विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 8 May 2020

अफजलखान वध: एक अवलोकन (उत्तरार्ध)

मागील लेखात आपण अफजलखान वधासंबंधी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न (FAQ) पहिले. आता शिवाजी महाराजांनी या बाबतीत दाखवलेले त्यांचे काही विशेष स्वभावगुण पाहू.
१. संयम:
सर्वात महत्वाचा गुण महाराजांनी या सर्व प्रकरणात जर दाखवला असेल तर तो आहे संयम. लक्षात घ्या अफजलखानाने शिवाजी महाराजांचा सख्खा मोठा भाऊ विश्वासघात करून मारला होता, महाराजसाहेबांची म्हणजेच शहाजी राजांची अटकेनंतर विजापुरात धिंड काढली होती आणि तुळजाभवानी फोडली होती. हे सर्व करून अफजल महाराजांच्या प्रदेशात उघडपणे त्यांना आव्हान देत घुसला होता. यावेळी 'जिंकू किंवा मरु' अश्या विचारसरणीने महाराज चालले असते तर त्यांचं स्वराज्य सुरु होण्यापूर्वीच संपलं असतं. अफजलची सैनिकी ताकद जास्त होती आणि महाराजांकडे अफजलशी उघड्या मैदानात झुंज द्यावी एव्हढं बळही नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची गरजपण नव्हती. एव्हढा मोठ्ठा सह्याद्री मागे असताना त्याच्या कचाट्यात अफजलला अडकवणं हेच योग्य होतं आणि महाराजांनी ते केलंसुद्धा. वरील सर्व गोष्टींसाठी महाराजांच्या मनात राग खदखदत असला तरी महाराजांनी प्रचंड संयम दाखवला. याउलट महाराजांच्या ज्या ज्या प्रदेशावर अफजलच्या सरदारांनी हल्ले केले त्या प्रदेशातूनसुद्धा आपल्या सैन्याला मागे हटायला सांगितलं. तसंच आपण फार घाबरलो आहोत त्यामुळे आपणच महाराजांना येऊन जावळीत भेटावं अश्या विनवण्यासुद्धा केल्या. ज्या माणसाचं तोंडसुद्धा पाहावं अशी शिवाजी महाराजांची इच्छा नसेल ज्याच्या नावानेच महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जात असेल अश्या माणसावर हल्ला न करता उलट त्यालाच विनवण्या कराव्या आणि आपल्या तावडीत सापडवावं यासाठी महाराजांना किती संयम पाळावा लागला असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी.
२. नेतृत्व:
खरं नेतृत्व कसं असावं, योग्य नेता कसा असावा यासाठी शिवाजी महाराजांसारखं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. सभासद बखरीमध्ये महाराजांनी अफजलखान मोहिमेसंबंधी मंत्रिगणांबरोबर केलेली चर्चा याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर गोपिनाथ पंतांना अफजलकडून माहिती काढून आणावयास सांगितले, यातून राजांचा सर्वात मोठा नेतृत्व गूण दिसून येतो तो म्हणजे सर्वांचे म्हणणे ऐकावे आणि त्यातून जे योग्य वाटेल ते करावे. आजकालच्या बॉलीवूडच्या जगात 'एकच माणूस सर्व गोष्टी करू शकतो हे दिसतं' वास्तविक पाहता हे अमानवीय आहे अश्यावेळी सर्वांच्या गुणांचा, ज्ञानाचा आणि पराक्रमाचा योग्य वापर करून घेणं हा नेतृत्वाचा महत्वाचा गुण महाराजांमध्ये होता हे दिसून येतं.
तसेच नेतृत्वाचे बरेच प्रकार असतात. स्वतः पुढे राहून, उदाहरण स्वतः बनून नेतृत्व करणं (leading from the front), दुसऱ्यांचे गुण पारखून त्याच्याकडून योग्य ती कामं करून घेणं इत्यादी. महाराजांचं चरित्र पाहता सुरुवातीच्या उमेदीच्या काळात त्यांनी अफजलवध, शास्ताखानाला शास्त, उंबरखिंडीतला मोघल सैन्याचा पराभव या आणि अश्या कामातून स्वतः पुढाकार घेऊन गोष्टी साध्य करून दाखवल्या (leading from the front). आग्र्याहून सुटका झाल्यावर पुढच्या काळात सिंहगड मिळवणं, पन्हाळा आणि इतर गड मिळवण्यासाठी त्यांनी इतरांच्या गुणांना वाव दिला. अफजल वधात एव्हढी मोट्ठी जोखीम स्वतः उचलून ती पूर्ण करून पुढे स्वराज्याचा विस्तार करायचं काम सुद्धा महाराजांनी केलं. गोपीनाथ पंतांना सांगितलेले मुद्दे, संभाजी कावजी आणि जिवा महालाची निवड, १०००, २००० मावळ्यांना झाडीत शांत बसवून ठेवणं आणि त्यांनीसुद्धा ते राजांसाठी करणं हे केवळ अतुलनीय नेतृत्व गुणानेच शक्य होतं.
३. मुत्सद्देगिरी:
अफजल हा कोणी लल्लू पंजू नव्हता किंवा काल राजकारणात घुसलेला नव्हता तर तो राजकारणातला मुरब्बी होता. परंतु त्याच्या गुणांना, पूर्वीच्या कामांना समजून त्याचा स्वभाव ओळखून चाली खेळणं हे करून महाराजांनी मुत्सद्देगिरीची पराकाष्टा गाठली. अफजल ज्याला जावळीचा प्रदेश किती कठीण आहे हे माहित होतं अश्या माणसाला फसवून, गोड गोड बोलून आणि पैशाचा लोभ दाखवून, खोटी वचनं देऊन, तिथे बोलावून मारणं हे काही सोप्प काम नव्हतं. भारताला याआधी केवळ भारतीय राजांनाच बोलावून विश्वासघात करून अश्या प्रकारे मारलंय हे ऐकण्याची आणि पाहण्याची सवय होती ती महाराजांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर बदलली. आपल्या डोक्यातील मुत्सद्देगिरी त्यांनी गोपीनाथ पंतांच्या तोंडून वदवून घेऊन खानाला गाफील केलं.
४. नियोजन:
असं म्हणतात कि 'Things don't go as planned' पण अफजलखान वध या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट जरी नियोजनाच्या बाहेर गेली असती तरी सगळी योजना फसली असती. महाराजांनी अफजलला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं, त्यासाठी जावळीच्या भूभागाची निवड केली, अफजल जावळीत म्हणजे पार गावात पोहोचल्यावर त्याच्या सर्व परतीच्या मार्गांवर आपले सरदार नेमले. गोपीनाथ पंतांना माहिती काढायला आणि अफजलला जावळीत बोलावण्यासाठी वकिली करायला पाठवले, अप्रतिम शामियाना रचला, बरोबर जिवा महालाला घेतला, अंगात चिलखत घातलं. हे सर्व नियोजन महाराजांनीच केले पण त्याची जबाबदारी सर्वांवर होती. अफजलच्या परतीच्या मार्गावर मावळ्यांना त्याच्या वधाच्या आधीच्या रात्रीपासून त्याचा वध होईपर्यंत गुपचूप बसून राहायचं होतं. एकाहि मावळ्याचा ताबा सुटला असता तर शत्रू एव्हढ्या आत आणूनसुद्धा सगळी योजना फसली असती. गोपीनाथ पंत हुशारीने आणि धूर्तपणे अफजलला पटवू शकले नसते तर तो इथे जावळीत आलाच नसता. जिवा महालाने बडा सय्यद मारला नसता तर सगळं यश मिळूनसुद्धा ते धुळीला मिळालं असतं. त्यामुळे या वधासाठी सर्वांनीच आपापली कामगिरी जबाबदारीने पार पाडली, पण जे नियोजन महाराजांनी केलं होतं ते पूर्णपणे निर्दोष होतं.
५. माणसांची पारख:
अफजलला त्याच्या शक्तीबळावर फार गर्व होता म्हणून त्याने आपल्याबरोबर फक्त बडा सय्यदच आणला. पण महाराजांनी बडा सय्यदसाठी जिवा महाला बरोबर घेतला जो त्याच्याइतकाच पट्टा चालवण्यात पटाईत होता. महाराजांनी बरोबर संभाजी कावजीसुद्धा घेतला. तो अफजल सारखाच बलदंड होता असा त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जर अफजल काही कारणाने त्याच्या बाळाने वरचढ झाला असता तर महाराजांना संभाजी कावजीची मदत झाली असती. जिवा महालाचा उपयोग झाला हे तर दिसूनच येतं पण जर अफजल आवरता आला नाही तर संभाजी कावजी बरोबर असावा हा महाराजांचा विचार त्यांच्यामधला सावधपणा दाखवून जातो.
वकील म्हणून गोपीनाथ पंतांची निवड म्हणजे एक महत्वाची चाल होती. अफजलला गोड बोलून, त्याची रदबदली करून त्याला जावळीत प्रतापगडाच्या पायथ्याशी आणायचं महत्वाचं काम त्यांच्या डोक्यावर होतं आणि ज्याप्रकारे अफजल जावळीत आला त्यानुसार गोपीनाथ पंतांची निवड अगदी योग्य होती हेच दिसून येतं. महाराजांच्या चरित्रामधूनसुद्धा हे नेहमीच दिसून येतं कि त्यांना माणसांची चांगली पारख होती.
६. प्रसंगावधान:
सगळ्यात शेवटी आणि अजून एक महत्वाचा गुण प्रसंगावधान. सभासद बखर सांगते कि बडा सय्यदला शामियानात पाहिल्यावर महाराजांनी गोपीनाथ पंतांना बोलावून त्याला बाहेर जायला सांगितलं. विचार करा महाराजांनी तलवारीने अफजल मारल्यावर सय्यद तेथेच असता तर त्याने काय केलं असतं? अफजलने वार केल्यावर महाराजांनी तलवारीने प्रतिवार केला हे एक वाक्य म्हणणं फार सोप्प आहे पण त्यासाठी किती प्रसंगावधान हवं याची कल्पनाच केलेली बरी.
महाराजांच्या गुणांचे बरेच पैलू या पूर्ण प्रकरणातून दिसून आले. हे काम काही सोप्प नव्हतं. मुत्सद्देगिरी, अप्रतिम नियोजन, योग्य माणसांची जोड आणि अद्वितीय नेतृत्व अश्या बऱ्याच गोष्टींनी शिवाजी महाराजांनी स्वतःला या प्रकरणातून फक्त तारूनच नेलं नाही तर स्वतःची योग्यता सर्व बादशाह्यांसमोर आणि परकीय आक्रमकांसमोर सिद्ध केली. इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंचांनींसुद्धां या प्रकरणानंतर महाराजांची विशेष दखल घ्यायला सुरुवात केली. या प्रकरणाबद्दल जितके बोलू, जितकं लिहू तितकं कमीच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की, या प्रकरणाचा नीट अभ्यास केला तर 'शिवाजी महाराज कि' 'जय' का म्हणावं? हे मनापासून पटायला मदत होईल यात शंकाच नाही.Hashtag #अफजलखान sur Twitter

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...