सरदार दाभाडे यांची गढी, इंदुरी, तळेगाव दाभाडे
#इंदुरीचा_किल्ला(#गढी)"येसपाटील बिन बाज पाटील हे दाभाडे घराण्याचे मुळपुरुष होय.
मौजे तळेगांव,तालुके-चाकण,सरकार-जुन्नर,सुभे-औरंगाबाद
येसाजी पाटील हे शिवरायांच्या पदरी सरकारात होते.त्यांनी निष्ठेने स्वराज्याची सेवा केली.पुढे महाराज कैलासवाशी झाल्याच्या नंतर पुढे संभाजीराजे गादीवर आले.त्यावेळी #येसाजी_पाटील_दाभाडे व त्यांचे पुत्र #खंडोजी व #शिवाजी दाभाडे हे करत होते.संभाजी राजेंच्या मृत्युच्या अगोदर संभाजीराजेंनी #येसाजीराव_दाभाडे यांना #राजाराम महाराजांच्या तैनातीस दिले होते.संभाजीराजेंच्या मृत्युनंतर जेव्हा #इतिकादखानाचा रायगडास वेढा पडला तेव्हा येसाजीराव पाटील दाभाडे हे राजाराम महाराजांच्या सोबत रायगडावर होते व त्यांच्याबरोबरच ते जिंजीला कर्नाटक प्रांतात गेले.
यावेळी जिंजी मुक्कामी राजाराम महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले.त्यावेळी राजाराम महाराजांनी येसाजी पाटील दाभाडे यांना '#इंदुरी' हे गाव वतन म्हणून करुन दिले.
त्याचे उल्लेख पुढिल प्रमाणे-
"राजशक २३ धातृनामसंवत्सरे सु।। सबांतिसैन आल्लफचे सालीं श्री.महाराज यांणी पुत्रोत्साह जहाला जाणोन कृपा करुन व यांची सेवा पाहून मौजे तळेगाव नजीक इंदुरी तालुके चाकण सरकार जुन्नर गांव दरोबस्त वंशपरंपरेने इनाम करुन दिल्हा.व मौजे ऊरसें तालुके पवनमावळ त्यांचे पत्नीस(दिला) व मौजे धामणें,प्रांत पुणे दरोबस्त पित्रपौत्रादी वंशपरंपरेने इनाम करुन दिलें."
-दाभाडे घराण्याची कैफियत
______#येसाजी_दाभाडे म्हणजे साधारण आसामी नव्हती.एक मोठे प्रस्थ होते व अगदी शिवाजी महाराजांपासून ते मराठेशाहीच्या अखेरीपर्यंत दाभाडे घराण्याचा त्याग व पराक्रम आफाट आहे.
एकदा चंदीला(जिंजी)ला मुघलांचा वेढा पडला होता व राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात होते.त्यावेळी येसाजी पाटील दाभाडेंना राजाराम महाराजांच्या कबिल्याच्या संरक्षणासाठी ठेवून येसाजीरावांचे पुत्र खंडोजी दाभाडे व शिवाजी दाभाडे दोघेही राजाराम महाराजांना घेऊन निघाले.गवतासाठी काही पोर जात होती त्यातच रुप पालटून राजाराम महाराजांना घेऊन तेथून निसटले.मागे येसाजीरावांनी राजाराम महाराजांच्या कबिल्यास घेऊन त्यांचाही वेश बदलून त्यांनाही किल्ल्याबाहेर काढले.राजाराम महाराजांना घेऊन २५ कोस लांब आले.(दाभाडे घराण्याच्या कैफियतीमध्ये राजाराम महाराजांना पाठीशी बांधून दौड घेतली असा उल्लेख आहे.)दुसर्या दिवशी येसाजी दाभाडेंचे कनिष्ठ बंधू शिवाजी दाभाडे यांचे काळीज फुटून रक्ताची गुळणी आली.तेव्हा राजाराम महाराज व खंडोजी उभे राहिले तेव्हा शिवाजीराव दाभाडे बोलले की,
"महाराज आपण जावे मी काही वाचत नाहीं,आपण येथे राहिले असतां मोगलांची दौड येऊ धरिले जाल.राज्य बुडेल."
इतके बोलताच रक्ताची पुन्हा गुळणी आली आणि शिवाजीराव दाभाडे गतप्राण झाले.तेथेच राजाराम महाराज व खंडेराव दाभाडेंनी ओढ्याची नळी पाहून त्यांत घालून वरुन माती लोटली.अर्थात हे मी नाही सांगत आहे.हि दाभाडे घराण्याची कैफियत सांगते आहे.
_______स्वराज्य रक्षिणार्या नरविरांचा असाही करुण अंत आहे त्यांच्या त्यागाच्या सिमा आज आपण नाही करुन शकत.पुढे येसाजी दाभाडे पन्हाळ्यावर मृत्यू पावले.मृत्यू पच्छात राजापाम महाराजांनी त्यांची सेवा पाहून काही वतने व सरपाटिलकी त्यांच्या कुटुंबास दिली.
"राजशक २५ बहुधान्यनाम संवत्सरे आश्विन शुद्ध ११स प्रांत जुन्नर व हरिचंद्र व प्रांत पुणे व परगणें आकोलें व पपगणे जावलीं तील या महालांची सरपाटिलकी,दरशेकडा रुपये दोन व भेट व बकरे एक वगैरे इनाम पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने करुन दिल्हे.खंडोजी बिन येसाजी दाभाडे यांस प्रांत बिडदेश कुळकर्णाेचे वतन दर सद्दे रुपये २ येकूण सद्दे रुपये ६ सहा प्रमाणे करुन दिल्हे.त्याजवर हिंदू होऊन खलेल करील त्यास श्री काशीस गोहत्येचे पातक असे,व मुसलमान होऊन खलेल करील त्यास त्यास त्याचे मजहबची शफत असे.याप्रमाणे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालावे असे करुन दिल्हे.व खंडेराव दाभाडे यास सेनाखासखेलीचें पद दिल्हे.वस्त्रे,शिरपेंच,हत्ती,घोडा व निशाण जरीपटका व चौघडा दिल्हा.व हुजरात तैनातीस देऊन सेवा घेत होते..........."
________पुढे शाहू महाराज मोंगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर दाभाडे घराण्याची मराठेशाहीच्या इतिहासात महत्वाची भुमिका राहिलेली आहे.खंडेराव दाभाडेंचा पराक्रम हा सर्वश्रुत आहेच.
पुढे हे वतन बरेच दिवस हे इंदुरीचे वतन वहिवाटीस दाभाडे घराण्याकडे नव्हते.जिंजिला वेढा पडला त्या काळात या सनदा गहाळ झाल्या होत्या त्या शाहू महाराजांनी पुन्हा पुर्ववत करुन दिल्या व सरसेनापदाची वस्त्रे व दिली.
त्याच प्रमाणे
"चाकण देहे ६३ व परगणें पारनेर देहे १०४ यांची सरदेशमुखी दर सद्दे दोहोत्रा व फडफर्मास....."
आदी वतनांच्या सनदाही दिल्या.
पुढे गुजरातची मोहिम वगैरे बर्याच घटना सदर कैफियतीमध्ये नमूद केलेल्या आहेत.अगदी इंग्रजी राजवटीपर्यंत.हि कैफियत नक्की कुणी लिहीली याबाबत माहीती उपलब्ध नाही.मात्र कैफियतीतील उल्लेख व बारकावे पाहता दाभाडे घराण्यातीलच अत्यंत माहितगार माणसाने सगर कैफियत लिहीली असावी.हि कैफियत 'हकीकत दाभाडे सेनापती' या नावाने आहे.हि कैफियत इतिहास संग्रहकर्त्यांनी इ.स.१८८७ मध्ये प्रसिद्ध केली.
अर्थात वरील सर्व लिखाण हे या कैफियतीच्या आधारेच मी केले आहे.इंटरनेटवर हिच माहीती अनुवादीतही आहे मी फक्त कैफियतीतील मुळ उल्लेख दिले आहेत.
_______इंदुरीचा भुईकोट किंवा गढी हि दाभाडे घराण्याच्याच वतनातील आहे.प्रशस्त महादरवाजा त्यावरील शरभशिल्पे हे सर्व आपल्याला गढीच्या वैभवाचे दर्शन आपल्याला घडवते.परंतु,सध्याची तटबंधी,बुरुजांवर वाढलेली झाडी यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.नाहीतर वाफगावच्या होळकरांच्या गढीसारखी याही गढीची तटबंधी कोसळेल व आपण एका पराक्रमी घराण्याच्या खाणाखुणांना पारखे होऊ...!
धन्यवाद..!
(चुकभूल देणे घेणे..!)
संकलन-
नवनाथ आहेर
No comments:
Post a Comment