विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

मलिक अंबर : निजामशाहीचा शेवटचा आधारस्तंभ

मलिक अंबर : निजामशाहीचा शेवटचा आधारस्तंभ. post saambhar :-अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर.
हा लेख दिनांक १० जुलै २०१० रोजी आनंदऋतु या मासिकात प्रथम प्रसिद्ध झाला होता.

या लेखात आपण अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवटचा कार्यक्षम वजीर मलिक अंबर व स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या सुरूवातीच्या काराकिर्दीचा आढावा घेऊ.
मलिक अंबरचा जन्म आजच्या इथिओपिया वा तत्कालिन अबिसेनिया या पूर्व आफ्रिकेतील देशात झाला. तो तत्कालिन समाजातील मुस्लिम जाती व्यवस्थेत सिद्दी हबशी मुसलमान या पोटजातीत गणला जात असे. त्याचा जन्म अंदाजे १५४९ साली झाल्याचे मानले जाते, त्याच्या आई वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी त्याला येमेन येथील गुलामांच्या बाजारात विकले. त्याला विकत घेण्यार्या व्यक्तीने त्याला बगदाद येथे मीर कासिम अल बगदादी याच्या हाती विकले असा कयास लावला जातो. त्याने त्याला बरोबर घेऊन मक्का, बगदाद, पर्शिया, काबूल अशा अनेक ठिकाणी प्रवास केला व शेवटी तो १५७५ च्या सुमारास दक्षिण भारतात पोहचला. येथे त्याला अहमदनगरच्या निजामशाहातर्फे त्याच्या एका सरदाराने विकत घेतले. त्यावेळी त्याच्यासारख्या सुमारे पंधराशे हबशी गुलामांची एक तुकडी बनवली गेली. काही कालावधीनंतर मलिक अंबरला त्या तुकडीचा मुख्य नेमले गेले. सुरूवातीच्या काळात आदिलशाही व कुतूबशाही फौजांविरूद्ध आपल्या शौर्याचे प्रदर्शन करूनही जेव्हा मलिक अंबरला पठाण सरदारांच्या वर्चस्वा खालील निजामशाहीत महत्त्व व बक्षिसी मिळाली नाही. तेव्हा तो आदिलशाहाच्या फौजेत आपल्या तुकडीसह दाखल झाला. मात्र येथेही त्याला दोन हजारी मनसबदारी शिवाय अधिक काही मिळाले नाही. तेव्हा त्याने काही काळ कुतूबशाहच्या पदरीही काढला. मात्र त्याला निजामशाहीचा तारणहार व्हायचे होते हे जणु त्याच्या नशिबातच लिहिले असावे, असे पुढील काळात घडलेल्या काही घटनांवरून दिसून आले. कारण मोगल बादशाह अकबर याचे निजामशाहीवरील पहिले आक्रमण केवळ निजामाचा मुलूखच नाही तर अनेक अफगान पठाण सरदारांच्या निष्ठाही घेऊन गेले. आपल्या सैन्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी निजामशाहाला आता हबशी सिद्दी मुसलमान, स्थानिक धर्मांतरीत मुसलमान व मराठ्यांच्या फौजांवर अवलंबून राहण्याचे दिवस आले. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत मलिक अंबर परत निजामशाहीत आला व त्याने हबशी सिद्दी गुलामांची पाच हजारांची फौज उभी केली, त्याला निजामशाहने सात हजारी सरदार बनवले. त्यानेही मोगलांच्या मुलूखावर आतपर्यंत हल्ले चढवत त्यांना संत्रस्त करणे सुरू केले. त्याने त्यांचा रसदमार्ग रोखला व अनेक किल्लेही जिंकले. या कर्तबगारीमुळे त्याला निजामशाहच्या दरबारात मोठे वजन प्राप्त झाले.
मात्र याच दरम्यान अहमदनगरचा कर्तबगार सुलतान मुर्तूझा निजामशाह याचा मृत्यू झाला. यानंतरच्या अनागोंदीच्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीवर सुमारे दहा वर्षे कळसूत्री बाहूल्या असणाऱ्या सुलतानांचा अमल झाला. त्यात हुसेनशाह, इस्माईल शाह, बुर्हानशाह, अहमदशाह व बहादूरशाह असे पाच निजामशाह सत्तेवर आले. या काळात मलिक अंबर हळू हळू विजेता सुलतान व त्याचा कर्ताकरविता वजीर वा सरदाराच्या आश्रयाने प्रगती करत राहिला. या दरम्यान त्याने मोगलांशी झालेल्या अहमदनगरच्या युद्धात चांदबीबीच्या नेतृत्वातील सैन्यात भाग घेतला व मोठा पराक्रम गाजवला. आता मोगलांना थोपवले असले तरी कायम असे करता येणार नाही हे चांदबीबी समजून होती मात्र अनेक सरदारांना तिचा सल्ला पटला नाही व चांदबीबीचा खून झाला. आता अकबराने आपला मुलगा मुराद मिर्झा व सेनापती खानेखानान याच्या नेतृत्वात मोठे सैन्य अहमदनगरवर पाठवले. त्या दोघांत खानेखानानने निजामशाहचा मोकळा मुलूख काबिज करून राजधानीकडे जावे व मुरादने थेट राजधानी अहमदनगरवर हल्ला चढवावा असे ठरले. दोन ठिकाणी तोंड देता देता निजामशाहीला नाकी नऊ आले. त्याच सुमारास मुराद मिर्झा मेला व त्याच्या जागी अकबराने आपला लहान मुलगा दानिएल मिर्झा याला अहमदनगरवर पाठवले.
आता मलिक अंबर जो निजामशाहचा मुख्य सरदार बनला होता त्याने नवी युद्धनीती शोधून तिचा वापर करायचे ठरवले. त्यानुसार त्याने नवा सुलतान मूर्तझा निजामशाह याला मोगलांच्या मुलखाच्या तोंडावर असणार्या अहमदनगर या राजधानीत न ठेवता अंतर्गत भागात असणार्या परिंडा या किल्ल्यावर पुर्ण बंदोबस्तात ठेवले. आपल्यासोबत सर्व शक्ती एकत्र असावी म्हणून जुनी दुश्मनी विसरून निजामशाहीच्या रक्षणासाठी शक्तीशाली व शूर असा अफगान पठाण सरदार मियान राजू याच्याशी मलिक अंबरने करार केला. त्यानेही निजामशाहीला आपली गरज आहे हे जाणून मोगलांच्या विरूद्ध लढाईसाठी दोन मोर्चे खोलण्याच्या मलिक अंबरच्या सल्ल्याला मान्यता दिली. त्यानुसार मलिक अंबरकडे बीडपासून तो आदिलशाही व कुतूबशाही सरहदीपर्यंतचा मुलूख व दौलताबादच्या पश्चिमेपासून ते चौल एवढा मुलूख होता. तर मियान राजू कडे दौलताबादेचा किल्ला व त्याच्या उत्तरेस गुजरातच्या सरहदीपर्यंतचा मुलूख व पश्चिमेस राजधानीचे अहमदनगर शहर व किल्ला हे ठिकाणे त्याच्या ताब्यात असावे असा मुलूख होता. मात्र लवकरच अहमदनगरचा किल्ला अकबराचा मुलगा दानिएल याने जिंकला व त्या बदल्यात मियान राजूला मलिक अंबरने उत्तरेस बुर्हानपूरपर्यंतचा मुलूख दिला.
आता मोगलांचे आक्रमण नविन निजामशाह मुर्तूझा याला परींड्याच्या किल्ल्यातून ताब्यात घेण्यासाठी सुरू झाले. त्याला वाचवण्याचे निमित्त करून मियान राजू व मलिक अंबर यांनी त्याला जवळ जवळ नजरकैदेतच ठेवले. लवकरच त्याला औसा या अंतर्गत भागतील किल्ल्यावर नेऊन ठेवले. आता संपूर्ण निजामशाही कारभार मुर्तूझा निजामशाहच्या नावाने मलिक अंबर व मियान राजु पाहू लागले. तेव्हा या दोघांना जरबेत ठेवण्यासाठी मोगल शाहजादा दानिएल मिर्झा याने सेनापती खानेखानान याला मलिक अंबरच्या तेलंगाणातील मुलूखावर चाल करून जाण्यास सांगितले जेणेकरून मलिक अंबर सुलतान निजामशाह पासून लांब जाईल व तो निजामशाहला कैद करू शकेल. घडलेही तसेच मलिक अंबर आपला तेलंगाणातील मुलूख वाचवायला गेला. तेथे त्याची खानेखानानच्या मोगल फौजेशी मोठी लढाई झाली या नांदेडच्या लढाईत मलिक अंबरने खानेखानानचा पराभव केला. मात्र त्यानंतर लगेच मलिक एरीचच्या नेतृत्वात चालून आलेल्या मुघलसैन्याने मलिक अंबरचा निर्णायक पराभव केला. स्वतः मलिक अंबर जीवावरच्या संकटातून वाचला व जबर जखमी अवस्थेत तो दौलताबादेस पोहचला. मात्र यादरम्यान अकबराचा मुलगा दानिएल मिर्झा हा गुजरातेत अहमदाबाद येथे सुभेदारीवर गेला व दख्खनच्या सर्व लढाईची जबाबदारी खानेखानानवर आली, त्याने दक्षिणेत मलिक अंबरशी तह केला. या तहामुळे मलिक अंबरला काही काळ शांतता लाभली व त्याने बंडाळ्या करणार्या काही सरदारांचा मोड करण्यात एक वर्षे लढा दिला तसेच आपल्या ताब्यातील निजामशाही मुलूख पुन्हा मिळवला. मात्र दानिएल मिर्झा पुन्हा एकदा अहमदनगरास आला व मियान राजूला आपल्याकडे ओढण्यासाठी त्याला निजामशाहाचा प्रतिनिधी अशी मोगली मान्यता देऊ केली. त्यामुळे राजूने मलिक अंबरविरूद्ध बंड केले व या गोधळाचा फायदा घेऊन मुघलांनी जालना भागातील निजामशाही किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा लावला. आता निजामशाहाला बरोबर घेऊन मलिक अंबरने मियान राजूवर हल्ला चढवला ज्यात दोघांनाही समिश्र यश मिळाले. आता आपल्या ताब्यात मियान राजूचा गुजरात भाग घेऊन मलिक अंबरने त्याला दौलताबाद भागात पुर्ण अधिकार दिले. याच सुमारास मियान राजूने मलिक अंबर याच्या इंदापुरच्या तळावर केलेल्या हल्ल्यात मालोजीराजे भोसले मारले गेले. राजूच्या दुर्दैवाने दानिएल मिर्झा मरण पावला व मियान राजूचा मोगली आधार गेला. ही संधी साधून मलिक अंबरने त्याच्यावर हल्ला केला. या लढाईत त्याला कैद करण्यात मलिक अंबरला यश आले. यामुळे दौलताबादचा किल्ला व मियान राजूचा संपूर्ण मुलूख मलिक अंबरला मिळाला. मियान राजूचे अनेक पठाण सरदार व इतर सरंजामदार पळून आदिलशाहच्या दरबारी विजापूरला गेले. आता निजामशाहीचा एकमेव तारणहार म्हणून केवळ मलिक अंबरच उरला.
मुघल बादशाह अकबर याचे आग्रा येथे निधन झाले व मुघल साम्राज्यात अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान अकबराचा मोठा मुलगा सलिम याने जहांगिर या नावाने दिल्लीचा कारभार हाती घेतला. यावेळी मुघलांचे दक्षिणेचे ठाणे बुर्हाणपुर येथे होते व त्यांच्या ताब्यात वर्हाड, खान्देश, जालना व अहमदनगर हे चार सुभे होते. मात्र नविनच अधिकारपदी आलेल्या जहांगिरला लगेच त्याचा मुलगा खुसरो याच्या बंडाला तोंड द्यावे लागले व त्याचे दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले. या बंडाला तोंड देता यावे म्हणून त्याने खानेखानानला बुर्हाणपूर येथेच राहण्यास सांगितले. याचाच फायदा उचलत मलिक अंबरने नविनच उभारलेल्या ताज्या दमाच्या सैन्याच्या मदतीने मुघलांच्या ताब्यातील जुनी राजधानी अहमदनगरसह जवळपास सर्वच मुलूख सोडवला. यामुळे चिडलेल्या जहांगिरने मलिक अंबरविरोधात पुन्हा खानेखानानला पाठवले. मात्र दोन वर्षे कठोर लढा देऊनही मलिक अंबर वा त्याच्या प्रभावाला आवर न घालता आल्याने जहांगिरने खानेखानानला परत बोलावले व त्याच्या जागी आपला मेहूणा आसफखान याला पाठवले. परंतु आता मलिक अंबरने मराठा सरदारांच्या मदतीने गनिमी कावा या नव्या युद्धतंत्राने मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले. आसफखानच्या अपयशाने चिडलेल्या जहांगिराने बडा अफगान सेनापती खान जहान लोदी याला दक्षिणेत पाठवले व सोबतच दमदाटीयुक्त तहाची पत्रे सुलतान आदिलशाह व कुतूबशाह यांनाही पाठवून मलिक अंबरची मदत बंद करविली. मात्र तरीही खान जहान लोदीला अहमदनगर व वर्हाड खानदेशचा आपलाच जुना भाग मलिक अंबरकडून तहात मिळवण्याशिवाय काही करता आले नाही. तेव्हा जहांगिर स्वतःच दक्षिणेत यायला निघाला मात्र ऐनवेळी आपल्या सल्लागारांच्या सांगण्यावरून त्याने आपला मुलगा खुर्रम याला दक्षिणेत पाठवले. शाहजादा खुर्रमने दख्खनमधे येताच आदिलशाह व कुतूबशाह यांच्या विरूद्ध सेना पाठवून त्यांना योग्य तो गर्भित इशारा दिला ज्यामुळे ते मलिक अंबरपासून दुर राहिले. आता अहमदनगर केंद्र ठेऊन मुघलांनी निजामशाहीच्या सर्वच भागांवर हल्ले चढवले. यात त्यांनी निजामशाहीची जुनी राजधानी जुन्नर, पैठण व मलिक अंबरने वसवलेले नवे शहर खडकी ही ठिकाणे लुटली. मित्रविहीन झालेल्या मलिक अंबरने शेवटी खुर्रमशी करार केला व निजामशाहीचा उत्तरेतील बालाघाट, वर्हाड, एलिचपुर वैगेरे भाग मुघलांना दिला सोबतच मोठी खंडणी देऊन त्याने निजामशाही राखली.
मात्र खुर्रम उत्तरेत परत जाताच दोन वर्षे पुर्ण तयारी करून मलिक अंबरने मोगलांकडील मोठा भाग परत मिळवला. यानंतर काही काळ शांततेत गेला मात्र पुढे उत्तर भारतात शाहजादा खुर्रम याने केलेल्या बंडाकडे मुघलांचे लक्ष लागुन राहिले असताना मलिक अंबरने लखूजी जाधवराव, शहाजीराजे भोसले इ. मराठा सरदारांच्या मदतीने मुघलांच्या ताब्यातील अहमदनगर, जुन्नर, वर्हाड, खानदेश, बालाघाट हा प्रदेश जिंकून घेतलाच त्याशिवाय आधी निजामशाहीत असणारा एलिचपुर, बुर्हाणपुर हा भागही त्याने मिळवला. त्याने त्याच्या मराठा सरदारांच्या फौजा माळव्यातही पाठवल्या व माळव्यातील प्रमुख केंद्र असणारे मांडू हे शहर लुटले व जिंकले. हा मलिक अंबरच्या अधिपत्याखालील निजामशाहीचा सुवर्णक्षण होता कारण एवढा मोठा प्रदेश निजामशाहीने आधी कधी पाहिलाच नव्हता. मात्र हे यश क्षणभंगूरच ठरले कारण खुर्रमचे बंड मोडून जहांगिरने त्याला रानोमाळ भटकंती करण्याइतपत कमजोर केले. अशा स्थितीत खुर्रम दक्षिणेत आला व त्याने मलिक अंबरकडे आश्रय मागितला. यावेळी त्याच्यातर्फे त्याचा प्रतिनिधी म्हणून मागे मलिक अंबरशी झालेल्या वादानंतर मोगलांकडे गेलेले लखूजी जाधवराव आले होते. मलिक अंबरने खुर्रमला आश्रय देणे कबूल केले. आता जहांगिर स्वतःच दक्षिणेत येण्याचे ठरवत होता. त्याची तयारी म्हणून त्याने महाबतखानाच्या नेतृत्वात अनेक मोठ्या सेनापतींना दक्षिणेत पाठवले. त्यांनी मराठ्यांच्या ताब्यातून मांडू, एलिचपुर, बुर्हाणपुर व वर्हाड हे प्रांत सोडवले.आपल्या विरोधात आदिलशाह व मोगलांची एकी झाल्याचे पाहून मलिक अंबरने मोगलांशी तात्पुरता तह केला व शाहजादा खुर्रम याला सुरक्षितपणे उत्तर हिंदुस्थानात जाण्यास सांगितले.
खुर्रम उत्तरेत गेल्याबरोबर निजामशाहीवर असलेला मोगलांचा मोठा दबाव कमी झाला व महाबतखान मोठे सैन्य घेऊन खुर्रमच्या मागावर गेला. त्याने मलिक अंबरविरूद्ध आदिलशाहीच्या मदतीसाठी लष्करखान नावाच्या सेनापतीच्या नेतृत्वात लखुजी जाधवराव, उदाराम पंडित आदी दक्षिणी सरदारांना देऊन तीस हजार सेना मागे ठेवली. या सेनेने मुल्ला मुहमदाच्या नेतृत्वातील चाळिस हजार आदिलशाही सेनेशी हातमिळवणी केली व ही सेना अहमदनगर शहराजवळून दौलताबादेकडे निघाली. या सुमारे सत्तर हजार सेनेविरूद्ध मलिक अंबरने आपली सिद्दी हबशी, दक्षिणी मुसलमान व मराठ्यांची मिळून सुमारे चाळिस हजार सेना उभी केली. आता ही सेना मलिक अंबरच्या नेतृत्वात अहमदनगरकडे निघाली. या सेनेत शाहाजीराजे व त्यांचे लहान भाऊ शरिफजीराजे हे आपल्या सात चुलतभावांसह होते. या सेनांची लढाई अहमदनगरजवळील भातवडी येथे झाली. या लढाईत मलिक अंबरच्या दक्षिणी सेनेने मोगली व आदिलशाही जोड सैन्याला जबरदस्त टक्कर दिली, आदिलशाही सेनापती मुल्ला मुहमंद मारला गेला व आदिलशाही सैन्य उधळले गेले. याच युद्धात मलिक अंबरच्या नेतृत्वात मराठ्यांनी प्रचंड पराक्रम केला व मुघल सैन्याला मागे ढकलले. त्याच वेळी मलिक अंबरच्या नव्या रणनीतीनुसार निजामशाही सैन्याने भातवडीचे तळे फोडून मुघल व आदिलशाही सैन्याला अक्षरशः बुडवले. हा विजय निजामशाही इतिहासातील शेवटचा मोठा युद्धविजय होता. यानंतर विजापुरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह व मुघल बादशाह जहांगिर यांनी मलिक अंबरबरोबर करार केला व निजामशाहीस काही काळ तरी शांतता लाभली. या युद्धात शहाजीराजांचे लहान भाऊ शरीफजीराजे मारले गेले.
आता वार्धक्याने थकलेल्या मलिक अंबरने शेवटची निरवानिरव सुरू केली. त्याने त्याचा मोठा मुलगा फत्तेखान याला आपला प्रतिनिधी नेमले व त्याला निजामशाहीचा भावी वजीर म्हणून मुर्तूझा निजामशाह व मुघल बादशाह जहांगिर यांची मान्यता मिळवली. असा हा निजामशाहीचा शेवटचा कर्तबगार वजीर व यशस्वी सेनापती मलिक अंबर दौलताबादचा किल्ल्यावर १४ मे १६२६ रोजी मृत्यू पावला. मलिक अंबर केवळ एक युद्धकुशल सेनापतीच नव्हता तर तो एक श्रेष्ठ मुत्सद्दीही होता त्याचबरोबर तो एक कुशल प्रशासकही होता. त्याने युद्धक्षेत्रात जशा अनेक सुधारणा केल्या, गनिमी काव्यासारखे नवनवे तंत्र शोधले तसेच जमिन महसुलातही सुधारणा केल्या. त्याने जमिन महसुल मोजण्यासाठी जमिनीचे आकारमान नाही तर जमिनीतुन होणारी एकुण वार्षिक प्राप्ती ध्यानात घेतली. त्याच बरोबर त्याने महसुलाचे प्रमाण एक तृतीयांश करून शेतकर्यांना दिलासा दिला. अनेक क्षेत्रांत उत्तम प्रकारचे कार्य करून मलिक अंबर भारताच्या इतिहासात प्रसिद्ध झाला आहे, त्याची कबर दौलताबाद जवळील खुलताबाद येथे आहे.
मलिक अंबर याच्या मृत्यूबरोबरच निजामशाहीची मृत्यूघंटा वाजली. त्याचा मुलगा फत्तेखान हा त्याच्याइतका कर्तबगार नव्हता किंवा त्याच्यात मलिक अंबर याची दुरदृष्टी नव्हती. त्याने अनेक असे निर्णय घेतले ज्यामुळे निजामशाही खिळखिळी झाली. शेवटी मुघलांनी निजामशाही जिंकून घेतली. मात्र याच मलिक अंबर मुळे मराठेशाहीचा मात्र खुप फायदा झाला. कारण शहाजीराजे यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यात मलिक अंबर यांचा मोठा वाटा होता अर्थात यात त्याचा स्वार्थही होता पण लवकरच शहाजीराजे स्वत: एक कार्यक्षम प्रशासक व सेनापती म्हणून उदयास आले व त्यांनी निजामशाही चालवून दाखवली. मात्र मुघल बादशहा शाहजहान याने स्वत: केलेले आक्रमण व आदिलशाही सैन्याने ऐनवेळी दिलेला धोका यामुळे शहाजीराजे यांना माघार घ्यावी लागली परंतु त्यांची कल्पकता आणि राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रेरणेने या माघारीनंतर १२ वर्षांच्या आत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. असो तो भाग शहाजीराजे यांच्या जीवनावर आधारित लेखात येईलच. शिवाजी महाराजांनी आपल्या महसूल व्यवस्थेत सुधारणा करताना मलिक अंबर याने बनवलेले काही नियम लागू केले होते यातच मलिक अंबरच्या महसूल व्यवस्थेचे यश आहे.
(या लेखातील काही मजकूर अथवा संपूर्ण लेखाचा माझ्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल)

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...