विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

जयपूरकर, राघोबा, चंद्रावंत आणि " ...... महाराणी अहिल्यादेवी" !!!



जयपूरकर, राघोबा, चंद्रावंत आणि "
...... महाराणी अहिल्यादेवी" !!!

postsaambhar :Prashant Babanrao Lavate-Patil
___________________________

अहिल्यादेवींच्या जीवनात तसे युद्धाचे प्रसंग कमीच आले. मल्हारबांच्या मृत्यूनंतर राज्य टिकवणे व रयत सुखी ठेवून राज्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे महत्वाचे होते. युद्धामुळे होणारे आर्थिक नुकसान, होणारी मनुष्यहानी आणि रयतेला भोगावा लागणारा परिणाम याची कल्पना अहिल्यादेवींना होती. त्यामुळे त्यांनी छोट्या-मोठ्या कारणावरून शक्यतो युद्धे टाळली. पण ज्या-ज्या वेळी गरजेचे होते त्यावेळी मात्र त्यांनी त्यांचे रौद्र रूप दाखवले. ज्या लोकांनी होळकर राज्यात उच्छाद मांडला आणि त्रास देऊ केला त्यांना मात्र अहिल्यादेवींनी चांगलाच धडा शिकवला.
अहिल्यादेवींच्या जीवनातील काही महत्वाचे युद्धप्रसंग इथे आपण पाहू.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१) जयपूरवाल्यांकडून कराचे काही पैसे येणे बाकी होते. तुकोजीरावांनी यासाठी त्यांना पत्र पाठवून पैसे देण्यासाठी सांगितले. या पत्राचे उत्तर खूपच उर्मट होते. जयपूरचा मंत्री 'दौलतराम' याने उलट पत्र पाठवले. या पत्रात तो म्हणतो;
"आम्ही होळकर आणि सिंधी या दोहोंचेही ऋणी आहोत. आमच्याजवळ तुम्हाला देण्याइतपत पैसा नाही. तेव्हा ज्यांच्यामध्ये हिंमत असेल त्याने आगोदर आमच्याकडून पैसा घ्यावा".
हे उत्तर मिळताच तुकोजीरावांनी फौज घेतली व जयपूरकरांवर आक्रमण करण्यासाठी निघाले. परंतु जयपूरला पोहचण्याअगोदरच सिंधिया जिऊबा दादाने त्यांच्यावर आक्रमण केले. यामुळे तुकोजीरावांना जयपूरपासून २२ कोस आगोदर ब्राह्मणगावच्या किल्ल्यावर थांबावे लागले. ही बातमी ज्यावेळी अहिल्यादेवींना समजली त्यावेळी त्यांनी ताबडतोब १८०० सैनिक तुकोजीरावांच्या मदतीला पाठवली. आणि सांगितले की, "या गर्विष्ठांचा गर्वहरण करा. मदत लागलीच तर मला कळवा मी स्वतः युद्धभूमीवर येऊन लढेन".
■■■
२) मालेरावांच्या मृत्यूनंतर होळकरांच्या राज्याला वारस नव्हता. मालेरावांना मुलबाळ नव्हते. हे चालू असताना काही चांडाळचौकडींनी होळकर राज्य गिळंकृत करून अहिल्यादेवींची उचलबांगडी करण्याची योजना आखली. याचे सूत्रधार म्हणजे पेशवे राघोबा. याचा सुगावा ज्यावेळी अहिल्यादेवींना लागला त्यावेळी ताबडतोब राज्याची सर्व सुत्रे हाती घेतली आणि पेशव्यांच्या विरुद्ध दंड थोपवून उभ्या राहिल्या. सैन्याची जमवाजमव केली. दाभाडे, भोसले, गायकवाड अशा अनेक सामर्थ्यवान मंडळींना मदतीचे आव्हान केले. या सर्वांनी अहिल्यादेवींना सक्रिय मदत करण्याचे वचन दिले. तिकडे महादजी शिंदे यांनी राघोबाला सहकार्य करण्यास नकार दिला. तुकोजीरावांनी होळकरांची संपूर्ण फौज आपल्या नेतृत्वाखाली सज्ज केली. अहिल्यादेवींनी आपल्या नेतृत्वाखाली स्त्रियांची फौज उभी केली.
राघोबा जसे उजैनला पोचले तसे पाहिले पत्र त्यांना तुकोजीरावांचे मिळाले. ज्यामध्ये आम्ही युद्धास तयार आहोत असा निरोप होता. याचवेळी अहिल्यादेवींचे पत्र राघोबाला मिळाले. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असे हे पत्र आहे. त्या पत्रात लिहितात,
"माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण आला आहात. परंतु आपली इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आपण मला अबला समजत आहात, पण मी कोणत्या प्रकारची अबला आहे हे तुम्हाला रणांगणात समजेल. माझ्या आधिपत्याखाली मी तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी सामना करेल. मी हरले तर मला कोणीही हसणार नाही. परंतु जर आपण हरला तर आपल्याला तोंड लपवायलाही जागा शिल्लक राहणार नाही. शिवाय एका अबलेवर आक्रमण केल्याचा जो कलंक तुमच्यावर लागेल तो कधीही पुसला जाणार नाही".
■■■
३) मल्हारबांनी १७५१ च्या आसपास जयपूर, उदयपूर, रामपुर वगैरे आपल्या अंमलात आणली होती. मल्हारबांच्या मृत्यूनंतर रामपुरच्या चंद्रावंतांनी होळकरांविरुद्ध उठाव केला. अहिल्यादेवींनी आपापसात समझोता घडवून आणला परंतु १७७१ मध्ये चंद्रावंतांनी होळकर राज्यावर हल्ला सुरू केला. यावेळी सुभेदार तुकोजीराव सैन्य घेऊन उत्तरेत दूरवर होते. अहिल्यादेवींनी सरदार शरीफभाई यांना सैन्यासोबत घेऊन रामपुरावर हल्ला केला व चंद्रावंतांचा सपाटून पराभव केला. या युद्धाचे संचलन स्वतः अहिल्यादेवींनी केले होते. १७८३ व १७८७ ला चंद्रावंतांनी पुन्हा हल्ले केले. परंतु दोन्हीवेळा अहिल्यादेवींनी त्यांचा पराभव केला. १७८७ ला अहिल्यादेवींनी रामपूर ताब्यात घेतले. चंद्रावत तेथून पळाले व आमदच्या किल्ल्यात बसले. किल्याला वेढा टाकला. किल्ल्याच्या बाहेर बारुद पेरून होळकरांच्या सैन्याला उडवून देण्याची योजना चंद्रावंतांनी आखली. परंतु बारुद पेरतेवेळी अचानक आग लागली व त्यामध्ये सौभाग्यसिंह व त्याची सेना भाजून निघाली. सौभाग्यसिंह हाती लागला. सौभाग्यसिंहाने अहिल्यादेवींची माफी मागून जीव वाचवला पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा सैन्य घेऊन होळकरांच्या सैन्यावर आक्रमण केले. यामध्ये त्याचा पुन्हा पराभव झाला व पकडला गेला. अहिल्यादेवींनी एक हुकूम सोडला.....
"जे नेहमी गद्दारी करतात त्यांना तोफेला देऊनच उडवले पाहिजे".
सौभाग्यसिंहाला तोफेच्या तोंडी देण्यात आले आणि त्यानंतर बाकीचे विद्रोही अहिल्यादेवींनी शरण आले.
अहिल्यादेवींनी या युद्धाचे नेतृत्व स्वतः करून संचलन केले होते. यावेळी अहिल्यादेवी यांचे वय ६३ होते. ही बातमी पुण्यास नाना फडणीस यांना समजताच चारी दिशांना तोफा उडवून विजय महोत्सव साजरा करण्यात आला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संदर्भ:
१) "लोकमाता-राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर".
लेखक: गोविंदराम शुरनर.
२) "अहिल्याबाई होळकर".
लेखक: ओमप्रकाश वसंत नजन

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...