सरदार त्रिंबकजी डेंगळे-------------2
लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
1802 च्या वसई तहामुळे पेशव्यांच्या कारभारावर इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. मराठी राज्यात झालेला इंग्रजांचा हस्तक्षेप त्रिंबकजीला पहावत नसे. त्याने सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालवले. शिंदे,होळकर,भोसले,पेंढारी यांच्याकडे आपले वकील रवाना केले. फौजेची जमवाजमव सुरू केली. 1814 ला त्रिंबकजी अहमदाबादचा सुभेदार झाला. पुढे सदाशिवभाऊ माणकेश्वर यांच्या जागी त्रिंबकजी पेशव्यांचे कारभारी(Cheif Minister) झाले.
1814 साली बडोद्याहून गायकवाडांचे दिवान गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यात आले. गायकवाडांची पेशवे सरकारकडे पुष्कळ थकबाकी होती तसेच गुजरातेतील काही सुब्यांचा प्रश्न होता. वर्षभरापासून त्या वाटाघाटी चाललेल्या होत्या. गंगाधरशास्त्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतलेली होती.
1815 च्या जुलै महिन्यात पंढरपुरात गंगाधरशास्त्र्यांचा खून होतो. त्याचे आरोप इंग्रज त्रिंबकजीवर करतात. वास्तविक त्रिंबकजीला गंगाधरशास्त्र्यांचा खून करून काहीही फायदा होणार नव्हता.सुरुवातीपासूनच इंग्रजांविरुद्ध गायकवाडांना आपल्या बाजूने आणण्याचा त्रिंबकजी गंगाधरशास्त्र्यांमार्फत प्रयत्न करत होता. हे खून प्रकरण आजतागायत गूढ व अनाकलनीयच राहिले आहे. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीने केला नाही,असेच स्पष्ट होत आहे. परंतु आपल्या मार्गातील काटा काढण्याची इंग्रजांना ही आयतीच संधी मिळाली. इंग्रजांनी बाजीरावाकडे त्रिंबकजीची मागणी केली. प्रारंभी पेशव्यांनी त्यास कराड जवळील वसंतगडावर ठेवले परंतु त्यावरही इंग्रजांचे समाधान न होता त्यांनी त्रिंबकजीला आपल्याच हवाली करावे यासाठी बाजीरावावर दबाव आणण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 1815 ला त्रिंबकजीला इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवले. पुढे वर्षभराने 12 सप्टेंबर 1816 ला त्रिंबकजीने ठाणे तुरुंगातून पलायन केले. पुढे ते त्र्यंबकेश्वर व नाशिक भागात आले.
सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा (निमगावजाळी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर)
No comments:
Post a Comment