नारायणराव पेशवा मारला गेल्यावर त्याची गरोदर पत्नी गंगाबाई हिला राघोबा व आनंदीबाई यांच्या भीतीमुळें बारभाईंनीं पुरंदर किल्ल्यावर बंदोबस्तांत ठेविलें होतें. तेथें माधवरावा जन्म झाला (१४ एप्रिल), व नंतर ४० दिवसांनीं त्याला पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं. सवाई माधवराव व गंगाबाई हे खासे आणि नाना व बापू कारभारी या चौघांनां कैद करण्याचा कट राघोबाच्या पक्षानें केला पण तो फसला. तेव्हां इंग्रजांच्या मदतीनें राघोबानें पेशव्यांशीं भांडण सुरू केलें, आणि मराठी साम्राज्यांत दुसऱ्या अनेकांनीं बंडाळी केली, पण त्या सर्व संकटांचा परिहार नानानीं केला ('नाना फडणवीस' पहा). माधवराव सव्वा ती वर्षांच असतां गंगाबाई वारली. (जुलै १७७७); यापुढें त्याचें संगोपन सदाशिवरावभाऊची बायको पार्वतीबाई हिंने केलें. १७७९ सालीं सवाई माधवरावाची मुंज पुणें येथें पव्रतीवरच मोठया थाटानें करण्यांत आली; पुढें १७८३ च्या फेब्रुवारींत त्याचें लग्न टोकेकर थत्ते यांच्या कन्येशीं होऊन तिचें नांव रमाबाई ठेवण्यांत आलें. पेशव्यांस लेखन व वाङ्मयाच्या शिक्षणसाठीं महादजीपंत गुरूजीस ठेवण्यांत आलें. पेशव्यासाठीं पौराणिक व ऐतिहासिक बखरी रचण्यांत आल्या होत्या व भौगोलिक माहिती शिकविण्यासाठीं एक यूरोपीय शिक्षकहि ठेवण्यांत आला होता. नानात-हेचें खेळ खेळण्याची व्यवस्था नानानीं केली. खबुतरें, पोपट, मैना, चंडोलपक्षी, बदकें, पाणकोंबडीं, मोर वगैरे पक्षी; ससे, हरणें, काळवीट, चित्ते, वाघ, गेंडें, एडके वगैरे पशू; आणि कुस्त्या खेळणारे पहिलवान, वज्रमुष्टि मल्ल, दांडपट्टा व तिरंदाजी खेळणारे इसम बाळगण्यांत आले. घोडयावर बसणें, हत्ती चालविणें, बोथटी व लेजीम खेळणें, तिरंदाजी करणें, वगैरे गोष्टी पेशव्यास शिकविण्यांत आल्या. गंगापूर येथें नानासाहेब पेशव्यांची बायको गोपिकाबाई राहत होती, तिचा वृद्धपकाळ झाल्यामुळें तिच्या भेटीस सवाईमाधवराव १७८८ च्या मार्च मध्यें गेला. यापुढें राज्यकारभारांत तो थोड थोडें लक्ष घालूं लागला. घाशीराम कोतवालाची गोष्ट (ब्राह्मणांस कोंडून ठेवल्यामुळें घाशीरामास देहांत शिक्षा झाल्याची) घडून आली. १७९१ सालीं कन्यागत असल्यामुळें पेशवे वांईस जाऊन नंतर साताऱ्यास छत्रपति महाराजांच्या भेटीस गेले. १७९२ सालीं महादजी शिंदे यांनीं पुण्यास येऊन नानांकडे असलेलें कारभारीपण स्वतःस मिळविण्याची खटपट पेशव्याजवळ केली पण पुढें दोघांचा समेट झाला. १७९४ सालीं पहिली बायको वारल्यामुळें पेशव्याचें दुसरें लग्न गणेशपंत गोखले यांच्या मुलीशीं झालें, तिचें नांव यशोदाबाई ठेवण्यांत आलें. याच सुमारास शनवार वाडयांतील कोठी व सातमजली बंगला जळाला. राघोबाचा मुलगा बाजीराव जुन्नर येथें बंदीत होता. त्यानें पेशव्याशीं गुप्त पत्रव्यवहार सुरू केला. हें नाना फडणवीसास समजतांच त्यानें पेशव्याचा निषेध केला. या व इतर प्रकरणांत पेशव्याचें नानांशीं जमत नाहीसें झालें. त्याचा परिणाम मनावर होऊन पेशवा जवर, वात यांनीं आजारी झाला. १५ आक्टोबर १७९५ रोजीं वाताचा झटका येऊन त्या भरांत शनवारवाडयांतील गणपतीच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील खिडकीतून त्यानें खाल उडी टाकली, ती हौदांतील कारंज्यावर पडून दोन दिवसांनीं पेशव्यांचा प्राण गेला. खडर्याच्या लढाईतील जय हीच काय ती या कारकीर्दीतील मोठया महत्त्वाची गोष्ट होय.
या पेशव्याच्या कारकीर्दीत सर्व कारभार नाना फडणवीस पहात असे. पेशव्यास राज्यकारभारांत मन घालण्याची इच्छा किंवा तेवढी हुशारी नव्हती. जास्त दिवस जगता तरी हा पेशवा मोठा कर्तबगार झाला असता असें वाटत नाहीं.
- केतकर ज्ञानकोश
No comments:
Post a Comment