विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

जंजिरा किल्ल्याला शिड्या उभारणारा दर्यावीर लायजी पाटील

 


जंजिरा किल्ल्याला शिड्या उभारणारा दर्यावीर लायजी पाटील
शिवरायांना कोकणात अनेक नररत्ने मिळाली.लायजी पाटील कोळी हे त्यापैकीच एक होत.अनेक कोळी बांधव शिवरायांच्या सैन्यात होते. आगरी, भंडारी, गावित, कोळी आदि कोकणातील मंडळी गलबते बांधण्यात पटाईत होती.संगमिरी हा गलबतातील नवीन युध्दप्रकार याच मावळ्यांनी आणला.
जंजिरा किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम(मावळे)घेऊन मुरूडला दाखल झाले.जंजिरावर हल्ला कसा करावयाचा याचा आराखडा आखत असताना लायजी पाटीलने जंजिरा किल्ल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याचा विचार सांगितला व स्वत:ही जबाबदारी अंगावर घेतली.मध्यरात्री छोट्या होड्यातून मावळ्यांना गडाच्या तटापर्यंत पोहोचवावे आणि मग शिड्यांच्या साह्याने गडावर चढून आतील हबश्यांचा बंदोबस्त करावा असे ठरले.
किल्ल्यावरील हबशांना थोडी जरी चाहूल लागली तरी सर्व मराठी मावळे मारले जाणार होते.लायजीने मोरोपंतास सांगितले आम्ही शिड्या लावतो,तुम्ही पाठोपाठ येणे.मध्यरात्री अंधारात वल्ह्यांचा आवाज न करता लायजीच्या होड्या जंजिराच्या तटाकडे निघाल्या.तटाजवळ पोहचल्यानंतर लायजीने व साथीदारांनी शिड्या तटावर लावल्या व ते मोरोपंताची वाट पाहू लागले.बराच वेळ निघून गेला प्रभात होण्याची वेळ आली तरी मोरोपंताच्या होड्या दिसेनात.शेवटी सिध्दीला आपला डाव कळेल म्हणून लायजीने हताश होऊन शिड्या काढण्याचा निर्णय घेतला व तो माघारी परतला.लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली.पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.पण त्याच सुमारास औरंगजेबने दक्षिणेस आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंनी सोडून द्यावा लागला व किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.
लायजी सरपाटलाची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही , याचे उत्तर महाराजांना काय दिले ते इतिहासात उपलब्ध नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले , यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल ; पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले , ' पंत , तुम्ही कोताई केली. मोहीम फसली. '
लायपाटलांच्या या प्रकरणाच्या बाबतीत अधिक माहिती संशोधनाने मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही.
पण याही प्रकरणात महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर एक सूर्यकिरण झळकन् झळकून गेला. महाराजांनी कुलाब्यास आज्ञा पाठवून लायजी सरपाटलास रायगडावर बोलावून घेतले.
या जंजिऱ्याच्या प्रकरणाची रायगडावर केवढी कुजबूज चालू असेल नाही यावेळी ?
महाराजांनी भर सदरेवर लायजीस बोलावले. तो आला. उभा राहिला. त्याला पाहून महाराज भरल्या आवाजात म्हणाले , ' शाबास! लायजी तू केवढी मोठी कामगिरी केली , शाबास. जंजिऱ्यास सिड्या लावल्या. '
लायजीला याचा अर्थच क्षणभर कळला नसेल. तो गोंधळलाही असेल. एका फसलेल्या करामतीचे महाराज कौतुक करतात ही गोष्ट मोठ्या नवलाचीच. महाराज आपल्या कारभारी अधिकाऱ्याला म्हणाले , ' लायजी सरपाटलांना पालखीचा मान द्या. ' हे ऐकून सारी राजसदर चपापली असेल नाही ? पण लायजी पाटील नक्कीच चपापला. तो म्हणाला , ' महाराज , मोहिम तर फते झालीच नाही. मग मला पालखीचा एवढा मोठा मान कशाकरिता ? मला नको ' त्यावर महाराज म्हणाले , ' नाही लायजी , हा तुझ्या बहाद्दुरीचा मान आहे. जंजिऱ्यासारख्या भयंकर अवघड लंकेस तू शिड्या लावल्यास ही गोष्ट सामान्य नव्हे. शाबास. म्हणून हा पालखीचा मान. '
तरीही लायजी म्हणत होता , मला पालखी नको. मान नको.
लायजीच्या या मनाच्या मोठेपणाची आणि खोलीची मोजमापं कशानं घ्यावीत ? हा त्याग आहे. ही स्वराज्यनिष्ठा आहे. यालाच आम्ही राष्ट्रीय चारित्र्य म्हणतो आहोत. यावर अधिक काही भाष्य करण्यासाठी आमच्या शिलकीत शब्द नाहीत.
महाराज लायजीचे हे मन पाहून लगेच आपल्या अधिकाऱ्यास म्हणाले , ' लायजी सरपाटलांस एक गलबत द्या आणि त्या गलबताचे नाव ' पालखी ' ठेवा. ' त्याप्रमाणे लायजीस एक गलबत बक्षीस देण्याची व्यवस्था झाली.
हे आणि असे शिवकाळातील प्रसंग पाहिले , की लक्षात येते की , हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला पुरून कसे उभे राहिले. केल्या कामाचेच मोल घ्यावे ; समाजाचे आणि स्वदेशाचे काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली. 🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...