विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

* श्रीशिवछत्रपतींचे सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्या समाधीचा शोध-

* श्रीशिवछत्रपतींचे सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्या समाधीचा शोध-

postsaambhar :

Madhukar Hakke

श्रीशिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे देवकाते. जिवाजीराजे देवकाते पूर्वी आदिलशाहीत सरदार करीत असत पुढे ते छत्रपतींच्या स्वराज्य कार्यात सामील झाले. याच घराण्यातील शूर पराक्रमी सरदार सुभानजी देवकाते शिवछत्रपतींना समकालीन होते त्यांना बळवंतराव असा किताब होता. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर जे सरदार उपस्थित होते त्यामध्ये बळवंतराव देवकाते ही उपस्थित असल्याचे दिसून येते. शिवछत्रपतीकालीन प्रसिद्ध शिलेदार व मुलखीचे सुभेदार यांच्या यादीत सभासद बखरीमध्ये त्याचा संदर्भ लागतो. शंभू छत्रपतींच्या मृत्यूनंतर जिंजी येथे राजाराम छत्रपतींना ज्या सरदारांनी मदत केली त्यामध्ये सुभानजी बळवंतराव यांचेही योगदान होते संकटात सापडलेली स्वराज्य रुपी नौका पैलतीराला लावण्याच्या कामी या सरदारांनी असंख्य श्रमसाहस केले त्या सरदारांना छत्रपतींनी वतने, इनामे व सरंजाम देऊन गौरविले यामध्ये सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांना छत्रपतींनी कडेवळीत प्रांताच्या आठ महालातील( एकूण गावे ४५३) सरगौड म्हणजे सरपाटील हे वतन व नांदेड वऱ्हाडच्या भागात लष्कराच्या खर्चासाठी अनेक परगण्यांच्या चौथाईचे हक्क सरंजाम करून दिले तसेच काही गावेही इनाम करून दिली त्यामध्ये आताच्या बारामती तालुक्यातील कन्हेरी, सोनगाव इत्यादी तर पेडगाव महालातील कोंढार चिंचोली व मांडवगण महालातील कौढाणे या गावांचा समावेश होता.

सुभानजींचे बंधू मकाजींना हटकरराव असा किताब बहाल करण्यात आला. शंभुपुत्र शाहू छत्रपतींनीही देवकाते सरदारांचा सरंजाम इनाम व मरातब कायम राखला स्वराज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये देवकाते यांनी आपले योगदान दिले. खासकरून इसवी सन १७३४ मधील गोवळकोटच्या मोहिमेमध्ये या घराण्यातील काही पुरुष स्वराज्याच्या कामी धारातीर्थी पडल्याची नोंद छत्रपतींच्या रोजकीर्दीमध्ये आढळून येते. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन छत्रपतींनी त्यांना बारामती तालुक्यातील निरावागज हे गाव इनाम दिले होते. पेशवाईत या घराण्याला उतरती कळा लागली काही राजकीय कारणांनी या घराण्याचे सरंजाम महाल जप्त करण्यात आले व एका पराक्रमी सरदार घराण्याची मराठेशाहीच्या इतिहासातील इतिकर्तव्यता संपुष्टात आली.

पण शाहू छत्रपतींच्या काळापर्यंत स्वराज्यातील काही नामवंत पंधरा ते वीस सरंजामदार घराण्यांमध्ये या घराण्यांचा समावेश होता त्याचे दाखले पुणे पुराभिलेखागारातील शाहू छत्रपतींच्या दप्तरात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. आजच्या हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसणा हे गाव त्यांच्या सरंजामी सत्तेचे मुख्य केंद्र होते. या गावात त्यांच्या भव्य व प्रशस्त गढीचे अवशेष अद्याप पाहायला मिळतात गावाच्या पूर्वेला असलेल्या देवकाते घराण्याच्या छत्री बागेत सुभानजी बळवंतराव यांचे नातू चव्हाजी बळवंतराव व त्यानंतर या घराण्यात झालेल्या सर्व लहान-थोर वीर सरदारांच्या समाध्या स्थित आहेत मात्र चव्हाजींच्या पूर्वसुरींच्या समाध्या अद्याप अज्ञेय होत्या पैकी शिवछत्रपतींचे सहकारी असलेले त्यांचे आजोबा सुभानजी बळवंतराव यांची समाधी संतोष पिंगळे व सुमित लोखंडे या अभ्यासक मित्रांनी बारामती तालुक्याच्या कण्हेरी गावात नुकतीच शोधून काढलेली आहे.

समाधीचे पूर्ण बांधकाम हे घडीव काळ्या पाषाणामध्ये केलेले असून समाधीवर तत्कालीन स्थापत्यशैलीचा पूर्ण प्रभाव जाणवतो त्यातूनच समाधीच्या कळसाची रचना ही घुमटाकार होती मात्र अलीकडे गावकऱ्यांनी डोक्यावरील घुमट काढून त्या ठिकाणी मंदिराप्रमाणे कळसाची योजना केलेली आहे. जमिनीपासून साधारणपणे दोन तीन फूट उंचीच्या दगडी चिरेबंदी चौथऱ्यावर ती समाधी उभी आहे. या चौरसाकृती चौथऱ्याची लांबी साधारणपणे १५ ते १८ फुटा दरम्यान असावी तर समाधीची उंची जमिनीपासून अंदाजे तीस फुटांपर्यंत असावी या समाधीवरती काही ऐतिहासिक राजचिन्हे व एक शिलालेखही आढळून आला. समाधीच्या दर्शनी भागात सूर्य, चंद्र ,सप्तमातृका व गणपतीच्या प्रतिमा तर इतर बाजूस कमलचिन्हे कोरलेली आढळून आली.

इतिहासाबद्दल असलेल्या अज्ञानातून गावकऱ्यांनी समाधीचे महादेवाच्या मंदिरात रूपांतरण केलेले आहे. शिलालेखाच्या पहिली ओळीत "घुमट सुभानजी बळवंतराव" अशी अक्षरे स्पष्टपणे दिसून येतात पुढील ओळी व अक्षरे मात्र नष्ट झालेली आहेत, काही ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेता नोव्हेंबर १७०७ मध्ये सुभानजी बळवंतराव यांचा मृत्यू झालेला दिसून येतो कन्हेरी गाव त्यांच्या वतनी पाटीलकीचा व सरदारी इनामाचा गाव असल्याने बहुधा याच गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले असावेत ही समाधी त्याचीच तर साक्ष देत नसावी.

* माहिती साभार- मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे- 8169141554

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...