विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 May 2020

#महाराष्ट्राचा_सह्याद्री 🚩












#महाराष्ट्राचा_सह्याद्री 🚩
पश्चिम घाटालाच संस्कृत नाव सह्याद्री असे आहे.
भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी असुन उत्तरेस सातपुडा डोंगर रांगेपासुन दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पश्चिम अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे.
सह्याद्रीची उत्तर ते दक्षिण लांबी सुमारे १६०० किलोमीटर इतकी आहे आणि त्यातील महाराष्ट्रात ७२० किलोमीटर भाग असून समुद्रसपाटीपासून सरासरी उंची सुमारे ९०० ते १२०० मीटर आहे.
पर्वताचा उतार हा उत्तरेतुन दक्षिणेकडे मंद होत जात आहे.
महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सुमारे ६०००० चौ.कि क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे व पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या सीमा अनुक्रमे पुढीलप्रमाणे-
अहमदनगर,नाशिक,पालघर,ठाणे,रायगड, पुणे, सातारा,सांगली,कोल्हापूर, सिंधुदुर्ग.
सह्याद्री डोंगररांगाच्या प्रामुख्याने ४ भाग आहेत.
१) सातपुडा डोंगररांग - ह्या शृंखलेच्या उत्तरेला नर्मदा नदी तर दक्षिणेस तापी नदी असुन त्या पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे वाहत जातात आणि ह्या डोंगररांगा मुळे त्या वेगळ्या झाल्या आहेत.
२) सातमाळा ते अजिंठा डोंगररांग -
ह्या डोंगररांगेत पश्चिम बाजूला सातमाळा तर पूर्वेकडे अजिंठा आहे.
३) हरिश्चंद्र ते बालाघाट डोंगररांग -
गोदावरी नदीच्या दक्षिणेस ही रांग पसरली आहे.
या डोंगररांगेच्या पश्चिम बाजूस हरिश्चंद्र तर पूर्वेस बालाघाट आहे.
४) शंभुमहादेव डोंगररांग -
महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी डोंगररांग हिच आहे.
रायरेश्वर पासुन शिंगणापूर पर्यंत ही रांग आहे.
सातारा,सांगली व पुढे कर्नाटक मध्ये ही रांग जाते.
भीमा व कृष्णा नदीच्या मध्ये ही रांग आहे.
#भौगोलिक_माहिती -
सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे याला सह्य पर्वत असेही म्हणतात.
ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे.
लाव्हा रसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.
पश्चिम घाटाचा उत्तरेकडील ते गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग ग्रेनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे.
उत्तरेस तापी नदीपासून ते दक्षिणेस निलगिरी पर्वता पर्यंत आणि पुढे पालघाट खिंडीपासूनची दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते.
उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो.
महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र हे दोन स्वभाविक विभाग अलग झाले आहेत.
उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातपुडा रांग,सातमाळा ते अजिंठा, हरिश्चंद्र ते बालाघाट व शंभूमहादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत.
पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत आणि पुढे जाऊन ते अरबी समुद्रात मिळतात.
सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी,राजगड,रायगड,प्रतापगड,वि शाळगड,साल्हेर,पन्हाळा,कोंढाणा यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत.
तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे.
निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री,दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात.
या पर्वताची उंची २००० मीटर पेक्षा जास्त आहे यातच दोडाबेट्टा २६३७ मीटर उंच हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती २५५४ मीटर उंच हे दुसरे प्रमुख शिखर आहे.
ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे.
निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिकरीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.
पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडीत झाली आहे.
अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी २६९५ मीटर उंच आहे.
हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
चेंबरा,बांसुरा,वेल्लरीमाला,अगस्त्यमलई व महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार,पानेमुडी,वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
केरळ व तमिळनाडू यादरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.
महाराष्ट्रात महाबळेश्वर,पाचगणी,पन्हाळा,माथेरान यांसारखी थंड हवेची ठिकाणे आहेत.
सह्याद्री पर्वतांमधील उंच शिखरे त्यांची उंची व जिल्हा -
१) कळसूबाई शिखर - १६४६ मीटर - जिल्हा.अहमदनगर.
(हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे.)
२) साल्हेर - १५६७ मीटर - जिल्हा.नाशिक.
३) महाबळेश्वर - १४३८ मीटर - जिल्हा.सातारा.
४) हरिश्चंद्रगड - १४२४ मीटर - जिल्हा.अहमदनगर.
५) सप्तशृंगी - १४१६ मीटर - जिल्हा.नाशिक.
६) तोरणागड - १४०४ मीटर - जिल्हा.पुणे.
७) अस्तंभा - १३२५ मीटर - जिल्हा.नंदुरबार.
८) त्र्यंबकेश्वर - १३०४ मीटर - जिल्हा.नाशिक.
#महाराष्ट्राच्या_सह्याद्रीतील_घाट -
१) थळघाट - नाशिक ते मुंबई दरम्यान.
२) माळशेज घाट - नगर ते शहापूर दरम्यान.
३) नाणेघाट - जुन्नर ते कल्याण दरम्यान.
४) बोरघाट - पुणे ते मुंबई दरम्यान.
५) कुंभारली घाट - कराड ते चिपळूण दरम्यान.
६) आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान.
७) फोंडा घाट - कोल्हापूर ते पणजी दरम्यान.
८) आंबोली घाट - कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान.
#सह्याद्रीतील_नदया -
भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा असे दोन प्रामुख्याने जलविभाजक आहे.
तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये महाबळेश्वर मधील कृष्णा,कावेरी,त्रंबकेश्वर मधील गोदावरी,भीमाशंकर मधील भीमा या प्रमुख नदया आहेत.
महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा,कादवा,दारणा,प्रवरा,मुळा, घोडनदी,नीरा,कोयना,वारणा,पंचगंगा इ उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.
कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा,मलप्रभा,तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे.
घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे.
कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे.
शिम्शा,हेमवती,कब्बनी,भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात. तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई,चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्चिम घाटातच आहे.
पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत.
पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकाचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे.
पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत.
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा,सूर्या,वैतरणा, तानसा,उल्हास,कुंडलिका,काळ, सावित्री,वाशिष्ठी,शास्त्री,तेरेखोल या प्रमुख नदया आहेत.
वैतरणा आणि सावित्री नदीजवळ सह्याद्रीचा आकार कंकणाकृती आहे.
गोव्यातील यापोरा,मांडवी,जुवारी, कर्नाटकातील काळी,गंगावळी, शरावती,बेडती,ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर,पोन्नानी, चलाकुडी,पेरियार,कल्लदा या मुख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत.
यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब नदी आहे.
तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्चिम घाटात जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सुमारे ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे सन.१९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना,कर्नाटकातील तुंगभद्रा,लिंगनमक्की,व केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत.
#सह्याद्री_मधील_हवामान -
समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते.
सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते.
उत्तरेकडील भागात १५०० मीटर उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०°सेल्स तर उत्तर भागात २४° सेल्सच्या दरम्यान असते.
#सह्याद्री_मधील_पाऊस -
बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो.
या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे.
वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी पर्यंत आहे.
महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६२५ सेंमी आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे पर्जन्यमान कमी होत गेलेले आहे.
#सह्याद्री_मधील_वनक्षेत्र -
पश्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, आर्द्र पानझडी वने येथे आढळतात. महाबळेश्वर,निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १८०० मीटर पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात.
दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात.
केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत.
कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.
#सह्याद्री_मधील_जैवविविधता -
अनेक जातींचे प्राणी,पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो.
१८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सुमारे १६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत त्यातील कास पठार प्रामुख्याने आहे.
पश्चिम घाटातील घनदाट वनामुळे असंख्य वन्यप्राणी तेथे आहेत.
या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती,१७९ जल स्थलचर वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत.
जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.
विविध जातींच्या गोगलगाई,सरपटणारे प्राणी,वटवाघुळे,फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे.
एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सुमारे ६००० जातींचे किटक आहेत.
फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात.
येथील प्रवाहांमधून विविध रंगी मासे पाहावयास मिळतात.
निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती,गवा, हरिण,चित्ता,अस्वल,सांबर,रानडुक्कर,वाघ इ.पाणी आढळतात.
येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा,कॉफी,रबर,मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात.
वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्चिम घाटातील घाट व खिंडी महत्त्वाचे ठरले आहेत.
अशा ह्या सह्याद्री मध्ये निसर्ग वैविध्यपूर्ण असल्याने तेथे पर्यटनाची अनेक ठिकाणे विकसित होत आहे.
आपण सर्वांनी जरूर आपल्या सह्याद्रीला काही दिवसात भेट द्या आणि एक अविस्मरणीय दिवसाचा अनुभव घ्या.
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सह्याद्री एवढ्या उंच उंच शुभेच्छा... 🙏
#एक_निवेदन -
आपल्या महाराजांच्या पुणे जिल्ह्यातील गड संवर्धनासाठी आपल्या सर्वांची श्रमदानाची गरज आहे.
जरी जे इच्छुक असतील त्यांनी आपली नावे ह्या ग्रुपवर नोंदवावीत.
- दुर्गाभ्यास व गडसंवर्धन मोहिम,पुणे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...