विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 19 July 2020

कोकणातील सागरी किनारे :







































































कोकणातील सागरी किनारे :
postsaambhar :Yogesh Bhorkar

कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.
कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे, खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत.
महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात.

१) डहाणू आणि बोर्डी किनारा :

डहाणू हे पालघर जिल्ह्यात वसलेले किनारी शहर आहे. डहाणूमधील मुख्य पर्यटक आकर्षण म्हणजे डहाणू-बोर्डी किनारा. हा प्रसिद्ध किनारा मुंबईपासून १४५ किमी वर आहे. त्याची लांबी १७ किमी आहे. डहाणू-बोर्डी किनारा चिकूसाठी प्रसिद्ध आहे. पारसी लोकांच्या दृष्टीने देखील हे एक महत्वाचे धार्मिक ठिकाण आहे.
बोर्डी हे ठिकाण डहाणूपासून अर्ध्या तासावर आहे. उन्हाळ्यात देखील संपूर्ण किनाऱ्यावर थंडगार वारे वाहात असतात.
डहाणू आणि बोर्डी किनाऱ्यासाठी नजिकचा विमानतळ मुंबई आहे, तर नजिकचे रेल्वे स्थानक डहाणू रोड आहे, जे मुंबईपासून अंदाजे तीन तासांच्या अंतरावर आहे.
मुंबई ते डहाणू अंतर १४० किमी
पुणे ते डहाणू अंतर २६५ किमी

२) तारकर्ली किनारा :

तारकर्ली किनारा म्हणजे एक अरुंद किनारपट्टी आहे जी कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे. हा किनारा पारदर्शक स्वच्छ पाण्यामुळे लोकप्रिय आहे. तारकर्ली किनाऱ्याला सिंधुदुर्गचा क्विन बिच असंही म्हणतात. तारकर्ली किनाऱ्यावर स्नोर्केलींग आणि स्कूबा डायव्हींगचा अनुभव देखील घेता येतो. मालवणी पदार्थांचा आस्वादही इथे घेता येतो जसे की माशांचे पदार्थ, कोंबडी-वडे. तारकर्ली किनाऱ्याला जाण्यासाठी नजिकचे बस स्थानक मालवण मालवण आहे व नजिकचे रेल्वेस्थानक कुडाळ आहे. इथेच सिंधुदुर्ग किल्ला आहे.
तारकर्ली येथे नदीच्या काठावरील संथ पाण्याचे निसर्गरम्य सौंदर्य हे कल्पनाशक्तीच्या पलिकडील आहे. सुंदर व्हर्जिन किनारे समृद्ध हिरव्या झाडांनी वेढले गेले आहेत. ताजी थंड हवा तुमच्या अवती भवति वाहत असते. प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या चिंता विसरून जाण्यास मदत करेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला वेळ द्याल.
तारकर्ली आणि कुडाळ यांच्या दरम्यान असलेल्या कर्ली नदीच्या काठावरील संथ पाणी हे महाराष्ट्रातील सुट्टीतील स्टार आकर्षण आहे. २००३ साली एमटीडीसीने केरळ हाउसबोट सारख्या हाउसबोट सुरु केल्या आणि त्यामुळे तारकर्ली पर्यटनात सोन्याची पिसे जोडली गेली आहेत. कर्ली नदीतील हाउसबोट प्रवास हे आता अव्दितिय आकर्षण बनले आहे. तारकर्ली मध्ये आता हाउसबोट सुरु झाल्यामुळे पर्यटक केरळ सारखे रात्रभर हाउसबोटचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही बोट भाड्याने घेऊन देवबागपासून कर्ली नदीत समुद्रपर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
बोट सुरू झाल्यावर, हाताचे तळवे नदीच्या आतपर्यंत दोन्ही बाजूंच्या दिशांनी हलवून आनंद लुटू शकता. तारकर्ली समुद्रकिनारा याला स्वच्छ पाण्याचा आशीर्वाद लाभल्यामुळे तारकर्ली हि स्कुबा डायविंग साठी एक उत्तम जागा आहे. तारकर्ली मध्ये सिंधुदुर्ग किल्ला परिसर हे स्कुबा डायविंग साठी एक प्रमुख जागा आहे.
देशात खूप कमी ठिकाणी तुम्ही स्कुबा डायविंगचा आनंद लुटू शकता त्यापैकी तारकर्ली हे एक आहे . तारकर्ली मध्ये स्कुबा डायविंग सुरु करण्यामागे सागरी जीवशास्त्रज्ञ श्री सारंग कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी सर्वोत उत्तम हंगाम म्हणजे नोव्हेंबर ते मे महिना. ज्यांना अगदी पोहणे सुद्धा माहीत नाही त्यांना सुद्धा तारकर्ली मध्ये स्कुबा डायविंग शक्य झाले आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक सतत तुमचा हात पकडून तुमच्याबरोबर पाण्याखाली असतात.
तारकर्ली मध्ये सुरुवातीला फक्त स्नॉर्कलिंग माहित होते, नंतर मात्र स्कुबा डायविंग सुरू करण्यात आले. तारकर्ली मध्ये अशा काही जागा आहेत कि त्या स्नॉर्कलिंग साठी आदर्श जागा ओळखले जातात - सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग संगम आणि वेंगुर्ला खडक इत्यादी.
स्कुबा डायविंग साठी पाणबुडयाला सोबत एक ऑक्सिजन सिलेंडर घ्यावा लागतो. सिलेंडर डाईव पाणबुडयाला जास्त स्वातंत्र्य देतात आणि व्यावसायिक डाईव पेक्षा जास्त खोल साध्य करण्यासाठी देखील पाणबुडयाला मदत करतात.

सिंधुदुर्ग किल्ला : सिंधुदुर्ग किल्ला समुद्रातील कुरटे बेटावर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४-६७ मध्ये तो बांधला. हा किल्ला बांधण्यासाठी ३००० कारागीर तीन वर्षे अहोरात्र झटत होते. उत्तम जतन केलेल्या अवस्थेतील हा एक किल्ला आहे. ४८ एकरांमध्ये तो पसरला असून अरबी समुद्रात त्याची उभारणी केली आहे. आतमध्ये तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्यात शिवराजेश्वर मंदीर आहे.

३) चिवला किनारा :

चिवला किनारा हा सी आकारात २ किलोमीटर पसरलेला किनारा आहे. येथे शुभ्र आणि स्वच्छ पाणी आहे. हा अत्यंत शांत आणि स्वच्छ किनारा आहे.

४) तोंडवळी किनारा :

तोंडवळी किनारा हा मऊ शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्र किनारा आहे. तो मालवणच्या उत्तरेला १९ किमी वर आहे. तोंडवळी किनाऱ्यावर बहुधा फारशी वर्दळ नसते परंतु इथे मंद समुद्री हवा सतत वाहात असते, त्यामुळं वातावरण तजेलदार असते.

५) अलिबाग किनारा :

हा शहराचा मुख्य किनारा आहे. इथे नारळाची असंख्य झाडे, समुद्राच्या वाऱ्यावर झुलत असतात. अलिबाग किनाऱ्यावर गडद काळ्या रंगाची वाळू आहे. अलिबाग किनाऱ्यावरुन १-२ किलोमीटर आत असलेल्या कुलाबा किल्ल्यावर चालत जाता येते.
अलिबाग किनाऱ्यावर कसे पोहोचाल
आपण मुंबईहून एस.टी. बसने अलिबागला जाऊ शकता. मुंबई ते अलिबाग दररोज ३५-४० एस.टी. बसेस धावतात. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मुंबई सेंट्रल बस स्थानकावरून उपलब्ध आहेत..
कार किंवा मुंबई ते टॅक्सी. अलिबाग मुंबई गोवा मार्ग आहे.
आपण मुंबईहून अलिबागला समुद्रमार्गे जाऊ शकता. गेटवे ऑफ इंडीयापासून लाँच सेवा उपलब्ध आहे.

६) वरसोली किनारा :

हा किनारा अलिबागच्या अगदी लगत स्थित आहे. चमकदार शुभ्र वाळू आणि स्वच्छ समुद्राचे पाणी ही खास वैशीष्टये. किनाऱ्यावर नारळाची आणि सुरुची सुंदर झाडे आहेत.
मुंबईच्या गेट वे आॉफ इंडिया वरून समुद्रमार्गाने मांडवाला गेल्यावर वरसोली मांडवापासून १४ किमी अंतरावरआहे.

७) किहीम किनारा :

किहीम किनारा हा अलिबाग भोवतीच्या सर्वोत्तम किनाऱ्यांपैकी एक आहे. सौंदर्य आणि विकास, निरव शांतता आणि दरवळ यांचं अचूक मिश्रण असलेला हा एक अद्भुत किनारा आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची गर्द झाडी आहे. निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडेल कारण इथे दुर्मिळ फुलपाखरं, पक्षी आणि फुलं देखील पाहायला मिळतात.
मुंबईच्या गेट वे आॉफ इंडिया वरून समुद्रमार्गाने मांडवाला गेल्यावर किहीम मांडवापासून १४ किमी आहे.

८) काशीद किनारा :

काशीद समुद्र किनारा स्वच्छ आणि सर्वात सुंदर आहे, येथे शृभ्र वाळू आहे, या किनाऱ्यात आपण जल क्रीडा सुविधाचा आनंद घेऊ शकता. काशीद किनारा शृभ्र वाळू, निळा समुद्र हिरव्या पर्वतरांगा आणि भाताची शेती साठी प्रसिद्ध आहे.
मुंबईच्या गेट वे आॉफ इंडिया वरून समुद्रमार्गाने मांडवाला गेल्यावर काशीद मांडवापासून ३२ किमी अंतरावरआहे.

९) हरिहरेश्वर किनारा :

हरिहरेश्वर किनारा हा मंदीर आणि आसपासच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखतात. हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी असलेल्या टेकडीला हरिहर किंवा पुष्पाद्री असे देखील म्हणतात. या मंदीरात ब्रह्मा – विष्णू – महेश आणि देवी पार्वतीच्या मूर्ती आहेत. परिसरात श्री कालभैरव आणि श्री योगेश्वरीची मंदीरं आहेत.
हरिहरेश्वर किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटींग, सेलींग, पोहणे, बीच व्हॉली बॉल आणि बीच वॉकींग टूर्स अशा अतिशय लोकप्रिय सुविधा उपलब्ध आहेत. हरिहरेश्वर किनारा मुंबईपासून सुमारे २०० किमी वर आहे.
हरिहरेश्वरच्या नजिकचे रेल्वे स्थानक माणगाव आहे, जे हरिहरेश्वरपासून ६५ किमी वर आहे.

१०) श्रीवर्धन किनारा :

हा एक छान आणि स्वच्छ किनारा आहे. या किनाऱ्यावर प्रदूषणरहित हवा आणि सुंदर निळा समुद्र असं वातावरण आहे. पुण्यापासून जवळ असलेले व एकमेकांपासून अंदाजे १५ किमीच्या अंतरावर तीन उत्तम किनारे आहेत – श्रीवर्धन – हरिहरेश्वर – दिवेआगर. हा किनारा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक आहे.
श्रीवर्धन किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून सहजपणे जाता येते. श्रीवर्धन किनाऱ्यावर बोटींग, सेलींग, पोहणे, बिच व्हॉली बॉल आणि बिच वॉकींग हे असे उपक्रम आहेत.
श्रीवर्धन किनाऱ्याच्या नजिकचे रेल्वे स्थानक माणगाव आहे, जे श्रीवर्धनपासून ४५ किमी अंतरावर आहे.

११) दिवेआगर किनारा :

दिवेआगर किनारा सहा किलोमीटर लांब असून इथे शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी आहे. समुद्री पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या किनाऱ्याच्या भोवती सुरूची झाडे आहेत. दिवेआगर श्रीवर्धनपासून अंदाजे ५ किमी वर आहे. गावातील एका बागेत सोन्याची गणपतीची मूर्ती सापडल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
दिवेआगारच्या नजिकचे रेल्वे स्थानक माणगावच आहे.

१२) गणपतीपुळे किनारा आणि गणेश मंदीर :

कोकणातील हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. गणपती पुळ्याचा समुद्र किनारा आणि ४०० वर्षे जुने स्वयंभू गणपती मंदीर ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. रत्नागिरी हे नजिकचे रेल्वे स्थानक आहे.
गणपतीपुळे इथे गौरी गणपती आणि माघ चतुर्थी हे सर्वात महत्वाचे सण आहेत. आंबा पोळी आणि फणस पोळी ही इथली खास उत्पादने आहेत.
गणपती पुळ्याच्या नजिकचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे व नजिकचे विमानतळ मुंबई आहे.

मुंबई ते गणपतीपुळे अंतर ३७५ किमी
पुणे ते गणपतीपुळे अंतर ३३१ किमी
रत्नागिरी ते गणपतीपुळे अंतर ५७ किमी
मुंबई ते रत्नागिरी अंतर ३४० किमी
पुणे ते रत्नागिरी अंतर २९० किमी
गोवा ते रत्नागिरी अंतर २५६ किमी
चिपळूण ते रत्नागिरी अंतर १०६ किमी

रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी किल्ला : रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला असेही नाव आहे. तीन बाजूंनी अरबी समुद्राने तो वेढलेला आहे आणि घोड्याच्या नालेसारखा त्याचा आकार आहे. पर्यटकांसाठी इथलं सुंदर भगवती मंदीर हे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याजवळ लाईटहाऊस आहे, इथून रत्नागिरी शहर आणि अरबी समुद्राचा सुंदर देखावा दिसतो.

१३) आंजर्ले किनारा, दापोली :

दापोलीपासून आंजर्ले बीच १४ कि.मी. अंतरावर आहे. येथील समुद्र स्वच्छ असून येथे शृभ्र वाळू आहे, तसेच येथे किनाऱ्यावर गर्द झाडी आहे. 'कड्यावरचा गणपती' याकरिता आंजर्ले हे प्रसिद्ध आहे (एका उंच कड्यावर गणेश मंदिर आहे).
अंजर्ले येथे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रस्त्याने जाणे.

१४) मिठबाव किनारा :

मिठबाव किनारा हा देवगड तालुक्यात मिठबाव गावाजवळ आहे. हा पांढऱ्या वाळूचा आणि स्वच्छ निळा समुद्र असलेला किनारा आहे. पोहण्यासाठी मिठबाव किनारा अतिशय उत्तम समजला जातो. येथील सृष्टि सौंदर्य देखील अनुपम आहे
मिठाबाब किनाऱ्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन कनकवली आहे.

विजयदुर्ग किल्ला, देवगड :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेला हा सर्वात जुना किल्ला आहे. राजा भोज यांनी १२०५ मध्ये तो बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून १६५३ मध्ये तो जिंकला आणि विजयदुर्ग असे त्याचे नामकरण केले.
या किल्ल्याच्या नजिकचे बस स्थानक देवगड व रेल्वे स्थानक कनकवली आहे.

कुणकेश्वर मंदीर, देवगड :

कुणकेश्वर मंदीर एक प्राचीन शिव मंदीर आहे जे कुणकेश्वर गावात स्थित आहे. या मंदिराभोवती एक लांबलचक शृभ्र वाळूचा समुद्र किनारा आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणूनही हे मंदीर प्रख्यात आहे. तुम्ही किनाऱ्यावर स्वच्छ पाण्यात अंघोळ करू शकता आणि खोल समुद्रात तुम्हाला डॉल्फीन्सचं देखील दर्शन घडू शकतं. या किनाऱ्याची एक बाजू नारळ आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेली आहे.
कुणकेश्वर मंदिराच्या नजिकचे बस स्थानक देवगड रेल्वे स्थानक कनकवली आहे.

विमलेश्वर मंदीर, वाडा :

विमलेश्वर हे पांडवकाली महादेवाचे मंदीर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पाच कोरीव प्रतिमा व हत्तीची दोन शिल्पे आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...