विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वांत बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचे नाव अफजलखान! अफजलचा अर्थ होतो सर्वोत्तम आणि
खान हा शब्द नेता, राज्यकर्ता या अर्थाने वापरला गेला आहे. खानाचे मूळ नाव
अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. माणूस जन्माने नाही तर
कर्माने मोठा होत असतो हे त्याने दाखवून दिले होते.
त्यामुळे संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती.
खानाचा शिक्का पाहिल्यावर त्याच्या आत्मविश्वासाचा अंदाज येऊ शकतो.
त्यावरील मजकूर- ‘स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि
अफजलखानाची उत्तमता पडताळून पाहावी तर प्रत्येक जपमाळेतून अफजल- अफजल असाच
आवाज येईल.’
१६५६ ला मोगल बादशहा औरंगजेबाने याच अफजलखानाच्या तडाख्यातून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली होती. मोगलांना मदत केली म्हणून
आपलाच मुख्य सेनापती खान महंमदला विजापूरच्या
वेशीत अडवून त्याचे तुकडे करण्याचे काम अफजलखानाने केले होते.
त्याचप्रमाणे शिवरायांच्या भोसले कुळाचा तो द्वेष्टा असल्याने कनकगिरीच्या
युद्धात शिवरायांचे मोठे बंधू संभाजीचा त्याने दगाफटक्याने मृत्यू घडवून
आणला होता तर शहाजीराजांच्या हाता-पायात साखळदंड घालून त्यांची विजापूर
साम्राज्यातून धिंड काढली होती. त्यातच पुढे शिवरायांनी स्वराज्याची
स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे
त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम
(उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही
जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती.
शाही फर्माने आणि
प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हा खानाने या
स्वारीविषयी कौल मागताच त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश
येणार असून तुझ्या जीविताला धोका
पोहोचेल असे भाकित वर्तविले. परंतु
अफजलखान हा धाडसी व पराक्रमी असल्यामुळे त्याने आपला बेत रद्द न करता
मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुस-या दिवशी त्याच्या बाबतीत आणखी एक
दु:खद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंड्याचा हत्ती (ढालगज)
फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंका-कुशंका
सुरू झाल्या. या वेळी खानाला ६४ बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल
हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी
लावला.
विजापूर-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी ५ कि.मी.वर एका
निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात. या विहिरीत
त्यांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या
करण्यात आली. या वेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार
करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे ६४
कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून प्रसिद्ध आहे.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी भारतात पुरातत्त्व विभागाची स्थापना
केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. १८८० साली या खात्याचे प्रमुख हेन्री
कुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह
संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो
उपलब्ध आहे. अगदी अलीकडे ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने १८ जानेवारी
२०१३ रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती.गतवर्षी मी स्वत:
माझ्या अभ्यास दौ-यात ‘साठ कबर’ या भागाला भेट देऊन तेथील वास्तूचे अवलोकन
केले.
विजापुरात गोल घुमट, मुलुख मैदान तोफ, अनेक नामांकित वास्तू पाहताना जी भावना असते ती इथे
राहात नाही. एक तर ओसाड माळरानात अगदी नापिक
जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी
चबुत-यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळ्या पाषाणात या ६४ कबरी आजही पाहण्यास
मिळतात. त्यानुसार दक्षिण उत्तर बाजूने चबुत-याची लांबी जास्त असून
त्यानुसार पहिल्या दोन रांगेत ७-७ समाध्या आहेत. तर तिस-या रांगेत ५ व ११
समाध्याच्या ४ रांगा आहेत. सध्या काही समाध्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
एकाच चबुत-यावर ६४ समाध्या पाहताना
इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते.
साधारणपणे ४ �२ आकाराच्या समाध्यांना चुना लावलेला आहे.
विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वत:साठी कबर बांधण्याची आज्ञा
दिल्याचे म्हटले जाते. परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर
बांधली हा भाग वेगळा. विजापुरात गेल्यावर फार कमी लोक इथे भेट देत असतात.
म्हणूनच कदाचित इंग्रजीत याला ‘ब्लॅक टुरिस्ट स्पॉट’ म्हटले जाते.
स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढ्या मोठ्या
प्रमाणात अशा समाध्या पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे.
भारतीय पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला
आहे. साहजिकच या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘करायचं नाही आणि करू द्यायचं
नाही’ . त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागलेली आहे. विशेष म्हणजे
खानाचे वंशज गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूरला राहतात. प्रा. जहागिरदार जे
माझ्या परिचयाचे आहेत. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मस्जिद व इतर वास्तू
पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते.
त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको.
एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी
विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत
आहे. घडून गेलेल्या घटनांचा सुसंगत अभ्यास म्हणजे इतिहास हे खरे मानले तर
१० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला मारल्यानंतर नेताजी
पालकरांनी वाईवर हल्ला करून खानाचा खजिना ताब्यात घेण्याचा बेत आखला होता.
मात्र तत्पूर्वी खंडोजी खोपडेनी खानाचा खजिना आणि त्याच्या बायका-मुलांना
मधल्या वाटेने पळून जायला मदत केली हा इतिहास
आहे.
मग या बायका पुन्हा कुठून आल्या? शिवाय खानाचा मुलगा फाजलखान व इतरही मुले गप्प कशी राहिली असतील हे सांगता येत नाही.
इतिहासात जर-तरला फार महत्त्व नसते. त्यामुळे शिवरायांच्या पराक्रमाचे
मोजमाप करताना ही एक कथा त्यांच्या नावावर जमा झाली हे निश्चित. त्यामुळे
आजही आपण विजापुरात गेलो तर तिथं आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असेल तर विजापुरात
गेल्यानंतर ‘साठ कबर’ नावाच्या स्थळाला जरूर भेट द्यावी.
डॉ. सतीश कदम
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Saturday, 9 May 2020
अफजलखानाच्या ६४ #बायकांच्या_कबरी
अफजलखानाच्या ६४ #बायकांच्या_कबरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment