विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

असे होते शिवराय..

असे होते शिवराय...

शहाजीराजेंनी शिवरायांना बंगलोरहून पुण्याला पाठवताना राजमुद्रा आणि भगवा ध्वज दिला होता. या राजमुद्रेच्या माध्यमातून शहाजीराजेंनी शिवरायांना खगोलशास्त्र, राजकारण, मानवता आणि विश्वबंधुता सांगितले. छत्रपती शिवरायांच्या हातून स्थापन होणारे स्वराज्य हे प्रजेचे कल्याण हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच दिवसागणिक विस्तारणारे आणि विस्तारत विस्तारत विश्वाला वंदनीय असा राज्यकारभार करुन दाखवणारे असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. छत्रपती शिवरायांनी या अपेक्षा पूर्ण करुन दाखवल्या.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या भौतिक सीमा जरी संपूर्ण विश्वभर विस्तारल्या नसल्या, तरी देखील त्यांची राजनीती, युद्धनीती, प्रजेच्या कल्याणाचे विचार आणि प्रेरणा संपूर्ण विश्वात गेली. जगात जिथे जिथे छत्रपती शिवरायांचे विचार गेले, इथे शिवराय हे वंदनीयच ठरले.

शहाजीराजेंनी दिलेल्या भगव्या ध्वजाला शिवरायांनी त्यागाचे प्रतीक अशी ओळख मिळवून दिली, ती भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिरंगा राष्ट्रध्वजात त्याच अर्थाने घेतली गेली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य ज्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना मराठा अशी ओळख होती, ती ओळख भारताच्या राष्ट्रगीतात त्याच अर्थाने घेतली गेली.

पण दुर्दैवाने आपल्याच देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये त्यांची टिंगल, बदनामी आणि कुचाळकी करणारे लोक निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतीक वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी स्वीकारले खरे, पण त्यांनी शिवरायांची मांडणी आपापल्या सोयीने केली. याची वेगवेगळी उदाहरणे देता येतील. उदा.स्वतः महिला, गरीब, शोषित घटकांबद्दल चुकीची भूमिका घेणाऱ्यांनी स्त्री सन्मानक, सर्वसामान्यांचे आणि निराधारांचे शिवराय स्वीकारणे टाळले. हिंदू-मुस्लिम, दलित-ब्राह्मण अशी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांनी धर्मसहिष्णू, जातीच्या पलीकडले शिवराय स्वीकारणे टाळले. यामध्ये अजूनही उदाहरणे देता येतील.

भारतीय समाजात जाती, धर्म, भाषा, संस्कृती व इर गोष्टींमध्ये विविधता असूनही केवळ त्यामध्ये देश म्हणून एकता असल्याचे सांगण्यात येते. पण वास्तवात भारत हा विविधतेतही विविधता असणारा देश आहे. जातीजातींमध्ये, धर्माधर्मात, भाषभाषांमध्ये, प्रांताप्रांतामध्ये असलेल्या संघर्षावरुन ते दिसून येते.

या विविधतेतील विविधतेमुळेच लोकांनी आपापल्या सोयीने समाजात महापुरुषांच्या वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण केल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तेच झाले आहे. त्यानुसारच समाजात शिवरायांच्या वेगवेगळ्या प्रतिमा घेऊन मिरवणारे घटकसमूह निर्माण झाले. कुणाचीतरी सोय ही इतर कुणासाठी गैरसोय असू शकते, या मानवी वृत्तीनुसार शिवरायांच्या वेगवेगळ्या प्रतिमांचे खंडन करणारे किंवा त्यावर आघात करणारे घटकसमूहही निर्माण झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास नसणारे अग्रीमा जोशुआ, सौरभ घोष, कुणाल कामरा, साहिल शहा, वीर दास यासारखे काही स्टँड अप कॉमेडियन, लेखक, वक्ते, मिमर्स वगैरे लोक येतात, काहीतरी बरळतात आणि नंतर अंगलट आले की माफी मागतात. परस्परांच्या विचारधारांमध्ये असणाऱ्या संघर्षात एकमेकांची खिल्ली उडवण्यासाठी हे लोक छत्रपती शिवरायांना लक्ष्य करतात हे दुर्दैवी आहे.

आताच्या घडीला शिवराय कसे होते हे सांगण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. पण काही लोक इतरांनी सांगितलेले शिवराय कसे आहेत हे सांगण्यावरच भर आहे. त्यातून तुम्ही आम्हीही सुटलो नाही.

काही लोकांना जन्मजातच “शिवाजी” या विषयाबद्दल आकस आहे, तर काही लोकांनी अतिटोकाच्या विचारांच्या आहारी जाऊन तो आकस स्वतःमध्ये निर्माण करुन ठेवला आहे. या खेळात आता शिवरायांना मस्करीचा विषय बनवण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे.

परिणामी अशा लोकांविरुद्ध शिवप्रेमींमधून येणाऱ्या प्रतिक्रिया स्वाभाविक असतात, प्रत्येकाची रोष व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. समोरची व्यक्ती वैयक्तिक बाबतीत कुठल्या विचारांची, जाती, धर्माची आहे, ती स्त्री आहे का पुरुष याच्याशी शिवप्रेमींना देणंघेणं नसते.

छत्रपती शिवरायांबद्दलच्या आमच्या अस्मिता इतक्याही टोकदार नाहीत तशाच त्या बोथटही नाहीत. त्यामध्ये आत्यंतिक उच्चकोटीचा अतिमानवतावाद नाही तसेच अंधानुकरणही नाही. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहासातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणुन आम्ही शिवरायांकडे पाहतो.

तरीही “मलाच जास्त कळतं” किंवा “मीच लय शहाणा” हा आजार झालेले लोक “शिवाजी” या विषयाबद्दल आपल्याकडच्या डाव्या, उजव्या, मधल्या, खालच्या, वरच्या, आतल्या, बाहेरच्या तत्वज्ञानाचा भडिमार करुन शिवप्रेमींनाच अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करतात. कारणांवर बोट ठेवण्याऐवजी त्याच्या परिणामांकडे बोट दाखवण्याचा हा प्रकार आहे.

छत्रपती शिवराय हे कुठल्याही चौकटीत न बसणारे व्यक्तिमत्व आहे, कारण ते विश्ववंदनीय आहेत. परंतु आजही भारतातील वेगवेगळ्या जातीधर्मामध्ये, भाषिकांमध्ये, प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. कदाचित त्यांच्यापर्यंत खरे शिवराय पोहोचले नसतील किंवा पोहोचवले गेले नसतील. पण यामध्ये शिवरायांवर जोक करण्यामागे काय लॉजिक आहे ? तुम्हाला राजकीय टीका करायच्या तर सरळ करा, शिवरायांना मध्ये घेऊन कुठले कंड शमवून घेता ?

मुळात आपल्याकडच्या हिंदुत्ववाद, बहुजनवाद, साम्यवाद, ग्रंथप्रामाण्यवाद, वगैरेच्या वाद्यांमुळे शिवचरित्रात इतके घोळ निर्माण झाले आहेत की ते सोडवण्यातच आमची ऊर्जा आणि वेळ खर्ची जात आहे. अजुन आमच्या महाराष्ट्रातच अधिकृत वस्तुनिष्ठ शिवचरित्र उपलब्ध नाही, प्रत्येकाच्या शिवचरित्रावर एकमेकांना आक्षेप आहेत. सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून असे अधिकृत शिवचरित्र निर्माण होऊ शकते, निदान असे झाले तरी त्याच शिवचरित्राची भाषांतरे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बाबांनो “असे होते शिवराय” हे त्यांना समजवून तरी सांगता येईल. इतकं झाले तरी हे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे लोक कमी होतील...
©अनिल माने

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...