विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 8 May 2020

अफजलखान वध: एक अवलोकन (पूर्वार्ध)



अफजलखान वध या महाराजांच्या आयुष्यातील प्रकरणाबद्दल मी गेल्या काही लेखांमध्ये माझ्या बालबुद्धीला सुचेल त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरीत्र जर अभ्यासायचे असेल तर 'अफजलवध' हि घटना त्यात अत्यंत महत्वाची आहे. हि घटना महाराजांसाठीच नव्हे तर सगळ्या भारतासाठीसुद्धा महत्वाची होती. याआधी भारताने अफवा पसरवून जिंकणारा अल्लाउद्दीन खिलजी पहिला, युद्ध हरल्यावर अभय दिल्यावर पुन्हा हल्ला करून ज्याने अभय दिले त्यालाच मारणारा घोरी पहिला आणि इमाने इतबारे निजामशाहीची आणि आदिलशाहीची चाकरी करूनही शेवटी ज्यांचे खून पडले असे लखुजीराव जाधव (जिजाबाईंचे वडील) आणि मुरार जगदेवसुद्धा पहिले. पण आपल्याहून ताकदवान शत्रूला मुत्सद्देगिरीच्या बळावर नेस्तनाबूत करणारे शिवाजी महाराज पहिलेच. अफजलच्या वधानंतर फक्त आदिलशाहीच नव्हे तर मुघल, इंग्रज, डच या सर्वांनीच शिवाजी महाराजांची विशेष दखल घ्यायला सुरुवात केली. या पूर्ण घटनेचं अवलोकन करताना त्याला आपण दोन भागात विभागूया. पहिला भाग असेल काही सामान्य/ नेहमी विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions) आणि दुसरा भाग असेल महाराजांचे काही महत्वाचे स्वभाव विशेष अथवा त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय:
काही सामान्य/ नेहमी विचारले जाणारे प्रश्न:
१. अफजलखान शिवाजी महाराजांना खरच दगा द्यायला म्हणजे मारायला किंवा पकडून न्यायला आला होता का?
विश्लेषण: यासाठी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचे तीन भाग आपण करू शकतो:
१. शिवाजी महाराजांच्या बाजूने असणारी ऐतिहासिक साधने
२. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध असणारी ऐतिहासिक साधने
३. त्रयस्थांनी या घटनेबद्दल केलेली नोंद
यातील तिसऱ्या प्रकारची साधनं म्हणजे इंग्रजांनी, डचांनी केलेली या प्रसंगाबद्दलची नोंद. परंतु इंग्रज आणि डच यांपैकी कोणाचाही या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे हि साधनं केवळ बाजारगप्पांवर आधारलेली आहेत. ५ मे १६६० ला वेंगुर्ल्याच्या एका डच वखारीतून जे पत्र लिहिण्यात आलं त्यात 'शिवाजीने आपल्या आई आणि बायकोला त्या मुस्लिम सेनापतीकडे (अफजलकडे) पाठवलं होतं म्हणजे त्याला (शिवाजी महाराजांना) अभय मिळावं म्हणून'. या अश्या अफवांवर आधारित माहिती इंग्रजांची आणि डचांची असल्याने त्यांचे संदर्भ इथे देत नाही. आता पाहू शिवाजी महाराजांच्या बाजूचे संदर्भ या बाबतीत काय म्हणतात ते? सभासद बखर म्हणते कि कृष्णाजी पंतांनी लाचलुचपत करून मुत्सद्दी वजिरांकडून माहिती काढलीकी "शिवाजी युद्धात सापडणार नाही त्यामुळे भेटीला बोलावून त्यास धरावे".
सभासद बखर:
📷
📷
शिवभारत म्हणते कि 'याप्रमाणे करार करून व आतून कपट योजून एकमेकांस भेटू इच्छिणारे ते दोघे त्यावेळी शोभले (शिवभारत अध्याय २१ श्लोक ९)
शिवभारत:
📷
तर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध असणाऱ्या साधनांपैकी 'तारीख इ अली आदिलशाही' मध्ये प्रत्यक्ष खानाच्या मनात कपट होतं असं लिहिलेलं नाहीये. याउलट 'बस्तीन्नुसलातीन' मध्ये तर 'जातीचा मुसलमान साफ दिलाचा भोळसर' असं या अफजलला म्हटलेलं आहे. परंतु आपण या भोळसट अफजलच्या कुरापती "स्वराज्य ते साम्राज्यमधील सुयोग शेंबेकर (Suyog Shembekar)च्या पोस्ट" लेखात पहिल्याच आहेत. असो पण 'तारीख इ अली आदिलशाही' मध्ये असा उल्लेख दिसतो कि आदिलशहाने अफजलला हुकूम दिला कि 'क्रोधाग्नि तीव्र करून शिवाजीच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी आणि त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापेखाली तुडवावे' याचाच स्पष्ट अर्थ होतो कि शिवाजी महाराजांना मारावे असाच आदिलशहाचा हुकूम होता असे म्हटले आहे. मुळात "स्वराज्य ते साम्राज्यमधील सुयोग शेंबेकर (Suyog Shembekar)च्या पोस्ट" लेखात अफजलचा जो स्वभाव दिसतो त्यानुसार त्याने कपट आधीच रचले असावे परंतु प्रत्यक्ष आदिलशहाने हुकूम दिल्यानंतर कर्नाटकातील बऱ्याच राजांना हरवणारा अफजल काही भोळसटपणे फक्त एक मेजवानी म्हणून शिवाजी महाराजांना भेटायला गेला नसावा. त्यामुळे या साधनांवरून शिवाजी महाराजांना मारायचे हाच निर्णय करून अफजलखान वाईला आलेला असावा हे अगदी स्पष्ट होत. बाकी अलिनामा आणि अलामगिरनामा यांमध्ये एकतर पूर्ण तपशील नाही किंवा अफवाच आहेत त्यामुळे त्याही इथे ग्राह्य धरत नाही.
२. अफलखानाला मारायचे हे शिवाजी महाराजांनी ठरवले होते कि त्याने वार केला म्हणून नाईलाजाने मारले?
विश्लेषण: पूर्वी काही बॉलिवूड मूव्हीजमध्ये असं दाखवत असत कि हिरो नेहमीच व्हिलनलासुद्धा अभय देत असतो आणि तरी व्हिलन सुधारत नाही आणि अचानक हिरोवर हल्ला करतो आणि नाईलाजाने 'स्वतःचा जीव वाचवण्यासाठी' हिरोला व्हिलनला मरावं लागत. हे झालं विसाव्या शतकातलं आणि हाच न्याय लावून लोकांचं म्हणणं असत कि कपट वगैरे मुळात शिवाजी महाराजांच्या मनात नव्हतं अफजलने पुढाकार घेतला म्हणून महाराजांनी मारलं त्याला. लोकांना वाटतं विश्वासघात करून महाराजांनी अफजलला मारलं हे ऐकून इतर लोकांच्या मनातला आदर कमी होईल महाराजांबद्दल म्हणून हे कारण उत्तम आहे. परंतु तस नाहीये उलट असं म्हणून आपण शिवाजी महाराजांनी वापरलेल्या मुत्सद्दी वृत्तीचाच अपमान करतो. त्यांनी केलेल्या इतक्या बिनचूक नियोजनाला नाकारतो. 'महाराजांनी शत्रूचा विश्वासघात केलाच आहे पण मित्रांचा कधी केला नाही' आणि तोच खरा राजा. महाराजांनी कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, नेतोजी पालकर, तान्हाजी मालुसरे आणि इतर सैनिकांना जावळीत, पारच्या झाडीत लपून बसायला सांगितलं होतं ते काय या शक्यतेवर कि अफजलने हल्ला केला तरच त्यांनी अफजलच्या सैन्यावर हल्ला करायचा? नेतोजी पालकरांना तर वाईत जाऊन अफजलच्या उरलेल्या सैन्यावरही हल्ला करायला सांगितलं होतं आणि त्यापुढे ५ महिने अविरतपणे आदिलशहाच्या मुलखावर हल्ला करून महाराजांनी त्याचा मुलुख बळकावला. हे सर्व नियोजन करायला खूप वेळ लागतो आणि हे सर्व नियोजन फक्त अफजलने हल्ला केला तरच त्याला मारावे या एका शक्यतेवर करण्याइतके महाराज भोळे नव्हते. आता कोणी म्हणेल या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं होतं अश्या बढाया उगाच आता मारल्या जातायत. परंतु ज्याप्रकारे इशारत झाल्यावर अफजलच्या फौजेचा पाडाव पार मध्ये झाला, ज्याप्रकारे वाईत पोहोचून नेतोजींनी अफजलच्या छावणीला लुटलं आणि ज्याप्रकारे पुढे महाराजांनी त्रिवेणी हल्ला केला या गोष्टी अश्याच 'आज खान मारला आता उठा आणि सुटा' इतक्या सोप्या नसतात. त्यामुळे खान दगा करो अथवा न करो 'खान मारायचाच' हे महाराजांनी ठरवलंच होत हे वरच्या सर्व नियोजनावरून दिसून येतं.
याशिवाय वैयक्तीक भावनांमुळेसुद्धा महाराजांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटतं. शिवाजी महाराजांच्या सख्या मोठ्या भावाला 'संभाजी राजांना' अफजलनेच मारले होते (याचे संदर्भ वेळोवेळी दिलेले आहेत मागील लेखात), शहाजी राजांना अटक केल्यानंतर विजापुरात त्यांची मिरवणूक याच अफजलने काढली होती, तुळजाभवानी यानेच फोडली, महाराजांच्या मेव्हण्याला बजाजीला यानेच कैदेत टाकलं. या सर्व पार्श्ववभूमीवर शिवाजी महाराजांना आपण अफजलला मरावं हे वाटलं असेल तर त्यात काहीच नवल नाही. तसंच अफजलने जे कारभार केले होते, हिंदू देवस्थानं आणि हिंदूना मारून तो ज्याप्रकारे स्वतःला 'शीक्नन्दा इ बुतान' आणि 'कातिल- इ मुतमर्रीदान व काफिरान' पदं लावून घेत होता त्यामुळे त्याला रोखणारं कोणीतरी हवंच होतं. आदिलशाही सत्तासुद्धा तलवारीच्या जोरावरच महाराष्ट्रात होती तर ती सत्ता तलवारीच्या जोरावर परत मिळवण्यासाठी महाराजांनी अफजलचा घात केला असेल तर त्यात महाराजांना काहीच दोष नाही. महाभारतात भीष्माला, द्रोणाचार्यांना आणि रामायणात वालीला याचप्रकारे घात करून मारण्यात आले होते. हेच शिवाजी महाराजांनीसुद्धा केले असेल तर लहानपणापासून वाचलेल्या आणि ऐकलेल्या रामायण महाभारतातील गोष्टींची उत्तम अंमलबजावणी महाराजांनी केली हेच दिसून येतं.
या शिवाय अफजलखानाला आदिलशाही दरबारात फार वजन होत. त्यामुळे त्यालाच मारलं म्हणजे महाराजांची दहशत निर्माण व्हायला मदत झाली असती आदिलशाही दरबारात. याशिवाय जेव्हढा प्रदेश महाराजांनी अफजल वधानंतर घेतला तो पाहता महाराजांनी अफजलवध शांत डोक्याने नियोजन करून केला याबद्दल काहीच शंका रहात नाही.
३. भेटीच्या प्रसंगी अफजलने शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता का? म्हणजेच प्रथम कट्यार खानाने महाराजांवर चालवली होती का?
विश्लेषण: आता हे खरं का खोटं हे कळायला काहीच मार्ग नाही. अफजलखानासकट त्याचे सगळे अंगरक्षक या प्रसंगात मारले गेले. महाराजांचे त्यांच्यासकट सगळे म्हणजे दहाच्या दहा अंगरक्षक यातून बचावले. त्यामुळे भेटीत नक्की काय झालं याची फक्त एकच बाजू आपल्याला कळणार. त्यामुळे या प्रश्नाचं संदर्भासहित उत्तर देणं शक्य नाही. शिवभारत, सभासद बखर, फतनजीचा पोवाडा, अज्ञानदासचा पोवाडा या सर्वांतच खानाने पेहेल केली असं लिहिलेलं आहे. खानाचा स्वभाव आणि त्याचा इतिहास पाहता खास करून त्याने ज्याप्रकारे शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगाला तहासाठी बोलावून मारलं होतं त्यानुसार त्याने पेहेल केली असेल यात शंका घ्यावी असं नाही वाटत. त्यामुळे केवळ तार्किक निष्कर्ष काढून या प्रश्नाचं उत्तर हो खानाने शिवाजी महाराजांवर प्रथम हल्ला केला असावा असे म्हणावे लागते.
हे झाले अफजलखान वधाच्या बाबतीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न. आता महाराजांचे या प्रसंगात दिसून आलेले काही स्वभाव विशेष पाहू पुढील लेखात.Know more about Afzal Khan And Shivaji Maharaj Fight ...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...