विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 3 May 2020

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना

२५ मार्च १६८९ ला रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज अत्यंत शिताफीने मोगलांना चकवून वेढ्यातून निसटले. प्रतापगड, वासोटा, पन्हाळा आणि तिथून कर्नाटक मधून मोगलरूपी जिवाच्या धोक्याशी झुंज देत साधारण १५ नोव्हेंबर १६८९ ला राजे जिंजीला पोचले. जिंजीला त्यांनी स्वराज्याची प्रशासकीय आणि राजनैतिक राजधानी बनवले. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी बलिदानानंतर औरंगजेबाने लगेच रायगडाला वेढा घालायचे फर्मान काढले. शिवाजी महाराजांच्या सगळ्या कुटुंबाला अटक करून हे स्वराज्य कायमचे मिटवून टाकावे हा त्याचा हेतू. त्याच्या ह्या योजनेला राजाराम महाराज निसटून जिंजीला गेल्यामुळे एक सणसणीत चपराक मिळाली. रायगडाला ज्याने वेढा घातला त्याच झुल्फिकार खानाला औरंगजेबाने आता जिंजीला जाऊन राजाराम महाराजांना अटक करायची कामगिरी सोपवली. हा झुल्फिकार खान म्हणजे मोगली वजीर असद खानाचा मुलगा आणि औरंगजेबाने खास मर्जीतला सरदार.


१६९० - जिंजीला प्रथमच वेढा

जिंजीचा किल्ला हा सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे - चेन्नई पासून साधारण १५०-१६० कि.मी आणि वेल्लोर पासून साधारण १०० कि.मी. हा किल्ला ३ टेकड्यांवर मिळून वसला आहे - कृष्णगिरी, राजागिरी/अनंदगिरी आणि चांद्रयानदुर्ग. किल्ल्याचा एकूण पसारा खूप मोठा आणि तटबंदी मजबूत. शिवाजी महाराजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्याला हिंदुस्तानातील एक सर्वात अभेद्य किल्ला म्हणलं होतं. अशा हया जिंजीच्या किल्ल्याला पहिल्यांदी २९ ऑगस्ट १६९० ला झुल्फीकारखानानी वेढा घातला(मोगल इतिहासकारांच्या मते २३ नोव्हेंबरला झुल्फिकार खानाने जिंजी साठी प्रयाण केले - काही असो १६९० च्या अखेरीस तो जिंजीला येऊन वेढा घालायच्या कामाला लागला होता हे नक्की). ह्या वेढ्याची पूर्वसूचना राजाराम महाराजांना असावी कारण जसा वेढा पडायला लागला तसे महाराज स्वराज्याच्या कर्नाटक सुभ्यात निघून गेले. ह्याच वेळी जिंजीच्या मोगल छावणीतून काही मराठा सरदार(माणकोजी पांढरे, नागोजी माने आणि नेमाजी शिंदे) फुटून राजाराम राजेंना सामील झाले. ह्या घटनेमुळे वेढा पूर्ण करता आला नाही असे दिसते. राजाराम राजे फेब्रुवारी १६९१ ला जिंजीला परतल्याची नोंद आहे. १६९० ला चालू झालेला हा महाराजांना अटकेचा प्रयत्न - वेढा घालणे, वेढा उठवणे - हा थेट १६९८ पर्यंत चालू राहिला. ह्या काळात मोगल फौजेचे बरेच हाल झाले हे पुढच्या हकीकती वरून कळेल


१६९२-९३ : संताजी-धनाजी आणि कामबक्ष !!!!

१६९० च्या अखेरीपासून पुढचे ८ वर्ष झुल्फिकार खान जिंजीच्या भोवतालच्या प्रदेशातच ठाण मांडून होता. १६९१-९२ मध्ये मराठा फौजेनी मोगल सैन्यावर असंख्य हल्ले केले होते. ह्यात कर्नाटक प्रांतात मोगलांची दाणादाण उडवल्यानी झुल्फिकार खानाला बादशाही छावणीतून मिळणाऱ्या मदती/रसदी वर परिणाम व्हायला लागला. ह्याचा परिणाम म्हणून झुल्फिकार खानाने जिंजीहुन १२ कोस मागे फिरून तळ ठोकला(मस्सीर-आलमगिरी). त्याचे सैन्य एक प्रलंबित वेढा देण्याच्या स्थितीत नव्हते. ह्याची दाखल घेत औरंगजेबाने तातडीने वजीर असदखान आणि शाहजादा कामबक्षला झुल्फिकार खानाच्या मदती साठी धाडले.

कामबक्ष आणि असदखान येताच जिंजीला पुन्हा एकदा वेढा पडला. ह्यावेळी परिस्थितीचे महत्व जाणून रामचंद्रपंत अमात्य (जे महाराष्ट्रात स्वराज्याचा मुलकी आणि सैनिकी कारभार बघत होते ) ह्यांनी सरनोबत संताजी आणि धनाजींना १५ आणि १० हजार फौज बरोबर देऊन राजाराम महाराजांच्या मदतीस पाठवले. हे २ विजेचे लोळ २ बाजूंनी जिंजीच्या मोगली फौजेवर कडाडले. त्यात संताजींनी तर कहरच केला. जिंजीच्या मोगली सैन्याला रसद पुरवायची जबाबदारी अलिमर्दा खान ह्या सरदारा वर होती. संताजींनी त्याच्या ध्यानी-मनी ही नसताना त्याला कांचीपुरम जवळ गाठून तुफान तडाखा दिला. अलिमर्दा खान व बरीचशी रसद पकडली गेली - शिवाय "१५०० घोडे आणि ६ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे. रसदे अभावी आता मोगल सैन्याची परिस्थिती बिकट होणार होती. हे एक संकट आले असताना दुसरीकडे तितकेच मोठे संकट मोगल फौजेवर कोसळले. धनाजींनी जिंजीच्या वेढ्याच्या पश्चिमी चौक्यांवर हल्ला चढवला. ह्या चौक्यांची जबाबदारी ज्याच्याकडे होती त्या इस्माईल खान मका ला धनाजींनी धरले. ह्या छाप्यात "५०० घोडे आणि २ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे.वेढ्यातल्या ज्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले तिथल्या काही मोठ्या तोफांना खिळे ठोकून निकामी करण्यात आले. ह्या २ हल्ल्यांमुळे वेढ्यातल्या सैन्याची अवस्था बिकट झाली असणार कारण तसे ही किल्ल्यातून त्यांच्या वर हल्ले होतच होते - आता बाहेरून ही २ तडाखे मिळाले.

हे सगळं चालू असताना मोगल छावणीत एक वेगळंच नाटक रंगलं होतं. झुल्फिकार खान व असद खान ह्या बाप-लेंकांना अशी खबर मिळाली की शाहजादा कामबक्ष ह्याने राजाराम महाराजांसोबत काही गोपनीय बोलणी चालू केली आहेत. असे वाटते की शत्रुसैन्यात फूट पडावी म्हणून मराठ्यांनी ही वावडी उठवली असावी - आणि खरंच तसे असेल तर ही खेळी प्रचंड यशस्वी झाली. ही बातमी खरी वाटायचं कारण पण होतं - काही असले तरी कामबक्ष एक डोळा नक्कीच मोगली तख्तावर ठेऊन असणार - राजाराम महाराजांविरुद्ध मोहिमेत थोडी ढील देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून बादशाह होण्याच्या स्वप्नात मदत मिळवायची अशी व्यवस्था असावी असे झुल्फिकार खानाला वाटले. त्या आशयाचे पत्र बाप-लेकाने लगेच औरंजेबाला पाठवलं - परिणामी मोगली निष्ठावंत सरदार दलपत बुंदेला ला कामबक्षच्या छावणीत ठेवण्यात आलं.अशी हूल उठवण्यात आली(बहुधा हूलच असावी) की कामबक्ष हा झुल्फिकार खान व असद खान ह्यांना अटक करायची योजना आखतोय.

संताजी-धनाजींचा झंझावात आणि त्यामुळे वेढ्यातल्या फौजेची झालेली बिकट अवस्था तसेच राजाराम महाराजांना पकडण्यात येत असलेलं अपयश - ह्या सर्वांचे खापर असद-झुल्फिकार ह्या पितापुत्रांनी सरळ काम्बक्षच्या डोक्यावर फोडलं. अशा परिस्थितीत त्यांनी एक कमालीचं पाऊल उचललं - त्यांनी जाऊन थेट कामबक्षला कैद केलं आणि औरंगजेबाकडे पाठवलं. फौजेची दयनीय अवस्था लक्षात घेऊन झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी तहाची बोलणी उघडली. दोन्ही पक्षांमध्ये तह होऊन मोगल सैन्य परत माघारी तळावर वंदिवाश(सध्याचे वंदवासी, तमिळनाडू) ला निघून गेले. असे करून १६९२-९३ मध्ये झालेला हा वेढ्याचा प्रयत्न ही फसला.


अखेरचा प्रयत्न

ह्या नंतरची २-४ वर्ष झुल्फीकाराने थेट जिंजीच्या किल्ल्याला वेढा न घालता आपला मोर्चा सभोवतालच्या प्रदेशाकडे वळवला. मराठा फौजेनी त्याच्या फौजेची रसद वेळोवेळी मारून व खजिन्याचा पुरवठा अधून मधून रोखून त्याला हे करण्यास भाग पाडलं. त्याने २ वेळा तंजावर वर हल्ला केला - ह्या पैकी दुसऱ्या हल्ल्यात ४० लाख "चक्री"च्या मोबदल्यात त्याने सला केला. वेल्लोरला ही त्याच्या सैन्याचा वेढा पडला पण तिथे हि अपयश - धनाजींनी स्वतः जाऊन वेल्लोर ला पडलेला वेढा उठवला. परंतु असे दिसते की १६९४ च्या अखेरीपर्यंत जिंजीच्या आसपासचा बराचसा मुलुख झुल्फिकार खानाने काबीज केला होता. असे करून जिंजीच्या मराठा प्रशासनाला जेरीस आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी १६९७ मध्ये औरंजेबाने झुल्फिकार खानाला पत्र पाठवून जिंजी वरचा हल्ला आणखीन तीव्र आणि निर्वाणीचा करायचा फर्मान दिला. साधारण ऑगस्ट १६९७ मध्ये राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाशी तहाची बोलणी करण्यासाठी आपला पुत्र कर्ण बरोबर एक शिष्टमंडळ पाठवले.असे वाटते की अशी बोलणी करून मोगलांना गुंतवून ठेऊन हा वेळ तिथून निसटायची योजना पक्की करण्यात घालवण्यात आला. शेवटी ३० जानेवारी १६९८ ला महत्प्रयासानंतर एकदाचा जिंजी किल्ला घेण्यात झुल्फिकार खानाला यश आले. पण यशानंतर ही त्याच्या हातात आलं ते धुपाटणंच - राजाराम महाराज तर कधीच जिंजीहुन निसटून २६ जानेवारी १६९८ ला वेल्लोर ला पोचले होते. तिथून धनाजींनी त्यांना परत महाराष्ट्र्र भूमीत आणलं आणि राजे २२ फेब्रुवारी १६९८ ला खेळणा(विशाळगड) ला पोचले. झुल्फिकार खानाने १६८९ ला रायगड घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत , १६९८ ला जिंजी किल्ला घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत !! मध्ये त्याचं सैन्य ८ वर्ष मराठ्यांचा मार खात नुसतंच झुरत होतं.


राजाराम महाराज - झुल्फिकार खान

काही जाणकारांच्या मते झुल्फिकार खान जिंजीला आल्यावर थोडे महिन्यांनी राजाराम महाराज व झुल्फिकार खान ह्यांच्यात एक छुपा अलिखित सला होता.जरी काही ब्रिटीश आणि पोर्तुगीज कागदपत्रात ह्याचा उल्लेख आहे , तरी ह्याला इतिहासात कुठे ही वाचा नाही - पण काही घटना लक्षात घेण्यासारख्या आहेत. झुल्फिकार खान व वजीर असद खान हे शाहजादा शाहआलम चे समर्थक असावे असं दिसते - तो औरंगजेबानंतर बादशाह झाला तर त्याच्याकडून आपली वजिरी पक्की करायची असा हेतू असू शकतो. ह्या योजनेत राजाराम महाराजांसारख्या बलाढ्य छत्रपतींची मदत नक्कीच झाली असती. राजाराम महाराजांच्या दृष्टीने वरवर दाखवण्यासाठी वेढा चालू ठेऊन स्वराज्य बळकटीचे काम चालू ठेवण्यासाठी ही योजना चांगली होती. वर दिल्याप्रमाणे संताजी-धनाजी च्या हल्ल्यानंतर मोगली सैन्याला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा मोका होता - परंतु तसे न करता त्या वेळी सला करण्यात आला. झुल्फिकार खानाच्या जागी नवा मोगली सरदार येऊन जिंजीला धडकला असता, त्यापेक्षा होते ते स्वराज्यासाठी बरे होते. ह्याच घटने वरून कदाचित राजाराम महाराज- संताजी ह्यांचे भांडण झाले असावे. असा छुपा समजोता दोन्ही बाजूनी होता का नव्हता हे सिद्ध करायला काहीच संदर्भ नाहीत. पण जर ते खरे असले तर आपल्या मुत्सद्देगिरीने आणि खोटे असले तर आपल्या पराक्रमाने राजाराम महाराजांनी औरंगजेबाला ८ वर्ष चांगलीच चपराक दिली ह्यात शंकाच नाही.

शेवटी एवढेच म्हणीन की जिंजीला वेढा घालून राजाराम राजेंना पकडायचे असंख्य प्रयत्न करून शेवटी मोगलांच्या हाती पडली ती शिकस्त आणि फक्त शिकस्तच !!!!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...