(17 एप्रिल 1640 )
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
( इतिहास अभ्यासक)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब.राजांचे पहिले
प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या
शिकवणीकडे व मार्गदर्शना कडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या
त्यागाकडे जाते .सईबाई राणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी ,सचिव
सखी व प्रिया होत्या सईबाई राणी साहेबांनी शिवाजीराजांना 19 वर्षे अत्यंत
समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न
झाले होते. दहा वर्षाचे राजे तर सात वर्षाच्या सईबाई राणीसाहेब होत्या.
स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या व प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या
शिवाजीराजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य
नव्हते.स्वराज्य रक्षणाचे वाण हे नाईक निंबाळकरांच्या घरात तर जन्मापासूनच
सईबाई राणीसाहेबांना ठाऊक होते "राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ".अशी म्हण
ज्यांच्या शौर्यामुळे पडली होती.त्या शूर वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या
घराण्यातील मुधोजी राजे यांच्या पोटी सईबाईंचा जन्म झाला होता.फलटणचे नाईक
निंबाळकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे.त्यांची
सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे
घराणे फार महत्वाचे मानले गेले. एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची
आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सई (आठवण) काढेल त्या म्हणजे सईबाई
राणीसाहेब सईबाई राणीसाहेब या आपल दु:ख गिळून दुसर्यांच्या सुखात
विरघळणार्या राणी होत्या. सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत सोशिक व
सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या
घराण्यात गेल्यामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात,
जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या.
त्यांनी शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल
दृष्टीने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले. स्वराज्या विषयी कर्तव्य
पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी
तितक्याच समर्थपणे पार पाडले. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या
छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच त्या आपले सुख मानत होत्या.फलटणचे
रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणतात "शिवाजी महाराज राम असतील तर सईबाई
राणीसाहेब सीता असतील, जर शिवाजी महाराज विष्णू असतील तर सईबाई राणीसाहेब
लक्ष्मी असतील, जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती
असतील इतके घट्ट प्रेम या दोघांचे होते." राजे मोहिमेवर असले की
चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापूस
पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजीराजांना सईबाई राणीसाहेबांची
आठवण येत होती. आठवणीने राजांचा जीव व्याकूळ होत होता. एकदा मोहिमेवर
असताना छावणीत रात्री पिठासारखे चांदणे पडलेले पाहून राजे कित्येक तास
छावणीबाहेर चंद्राकडे पहात उभे राहिलेले होते,तर तो चंद्र पाहण्यासाठी नसून
सईबाईं राणीसाहेबांच्या उत्कट आठवणीने राजांचे मन हरखून जात होते
.राजांच्या या प्रेमामुळे त्यांचे जीवन अनेक विविध रंगाने शोभणार्या
इंद्रधनुष्या सारखे किंवा नवरस युक्त काव्या सारखे भासत होते. सईबाई
राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे शिवाजीराजांच्या संसाराची कथा जीवाला
चटका लावणारी ठरली. राणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण
हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन
वर्षाचे शंभूराजे पोरके झाले . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सईबाई राणीसाहेब
हे जग सोडून निघून गेल्या. पण जातांना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक
छावा अर्पण केला.या छाव्याने पुढे रूद्रअवतार धारण करून ओरंगजेबाला नाकी
नऊ आणले.5 सप्टेंबर 1659 साली आपल्या लाडक्या शंभूराजांना व छत्रपती शिवाजी
महाराजांना सोडून सईबाई राणीसाहेब निजधामाला गेल्या.
सईबाई राणीसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment