श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे राजे म्हणून लेखले जाते ते उगाच नाही.
इ.स १६६२ मध्ये औरंगजेबाने स्वराज्याच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी आपला मामा शाहिस्तेखान याला दीड लाखाची फौज घेऊन दख्खनमध्ये पाठवले.
शाहिस्तेखानाने दख्खनमध्ये उतरतात पुण्यातील लाल महालातच तळ ठोकला आणि रयतेचा छळ सुरू केला. आणि स्वराज्यात सर्वत्र धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.
त्यावेळी शिवरायांनी रयतेच्या काळजीने लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत.
या पत्रांमधील प्रत्येक शब्द हा शिवरायांना रयतेचे राजे का उल्लेखले जाते, याची साक्ष देतो.
प्रस्तुत पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडखोरे मधील महाराजांचा शिलेदार सर्जेराव जेधे (कान्होजी जेधे यांचा पुत्र) यास लिहिलेले असून, यातील प्रत्येक शब्द हा काळजाला भिडतो आणि लोककल्याणकारी शिवरायांची आठवण करून देतो.
पत्र -
राजश्री शिवाजीराजे - सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे सु।।
तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे .तरी तुह्मास रोखा अहडता (पत्र पोहचताच)च तुह्मीं तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळें समेत तमाम रयेति लोकास घाटाखाले बांकाजागा( मजबूत ,दुर्गम ठिकाण )असेल तेथे पाठवणे. जेथे गनिमाचा आजार (शत्रुचा त्रास)पहुचेना ऐशा जागीयासि त्यासि पाठवणे. ये कामास हैगै न करणे रोखा अहडता च सदरहू लिहिलेप्रमाणे अमल करणे. ऐसियासि तुह्मापासून अंतर पडलियावरी मोगल जे बांद(कैद झालेले लोक) धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बैसेल. ऐसे समजोन गावाचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाले (कोकणात) जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडिचा दिरंग न करणे. तुम्ही आपले जागा हुशार असणे. गावगना हि सडेकडील सेतपोत जतन करावया जे असतील त्यास हि तुम्ही सांगणे की डोंगरावर असिरा कुबल (सूरक्षीत) जागा आसरेस जाने ऐसे त्यासि सांगणे व गनीम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकउनु पलोन जाणे. तुह्मी आपले जागा हुशार असणे.
मोर्तब सूद.
कमेंट मध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा.
धन्यवाद.
- @maratha_riyasat
No comments:
Post a Comment