विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

II श्री राजा शाहु छत्रपती II

II श्री राजा शाहु छत्रपती II

छ. शाहु महारांजावर लिहिणे म्हणजे काजव्याने कर्तूत्व सुर्यनारायणाला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. जागर समुहात शाहुपर्वात राजांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा माझा अल्पमती प्रयत्न सुजाण वाचकांनी गोड माणून घ्यावा, हि विनंती. लेखात शक्य तेथे सुधारणा स्वागतार्ह आहेत.
जवळपास ४०० वर्ष गुलामगिरीच्या अंधारात असणा-या महाराष्ट्राला ‘स्वराज्य-संकल्पक’ शाहजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या आशेचे किरण दाखवले. छ. शिवाजी महाराजांच्या रुपाने “स्वराज्याचा” अरुणोदय झाला. अठरापगड जातीत असणा-या “मराठा” ला स्वाभिमान आणि आत्मभान राजांनी दिले.
सन १६८० च्या सुमारास मुघल साम्राज्य स्वतःच्या चरमसीमेवर होते. सत्ता, संपत्ती, सैन्य कशाचीही कमतरता नव्हती. औरंगजेबाने सत्ता हातात घेतल्यापासून जवळपास २५ वर्षांनी उत्तरेतील व्यवस्था आणि तख्त स्थिरस्थावर केले. छ. शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाची वक्रदृष्टी दक्षिणेकडे वळली. अनेक वर्ष दख्खन जिंकण्याचे त्याचे सुप्त मनसुबे जागृत होऊ लागले आणि स्वराज्य सुर्याला औरंगजेबरुपी ग्रहण लागले. या ग्रहणाशी ९ वर्ष अखंड झुंज देउन छ. संभाजी राजांनी आत्मबलीदान करुन स्वातंत्र्यासाठी अपरिमित त्यागाचे आदर्श उदाहरण महाराष्ट्रापुढे ठेवले. छ. राजाराम महाराजांनी पुढे ११ वर्ष हा स्वातंत्र्य यज्ञ कुंड धगधगता ठेवला आणि रणरागिनी ताराराणीने या ग्रहणाचा अस्त केला.
छ. शाहु समजुन घेताना इथेच थोडे मागे जावे लागते. अखंड भारत एकछत्री अंमलाखाली आणणारा हा कर्तुत्व –सह्याद्री अत्यंत शांत, महत्वाकांक्षी, दिर्घसुत्री राजकारणी, कुटुंबवत्सल, प्रजाहितदक्ष राजा आणि वयक्तीक आयुष्यात अत्यंत साधेपणा जपणारा होता.हे सर्व गुण शाहुंमध्ये असण्यात त्यांचे बालपण समजुन घ्यावे लागेल.
छ. शाहुंच्या आयुष्यात प्रभाव असणारी अत्यंत पहिली आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे “ श्री सखी राज्ञी जयती” मातोश्री येसूबाई. सन १६६४ साली पिलाजीराव शिर्के यांची हि कन्या युवराज संभाजी राजांच्या आयुष्यात शौर्यलक्ष्मीच्या पावलांनी भोसले घराण्यात आली. इथून पुढचा काळ स्वराज्यात अत्यंत धामधुमीचा. पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक, महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहिम या सा-या घटनातून येसूबाई राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या संस्कारात घडत होत्या. #जिजाऊंनी_फक्त_स्वराज्याचे_तीन_छत्रपती_नाही_घडवले
#तर_छत्रपती_कसे_घडवावेत_हे_येसूबाईंच्या_रुपाने_दाखवुनही_दिले. दुर्दैवाने इतिहासकारांनी जिजाऊंच्या या कार्याकडे दुर्लक्षच केले असे खेदाने म्हणावे लागेल.
छ. शाहुंना जन्मापासून छ. संभाजी राजांची मोहीमांची आघाडी पहाता फारसे पितृसुख मिळाले नाही. छ. संभाजी राजांविरुद्ध असणारे अंतर्गत गढुळ वातावरणात त्यांचे बालपण व्यतीत होऊ लागले आणि वयाच्या ७व्या वर्षी संभाजी राजांच्या हत्येने त्यांचे पितृछत्र हरपले. राजपुत्र म्हणुन जन्माला आलेल्या ह्या मुलाला कळत्या वयात थोडे-थोडके नाही तर तब्बल १८ वर्ष औरंगजेबाचा राजकैदी म्हणुन जगावे लागले यासारखा नियतीचा दुर्दैवी खेळ तो कोणता?
औरंगजेब आणि शाहु यांचा संबध अभ्यासताना कधी कधी न सुटणारे कोडे पडते. अत्यंत क्रुर, कपटी, धर्मांध, सत्तेसाठी रक्तसंबधाचा रक्तपात करणारा औरंगजेब येसूबाई आणि शाहुंप्रती त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट वागताना दिसतो. संभाजी राजांचा औरंगजेबाला प्रचंड द्वेष पण शाहु आणि येसूबाईंसोबत त्याचे वागणे न कळणारे. औरंगजेबाने कैदेतल्या या छ. घराण्याचा योग्य तो मान मरातब राखला. खासा त्याची मुलगी झिनतुन्निसा त्यांची काळजी घेई. तिलाही शाहुंचा लळा होता. औरंगजेबाने शाहूस राजा म्हणून मान्यता दिली आणि ७ हजारांची मनसबही दिली, खिलतीची वस्त्रे, नगारा आणि नौबतीचा मानही दिला होता. औरंगजेबाची कन्या झीनत उन्निसाबेगम हिने शाहू व त्यांच्या परिवाराची चांगलीच काळजी घेतली. शाहूंचे जन्म नाव शिवाजी असले तरी औरंगजेब त्यांना शाहूच म्हणत असे. नोव्हेंबर १७०३ मध्ये औरंगजेबाने शाहूंचा विवाह कण्हेरच्या शिंद्यांच्या मुलीशी लावून दिला. या आधी दिल्लीत शाहूंचा विवाह मानसिंहराव रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या अंबिका ऊर्फ राजसबाई यांच्याशी झाला होता त्या तेथेच वारल्या. २५ वर्ष मोगलांची औरंगजेबासोबत असणारी हि फिरती राजधानी दक्षिणेत फिरत होती. मनसबदार म्हणुन शाहु राजा रोज दरबारात हजेरी लावत असत. गुणग्राहक मनाने याच काळात राज्यकारभाराचे धडे गिरवले. या अठरा वर्षात एक एक दिवस येसूबाईनी कशा पारतंत्र्य यातना भोगल्या असतील? ज्या क्रुरकर्म्याने पतीची हत्या केली त्याच्या कैदेत त्या माउलीच्या अगतीकतेची कल्पना करणेही कठिण..!!! जेवणाचा एक सुखाचा घास त्यांच्या गळ्याखाली उतरत नसेल. पण खचुन न जाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या ह्या धिरोदत्त माउलीने पुढिल मराठा छत्रपतीची जडण-घडण चालु ठेवली. मोगल रियासतीचे कोणतेही वाईट संस्कार येसूबाईंनी शाहुंवर हौ दिले नाहीत. स्वराज्य अस्मितेची ज्योत तेवत ठेवत कुटुंबवत्सल शाहु तिने घडवले. अखेर सन १७०७ साली औरंगजेबचे निधन झाले आणि मराठा स्वराज्यात दुही माजवण्यासाठी झिनतौन्निसा बेगमच्या सल्ल्याने मोगलाईतुन शाहुंची राजकिय सुटका झाली.
स्वराज्याच्या युवराजांची उत्तरेतील वारी हि स्वराज्यासाठी लाभदायकच ठरली असे म्हणावे लागेल. युवराज संभाजी राजे छ. शिवाजी राजांसोबत ५ मार्च १६६६ ते २० नोहेंबर १६६६ आग्राभेटीसाठी उत्तरेकडे होते. बालवयात गेलेले युवराज परत येताना संस्कृत पंडित संभाजी म्हणुन परतले. जर ७-८ महिन्यांचा सहवास गुणग्राहक संभाजीवर इतका पडू शकतो तर १८ वर्ष औरंगजेबासारख्या सम्राटाचा संग असणारा शाहु स्वतःच्या गुणग्राहकतेवर व बुद्धिमत्तेवर अखंड हिंदुस्तानचा सम्राट न होते तरच नवल.
(क्रमशः)
संदर्भः- मुसलमनी रियासत,
प्रा. सतिश कदम यांचे संशोधनात्मक लेख
चित्रः- छ. संभाजी महाराजांबरोबर बाल शाहु महाराज
source:- internet
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...