छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंत्यविधीवेळी संभाजी महाराजांना का बोलवले नाही? त्यांना कळविण्यात का आले नाही?
postsaambhar :भूषण गर्जे,
शिवछत्रपतींचा मृत्यू आणि त्यानंतर माजलेली अनागोंदी हे आजदेखील मराठ्यांच्या इतिहासातील गूढ बनून राहिले आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भात तत्कालीन कागदपत्रात वेगवेगळी माहिती मिळते. बखरकार शिवरायांचा मृत्यू विषबाधा होऊन झाला असे सांगतात. त्यात पुढे विषप्रयोग अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी केला, असा आरोप आहे. परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता हा आरोप बिनबुडाचा आहे, हे जाणवते. तसेच तर्क आणि पुराव्यांच्या आधारे हे खोडून काढता येते. फारसी पत्रांमधील नोंदीनुसार, मोरोपंत पेशवे महाराजांच्या मृत्यू समयी बिदरच्या किल्ल्याच्या आसपास फुलमारी परगण्यात सैन्याची जमवाजमव करत होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराड मध्ये सैन्य घेऊन होते, अशी नोंद मिळते. इंग्रजांच्या पत्रानुसार, अन्नजीपंत सुरणीस हे चौलच्या भागात असल्याची माहिती मिळते. रायगडवर त्यावेळी धाकटे पुत्र राजाराम , महाराणी सोयरबाईसाहेब, गडाचे कारभारी राहुजी सोमनाथ, प्रल्हादपंत निराजी अशी मोजकीच मंडळी उपस्थित होती.
इंग्रज आणि पोर्तुगीज पत्रात ह्या उलट माहिती मिळते. शिवरायांचा मृत्यू 'रक्ताचा अतिसार' होऊन झाला असे त्यांच्या पत्रात दिसून येते. येथे देखील खूप सारे कंगोरे आहेत. सर्वात प्रथम म्हणजे शिवरायांच्या मृत्यूसमयी फिरंगी वैद्यास रायगडावर पाचारण केल्याची नोंद आढळत नाही, मग इंग्रजांना अतिसाराबद्दल विश्वसनीय माहिती कुठून मिळाली? आणि १५०किमी लांब मुंबईत असलेल्या इंग्रजांना जे समजले ते रायगडावरील ज्येष्ठ मंडळींना कसे समजले नाही? सभासद आपल्या बखरीत "मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वरा ची जाहाली " एवढेच लिहून ठेवतात. सभासदाने अतिसार किंवा इतर कोणतेही व्याधी लक्षण नोंदवले नाही, हे विशेष.
त्यामुळे महाराजांच्या मृत्यू संदर्भात आपल्याकडे कोणताही ठोस असा पुरावा उपलब्ध नाहीये. परंतु त्यातल्या त्यात अर्धवट बखरींपेक्षा येथे फिरंगी पत्रव्यवहार जास्त विश्वसनीय वाटतो.
रायगडावर महाराजसाहेबांचा अंत्यविधी पुत्र रामराजेंकरवी साबाजी भोसले शिंगणापुरकर ह्यांच्या उपस्थिती करण्यात आला, असे सभासदाने नमूद केले आहे. त्यावेळी संभाजीराजे रायगडावर उपस्थित नव्हते, हे सत्य आहे.
ह्या बद्दल 'ग्रँट डफ' ने आपल्या ग्रंथात पुढील वर्णन केले आहे :
".. अज्ञा आली की ; संभाजी कैद करून दिल्लीस पाठवून द्यावे. परंतु दिलेरखान संभाजीस अनुकूल होता. म्हणून ती औरंगजेबाची आज्ञा शेवटास जावयाच्या पूर्वीच त्याला पळून जाण्यासाठी अवकाश सापडला. मग शिवाजी आणि संभाजी एकचित्त झाले. परंतु संभाजीचा दुष्ट स्वभाव गेल्याची संशयानिवृती होईतोपर्यंत त्यास पन्हाळा किल्ल्यावर रहावयची आज्ञा दिली. शिवाजीचे मरणापूर्वी अनाजी दत्तो व मोरोपंत वैगेरे कोणी मोठी मोठी लोक जवळ असता शिवाजी बोलीला, माझ्या मरणानंतर संभाजीचा दुष्ट स्वभावे करून राज्यास अपाय होईल असे दिसते. ही गोष्ट सोयराबाईस कळली तेव्हा तिचे मनात आले की, संभाजीस एकीकडे करून आपला पुत्र राजाराम तक्ताधिपती करावा.."
ग्रँट डफ ने आपला हा ग्रंथ सातारा दरबारी राहून इ. स. १८२६ साली म्हणजे अगदीच उत्तर काळात लिहिला आहे. त्याने आपला ग्रंथ लिहिताना चिटणीस बखरीचा आधार घेतला होता. संभाजी महाराजांची सर्वात जास्त बदनामी कुणी केली असेल तर ती मल्हार रामराव चिटणीस याने. त्याने शिवराय आणि संभाजी महाराजांवर तयार केलेल्या दोन बखरींमध्ये निर्माण केलेल्या संभाजी महाराजांच्या विकृत प्रतिमेचा परिणाम १९-२० व्या शतकातील इतिहासकार व साहीत्यिकांवर झाला. त्यामुळे चिटणीस बखरी चे मूळ लेखन येथे पाहणे अगत्याचे ठरते.
चिटणीस शिवछत्रपतींच्या बखरीत लिहतात, ".. ऐसे घरोबियाचे रीतीने जसे समाधान करून ये तसे करून पन्हाळा प्रांत तीन लक्षांचा तालुका त्यांचे खर्चीस नेमून दिला. याजप्रमाने बंदोबस्त करून देऊन नजरबंद ऐसेच ठेविले. "
पिता - पुत्राच्या भेटीनंतर शिवरायांना संभाजीस 'नजरबंद' ठेवल्याचे मल्हार रामराव सांगतो. परंतु पन्हाळ गडावर युवराज संपूर्णपणे स्वतंत्र होते. एवढेच नव्हे, तर पन्हाळ प्रांताचा कारभार त्यांना महाराजांनी सांगितला होता.
संभाजी महाराजांच्या बखरीत चिटणीस लिहतात,
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राणी सोयराबाईंच्या पुढारपणाखाली राजाराम महाराजांस गादीवर बसिवण्याचा जो कट झाला ह्यात हबींरराव मोहीते सरसेनापती उपस्थित नव्हते. उलट त्याने तर हा प्रधानांचा कट उधळून लावला. याची कल्पना सुद्धा मल्हार रामरावास नाही.
कृष्णाजी अनंत सभासद ने आपल्या सभासद बखरीमध्ये थोड्या फार फरकाने हेच वर्णन केले आहे. सभासद आपल्या बखरीत लिहतात,
" ते पळून पन्हाळीयास आले. हे वर्तमान राजियास पुरांधरास कळताच संतोष पावून पुत्राचे भेटीस पन्हाळीयास आपण आले. मग पितापुत्रांची भेट जाहली. बहुत रहस्य जाहाले. "
संभाजी महाराजांबद्दल सभासदाचे लेखन हे कल्पना आणि सत्याचे मिश्रण दिसते. पन्हाळ गडावर पितापुत्र भेटून त्यांमध्ये ' रहस्य ' घडून उभयंतांची दिलजमाई झाली असणे स्वाभाविक वाटते. मल्हार रामराव आपल्या बखरीत ' एकचित्त ' हा शब्द वापरतात तो ह्याच अर्थाने.
पुढे सभासद लिहतात,
मृत्यू जवळ आला तेव्हा महाराजांनी प्रमुख मंत्र्यांना जवळ बोलावून ' संभाजी राज्यास अपाय करील, राज्य राखणार नाही. क्रूर कृत्ये करील ' असे भविष्य वर्तविले, असे सभासद सांगतो. परंतु पन्हाळ गडावरील 'एकचित्त' भेट ते महाराजांचा मृत्यू ह्या ३ महिन्याच्या अवधीत असे काय घडले की शिवरायांना एवढे कठोर उद्गार काढावे लागले ? सभासद कारण स्पष्ट करत नाहीत. शिवरायांसारखा कर्तव्यदक्ष राजा आणि पिता आपल्या मुलाबद्दल असे उद्गार काढून स्वराज्यात आपणहून दूही का मजवेल ? हे मनास पटत नाही.
मग सभासदाने असे का लिहावे ? ज्याने शिव - शंभुंची कारकीर्द पहिली आहे, जो अंतर्गत राजकारणात वावरला आहे तो संभाजी महाराजांबद्दल असे उद्गार का काढतो? ह्याचा अर्थ एकच दिसतो तो म्हणजे, ' उगवत्या सूर्यास प्रणाम ' ही राजकारणातील प्रवृत्ती त्यात पुरेपूर भरलेली दिसते. सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या अश्रयात जिंजित लिहून पुरी केली. राजाराम महाराजांची स्तुती करून आणि संभाजी राजांची नालस्ती करून त्याने राजाराम महाराजांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.
सभासदाचे उद्गार दरबारातील एका भाटास शोभणारे आहे; जाणकार मुत्सद्दी राजकारण्यास नव्हे, असे निरीक्षण डॉ. जयसिंगराव पवार ह्यांनी नोंदवले आहे.
मग संभाजी महाराजांस महाराजांच्या मृत्यू समयी रायगडावर येण्यापासून का रोखले गेले? त्यांना का डावलले गेले ? ह्या बद्दल इतिहास मौन बाळगतो. आपण येथे फक्त तर्क लावू शकतो.
युवराज संभाजीराजे आणि मंत्र्यांमधील बेबनाव वरवर गूढ वाटत असला तरी मानवशास्त्रीय दृष्ट्या ह्यांचे उत्तर देणे सोपे आहे. त्यांच्या मधील संघर्ष हा ' दोन पिढ्यांतील अंतर ' (Generation gap) ह्या तत्वावर झाला असावा, असे जयसिंगराव पवार नमूद करतात.
शिवरायांच्या आदेशानुसार जेव्हा संभाजीराजे कारभारात लक्ष घालू लागले तेव्हा पासून ह्या वितुष्टास सुरुवात झाली असावी. आम्ही एवढे कर्तबगार, महाराजांनी आमच्यावर विश्वास दाखवून एवढी कार्य करवून घेतले, प्रतिष्ठेने वागविले आणि हा कालचा पोर आम्हास शिकवितो ? ही ज्येष्ठ मंत्र्यांची भावना त्यांचा अहंभाव वाढविण्यास व शंभुराजांशी शत्रुत्व निर्माण करण्यास कारणीभूत झाली असणार. त्याचबरोबर १७-१८ वर्षांच्या युवराजांचे अपरिपक्व विचार हा दुरावा वाढविण्यास कारणीभूत ठरले असणार. ह्याच वेळेला मंत्र्यांना स्वतःच्या भविष्याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. ज्याचे बापाच्या हयातीत आपल्याशी पटत नाहीये, तोच उद्या उत्तराधिकारी झाल्यास आपली धडगत नाही ह्या विचारांनी मंत्रिमंडळातील प्रधान अस्वस्थ झाले असणार. त्यात संभाजी महाराजांबरोबर सारासार चर्चा करून 'दिल जमाई' करणे मंत्र्यास कमीपणाचे वाटल असणार.
त्यामुळे शिवरायांच्या मृत्यूनंतर मंत्र्यांनी एक विचार केला. राजारामांचे मंचाकरोहन करून शिवरायांचा अंत्यविधी उरकण्यात आला आणि संभाजी राजांना कैद करण्याचा कट आखण्यात आला. आपल्या सुदैवाने हा कट पूर्णत्वास जाऊ शकला नाही.
ज्या राजपुत्राला स्वतःच्या मातेचे दर्शन कधी मिळू शकले नाही, त्याच संभाजीराजाला आपल्या पित्याचे अखेरचे दर्शन देखील घेता आले नाही. नियतीचा हा केवढा क्रूर डाव आहे. नियतीने जिथे पराक्रमी पित्याच्या पारड्यात दैवत्व बहाल केले, त्याच नियतीने पराक्रमी पुत्रास एवढे अनन्वित छळ का दिले हा प्रश्न नेहमीच मला पडतो. संभाजीराजे 'शापित राजपुत्राचे' आयुष्य जगले होते.
धन्यवाद.
संदर्भ :
१) A history of Marhattas : Grant Duff
२) सभासद बखर
३) चिटणीस बखर
४) छत्रपती संभाजी एक चिकित्सा : डॉ. जयसिंगराव पवार
No comments:
Post a Comment