विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

महाराष्ट्रा मधली हस्तकला व हस्तव्यवसाय:




















महाराष्ट्रा मधली हस्तकला व हस्तव्यवसाय:
postsaambhar :Yogesh Bhorkar

हस्तव्यवसाय : महाराष्ट्रात ठिकठिकाणी केलेल्या उत्खननांतून सापडलेले अवशेष,संस्कृत-प्राकृत साहित्यातील निर्देश,तसेच प्राचीन लेण्यांमधील मूर्तिशिल्पांचे अलंकार व वेशभूषा यांतून महाराष्ट्राच्या हस्तकलांची दीर्घ परंपरा लक्षात येते. नासिक,जोर्वे,नेवासे,चांडोली,सोनगाव,इनामगाव,दायमाबाद,प्रकाशे,सावळदे,बहुरूपे,व बहाळ येथील पुरातत्त्वीय उत्खननांवरून तेथील प्राचीन वसाहतीमधील हस्तोद्योगांची कल्पना येऊ शकते. उदा., जोर्वे-नेवासे येथील ताम्रपाषाणकालीन मातीची भांडी ही त्यांची उत्कृष्ट घडण,पातळ पोत,भट्टीची भाजणी,भौमितिक रेखांकन,तांबूस छटा व खणखणीत आवाज यांमुळे वैशिष्टयपूर्ण वाटतात. त्यांवरील धावते श्वान व बागडणारे हरिण यांची चित्रे म्हणजे तर तत्कालीन कलापूर्ण आविष्कारच ठरतो.

नागपूरच्या पंचक्रोशीतील जुनापाणी येथील उत्खननात सापडलेले तांबड्या पार्श्र्वभूमीवरील श्र्वेतरंगी नक्षीचे,रक्तरंगी (कार्नेलियम) मणी, चकतीच्या आकारांचे सुवर्णमणी व वळी, काळी-तांबडी अभ्रकयुक्त मृदापात्रे,तोटीयुक्त काळा वाडगा,तांब्याचे वाळे,लोहलोलक,ताम्रघंटा माहूरझरीची सोन्याच्या तारेची चक्राकृती कर्णफुले,घोड्याच्या पाठीवरील ताम्रपत्र्याचा साज व मणी टाकळघाटची काळी-तांबडी वाडगी,थाळ्या,अभ्रकयुक्त मृदाघट,कळशा,पराती,लोटे,लोखंडी भाले,खंजीर,बाणाची टोके,तांब्याच्या बांगड्या,रंगीबेरंगी मण्यांचे अलंकार आणि खापा येथील शीर्षभागी दोन पक्षी असलेली तांब्याची गोल झाकणी व ताम्रपत्र्याचा अश्वमुखालंकार वर्धा जिल्ह्यातील पवनार व अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथील रेखांकित काळ्यातांबड्या खापऱ्या,लोखंडी आयुधे,शुभ्र पाषाणमणी,अभ्रकयुक्त रंगीत मृदापात्रे आणि खानदेशामधील रंजाळे येथील वाडगे,निमुळत्या बुडाची भांडी,बैठका (स्टँड) इ. नानाविध वस्तूंवरून त्या काळातील हस्तोद्योग विविध प्रकारचे व प्रगत असल्याचे दिसते.

सातवाहनकालीन संस्कृतीचे अवशेष,तर महाराष्ट्रातील बहुसंख्य स्थळांच्या उत्खननात सापडले आहेत. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील कराड – कोल्हापूर,पश्र्चिम महाराष्ट्रातील नासिक – नेवासे व नालासोपारा,खानदेशातील प्रकाशे व वहाळ मराठवाड्यातील तेर व पैठण आणि विदर्भातील कौंडिण्यपूर,पवनार व पवनी येथील उत्खननात सापडलेल्या लांबरूंद विटा,छिद्रयुक्त चौकोनी कौले, कलापूर्ण रांजण,माती-विटांची चूल,लांबचौकोनी व चार पायांचे दगडी पाटे, मासे पकडण्याचा लोखंडी गळ आणि घागरी,माठ,गाडगी,मडकी,वाडगा, सानक, परात इ. मातीची काळी-तांबडी भांडी हे याचे पुरावे होत. दायमाबाद (खानदेश) येथील उत्खननात सापडलेला दोन बैलांचा रथ, हत्ती,रेडा,रायनो इत्यादींच्या ओतीव प्रतिमा उल्लेखनीय आहेत. त्या वस्तूंना चाके असल्यामुळे ती खेळणी असावीत असाही अभ्यासकांचा दावा आहे. ही तत्कालीन विकसित हस्तव्यवसायाचीच प्रतीके होत.

त्या काळात कर्णभूषणे,मणिमाला,कंकणे व अंगठ्या यांसारखे अलंकार तसेच ताईत वा चक्राकार कुंडले यांचाही वापर रूढ असल्याचे दिसते. नीलाष्म किंवा लाजवर्दी या मूल्यवान दगडाच्या चपट्या व काटकोनी मण्यांबरोबर साध्या आणि बारीक मण्यांचे तीन सर ओवून फलकहार तयार करण्यात येई तर गोमेद,अकीक,प्रवाळ,गार, स्फटिक, सूर्यकांत व बिलोरी दगडांपासूनही मणी तयार करण्यात येत. त्यातही रंगाने काळे,निळे,हिरवे,लाल,पांढरे आणि आकाराने चपटे,गोल,त्रिकोणी व दुकोनी मणी वापरून त्यांच्या मणिमाला व अलंकार जडविण्याची प्रथा होती. लाखेच्या मण्यावर सोन्याचे पाणी देणे वा वर्ख चिकटविणे,तसेच दोन मण्यांच्या मधोमध सुवर्णपत्राचा वापर करून खऱ्याखुऱ्या सुवर्णमण्याचा आभास निर्माण करण्याची तत्कालीन किमया उल्लेखनीय आहे. ताईतामध्ये प्रायः खंजीर,सिंह,कासव,वाघनखे इत्यादींच्या प्रतिमा आढळून येतात तर कंकणे कोरीव नक्षीची व बहुधा शंखाची वा हस्तिदंताची असत. अशा कंकणांचे नमुने प्रकाशे (खानदेश) येथे आढळले आहेत. काचेच्या बांगड्या लाल,निळ्या,पिवळ्या,हिरव्या किंवा संमिश्र रंगाच्या असून क्वचित त्यांवर विविधरंगी ठिपके दिसून येतात.

सौंदर्यप्रसाधने व डोळ्यात काजळ वा सुरमा घालण्यासाठी हस्तिदंती किंवा अस्थींच्या विविध प्रकारच्या शलाका त्याकाळी प्रचलित होत्या तर अंग घासण्यासाठी बारीक छिद्रे असलेल्या किंवा रेघा ओढलेल्या मातीच्या वा तांब्याच्या गोल किंवा चौकोनी वजऱ्या वापरात होत्या. केस विंचरण्यासाठी हस्तिदंती फण्या वापरल्या जात. काळ्या,निळ्या,हिरव्या,लाल अशा एकरंगी वा बहुरंगी काचेच्या व क्वचित शंखाच्या वा हस्तिदंताच्या अंगठ्याही वापरण्याची प्रथा होती. तेर येथील उत्खननात सापडलेली श्रीदेवीची मूर्ती एखाद्या आरशाची मूठ असावी असे काही अभ्यासकांचे मत आहे. [⟶ पुरातत्त्वीय अवशेष पुरातत्त्वीय उत्खनने].

मराठेशाहीतील पुण्याचा शनवारवाडा व विश्रामबागवाडा नासिकचा सरकारवाडा,कोपरगावचा रघुनाथराव पेशवेवाडा,सातारचा राजवाडा किंवा मेणवलीचा नाना फडणिसांचा वाडा येथील यांतील काष्ठकाम उत्कृष्ट कारागिरीची साक्ष देतात. वाड्यांचे स्तंभ,हस्त,तुला छत,दरवाजे व त्यांवरील चौकटी आणि वास्तूचा दर्शनी भाग इत्यादींच्या सुशोभनासाठी कोरीव काष्ठकामाचाच वापर त्याकाळी प्राधान्याने करण्यात येई. या काष्ठकामात हिंदुस्थानी व गुजराती अशा दोन शैली उपयोगात आणीत. प्रायः ठळक गुजराती शैलीने चौकोनी खांब,त्यांचे हस्त,दारे व चौकटी सुशोभित करण्यात येत तर सुरूचे खांब,त्यावरील त्रिदली व कमानी आणि छतावरील नाजूक जोडकामात हिंदुस्थानी शैलीचा आविष्कार करीत. नागपूरच्या लाकडी चित्र-चौकटी प्रसिद्ध असून त्या सालईच्या लाकडापासून तयार होतात. नागपूर हेच अशा चित्र-चौकटीनिर्मितीचे भारतातील एकमेव केंद्र आहे. [⟶लाकडी कलाकाम].

ठुशीसारखा दागिना किंवा ⇨पैठणीसारखे वस्त्र यांसारख्या मराठमोळ्या कलाप्रकारांबरोबरच मुसलमानी अमदानीत ⇨हिमरू, ⇨बीदरचे कलाकाम व ⇨मीनाकारी यांसारख्या इस्लामी कला-प्रकारांची येथील हस्तव्यवसायांत भर पडली. पेशवाईच्या काळात उत्तम व भारी पीतांबरासाठी येवल्याची जशी ख्याती होती,तशी महेश्वर,नागपूर,सोलापूर,बऱ्हाणपूर (सध्या मध्य प्रदेशात), जालना,खंबायत (सध्या गुजरात) आणि शाहपूर या पेशव्यांच्या वर्चस्वाखालील गावांची वस्त्रोद्योगासाठी विशेष प्रसिद्धी होती. ब्रिटिश काळात मात्र सर्व कापडधंदा उत्तरोत्तर बसत गेला.

महाराष्ट्रातील दौलताबाद व जुन्नर ही पूर्वीची उत्तम हातकागदनिर्मितीची केंद्रे होती. इतरही ठिकाणी हातकागद तयार होत असे परंतु अठराव्या शतकाच्या अखेरीपासून इंग्लंडमधील पांढरा शुभ्र,गुळगुळीत व हलकाफुलका कागद येथील बाजारपेठांत स्वस्त किंमतीत विकला जाऊ लागला आणि महाराष्ट्रातील हातकागद उद्योगही बंद पडला,इंग्रजांनी येथील बाजारपेठांत कुलुपे, मेणबत्त्या व काचेच्या वस्तू आणल्या तर चहा,तपकीर,सुगं धी उटणी,चिनी बाहुल्या,चाकू,सुऱ्या,रूंद पात्याच्या तलवारी,दुर्बिणी,चष्मे,पिस्तूल,बं दुका आणि तोफा इ. पोर्तुगीजांनी आणल्या,परिणामी स्थानिक कारागिरांच्या वस्तूला उठाव राहिला नाही. समाधानाची बाब एवढीच की, स्थानिक पातळीवर चालणारे व दैंनदिन जीवनातील आवश्यक वस्तूंची निर्मिती करणारे कुंभार, लोहार, सुतार,सोनार,चांभार,तांबट,बुरूड,जिनगर, कोष्टी व तत्सम अन्य कारागीरकुटुंबे कसातरी तग धरून होती व त्यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कारागिरी टिकून होती.

स्वातंत्र्योत्तर काळात मात्र शासनाच्या उदार धोरणामुळे येथील हस्तव्यवसायाचे पुनरूज्जीवन घडून येत आहे. बऱ्याच हस्तव्यवसायांची सहकारी तत्त्वावर पुनर्रचना करण्यात आली. अनेक सहकारी संस्थांना शासनाकडून आर्थिक,तांत्रिक व इतर प्रकारचे साहाय्य मिळू लागले. सध्या महाराष्ट्रात जे हस्तव्यवसाय सुरू आहेत त्यांचे वर्गीकरण स्थूलमानाने खालीलप्रमाणे करता येईल : (१) जरीकाम, (२) हिमरूकाम, (३) भरतकाम, (४) सोनारकाम, (५) तांबटकाम, (६) चर्मकाम, (७) लाखकाम, (८) बुरूडकाम, (९) मणिकाम, (१०) कुंभारकाम, (११) वाखकाम, (१२) खडीकाम, (१३) मूर्तिकाम, (१४) वाद्यनिर्मिती. (१५) बाहुल्या-खेळण्यांची निर्मिती, (१६) भित्तिशोभितांची निर्मिती व (१७) लोकचित्रकला इत्यादी.

वरीलपैकी बऱ्याच हस्तव्यवसायांना दीर्घ परंपरा आहे. उदा., पैठणी. जरीकाम अर्थात ⇨किनखाब याचा एक अतिशय कलात्मक व संपन्न नमुना म्हणजे पैठणी होय,जरीकामाचाच दुसरा प्रकार म्हणजे हिमरूकाम होय. मोगल अमदानीत हिमरू कलाप्रकार औरंगाबादला आला आणि तेथेच तो स्थिर झाला. ⇨मश्रू हा हिमरूचाच एक उपप्रकार असून त्याचा वापर मोगलकाळापासून सर्रास चालू आहे.

याखेरीज सोलापुरी चादरी आणि अभ्रे ही सुती विणकामाची,तर उमरेडची (विदर्भ) करवतीकाठी (रेशीमकाठी) व जरीकाठी धोतरे-उपरणी नागपूर, इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव व नासिक इ. केंद्रांतील साड्या हेही प्रकार रेशीम व जर यांच्या विणकामाची साक्ष देतात. पाश्चिमात्य पद्धतीने भरतकाम केलेली वस्त्रेही अलीकडे निघू लागली आहेत विशेषतः सिंधी जमातीच्या साहचर्याने या भरतकामाला बराच वाव मिळाला. भिंगे लावून भरतकाम केलेले अभ्रे,खोळी, चहादाणीवरील आच्छादने,चादरी वा मेजावरील आच्छादने अशा विविध वस्तू ठिकठिकाणी तयार होऊ लागल्या असून त्यांचे प्रमाणही विपुल आहे. मुंबई,पुणे,जळगाव,अहमदनगर,नागपूर,वर्धा व कोल्हापूरच्या परिसरात हे भरतकाम विशेषत्वाने होत असल्याचे दिसून येते.

चांदीच्या भांड्यांनाही महाराष्ट्रात बरीच दीर्घ परंपरा लाभलेली आहे. मराठेशाहीत नासिक येथे चांदीच्या भांड्यांची निर्मिती विपुल प्रमाणात होई. यांमध्ये प्रायः पूजेची उपकरणे, देवदेवतांच्या मूर्ती व टाक,कुंकवाचे करंडे,पानदान,गुलाबदाण्या,अत्तरदाण्या,कलात्मक वाट्या,थाळ्या,तबके,मयूर व हत्तीच्या आकाराची उदबत्तीची घरे इत्यादींचा अंतर्भाव होतो. कोल्हापूरलाही याच पद्धतीची चांदीची तयार होणाऱ्या भांड्यांवर इस्लामी शैलीचा प्रभाव पडला व तेथे बिदरीकामयुक्त अशी चांदी व अन्य धातूंची भांडी तयार होऊ लागली. कलात्मक भांडी तयार करणारे कारागीर होते. मात्र औरंगाबादला त्यांत बहुधा भिंतीवरील अलंकृत ताटल्या,थाळ्या,वेधक अशा प्रतिकात्मक चित्राकृती,भुकटी-मंजुषा,रक्षापात्रे,कागद कापावयाच्या सुऱ्या, अंगठ्या,बांगड्या,साडीवर लावावयाचे मोठे चाप व मनगटी गुंड्या असे नाना प्रकार येतात.

सोन्याचांदीचे दागिने घडविण्यात कोल्हापूर पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. आजही कोल्हापूरी साज प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. कोल्हापूरच्या पंचक्रोशीतील हुपरी येथे या कारागिरांची चारशेहून अधिक निर्मिती केंद्रे असून गावासन्निध अतिरिक्त अशी अडीचशे निवासी-नि-निर्मिती- केंद्रे वाढविण्याची योजना आहे. त्याशिवाय सु. तीन हजार पुरूष व एक हजार महिला आपल्या रिकाम्या वेळात गृहोद्योग म्हणूनही चांदीचे दागिने घडवीत असतातच. गळसरी, बाळ्या,बाजूबंद, केसाचे चाप,मनगटी साखळ्या, अंगठ्या,किल्ल्या अडकवण्याच्या साखळ्या वगैरे वस्तू कलात्मकतेने परिपूर्ण असतात. काही दागिन्यांवर चांदी उद्योग सहकारी संघ मर्यादित हीसंस्था सोन्याचा मुलामा देण्याचे कामकरते.

तांबटकामासाठीनासिक,अंबरनाथ, ठाणे,कल्याण हीकेंद्रे महत्त्वाची आहेत. येथे परंपरागत पद्धतीने लहान-मोठी भांडी आणिकलापूर्ण असे दीपा-धार तसेच हंड्या-झुंबरांचे आधार(स्टँड),रक्षापात्रे, फुलपात्रांचे आधार, कागद कापण्याच्या सुऱ्या,टाचणी-घरे, तबके अशा विविध नक्षीच्या वस्तू तयार होतात. पितळेची भांडीदेखील जुन्या-नव्या पद्धतीने तयार करण्यात येत असून ती घाटदार असतात. नासिक व भंडारा ही या दृष्टीने महाराष्ट्राची महत्त्वाची निर्मितिकेंद्रे आहेत. नासिक-ओझर येथे तीन-चार मोठे कारखाने असून भंडारा येथील कासार हा धंदा पुरातन काळापासून करीत आहेत. ‘भाण’ याचा अर्थ भांडे. म्हणून भांडे तयार करणारे गाव ते भाणारा &gt भंडारा होय. येथे काही मोठे व अनेक लहान कारखाने असून त्यांत सु. दहा हजारांच्या वर मजूर काम करीत आहेत. दर दिवसाला या कारखान्यामधून सु. १,००० गुंड (हंडे) व इतर लहान-मोठ्या भांड्याचे उत्पादन होत असून मध्य प्रदेश,खानदेश,विदर्भ व बंगाल या प्रदेशात त्यांची विक्री होते. भारतीय हस्तव्यवसाय मंडळाने तयार केलेल्या नमुन्याप्रमाणे अलंकृत मुठी,किल्ल्यांच्या साखळ्या,मनगटी गुंड्या,त्रिमूर्ती इ. शोभेच्या अनेक वस्तूही परदेशी पर्यटकांसाठी येथे तयार होत असून त्यांची निर्यातही करण्यात येते. जळगाव व भुसावळ येथे मात्र सर्वसाधारणतः स्वयंपाकाची भांडी,तपेल्या व पेले या वस्तू तयार होतात.

महाराष्ट्रातील कुंभारकामही परंपरागत असून गावोगावी गाडगी, मडकी,रांजण,माठ,परळ,सुरया व दिवल्या यांसारख्या लहा-नमोठ्या मातीच्या वस्तू तयार करण्यात येतात परंतु पुणे, मुंबई,तळेगाव,ओगलेवाडी व भद्रावती येथील मृत्पात्रे कलापूर्ण असून त्यात वैविध्यही आढळते. मुंबईसारख्या ठिकाणी कुंभारांच्या सहकारी संस्थामध्ये नक्षीदार सुरया,गाळणीयुक्त पीप,गोमुखी खुजा,दांडीची जलपात्रे,चित्रयुक्त पुष्पपात्रे,अलंकृत दीपमाळा आणि फळफळावळांच्या थाळ्या-करंड्या अशा नाविन्यपूर्ण सुशोभित वस्तू तयार करतात. [⟶दिवे].

चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी,इसापूर,बल्लारपूर (बल्लारशा),जुनरा व भद्रावती (भांदक) या गावी चिनीमातीचे मुबलक साठे सापडल्यामुळे कौले,नळ (चिनीमातीचे पाईप),कपबशा,बरण्या यांसारख्या वस्तूंची निर्मिती होऊ लागली आहे. भद्रावती येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांनी स्थानिक कुंभारांना हाताशी धरले व ऑगस्ट १९५५ मध्ये ग्रामोदय संघाची स्थापना करून त्यांना प्रशिक्षित करणारा दहा महिन्यांचा शिक्षणक्रम सुरू केला. येथे भारतीय कलाकारागिरीचा आविष्कार करणारी ही विविध आकारांची मृदापात्रे नव्या तंत्राने बनविली जातात. ती परदेशातही लोकप्रिय ठरली आहेत. भांदक सिरॅमिक सहकार संस्था ही तर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी चमकदार चिनी मातीची भांडी (ग्लेजड पॉटरी) तयार करणारी संस्था मानण्यात येते. या संस्थेच्या श्वेत भांडी (व्हाईट वेअर) विभागातील भांडी अत्यंत दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीची समजली जातात. घारेपेठ गावीही अशीच भांडी तयार होत असून मंगलोरी कौलेही तयार करण्यात येतात.

महाराष्ट्रातील लाखकामाचे (लाखटलेल्या कामाचे) सर्वांत मोठे केंद्र म्हणजे सावंतवाडी होय. लाखकामाचे दोन प्रकार असतात. एक कातारी व दुसरे चितारी पद्धतीचे. सावंतवाडीत पूर्वीपासूनच या दोन्ही पद्धतींचे लाखकाम होत असे. अलीकडे येथे केळी,संत्री,लिंबू,द्राक्षे,सीताफळ,रामफळ वा तत्सम अनेक प्रकारची रंगीबेरंगी फळे व सावंतवाडी पद्धतीची नक्षी-चित्रे असलेल्या आधुनिक फर्निचर-वस्तू तयार करण्यात येत असून येथे त्याची आठ केंद्रे आहेत. येथील लाखकाम केलेली लाकडी फळे व खुंट्या वैविध्यपूर्ण असून पुष्पपात्रे,दीपाधार,खेळणी, बाहुल्या इ. इतर वस्तूंचे दरवर्षी सु. ६ लाख रूपयांचे उत्पादन होते. पूर्वी सावंतवाडीच्या रंगीत दशावतारी गोलाकार ⇨ गंजीफा आणि मुसलमानी आयता कृती गंजीफा फार लोकप्रिय होत्या. [⟶ पत्ते व पत्त्यांचे खेळ)

चर्मकलाकामात कोल्हापूरचा अग्रक्रम लागतो. कोल्हापुरी चपला जगप्रसिद्ध असून परदेशातही त्यांची निर्यात होते. सु. ७०० ते८०० कुटुंबे या कुटिरोद्योगामध्ये गुंतलेली असून परंपरागत पद्धतीने ते या चपलांचे जोड तयार करीत असतात. चंद्रपूरची ख्याती मात्र सांबराच्या कातड्याच्या जोड्यांसाठी आहे. एकेकाळी मुंबईच्या पंचक्रोशीतील कारागिरांची प्रसिद्धी व्यापारी खातेवहीच्या पुस्तिकांना लावण्यात येणाऱ्या आवेष्टनावरील कोरीवकामासाठी होती.

महाराष्ट्रातील बुरूडकामाचे क्षेत्र म्हणजे ग्रामीण भाग. परंपरागत व रोजच्या व्यवहारांतील वस्तू उदा., सूप,टोपल्या,लहानमोठ्या परड्या,पेटारे,करंड्या वा तत्सम वस्तुप्रकार हे स्थानिक बुरड समाजाकडून सर्वत्र तयार करण्यात येत असतातच परंतु वैशिष्टयपूर्ण अशा फर्निचर-वस्तूही पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून तयार करण्यात येतात. वेळू (बांबू) आणि वेत यांचा वापर करून पाठीच्या खुर्च्या,मेजे (टीपॉय) व तत्सम वस्तूंची निर्मिती करणाऱ्या काही सहकारी संस्था शहरी विभागात आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील बावडा,आजरा व गारगोटी यांसारख्या ठिकाणी करंडीसदृश अनेक बुरडी वस्तू तयार होतात.

काष्ठकलाकामात सांप्रत महाराष्ट्र विशेष अग्रेसर नसला,तरी जळगाव जिल्ह्यातील डौलदार लाकडी ‘धमणी’ मात्र वैशिष्टयपूर्ण असते. पारोळे, एरंडोल,धरणगाव व चोपडा येथील सुतार या दृष्टीने अधिक कलात्मक दृष्टिकोन ठेवतात. त्यांनी तयार केलेल्या धमण्यांना मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथे विशेष मागणी असते तर पंढरपूरच्या परिसरातील रक्तचंदनाच्या बाहुल्या, लाकडी ‘ठकी’ व चिंधीची बाहुली या सर्व परंपरागतच परंतु अलीकडे चिंधीच्या बाहुलीत विशेष सुधारणा होऊन तिचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. या हस्तोद्योगात अनेक महिला गुंतल्या असून मुंबई,पुणे,खडकवासला,कोल्हापूर,अमरावती व नागपूर येथे बाहुलीनिर्मितिकेंद्रे स्थापन झालेली आहेत. महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा उदा.,शेतकरी,गवळण,मराठमोळे जोडपे,कोळीण,भटजी वगैरेंसारख्यांचा अंतर्भाव असलेल्या या बाहुल्यांना परदेशातही मागणी असते. ती मागणी खडकवासला येथील महिला सहकारी उद्योग मंदिर ही संस्था तसेच मुंबईतील काही खाजगी निर्यातदारही पूर्ण करतात. लाकडाचा भुसा व सुरती माती यांच्या मिश्रणाने विविध पशुपक्षी,गणपतीच्या व इतर देवदेवतांच्या मूर्ती पेण येथे तयार होत असून त्या भारतभर जातात. [⟶बाहुली ]

कोल्हापूर, पुणे, नागपूर इ. ठिकाणी पटवेगार [⟶पटवेगारी] काचमणी तसेच अकीकाच्या मणिमाळा तयार करतात. अजिंठा-वेरूळ परिसरात हे अकीकाचे दगड विपुल प्रमाणात सापडत असून त्यांपासून मणी तयार करण्याची केंद्रे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावी आहेत तर अहमदनगर जिल्ह्यात वाखकाम चालते. वाखापासून तयार केलेल्या रंगीत,वैचित्र्यपूर्ण व आकर्षक हस्तमंजुषा, चटया,मंडी-पिशव्या वगैरे वस्तू बऱ्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. सावंतवाडी पुणे व मुंबई येथील काही महिला उत्पादक केंद्रेही वाखाच्या वस्तू तयार करतात. त्याचप्रमाणे भारतात व विशेषतः परदेशातही लोकप्रिय ठरलेली बाब म्हणजे कापडी भित्तिशोभिते होत. सोलापूरला त्याची तीन मोठी निर्मितिकेंद्रे आहेत [⟶ भित्तिशोभन].

मिरज येथे होणारी तंतुवाद्ये उदा.,तंबोरा,वीणा,सतार,दिलरूबा,सारंगी,भजनी वीणा व एकताल (एकतारी) यांनी आपली परंपरा अजूनही टिकवून ठेवली आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक गावी स्थानिक कलाकार गणपतींच्या मूर्ती तयार करीत असतात तथापि शाडूपासून तयार होणाऱ्या पेण,कोल्हापूर येथील गणपतीच्या मूर्ती विशेष प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे शाडूपासून तयार केलेले गौरीचे मुखवटे वेधक असतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर येथील कागदी लगद्यापासून तयार केलेले गौरीचे मुखवटे आणि इतरत्र तयार होणारे व स्थानिक पध्दतीने रंगविलेले लाकडी मुखवटेही उल्लेखनीय आहेत. डहाणू येथील ⇨वारली जमातीची घराच्या भिंतीवरील चित्रकला म्हणजे तर महाराष्ट्राचे एक वैशिष्टयपूर्ण असे लोककलेचे दालनच होय. महाराष्ट्रात कोकणा, गोंड, भिल्ल, कोरकू इ. आदिवासी जमाती असून त्यांपैकी काहींच्या पारंपरिक हस्तकला वैशिष्टयपूर्ण आहेत [⟶आदिवासी].

लाकडी ठशाच्या साह्याने कापडावर मुद्रण करण्याचा हस्तव्यवसाय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चालत असून मुंबईमध्ये ठसा पद्धतीने व पटमुद्रण पद्धतीने कापड सुशोभित करण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामध्ये परंपरागत व नवीन धर्तीच्या शैलींचा वापर करण्यात येतो. मुंबईखेरीज पुणे,नासिक,सांगली,कोल्हापुर, वर्धा,नागपूर आणि इचलकरंजी येथेही छा पील साड्यांची निर्मिती होते.

कापडछपाईची दुसरी परंपरागत शैली व प्रकार म्हणजे काळ्या चंद्रकळेचा होय. ⇨ खडीकामयुक्त चंद्रकळा महाराष्ट्रीय वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.

वरील लहानमोठ्या हस्तव्यवसायांच्या जोडीला इतर अनेक हस्तव्यवसाय महाराष्ट्रातील लहानमोठ्या गावी चालतात. भारतातून सध्या ५८० कोटी रूपयांच्या हस्तकलावस्तू निर्यात होतात त्यांपैकी महाराष्ट्रातून केवळ २० कोटी रूपयांच्याच वस्तूंची निर्यात करण्यात येते (१९८१). महाराष्ट्रातील हस्तकलेला उत्तेजन मिळावे व तिचा विकास व्हावा म्हणून नियोजनबद्ध प्रयत्नांसाठी अखिल भारतीय हस्तकला महामंडळ तसेच सहकारी आणि शासकीय संस्था प्रयत्नशील आहेत. [⟶ग्रामोद्योग तांबटकाम धातुकलाकाम फर्निचर (भारतीय फर्निचर) बुरूडकाम भारत (हस्तव्यवसाय) मणिकाम मृत्पात्री हस्तव्यवसाय].

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...