विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी - मल्हाररावांच्या छत्राखाली


#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी
- मल्हाररावांच्या छत्राखाली
संदर्भ: ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई- विनया खडपेकर
:मयुर हनुमंतराव सुळ

गेली काही वर्षे होळकर राज्याचा कितीतरी जबाबदाऱ्या अहिल्याबाई सांभाळू लागल्या होत्या.पण 1754 नंतर. अहिल्याबाईंचे नाव कागदोपत्री सगळीकडे दिसू लागले.
मल्हारराव सतत मोहिमांवर असत.काबीज केलेला मुलुख सुव्यवस्थित राखण्यासाठी मोहिमा काढून संपर्क ठेवावा लागत असे.तरच चौथाई,सरदेशमुखी वगैरे अधिकार आणि खंडणी वसूल होऊ शकत असे. कधी या वसुलीसाठी लढाई करावी लागत असे.मग पुन्हा या लढाईचा खर्च डोक्यावर बसत असे.असे हे चक्र चालू होते.त्यामुळे मल्हारराव आज खानदेशात.उद्या राजपुताण्याच्या मार्गावर.परवा दिल्लीत छावणी.तेरवा अंतवेदिकडे कुच.पण जेथे असतील तेथून मल्हाररावांची पत्रे इंदूरला जात असत.त्यात अहिल्याबाईंना आज्ञा असत.संदेश असत.सल्ले असत.मार्गदर्शन असत.अहिल्याबाई मुलखी कारभार पाहत होत्या. मामलतदार, कमविसदारांच्या व्यवहारावर दाब ठेवत होत्या.सगळे हिशोबठिशेब तपासात होत्या.
घटना वेगाने घडत होत्या.पेशव्यांनी शिंदे आणि होळकर यांना मुलखाचे समान उत्पन्न वाटून दिले होते. शिंद्यांचे राज्य मात्तबर समजले जात होते.पण धनसंपत्तीने होळकरांच्या तोलामोलाचे झाले नव्हते. बाजीराव पेशव्यांनी माळव्यातील मराठा राज्याची जबाबदारी शिंदे आणि होळकर यांच्यावर सोपवली होती,ती आज्ञा जन्मभर पाळणे, असे दोघांनाही मनःपूर्वक वाटत होते.दुसरे म्हणजे,मिळवून घेण्याशिवाय तरणोपाय नाही हे दोघांनाही कळत होते,कारण दोन्ही घराण्याच्या काही जमेच्या बाजू होत्या आणि काही उण्या बाजू होत्या.
मल्हाररावांचे एकमेव आशास्थान होते-अहिल्याबाई! पेशव्यांना अहिल्याबाईंच्या कर्तृत्वा बद्दल विश्वास वाटत होता.भोवतालची जनता अहिल्याबाईंच्या चरणी झुकू लागली होती. मल्हाररावांना वाटत होते,सध्या तरी आपण सगळा भार सुनेच्या खांद्यावर सोपवायला हरकत नाही.पुढे काय ते परमेश्वर जाणे.
अहिल्याबाईंची मुले मालेराव आणि मुक्ताबाई वाढत होती. मालेरावाला हत्ती,घोडे,वाघ, चित्ता असा पशुसृष्टीचा फारच लळा होता.मल्हारराव मोहिमांवर जातांना कधीकधी नातवाला आपल्या बरोबर घेऊन जाऊ लागले.आत्ता गौतमाबाई-मल्हारराव,अहिल्याबाई सर्वांचे लक्ष मालेरावावर केंद्रित झाले.तो दहा वर्षाचा झाला.एकुलत्या एका लाडक्या नातवाची गौतमाबाईनी तुळा केली.आणि ती संपत्ती ब्राम्हणांना दान केली.
राघोबादादा, मल्हारराव होळकर आणि बरोबर मराठे सरदार सरहिंद मधून वायव्येकडे निघाले.सतजल नदी ओलांडून 20 एप्रिल 1758 रोजी व्यासगंगा आणि रावी नदी ओलांडून लाहोरला पोहचले.त्यांनी लाहोर ताब्यात घेतला.मजल दरमजल करत सिंधू नदीच्या तीरावर असलेल्या अटक ह्या गावी पोहचले.त्यांच्या स्वप्नातही नसलेल्या प्रदेशात ते आले होते.विस्तीर्ण सिंधू नदी ओलांडून ते पेशावर या नगरात पोहचले आणि मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकले.त्या विजयघोषाचा नाद मराठेशाहीत सर्वदूर दुमदुमला.पुण्यातल्या शनिवारवाड्यात,इंदुरातल्या होळकर वाड्यात आनंदाला उधाण आले.त्या विजयाच्या धुंदितच राघोबादादा आणि मल्हारराव होळकर परतले.
यावेळी नानासाहेब पेशव्यांनी कळवले की,मल्हाररावांनी दिल्लीपासून लाहोरपर्यंत सर्व मुलुखाची जबाबदारी घ्यावी.पण मल्हाररावांनी नकार दिला.हे कार्य शिंद्यांकडे सोपवावे असेही म्हटले.मुलकी कारभारात मल्हाररावांच्या हाताखाली काम करणाऱ्या अहिल्याबाईंना या निर्णयाच्या अनुकूल प्रतिकूल बाजू दिसत होत्या.त्यातून त्यांची वैचारिक जडणघडण होत होती.पण मल्हाररावांनी ही जबाबदारी का नाही स्वीकारली कारण त्यांना वाटत असू शकेल,एकदा पंजाबची जबाबदारी स्वीकारल्यावर तेथे कायमची वस्ती करणे प्राप्त होते.मग अहिल्याबाईवर सर्व होळकर राज्याची नित्याची जबाबदारी पडली असती.नातू मालेराव वयाने लहान.शिवाय साठी ओलांडली होती.या वयात परक्या मुलुखात राहून नव्या व्यवस्थापनाच्या,नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणे त्यांना नकोसे वाटत असेल.माळव्यात राहून मालेरावालाच राज्यकारभाराचे वळण लावावे अशी त्यांची इच्छा असू शकेल.
दक्षिणेत निजामाने जोर केला. निजामाविरुध्द पेशव्यांनी मल्हाररावांची मदत मागितली.त्यावेळी मल्हारराव वाफगाव ला होते.मल्हाररावांना आणण्यासाठी विठ्ठल शिवदेव विंचूरकर वाफगावी गेले.पण मल्हारराव बाहेर पडायला तयार नव्हते.मग पुन्हा राघोबादादाकडून दोन कारकून,व पाठोपाठ खुद्द सखाराम बापू गेले.परंतु मल्हारराव राजी होत नव्हते.शेवटी स्वतः माधवराव पेशवे यांनी मल्हाररावांना नवीन दहा लक्ष उत्पन्नाचा सरंजाम लिहून दिला.मग मल्हारराव पिंपळखेड येथे पेशव्यांना जाऊन मिळाले.
असे हे उपद्व्यापि आणि पराक्रमी मल्हारराव लहानसहान व्यवहारातही बारकाईने लक्ष घालत असत.त्या व्यवहाराची कार्यवाहीची जबाबदारी अहिल्याबाईं वर सोपवत असत.त्यावेळची पत्रे पहिली की अहिल्याबाई त्यांच्या कामात वाकबगार कशा होत गेल्या असतील याची कल्पना येते.
मल्हाररावांच्या व्यवहाराचा चोखपणा अहिल्याबाईं मध्ये उतरला होता हे ठिकठिकाणी जाणवते.सुलतानपूर परगण्याच्या कमाविसदराला अहिल्याबाईंनी आज्ञा केली,"सरकारच्या पागेसाठी चौदा दिवसांचा शिधा पाठवावा." आज्ञा अगदी काटेकोर होती- ' घोड्यांची हजेरी पाहून घेणे.मग तूप आणि कणिक एक खंडी, सतरा मण,दोन शेर इतका माल घोड्यांसाठी पोहचता करणे. माल पोहचल्यावर सरकारातुन पावती घेणे.म्हणजे नंतर रक्कम सरकारातुन मंजूर होईल.
21 ऑक्टोंबर 1764. बक्सारच्या मैदानात बादशहा,शुजा व मिरकासिम यांच्या संयुक्त सैन्याची आणि इंग्रजांची लढाई झाली.इंग्रजांनी ह्या त्रिवर्गाचा पराभव केला.11 फेब्रुवारी 1765 या दिवशी इंग्रजांची अलाहाबाद चा किल्ला काबीज केला. मल्हाररावांनी ओळखले,आत्ता इंग्रज पेटले आहेत.पुन्हा लढाया अटळच आहेत.त्यांनी त्या दृष्टीने पाऊले उचलायला चालू केली.सुरक्षित ठिकाणी पण संभवनीय रणक्षेत्राच्या जवळ तोफांच्या दारूचा आणि युद्धाला आवश्यक सामग्रीचा पुरवठा करणारे केंद्र असणे आवश्यक होते.यावेळी अहिल्याबाई तीर्थक्षेत्री फिरत देवदर्शन करत होत्या.मल्हाररावांनी अहिल्याबाईंना निरोप पाठविला " ग्वाल्हेर जवळ जाऊन लष्कराची तयारी करावी. दारुगोळ्याचा कारखाना लावून तोफखाना सिद्ध ठेवावा." अहिल्याबाईंनी देवदर्शन तबोडतोब आवरते घेतले.
त्या कामाला लागल्या. तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याच्या कारखान्याचा व्याप प्रचंड होता.कारखान्यासाठी क्षेत्र निवडण्यापासून,तोफा वाहून नेणाऱ्या बैलांच्या चाऱ्यापर्यंत ची सर्व व्यवस्था पहावी लागत असे.शेकडो माणसे,कित्तेक प्रकारची सामानसुमान या व्यापात गुंतलेले असे.एका कारखान्यासाठी सुमारे दीडशे माणूस कामावर असे.
अहिल्याबाईंच्या लक्षात आले, तोफखान्याची सोय ग्वाल्हेरात होणे शक्य नव्हते.त्यासाठी निराळ्या जागेची शोधाशोध सुरू झाली.बराच तपास केल्यावर सिरोंज गावी तोफखाना ठेवणे सोयीचे होईल आणि ते शक्य ही आहे याची खात्री झाली.मल्हाररावांचा सल्ला घेण्याची यावेळी त्यांना आवश्यकता वाटली नाही.तेवढा वेळही नव्हता.अहिल्याबाईंनी बेलाशक तोफखाना सिरोंजला हलवला.नंतर मल्हाररावांना हा बदल कळविला.
त्यावेळी अहिल्याबाई ग्वाल्हेरास होत्या. गोहदचे राज्य येथून अगदी जवळच होते.मल्हाररावांच्या मनात गोहदकरांचे पारिपत्य करण्याचा मनसुबा होता,हे अहिल्याबाईंना माहीत होते.अहिल्याबाईंच्या हाती तोफखाना होता.लढईतले डावपेच त्यांना माहीत झालेले होते.अहिल्याबाईंनी स्वतःच्या अधिकारात धडाक्यात एक निर्णय घेतला. गोहदकरांच्या एका गढीवर तोफा रोखल्या.होळकरांच्या तोफा रोखल्या जाताच गोहदकर हादरून गेले.गढी खाली करून दिली.
मल्हाररावांचे लक्ष नेहमी आगामी लढायांचे डावपेच आखण्याकडे होते.पूर्वी अहिल्याबाईंनी गोहदची एक गढी घेतलीच होती.आत्ता गोहदचे राज्य आपल्या अखत्यारित आणण्याचा डाव ते योजत होते.त्यासाठी एक कारभारी वैद्य आणि खांडाराणी हरकुबाई यांच्याशी त्यांनी खलबत केली वास्तविक गोहदच्या गढीवर अहिल्याबाईंच्या तोफा रोखल्या जाताच, गोहदकरानी तो गढी खाली करून दिली होती,हे अहिल्याबाईंचे यश होते.तरी खलबत करण्यासाठी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बोलावले नाही.अधिक कर्तृत्व दाखवल्यावरही माणूस कसा डावलला जाऊ शकतो हे यावेळी अहिल्याबाईंना कळले असावे.खलबत झालेल्या निर्णयाची कार्यवाही मात्र मल्हाररावांनी अहिल्याबाईंवर सोपवली.
मल्हारराव बुंदेलखंडात शिरले.बुंदेलखंडात त्यांनी महादजी शिंदे यांना हाताशी धरले.मल्हारराव व महादजी दोघांनी मिळून दतिया, वोडसे इ. ठाणी हस्तगत केली.आणि ते गोहदच्या मागे लागले.मल्हाररावांची चढाई सुरु असली तरी तब्बेत अधूनमधून बिघडत होती.काही ना काही आजार वर डोके काढत होता.कानाला खूपच ठणका लागत होता.त्यांनी विश्रांतीसाठी आलमपुर येथे मुक्काम केला.अहिल्याबाई तेथे येऊन पोहोचल्या.दोन पत्न्या द्वारकाबाई, बनाबाई आधीपासून बरोबर होत्या.आजारपणाने गाठले असले तरी मल्हारराव जबाबदारीची कामे निपटतचं होते.
राघोबादादा पेशव्यांचा निरोप घेऊन पुणे सोडले.खंडण्या घेत ते माळव्यात सिहोर गावी पोहचले.विश्वास लक्ष्मण यांनी सिहोरला राघोबादादा यांना निरोप पाठवला.मल्हारराव आणि महादजी यांनी बुंदेलखंडात अंमल बसवून गोहदच्या जाटावर चढाई केलेली आहे! मल्हारराव व महादजी यांना गाठण्याच्या हेतूने राघोबादादा झाशीजवळ पोहचले.झाशी येथे काही दिवस विश्रांती घेऊन 18 मे 1766 रोजी राघोबादादा आलमपुर येथे आले.लगेचच मल्हारराव राघोबादादा यांना भेटायला गेले.शिंदे घराण्याचा सरंजाम महादजी शिंदे यांना मिळवून देण्यासाठी मल्हाररावांनी ही भेट घेतली.
नंतर दोनच दिवसात 20 मे 1766 या दिवशी मल्हाररावांना मृत्यू आला.द्वारकाबाई आणि बनाबाई सती गेल्या.भरल्या डोळ्यांनी अहिल्याबाईंनी मल्हाररावांचे अंत्य दर्शन घेतले.आपल्या डोक्यावरील छत्र हरपले,हीच जाणीव त्यांना होत होती.
ज्या गावी मृत्यू झाला त्या आलमपुरचे नाव मल्हारनगर करण्यात आले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...