विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 May 2020

निजामशाही आणि आदिलशाहीचा इतिहास.




निजामशाही आणि आदिलशाहीचा इतिहास.

जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसनशाह गंगू बहमनी याने तुघलकानंतर १२ ऑगस्ट १३४७ पासून बहमनी सत्ता स्थापन केली. पुढे निजामशाह आणि आदिलशाह हे बहमनी सुलतानांकडून फुटले आणि त्यांनी आपले राज्य स्थापन केले. मलिक अहमद निजामउल्मुल्क हा बनला निजामशाह आणि युसूफ अदिलखान बनला आदिलशाह. आता हे नक्की आले कुठून आणि बादशाह झाले तरी कसे ते पाहू. फेरिश्त्याने त्यांचा इतिहास अगदी व्यवस्थित लिहून ठेवला आहे तो पुढीलप्रमाणे.
मलिक अहमद निजामशाह (पहिला निजामशाह):
अहमद निजामशाह जो पहिला निजामशाह झाला हा'मलिक नायब बहरी' याचा मुलगा होता. हा मलिक नायब मूळचा विजयनगरचा ब्राह्मण होता. त्याचे खरे नाव 'तिमप्पा' असे होते तर त्याच्या बापाचे नाव भैरव असे होते. मलिक नायब हा अहमदशाह बहामनीच्या फौजेकडून कैद झाला. फारच लहान होता ज्यावेळी त्याला मुसलमान धर्माची दीक्षा देण्यात आली. पुढे पुढे त्याच्या कर्तबगारीचा सुलतानावर असा काही प्रभाव पडला कि आपल्या शाहजाद्याच्या महमूदच्या तैनातीला या मलिक नायबला ठेवण्यात आलं. फारसी आणि अरबी वाङ्मयावर त्याने असामान्य प्रभुत्व प्रस्थापित केले. शाहजाद्याला त्याच्या वडिलांचे 'भैरव' हे नाव घेता येत नसे त्यामुळे भैरवचे 'बहरी' झाले. म्हणून नाव मलिक नायब बहरी. हळू हळू नायब राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचला आणि त्याला'आश्रफ हुमायून' आणि' निजामउल्मुल्क' या पदव्या सुलतानाने दिल्या. महंमदशाह बहमनीचा मृत्यू झाल्यावर शाहजादा मेहमूद सुलतान झाला त्याने मलिक नायबला आपला वझीर केले. मलिक नायबाने आपला मुलगा 'मलिक अहमद'(हाच तो पहिला निजामशाह) याला दौलताबाद आणि वऱ्हाड याची जहागिरी दिली. मलिक अहमद हा आपल्या बापापेक्षा वरचढ निघाला. त्याने शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, पुरंदर, भोरप, मुरंजन, माहोली असे बरेच किल्ले जिंकून घेतले. मलिक नायबाच्या खुनानंतर त्याने आपल्या बापाचे सर्व अधिकार धारण केले(म्हणजेच तो'निजामउल्मुल्क' झाला). पुढे त्याने 'अहमद निजाम उलमुल्क बहरी' असे नाव धारण केले. पुढेही त्याने बरेच पराक्रम करून आपल्या बहमनी सुलतानाला जुमानणे सोडून दिले. त्याच्या बंदोबस्तासाठी बऱ्याचजणांना पाठवण्यात आले, पण सगळे प्रयत्न निष्फळ झाले. अखेर 'भंगिरी' गावाजवळ अहमद निजाम उलमुल्कने बहामनी सेनेचा २८ मे १४९० रोजी दारुण पराभव केला. आणि आता त्याने स्वतःला निजामशाह म्हणून घोषित केलं. अशी झाली निजामशाहीची सुरुवात.
युसूफ अदिलखान (पहिला आदिलशाह):
युसूफ अदिलखान ची गोष्ट एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाला लाजवेल अशी आहे अगदी. 'युसूफ' (पहिला आदिलशाह) हा ओटोमन कुटूंबातील एका बादशहाचा मुलगा होता. याचा बाप आगा मुराद १४५१ रोजी मरण पावला. यानंतर त्याचा मोठा मुलगा मेहमूद गादीवर आला. आगा मुराद राज्य करीत असताना मुस्तफा नावाच्या माणसाने आगा मुराद ऐवजी आपणच या गादीचे वारस आहोत अशी बातमी उडवल्यामुळे राज्यात भरपूर गोंधळ माजला होता. यामुळे मेहमूद राजा होताच त्याला मंत्र्यांनी उरलेल्या सर्व शाहजाद्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. त्याचा अंमल करण्यासाठी ते युसुफच्या आईकडे आले. त्याचा गळा दाबून त्याचा खून करून त्याचा मृतदेह जाहीर करून आता अजून कोणीही वारस उरलेलं नाही हे मंत्रिगणांना सिद्ध करायचे होते. "एव्हढ्या मोठ्ठया निर्णयासाठी मला एका रात्रीची मुदत द्यावी म्हणजे मी माझी मानसिक तयारी करेन" अशी विनंती राणीने केली. मंत्र्यांनी ती परवानगी तिला दिली. या रात्रीच राणीने ख्वाजा इमादुद्दीन या सावा गावाच्या एका व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले. राणी नेहमी इराणमधून आणलेल्या मालाची खरेदी या व्यापाऱ्याकडून करत असे. या व्यापाऱ्याकडून राणीने एक सिरकॅशियन गुलाम विकत घेतला जो वयाने आणि दिसायला साधारण युसूफ सारखा होता. तिने बक्कळ पैसे देऊन या व्यापाऱ्याला युसुफला सावा गावी नेऊन तेथे त्याचे शिक्षण करावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी त्या बिचाऱ्या गुलामाचा युसूफ समजून मात्र हकनाक बळी गेला. युसूफ पुढे वयाची १६ वर्ष पूर्ण होईपर्यंत सावा येथेच राहिला. त्याच्या आईने त्याच्यासाठी बक्कळ पैसे आणि एक दाईसुद्धा पाठवली होती. पुढे अशी दंतकथा आहे कि एका खिज्र नावाच्या अवलियाच्या सांगण्यावरून तो इराणमधून (पर्शियामधून) हिंदुस्थानात आला. भारतात आला तेव्हा युसूफ केवळ १७ वर्षांचा होता. पुढे बहमनी राज्याचा वझीर महमूद गावान याने त्याला एक जॉर्जियन गुलाम म्हणून विकत घेतले आणि त्याला शाही शरीररक्षक म्हणून भरती केले. पुढे महमूद गवानाने युसुफला घोडदळ खात्याची सर्व कामे पाहण्यासाठी नियुक्त केलं. त्यामुळे तो बहमनी बादशाह महमद याच्या नजरेत आला. पुढे निजामउल्मुल्क (हा निजामशाह नव्हे) या एका अधिकाऱ्यांबरोबर युसुफने बरेच पराक्रम केले. निजामउल्मुल्क एका लढाईत मारला गेला असता युसुफने पुढे बराच पराक्रम दाखवला आणि बादशहाची मर्जी संपादन करून घेतली. अच्छा याच युसुफला आपल्या वरच्या मलिक अहमद निजामुल्मुल्क (म्हणजे निजामशाह) वर हल्ला करायला बहमनी बादशहाने आदेश दिला होता बर का? आणि या पठ्याने काहीतरी कारण काढून हा आदेश तर फेटाळलाच वर निजामशाहाला बातमी पाठवून सावध सुद्धा केले. महमूद बहमनी बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच प्रचलित असलेल्या युसुफला परदेशी अधिकारी आणि सैनिक यांनी पाठिंबा दिला. आता युसुफने बिदर सोडले आणि तो विजापूरला आला इथे त्याने स्वतःला युसूफ आदिलशाह म्हणून घोषित केले. आणि असा युसूफ अदिलखानचा आदिलशाह होऊन इथे आदिलशाहीची सुरुवात झाली. युसूफ अदिलखानची पार्शवभूमी फेरीस्त्याला मिर्जा महमद यांच्याकडून कळली. मिर्जा महमद म्हणजे आदिलशाह युसूफ आदिलखान याच्या वझिराचा गियासुद्दीन याचा मुलगा. कुठे सावा मध्ये शिकणारा आणि आज मारतोय कि उद्या असा विचार करणारा साधा युसूफ आणि कुठे आदिलशाह. पण बाबासाहेब पुरंदरे म्हणतात तसं भारतात आम्ही सर्वांचंच स्वागत केलं आणि त्यांना आमच्यावर राज्यही करू दिलं. बाकी पुढील इतिहास सर्वश्रुतच आहे. [1]

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...