजयी घटना म्हणून गणली जाते.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जेंव्हा ब्रिटिश आणि इटालियन सैनिक १९४१ साली आमनेसामने आले. ईशान्य आफ्रिकेत इथोपिया सुदान यांच्या जवळ एरिट्रीया नावाचा देश आहे. या प्रांतात डोलोगोलो नावाचा एक डोंगरी किल्ला त्यावेळी इटालियन आर्मी च्या ताब्यात होता. आणि किल्ल्याच्या जोरावर इटली चा त्या भागावर कब्जा होता.

त्यामुळे साहजिकच लाल समुद्राच्या आखाती प्रदेशावर इटालियन सैनिकांच वर्चस्व होतं. त्यामुळे ब्रिटिशांना तो किल्ल्या घेणं आवश्यक होते. डोलोगोलो चा किल्ला समुद्र सपाटी पासून अडीच हजार फूट उंच होता. या किल्ल्याच महत्व ओळखून च इटालियन सैनिकांनी किल्ल्यावर भरपूर प्रमाणात रसद आणि दारुगोळा किल्ल्यावर आणून ठेवला. त्या मुळे किल्ला काही केल्या दाद देत नव्हता.

ब्रिटिशांनी पंजाब आणि कुमाऊं रेजिमेंट ला किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलावलं पण किल्ला काही दाद देत नव्हता. कित्येक ब्रिटिश सैनिकांना हा किल्ला घेताना वीर मरण आलं.

कुमाऊं रेजिमेंट ला मदत करण्यासाठी मराठा लाईट इन्फ्रन्ट्री ला पाठवण्यात आलं. जानेवारी १९४१ च्या शेवटी ५वी मराठा लाईट इन्फ्रन्ट्री तिथे पोहोचली. सुभेदार श्रीरंग लावण यांच्याकडे या इन्फ्रन्ट्री च नेतृत्व होतं. पहिल्या चढाईत या तुकडीला ही अपयश आलं होतं. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी ब्रिटिशाकडून दबाव वाढत होता.

या मोहिमेची जबाबदारी होती फ्रॅंक मेजरवायर या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. सह्याद्री सदृश्य किल्ल्या असल्याने सुभेदार श्रीरंग लावण यांनी फ्रँक ला विचारलं हा किल्ला माझी रेजिमेंट घेऊ शकते जर तुम्ही बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्ध घोषणा बोलण्याची परवानगी दिली तर. फ्रँक कुत्सित पणे लावण यांच्या वर हसला पण लावण यांचा आत्मविश्वास बघता फ्रॅंक याने लावण आणि त्यांच्या बटालियन ला संधी दिली. 

श्रीरंग लावण यांनी पाहणी करून त्यांच्या सैनिकासह कड्यावरून चढत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने सरसर करत किल्ल्यावर गेले. इटालियन सैनिकांनी वर चढणाऱ्या सैनिकांवर बंदूक आणि तोफेचा मारा केला पण हे लढवय्ये त्वेषाने चढत होते.

किल्ल्यावर पोहोचल्यावर घनघोर युद्ध झालं आणि किल्ला मराठा लाईट इन्फ्रन्ट्री च्या बटालियन ने मिळवला. सुभेदार श्रीरंग लावण यांचा पराक्रम पाहून फ्रँक यांनी बोटं तोंडात घातली. सुभेदार श्रीरंग लावण यांना १८ जुलै १९४१ रोजी मिलीटरी क्रॉस पदकांने सन्मानित करण्यात आले आणि त्या दिवसापासून मराठा लाईट इन्फ्रन्ट्री ची घोषणा “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय”

छत्रपतींच्या केवळ नावाने सैनिकामध्ये स्फुरण चढून ते असामान्य पराक्रम गाजवतात हे त्यावेळी सिद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धच्या वेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. म्हणूनच मराठा सैनिकांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर दरारा अन आदर आहे.

शिवरायांनी रुजवलेली मुद्रण कला

भारतामध्ये इ.स. १५५० मध्ये मुद्रणाला आजच्या भाषेत सांगायचं झालं तर टायपिंग ची सुरुवात झाली. पोर्तुगीजांनी त्यांच्या धर्म प्रसारासाठी लागणारी धार्मिक पुस्तके छापण्यासाठी गोव्यात सर्वप्रथम छापकारखाना सुरू केला. त्यासाठी लागणारी साधनसामग्री व यंत्राचे सुटे भाग पोर्तुगीजांनी त्यांच्या देशातून आणले. पोर्तुगीजांनी १९५६ साली ‘केटेशिमो-डी-डाक्ट्रिन’ हे पुस्तक या कारखान्यात छापलं आणि प्रकाशित केलं.

भारतात छापून प्रकाशित झालेलं हे पहिलं साहित्य आणि कदाचित हीच छपाई आणि मुद्रण कलेची पायरी म्हणता येईल. पुढे मग भारतात छपाई कलेचा विस्तार होत गेला. ही मुद्रणाची प्रक्रिया शिकण्याची तयारी जर कोणत्या भारतीयाने केली असेल तर ते छत्रपती शिवराय.

महाराजांनी सुरतेवर छापा घातला त्यावेळी तेथील जडजवाहिराची  जमवाजमव सुरू असतानाच छत्रपती शिवरायांना एक यंत्र सापडलं. पण यंत्र नेमकं काय आणि कसं काम करत याबाबत कुतूहल निर्माण झालं. मात्र, ते काय यंत्र आणि ते कसं काम करतं ते ब्रिटिश सांगेनात.

त्यावेळी शिवरायांनी ते यंत्र सुरतमधीलच भीमजी पारेख यांना देऊन ते काय आणि त्याचा उपयोग काय अन कसा करायचा या बाबत माहिती करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरतेत भारताचा पहिला छापखाना सुरू केला. आजही ताे श्री शिवाजी छापखाना म्हणून दाखवला जाताे.

१६७४ हे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेका वर्षीच्या ३ एप्रिलच्या पत्रानुसार, भीमजीने छपाई करण्यास लागणारी साधनसामग्री आणि काही कारागीर लंडनवरून मागवले होते. मुंबईचा त्यावेळचा गव्हर्नर असणाऱ्या जिराल्ड अँजिअर १६७४ मध्ये लंडनहून छापखान्याची सामग्री मागवण्यासाठी भीमजीला मदत केली खरी आणि या प्रेसवर काम करण्यासाठी इंग्रजांनी काही लोक पाठविले.

परंतु भारतीयांना या कलेचे ज्ञान मिळू नये, असा त्यांचा हेतू होता. भीमजीच्या प्रेससाठी लंडनवरून आलेली सामग्रीही निकृष्ट दर्जाची असल्याचे सिद्ध झाले. १६८९ या वर्षी मुंबईच्या गव्हर्नरने या प्रेसमध्ये काही पत्रके छापली आणि भीमजीच्या मृत्यूनंतर थेट १८१२ मध्ये ही प्रेस फरदनजी मुरझबान याने चालवायला घेतल्याची माहिती उपलब्ध आहे.

१८व्या शतकाच्या शेवटी शेवटी भारताच्या बहुतेक मुख्य शहरांत छापखाने सुरू झाले होते. संगणक येण्यापूर्वी भारतात ‘लेटर प्रेस’ ही पद्धत अधिक लोकप्रिय होती जुन्या माणसांना त्याची टकटक आठवत देखील असेल.

मुद्राक्षरे जुळवाजुळव करून मुद्रण केले जात असे. याची गम्मत म्हणजे मुद्रांकीत केलं जाणारं अक्षर दिसताना उलट तर कागदांवर सुलट उमटलं जातं. यामध्ये देखील प्लॅटनयंत्र, सिलिंडर प्रेस, रोटरीयंत्र ते यंत्र विकसित होत गेलं.

लिथोग्राफी हा छपाईतला आणखी विकसित प्रकार. यामध्ये तीन रोलरच्या साहाय्याने छपाई केली जाते. ऑफसेट पद्धती ही लिथोग्राफीची सुधारित आवृत्ती. यामध्ये शाईची बचत तर होतेच  तर मनुष्यबळ देखील कमी लागत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे कमी वेळात भरपूर छपाई सोबतच कामात सफाई आणि स्वच्छता. पुढे संगणकामुळे मुद्रण पद्धतीचा कायापालट च झाली.

आत्ता आत्ताच्या काळात भारतात डिजीटल मुद्रण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आपण आपल्या दादा, मानानियांचे जी मोठमोठी प्लास्टिकची पोस्टर्स, बॅनर्स पाहतो, त्यासाठी डिजीटल मुद्रण पद्धतीचा वापर केला जातो.

कल्याणच्या सुभेदाराची सून

शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात.

एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण स्वीकारलं त्या बद्दल जे धोरण स्वीकारलं त्या धोरणाचं समर्थन करतात. 

सर्वात अगोदर हे प्रकरण नक्की काय आहे इतिहासात नेमकं कुठं सापडलं आणि कधी घडलं याचा अभ्यास करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते. पहिली बखर आहे शककर्ते शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय.

आबाजी सोनदेव यांजकडे कल्याण प्रांताचा सुभा होता. त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटा बुरुजांच्या निगराणी ची जबाबदारी महाराजांनी त्यांजवर सोपविली. ज्या वेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी ‘मुलाणा हयाती’ नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता.

स्वराज्य वृद्धीसाठी कल्याणच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली. त्याकाळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोण जाणे कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली. व सुंदर “भेट” शिवरायांना उपहार म्हणुन पाठविली. या “उपहारावर” कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले.

यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणी मधे तिची सुखरूप रवानगी केली. या सुनेच्या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही ही असेच सुंदर असतो.

ही ढोबळ कथा कमी अधिक फरकाने दोन्ही बखरीमध्ये उपलब्ध आहे. बखर ऐतिहासिक असल्यातरी त्या समकालीन नक्की नव्हत्या. कारण पहिली बखर आहे ‘शककर्ते श्री शिव छत्रपती महाराज’ जी लिहिली मल्हार रामराव चिटणीस यांनी, १८१० साली सातारा छत्रपती दुसरे शाहू उर्फ प्रतापराव ह्यांच्या आज्ञेवरून त्यावेळच्या गादीचे चिटणीस मल्हार रामराव यांनी हि बखर लिहिली.

बाळाजी आवजी चित्रे यांच्या नातवाने ही बखर ऐकीव माहिती नुसार आणि वडिलोपार्जित जी कागदपत्रे त्यांच्या संग्रही होती त्या नुसार ही बखर लिहिली.

दुसरा उल्लेख आढळतो ती बखर आहे शिवदिग्विजय. ही बखर कोणी लिहिली याचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु बडोद्याच्या पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर व लक्ष्मण काशिनाथ दांडेकर यांनी  १८९५ साली हा दस्त प्रकाशित केला. हि बखर प्रकाशित झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्यावर लगेचच लिहिली असं प्रकाशकांच मत होतं.

समकालीन एकही पुरावा नसल्याने ही एक दंतकथा आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण लेखन करणारे वा सि बेंद्रे यांनी अश्याच आशयाची कथा सांगितली आहे.

वाई जवळच्या गोळेवाडी च्या सुभेदाराची सून भेट म्हणून महाराजांच्या समोर पेश केली त्यावर महाराजांनी ब्राम्हण सरदाराला (पुस्तकात तसा उल्लेख आहे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर शुद्ध अंतःकरणाने माफी मागतो) शिवाजी महाराजांनी तिखट प्रतिक्रिया देऊन काशीस जाण्यास सुनावले. ही १९७२ साली कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र खंड एक पान क्रमांक ११४ वर उपलब्ध आहे. 

जर ही घटना आहे अशी समजली तर कल्याणच्या छाप्या दरम्यान कल्याणच्या सुभेदाराची सून कदाचित घाबरून पेटाऱ्यात लपली असू शकते. तो पेटारा तसाच मराठयांनी आणला आणि हा प्रसंग घडला असू शकतो असा तर्क आपण लावू शकतो. पण आबाजी सोनदेव हे प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवक असल्याने ते असं जाणीवपूर्वक करतील असं वाटतच नाही.

इतिहासात जर तर आणि तर्काना काही अर्थ निश्चितच नसतो. परंतु हा प्रश्न असा पडतो कि ज्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देऊन आपण नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या काय किंवा शत्रूंच्या लेकीबाळीवर न्याय केला आहे का नाही?

‘परस्त्री ही मातेसमान’ मानणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उदात्त विचार किती गंगे समान निर्मळ आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ ह्या प्रकरणाकडे आपण नक्की बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘परस्त्री विषयी असलेले आदरयुक्त धोरण’ एवढाच शुद्ध हेतू ला लेख लिहिण्या मागे आहे.

शिवरायांनी बांधलेला एक पूल आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

जावळीचं खोरं म्हटलं की आपल्या आठवतो तो शिवरायांनी दाखवलेला प्रताप आणि याच इतिहासाचा साक्षीदार किल्ला प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यामुळे पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना नदीच्या जोरदार वाहणाऱ्या प्रवाहाच्या मुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी नेहमी अडचण असायची.

ज्यामुळे गावाचा संपर्क खंडीत व्हायचा. आणि म्हणून या भागातून प्रवास करणं फार मुश्किलीचं असायचं. यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ दगडी चिऱ्यांचा पूल उभारला.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो. कारण या पुलाची लांबी बावन्न मीटर लांब आहे, या पुलाची उंची ही पंधरा मीटर उंच असून याची रुंदी आठ मीटर रुंद इतकी आहे. आणि सर्वात विशेषतः ओळख सांगावी अशी बाब म्हणजे हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला. साडे तीनशे वर्षे उलटून सुद्धा ऊन वारा आणि मुसळधार पावसात सुद्धा हा पूल अजूनही भक्कम पणे उभा आहे.

सध्याच्या पार या गावात उभा असलेला या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह स्वराज्याच्या मावळ्यांचा प्रवास पावसातही सोपा झाला. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाकडे पाहिल्यावर कळून येईल की आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आणि अभियंत्यांना लाजवेल असाच हा पूल आहे.

पुलासाठी लावलेला प्रत्येक दगडी चिऱ्यांचा काटकोनात घडवलेला, घडवलेला प्रत्येक दगड एका आकाराचा आणि वजन जर केलं तर कदाचित एकाच वजनाचा देखील भरेल इतकं अचूक काम. पुला खालून पाण्याच्या प्रवाहाने येणारे लाकडी ओंडके किंवा इतर काही चीज वस्तूंमुळे पुलाच्या खांबाला धोका पोहचू नये म्हणून ते खांब काटकोनात बांधले आहेत. ज्यामुळे पाण्यासोबत आलेली वस्तू या काटकोनी खांबांना आदळून त्याचे दोन भाग व्हावेत अशी यंत्रणा.

दोन खांबांना जोडणारी कमानही सुंदर गोलाकृती मध्ये कोनात जाणारी जणू मंदिरातील गाभऱ्यासारखीच किंवा एखाद्या बुरुजाप्रमाणे. कोरीव काम केलेल्या या शिवकालीन पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक काळ झाला, पण हा पूल आजही त्याच ताकदीने सेवेसाठी उभा आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर काळात कोकणात जाण्यासाठी होऊ लागला.

पंचावन्न दिवसांची झुंज देणारा स्वराज्यातील एक अनामिक योद्धा

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मोघली सरदार शाहिस्तेखान याने महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या.

पुणे- नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता. हि गडी जिंकल्याशिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही याची जाणीव शाहिस्तेखानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली. या मोहिमेसाठी खान जातीने निघाला, बरोबर प्रचंड तोफखाना आणि वीस हजाराहून अधिक सैन्य सुद्धा होते.

या सैन्यात उजबेकखान, गिरीधर कुंवर, सय्यद हसन, जाधवराव, रायसिंह असे नामवंत सरदार होते. चाकणचा मराठी किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा.

फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल.

२१ जून १६६० रोजी मोघली फौज चाकणला पोचली. मोघली सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लीलया परतवून लावला, तेव्हा खानाला कळून चुकले कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही. त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाणा- गोटा संपला कि किल्ला आपसूक ताब्यात येईल.

फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही.

रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोघली छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले.

किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, यांनी खूप दिवस तग धरून होते. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती.अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. “या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे”.

खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली होती. वरती बुरुजावर लढणार्या मराठी सैनिकांस याचा काहीच अंदाज नव्हता आणि अखेर वेढ्याच्या पंचावनाव्या दिवशी मुघलांनी हा सुरुंग पेटवून दिला. चाकणचा बुरुज उडाला, कित्येक तोफा, सैनिक, बंदुका हवेत उडाल्या. बुरुजावरील मराठे आकाशात उडाले.

हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली.

किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती. शास्तेखान च्या सैनिकांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला. पण किल्ला काही दाद देत नव्हता. मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.

गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते. अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवस लढविला. मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला. किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.

मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले. कारण महाराज म्हणत, आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला.

शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली.

रिक्त हाताने स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा ‘भगवा ध्वज’, किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन चाकणकडे निघाले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा त्यांनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला.

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...