विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 July 2020

सह्याद्रीचा आणि मराठ्यांच्या दहशतीने औरंगजेब कायमचं अपंगत्व आलं?

सह्याद्रीचा आणि मराठ्यांच्या दहशतीने औरंगजेब कायमचं अपंगत्व आलं?

काबूलपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मुघल साम्राज्याचा शहेनशहा औरंगजेब चा पसरलेल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा समोर भल्या भल्या रथी महारथी नी आपल्या आपल्या समशेरी म्यान करत त्याची चाकरी पत्करली.

परंतु एवढ्या साम्राज्यला टक्कर देण्याची हिंमत फक्त आणि फक्त आपल्या रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे स्वराज्य आणि स्वराज्याचे निष्ठावंत विश्वासू कर्तव्यदक्ष मावळे. हिंदवी स्वराज्यावर औरंगजेबाने अनेक हल्ले केले. मात्र स्वराज्याच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत औरंगजेबाला काही विजय मिळवता आला नाही. 

छत्रपती शिवरायांच्या निर्वाण नंतर आलमगीर औरंगजेब याला आता हिंदवी स्वराज्यावर सहज विजय मिळविणे सहज शक्‍य होईल असे वाटले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्याला लाभलेल्या दुसऱ्या छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांसह स्वराज्यावर नजर ठेवून असलेल्या इतर शत्रूंना जोराची टक्कर देत तलवारीच्या जोरावर स्वराज्यापासून दूर ठेवले. स्वराज्याचा वाढता विस्तार आणि मुघलांच्या मातब्बर सरदारांना स्वराज्याच्या शिलेदारांनी माती चारली त्यामुळे औरंगजेबाला दिल्ली सोडून मोठ्या फौजफाट्यासह स्वतः स्वराज्यावर चालून यावं लागलं.

स्वराज्य गिळण्यासाठी आलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडून हाल हाल करुन मारले. औरंगजेबाला वाटले आता तरी आपण स्वराज्य सहज काबीज करता येईल. मात्र संभाजीराजांच्या मृत्यूचा अंगार मावळ्यांच्या रक्तात चित्कारत होता.

छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी स्वराज्याची तिसरी दक्षिणेतील राजधानी जिंजी च्या किल्ल्यावरून राज्यकारभार सुरु करत मोगलांशी लढा सुरू ठेवला. मात्र दुर्दैवाने २ मार्च १७०० साली त्यांचा मृत्यू झाला.

स्वराज्याची तीन छत्रपती च्या निर्वाणानंतर ही औरंगजेब यास हवी तशी स्वराज्यावर पकड बसवता आली नाही. त्यांनतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सुत्रे हातात घेऊन राज्यकारभार सुरू केला. ताराबाई यांनी मोठ्या जिद्दीने मोगलांना तोंड देत होत्या.

मावळे गनिमी काव्याने डाव साधून ते मोगल सैन्यावर हल्ला करत अन वाऱ्याच्या वेगाने गायब होत. मुठभर मावळे कधी येत कधी हल्ला करत अन निघून जात, याचा थांगपत्ताही मोगलांना लागत नसे. संताजी-धनाजीच्या भितीने तर मोगलांना झोपही लागत नव्हती.

औरंगजेबही मोठ्या त्वेशाने मराठा सैन्याशी लढत होता स्वराज्याच्या कर्तव्यनिष्ठ मावळ्यांनी मुघलांच्या नाकी नऊ आणले होते. स्वराज्याचे महत्वाचे किल्ले मोगलांनी ताब्यात घेतले पण या धामधुमीत त्याच सैन्य बरंच दमलेले होते.

त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस, नद्यांना आलेले पुर यामुळे मोगल सैन्याचेही मोठे शारीरिक आणी मानसिक स्वास्थ्य ढासळले होते. तरीही औरंगजेब एक एक किल्ला ताब्यात घेत होता. युद्धात आणि पावसाच्या माऱ्याने त्याचं सैन्य, जनावरे यांची अतोनात हानी झाली होती.

सैन्याच खच्चीकरण आणि मोगलांचा खजिना ही हळू हळू रिकामा होत चालला होता. सैन्याचा पगारही वेळेत होत नव्हता. त्यामुळे सैन्यावर उपासमारीची वेळ आली होती. असे असताना २१ जून १७०० रोजी साताऱ्याच्या खटाव तालुक्‍यातील भुषणगडाकडे औरंगजेबाच्या सैन्याने कूच केली.

भुषणगड ताब्यात घ्यायला मोगलांना जवळ जवळ महिना गेला. अखेर भूषणगडाकडून ३६ मैलाचे अंतर कापून ३० ऑगस्ट रोजी माण नदीजवळील मोगल सैन्य खवासपूर येथे आले. तेथे कोरड्या नदीत मोगल फौजांनी छावणी टाकली. मोगल सैन्याची महिनाभर खवासपूरजवळ नदीत छावणी होती. माणदेश हा कायम दुष्काळी पट्टयातला प्रदेश, माण नदीच्या आसपासचा परिसर मिळून जो प्रदेश येतो तो माणदेश.

१ ऑक्‍टोंबर १७०० रोजी रात्री माण गावच्या आजूबाच्या परिसरात अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे अचानक माण नदीला भयंकर पूर आला. या पुरात मौगलांचे अनेक सैन्य, खजीना, जनावरे, वाहून गेली.

मध्यरात्री काळोखात पुराचे पाणी अचानक छावणीत घुसल्यामुळे मोगल छावणीत अक्षरशः दाणादाण उडवून दिली. अचानक छावणीत गोंधळ सुरू झाल्यामुळे औरंगजेबाला वाटले की मराठ्यांनी छावणीवर हल्ला केला. तो दचकुन झोपेतून उठून मरहट्टे आ गये असं म्हणत पळू लागला, मात्र अडखळून त्याचा तोल गेल्याने तो जोरात आपटला ज्यात त्याच्या गुडघ्याला जबर मार बसला.

स्वत:चा जीव वाचवत तो सुरक्षित ठिकाणी गेला. पुढे वैद्य, हकिमांनी अनेक उपचार करुनही औरंगजेबाचा पाय काही केल्या सरळ झाला नाही या पुरात मोगली सैन्याची प्रचंड हानी झाली. त्यानंतर औंरंगजेबाला नवीन घोडे, सैन्य भरती करावी लागली. मात्र पायला आलेले अपंगत्व अखेरपर्यंत राहिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...