postsaambhar : सुयोग शेंबेकर,
अल्लाउद्दीन खिलजी हा बादशाह जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या आणि जावई दोन्ही होता. अल्लाउद्दीन हा फार क्रूर होता पण युद्ध डोकं फारच शांत ठेऊन करायचा. त्याकाळच्या महाराष्ट्रात यादवराजे राज्य करत होते ज्यांचा रामदेवराय नावाचा राजा त्यावेळी देवगिरीचे साम्राज्य सांभाळत होता. हा राजा अतिशय भित्रा आणि कोणतीही दूरदृष्टी तसंच युद्धकौशल्य नसलेला होता. शिवाजी महाराज आणि इतर मराठ्यांच्या आधी महाराष्ट्रावर राज्य करणारं हे मराठी राज्य होतं. यादवराजांचा प्रधान हेमाद्री याला 'मोडी' लिपीचा जनक म्हटलं जातं.
१२९४ मध्ये रामदेवरायाचा सेनापती जो त्याचा मुलगा होता, शंकरदेवराय हा दुसऱ्या राज्यावर हल्ला करायला गेला असताना (किंवा काही इतिहासकारांच्या मते सैन्य घेऊन तीर्थयात्रेला गेलेला असताना, परंतु सैन्य घेऊन तीर्थयात्रेला जाणं जरा विचित्र वाटतं) अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी या यादवांच्या राजधानीवर हल्ला केला (६ फेब्रुवारी १२९४). हा खिलजींचा पहिला हल्ला होता. यावेळी रामदेवराय घाबरून देवगिरीच्या किल्ल्यात जाऊन लपला. यावेळी अल्लाउद्दीन जवळ केवळ ८००० कवचधारी पठाण होते. मागून दिल्लीची '१ लाखाची फौज' येत आहे अशी अफवासुद्धा अल्लाउद्दीनने उडवूंन दिली. प्रत्येक पठाणाने देवगिरीच्या घरातल्या संपत्तीला आणि महिलेला लुटलं. हा महाराष्ट्रावरचा पहिला मुसलमानी सुलतानाचा हल्ला. (अल्लाउद्दीनचा हल्ला जलालुद्दीन या सुल्तानांकडून) [1]
📷
शंकरदेवराय लगेच राजधानीकडे परत फिरला आणि त्याने अल्लाउद्दीनला आव्हानसुद्धा दिलं. पण भित्र्या रामदेवरायने आपल्या मुलालाच 'आपण खंडणी आणि लूट घेऊन अल्लाउद्दीनला जाऊ देऊ' असं पत्र पाठवलं. शंकरदेवरायाने बापाचं ते पत्र झुगारून दिलं. अल्लाउद्दीनवर हल्ला केला. मगाशीच म्हटल्याप्रमाणे अल्लाउद्दीनने शांत डोक्याने व्यूहरचना केली. ४००० सैनिकांना घेऊन शंकरदेवरायावर हल्ला करायला गेला आणि ४००० लोकांना देवगिरीच्या किल्ल्याच्या वेढ्यावरचं ठेवलं. सामना भिडला शंकरदेवराय मराठ्यांच्या पराक्रमाला साजेल असा लढला. त्याचं सैन्यसुद्धा जास्त होतं. आता अल्लाउद्दीन हरणार तेव्हढ्यात त्याने उरलेल्या ४००० सैन्याला बोलावलं. 'हेच ते दिल्लीचं १००००० च सैन्य' असं वाटून शंकरदेवरायाची फौज विनाकारण पळू लागली. पर्यायाने शंकरदेवरायालाही पळ काढावा लागला. उरल्या सुरल्यांची कत्तल. रामदेवराय आपल्या मुलाच्या मदतीसाठी किल्ल्याच्या बाहेरच पडला नाही. पडला असता तर अल्लाउद्दीनची काही खैर नव्हती.
या लढाईनंतर अल्लाउद्दीन अजूनच अडून बसला. त्याने एकूण सहाशे मण सोनं, सात मण मोती, दोन मण हिरेमाणकं, एक हजार मण चांदी आणि रेशमी कापडाचे चार हजार ठाण[2] एव्हढ्याची मागणी केली. याउपर दरवर्षी बक्कळ खंडणीसुद्दा. कळस म्हणजे राजकुमारी 'जेष्टाई' किंवा 'जेष्ठापल्ली' हिची मागणी केली आणि भित्र्या रामदेवरायाने त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. हीच ती जेष्टापल्ली जिला तुम्ही 'पद्मावत' चित्रपटामध्ये पाहिलं होतं.
📷
यामुळे अल्लाउद्दीन इतका श्रीमंत झाला कि त्याने त्याच्या बळावर आपल्या काकाला फसवून, रमझानच्या महिन्यात आपल्याजवळ बोलावून त्याचा खून करावला (१२९५). 'मी जलालुद्दीन बादशहाला घाबरलो आहे, जवळ सतत एक विषाची छोटी शिशी बाळगतो, आपण (जलउद्दीन) सैन्य घेऊन भेटायला आलात तर लगेच विषप्राशन करून आत्महत्या करेन' वगैरे बऱ्याच थापा मारून या पठ्ठयाने आपल्या सासऱ्याला म्हणजेच काकाला, म्हणजेच बादशहाला आपल्या जवळ कऱ्हा येथे बोलावून मग त्याचा खून केला. पुढे ५० दिवसांच्या आत या कटात सामील असलेल्या सगळ्यांचाही त्याने खून करविला आणि स्वतः बादशाह झाला.
१२९४ नंतर १३०७ ला मलिक काफूर या आपल्या गुलामाला, अल्लाउद्दीनने देवगिरीवर हल्ला करायला, (शिक्षा द्यायलाच म्हणाना) पाठवलं. का? ऐका पुन्हा एकदा आपल्या भित्र्या भागुबाईची गोष्ट. रामदेवरायाने अल्लाउद्दीनला पत्र लिहून कळवलं कि 'गेल्या तीन वर्षांपासून मी खंडणी देत नाही आहे याला कारण माझा मुलगा आणि मंत्री आहेत. ते मला खंडणी पाठवू देत नाहीयेत, तरी कोण्या बड्या सरदाराला पाठवून याचा बंदोबस्त करावा'. पुन्हा देवगिरीवर हल्ला, आणि पुन्हा पराभव. मुळातच धाडस कितीही असलं तरी प्रतिस्पर्धीची ताकत, युद्धशैली, मानसिकता या कशाबद्दलच माहिती शंकरदेवरायाला नाही. सैन्य मोठं पण काहीच योजना नाही त्यामुळे पुन्हा पराभव. परत शंकरदेवरायाने पळ काढला. यावेळी माहिती देणाऱ्या रामदेवरायलाच पकडून मलिक काफूर दिल्लीला घेऊन गेला (२४ मार्च १३०७). अल्लाउद्दीनने उपकार म्हणून आपल्या 'सासऱ्याला' न मारता त्याला 'रायरायान' पदवी दिली. पुढे मोठ्या गर्वाने पराभूत रामदेवरायाने ती मिरवलीसुद्धा बर का? एव्हढच काय 'प्रौढप्रताप चक्रवर्ती' सुद्धा म्हणावयाचा हा पराजित राजा स्वतःला (ताम्रपट आणि शिलालेख). अखेर १३०९ च्या दरम्यान रामदेवराय मेला आणि शंकरदेवराय राजा झाला. पुन्हा त्याने खंडणी बंद केली आणि अल्लाउद्दीनच मांडलिकत्व झुगारून दिलं. अल्लाउद्दीनने पुन्हा मलिक काफूरला देवगिरीवर पाठवलं. यावेळी त्याला सांगितलं कि तूच देवगिरीचं राज्य सांभाळ. पुन्हा लढाई आणि या लढाईत अखेर जुन्या चुकांवरून काहीही न शिकलेला शंकरदेवराय अखेर मलिक काफूर कडून या युद्धात मारला गेला. आता मलिक काफूर स्वतःच देवगिरीवरचं राज्य पाहू लागला (अल्लाउद्दीनच्या वतीने). तिथे एक मोठठी जामा मशिदसुद्धा बांधली.
पुढे १३१७ मध्ये अखेर अल्लाउद्दीन 'अल्लाहला प्यारा' झाला. नेहमीप्रमाणे बादशाहीसाठी दिल्लीत कत्तली सुरु झाल्या. ३५व्या दिवशी खुद्द 'मलिक काफूर'चा खून पडला. या सर्व कत्तलींमध्ये जेष्ठाईचा मुलगा उमरखान शहाबुद्दीन जो केवळ ६ वर्षांचा होता तो सुद्धा मारला गेला. कधी ना कधी तो बादशाह होऊ शकला असता ना. एव्हढ्या कत्तली करणारा हा महाभाग होता कोण? कुतुबुद्दीन मुबारीकखान खिलजी. आता तो बादशाह बनला. त्याला कळलं कि रामदेवरायाचा जावई, हरपालदेवराय हा आता राजा बनून देवगिरीत चळवळी करतो आहे. मुबारीकने देवगिरीवर पुन्हा हल्ला केला हा खिलजींचा ४था हल्ला. यावेळीतर हरपालदेवरायाची फौजसुद्धा कमी होती. त्यामुळे पुन्हा पराभव, आणि दुर्दैवाने प्रत्यक्ष हरपालदेवरायच मुबारीकच्या हाती सापडला. मुबारीकने त्याची कातडी सोलून देवगिरीवर टांगायला सांगितली. बाबासाहेब पुरंदरेंनी अतिशय हृदयद्रावक वर्णन केलं आहे या प्रकारचं 'देवगिरीच्या दरवाज्यावर यादवांचा जावई सोललेल्या बकऱ्यासारखा लोम्बकळू लागला. लग्नात सम्राट रामदेवरावांकडून भर वैभवात कदाचित याच दरवाजावर सीमांत पूजन स्वीकारणारा यादवांचा जावई आज मासांचा लोळागोळा होऊन लोम्बकळत होता.' अश्या प्रकारे देवगिरीचे २ राजे शंकरदेवराय आणि हरपालदेवराय हे क्रमाने मलिक काफूर आणि मुबारीक खिलजी यांनी मारले. आणि महाराष्ट्रावर परचक्र आलं. 'यादवांच्या ध्वजावरील गरुडाची पिसं झाली'.[3]
आता योगायोग पहा या यादवांना आपले पूर्वज म्हणणारे जाधव यांची कन्या 'जिजाबाई' आणि चितोडच्या रतनसिंग राण्यांच्या भावाला लक्ष्मीसिंगला आपले पूर्वज म्हणणारे भोसले यांचा पुत्र शहाजी यांचा पुढे विवाह झाला. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यांचं राज्य संपवलं त्यांच्या पिढीतल्याच राष्ट्रपुरुषाने पुढे स्वराज्य आणि पर्यायाने इतिहास घडवला.
तळटीपा
[1] Buy Khalji Kaleen Bharat (History of Khaljis) - 1290-1320 (Medieval India Series, Book 2 of 9) Book Online at Low Prices in India
No comments:
Post a Comment