**17 एप्रिल 1720**
दिल्लीवरुन सनद आणल्यानंतर वर्षभरातच बाळाजी विश्वनाथांचे अल्प आजाराने
सासवड येथे राहत्या वाड्यात २ एप्रिल १७२० (चैत्र शु.६) रोजी निधन झाले.
शाहू छत्रपतींसाठी हा मोठा धक्का होता. मुघलांच्या कैदेतून सुटल्यावर
त्यांच्या राजकीय प्रवासात बाळाजी विश्वनाथांची फार मोलाची साथ वेळोवेळी
त्यांना मिळाली होती. अनेक राजकीय, लष्करी व मुलकी निर्णय घेताना त्यांनी
बाळाजींवर टाकलेली जबाबदारी त्यांनी तडीस नेली होती.
पुढचा "पेशवा" कोण? हा कळीचा आणि नाजूक प्रश्न होता. बाजीरावाला परंपरागत पेशवेपद देऊ नये असं दरबारी म्हणत होते. "बाजीराव साहेब बहुत उद्दाम प्रकृतीचे, अवघा वेळ शिपाईगिरीत मग्न, राज्यकारभार चालवावयास सबुर असावी तो भाव नव्हता त्यामुळे या पदाचे उपयोगी नाहीत, अशी राजश्री यांसी बहुतांनी मसलत दिली" मात्र शाहूंनी बाजीरावाचे काम, त्याचे मुलकी निर्णय बघितले होते. बाळाजी विश्वनाथ दरबारात नसताना त्यांचा मुतालिक म्हणून थोरल्या बाजीरावांनी किती काटेकोरपणे काम केले आहे ह्याची उदाहरणे शाहू महाराजांसमोर होती. त्यांनी थोरल्या बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे द्यायचा निर्णय घेतला.
कराड जवळील मसूर येथे चैत्र बहुलसप्तमी गुरुवार शके १६४२ म्हणजेच १७ एप्रिल १७२० या दिवशी थोरल्या बाजीरावांना शाहूंनी पेशवे पदाची शिक्के कट्यार बहाल केली - "बाळाजी विश्वनाथ यांनी या राज्यात जीवदारभ्य श्रमसाहस करून, पुढे सुख भोगिले नाही, याज करीता यांस वस्त्रे तूर्त देतो, यांचे दैवी असल्यास श्री शंभू कृपा करील, उपयोगी नाही असे दिसल्यास पुढे विचार होईल." थोरल्या बाजीरावांचे वय तेव्हा २० देखील नव्हते. तर चिमाजी आपांचे वय जेमतेम १२-१४ असावे. जरीपटका फडकत ठेवण्यासाठी नवा भक्कम "ध्वजदंड" स्वराज्याला मिळाला होता. एक नवीन मुद्रा पाडली गेली -
"॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान,
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥"
बाजीराव सामान्य माणूस नव्हे, अर्थात सामान्य असते तर पेशवेपदावर विराजमान होऊच शकले नसते किंवा झाले असते तरी बोल बोल म्हणता दिल्लीला टेकीला आणु शकले नसते. ४० वर्षांच्या उण्यापुर्याा आयुष्यात आणि २० वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दित ह्या माणसाने लाखो किमी प्रदेश घोड्यांच्या टापांनी पालथा घातला व मराठी स्वराज्याला जोडला. अनेक बलाढ्य शत्रूंना रणांगणावर धूळ चारली. अनेक माणसे जोडली. काही नवीन माणसे तयार केली. दरबारातले सर्व विरोधक निष्प्रभ केले. भल्याभल्यांना आपल्या भजनी लावले. छत्रपती शाहूंचे सिंहासन आपल्या मजबूत खांद्यांवरती तोलून धरले. एकाहून एक मोठे भीमपराक्रम केले. बाजीरावांची पहीली सात वर्ष ही अदमास घेण्यात, आहे ती परीस्थिती सांभाळण्यात गेली. कार्नाटक मधील दोन स्वार्यांहपर्यंत अनेकांच्या मनात बाजीरावांबाबत प्रश्न देखिल होते. काही काळ निजामाच्या फुटिच्या राजकारणाने शाहूंच्या मनात बाजीरावांविषयी शंकाही निर्माण झाली होती पण पालखेडच्या लढाईत निजामाचा अभूतपूर्व पराभव करुन बाजीरावांनी सगळ्यांची तोंडे गप्प केली. पालखेडची लढाई हा बाजीरावांच्या भाग्योदय होता. तो त्यांनी स्वता:च्या मनगटाच्या ताकदिवरती घडवला होता. अवकाशात एखादा तारा आकुंचन पावत जावा आणि एका क्षणी त्याचा अति प्रचंड विस्फोट होऊन त्यातून असंख्य कण अंतराळात हजारो प्रकाशवर्ष पसरले जावेत व जणू प्रतिसृष्टि निर्माण व्हावी तद्वत मुघली आक्रमणाने आकुंचन पावलेले मराठी राज्य कल्पनातीत वेगाने भारतभर पसरत गेले. मराठ्यांनी अटक ते कटक साम्राज्य ऊभे करुन मगच दम घेतला. बाजीराव "तो" विस्फोटाचा क्षण होते असं म्हणावं लागेल.
No comments:
Post a Comment