विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

स्वराज्यजननी जिजामाता

 

स्वराज्यजननी जिजामाता
त्यागाची मूर्ति, मायेची सावली, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता, राष्ट्रामता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा...
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या मनात स्वातंत्र्याचा धगधगता लावरस ओतला, गुलामगिरीच्या विरोधात बंडचा जाळ पेटवला. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
पूर्ण नाव:- जिजाबाई शहाजीराजे भोसले.
जन्म:- जानेवारी १२, इ.स. १५९८.
जन्मस्थान :- सिंदखेडराजा, बुलढाणा.
मृत्यू:- जून १७, इ.स. १६७४.
समाधीस्थळ:- पाचाड, रायगडचा पायथा.
वडील:- लखुजीराव जाधव.
आई:- म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई.
पति:- शहाजीराजे मालोजीराजे भोसले.
संतती: संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले.
पार्श्वभूमी:- जिजामातांचे माहेर बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडचे. जाधव कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज.
महत्वाचे प्रसंग:-
बालपण:-
लाखोजीराव जाधव हे सिंदखेड वतनाचे पाच हजारी मनसबदार होते. कर्तृत्ववान, पराक्रमी पिता आणि म्हाळसबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. वयासोबत त्यांची पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट धरून लखोजिरावांकडे लष्करीप्रशिक्षण साठी हट्ट करत. जिजामातांचा विवाह 1605 साली शहाजीराजांसोबत दौलताबाद येथे झाला.
भोसले व जाधवांचे वैर:-
भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, तरीही जिजाऊंनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.
अपत्ये:-
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली, चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी:-
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्यांची संपुर्ण जवाबदारी जिजामातांनी स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.
शहाजी महाराजांनी जिजाऊंवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शहाजीराजानी जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. परंतु शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती. बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख यांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली.
पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकर्याना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदार्या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.
जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बकासुरचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अश्या प्रत्येक गोष्टीत पराक्रमाला भगवंताचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणार्याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजाऊंनी महाराजांवर बिंबवले. राजांच्या मोहिमांचा, युध्दांचा, सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या. मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत.
हिंदवी स्वराज्य:-
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. त्यानंतर नरसाळा किल्ला, कोंढणा, पुरंदर, सुभानमंगळ असे अनेक किल्ले स्वराज्यात सामील केले. अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून स्वराज्याला सुरक्षित केले.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजांनी देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन इ.स. १६७४ ला रायगडावरती पार पडला.
निधन:-
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, राजमाता जिजाऊंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, याच गावी राजमाता राजमाता जिजाऊंची समाधी आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...