विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

छत्रपती राजारामराजे भोसले

 

छत्रपती राजारामराजे भोसले
आमचं नाव जरी राम असल तरी आम्ही भरत म्हणून राहू, कधी सिंहासन जरी आम्हाला मिळाल तरी आम्ही सिंहासनावर दादासाहेबांचे जोडे ठेऊ. शिवपुत्र छत्रपती राजारामराजे......
जन्मताना ते पालथे निपजले म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामराजांनी पातशाही पालथी घातली नाही, तरी त्यांनी पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.
पूर्ण नाव:- राजारामराजे शिवाजीराजे भोसले.
वडील:- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
आई:- सोयराबाई शिवाजीराजे भोसले.
जन्म:- २४ फेब्रुवारी १६७०
जन्मस्थान:- राजगड
बंधु:- छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
बहीण:-
१. सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर (फलटण-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
२. राणूबाई - - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
३. अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
४. दीपाबाई - - विसाजी उर्फ विश्वासराव (जन्मदाती आई:- सोयराबाई)
५. कमळाबाई - जानोजी पालकर पुत्र, (शिरूर-पुणे) (जन्मदाती आई:- सकवारबाई)
६. राजकुवर - -गणोजी शिर्के (दाभोळ) (जन्मदाती आई:- सगुणाबाई)
पत्नी:-
१. जानकीबाई (गुजर)
२. ताराबाई (मोहिते)
३. राजसबाई (घाटगे)
४. अंबिकाबाई
५. सगुणाबाई
राजारामराजे पुत्र :-
१. शिवाजीराजे दुसरे (ताराबाई यांचे पुत्र)
२. संभाजीराजे दुसरे (राजसबाई यांचे पुत्र)
मंचाकरोहन:- १२ फेब्रुवारी १६८९
राजधानी:- किल्ले रायगड व जिंजी
राजमुद्रा:- छत्रपती राजाराम महाराज यांच्या दोन राजमुद्रा होत्या.
प्रतिपात चन्द्र्लेखेव वर्धीष्णू विश्ववंदिता | शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य राजाते |
धर्म प्रद्योदिताशेषवर्णा दाशराथेरीव | राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते |
मृत्यू:- ३ मार्च १७००
समाधीस्थळ:- सिंहगड, जिल्हा:- पुणे.
चलन:- होन, शिवराई.
उत्तराधिकारी:- महाराणी ताराबाई भोसले.
महत्वाचे प्रसंग:-
दूर जिंजीस जाऊन स्वराज्य राखण्याचा निर्णय आणि थरारक प्रवास :-
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. छत्रपती संभाजी महाराज अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामराजांच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. परंतू रायगड ते जिंजी हा प्रवास खूप खडतर होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती झुल्फीकार खान याचा वेढा पडला होता. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवाला. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. जास्तीत जास्त मराठ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले. राजाराम महाराज रायगडावरून थेट प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. आणि पन्हाळ्यास मोगलांचा वेढा पडला. राजाराम महाराजांपुढे शिवछत्रपतींचा पन्हाळ गडावरील प्रसंग उभा ठाकला. आता गनिमीकावा वापरुन इतिहासाची पुनरावृती करायची वेळ आली होती. परंतू आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज औरंगजेबाने अगोदरच बांधला होता. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजरामराजांचा दृढ निश्चय होता.
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. आई भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर स्वराज्याला साथ दिली. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.
मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. महाराज स्वत आघाडी घेत युद्धास सामोरे गेले. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.
ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी त्यांच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा त्यांनी राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता त्यांनी महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने राणीस शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्यांनी घेऊन राणीचा बचाव केला.
राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली. या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद यांनी शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर ! त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.
शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.
बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ यांना कैद करून ठाण्यात नेले. ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते झाले असते ’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.
राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हे मराठा सरदार छावणी करून होते. त्यांना महाराज आल्याची वार्ता समजताच ते त्वरेने दर्शनास आले. आणि त्यांनी महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती. जिंजीला शिवरायांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच सुमारास वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांचा विरोध झाला परंतु विरोधाला मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.
स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.
मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या पराक्रमाविषयी इतिहासकरांनी खूप कमी लिखाण केले आहे.
जर पुढील पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महारजांच्या पुढील पराक्रमी प्रवासाची माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट करून कळवावे.
संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
व्याख्यान पराक्रमी मराठे (दुर्गमहर्षी प्रमोद मांडे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...