मंदिरात बांधलेली घंटा, पाहिलीय तूम्ही आम्ही
#घंटेसाठी_बांधलेलं_मंदिर पाहिलंय का हो कोणी???
मंदिरात प्रवेश करताना आपण घंटानाद करून प्रवेश करतो. त्या घंटेचा नाद
सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा या घंटा मंदिरात प्रवेश करताना प्रथम
दर्शनी दिसतात. पण कधी घंटेसाठी मंदिर बांधलेले पाहिलय का?
आज अशाच एका मंदिराची ओळख करून देत आहे...
#मेणवली_घंटा_मंदिर
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव.
त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक
पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना
फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले. नानांनी त्या गावात
स्वत:ला राहण्यासाठी एक वाडा बांधलाच, पण कृष्णामाईच्या घाटावर विष्णूचे व
दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक
छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने
खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे
त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या
घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर
घेतलेल्या मेरीचे चित्र व १७०७ हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर
जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती
एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे
प्रश्न पडतात.
बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या
नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा १७३९ मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई
असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या
परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप
घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील
घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या
हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
मेणवली येथील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्ट्य ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.
पोर्तुगीजांची सत्ता वसई परिसरात १५१६ पासून १७३९ पर्यंत रायगड जिल्ह्यातील चौलपासून पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंत पसरली होती. पोर्तुगीजांनी वसईत सुमारे सव्वादोनशे वर्षांच्या काळात व्यापार केला आणि स्थानिक जनतेमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसार केला. अनेक पोर्तुगीज लोक त्या परिसरात स्थायिक झाले. त्यांच्या आध्यात्मिक गरजांसाठी; तसेच, तेथे ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिलेल्या नवख्रिश्चनांच्या धार्मिक गरजांसाठी, पोर्तुगीजांनी चौलपासून डहाणूपर्यंत किल्ल्यात आणि किल्ल्याबाहेर सत्त्याहत्तर चर्चेस बांधली. पोर्तुगीजांचे लहानमोठे सुमारे दहा किल्ले त्या भागात होते. वसई किल्ला हा त्या सर्व किल्ल्यांत मोठा आणि मजबूत किल्ला होता. त्या किल्ल्यामधून त्या परिसरातील पोर्तुगीज सत्तेचे नियंत्रण गव्हर्नर करत असे. तो काळ २८ मार्च १५३७ पासून २३ मे १७३९ पर्यंतचा. त्यांनी अर्नाळा किल्ला २८ मार्च १५३६ रोजी जिंकला. पोर्तुगीजांची वसई परगण्यातील सत्ता त्यांनी वसई किल्ल्यात शरणागती १२ मे १७३९ रोजी पत्करल्यानंतर संपुष्टात आली.
चिमाजी अप्पा यांच्या
नेतृत्वाखाली मराठा सेनेने चौलपासून डहाणूपर्यंतच्या त्या पोर्तुगीज
किल्ल्यांवर हल्ले सुरू केले. तो रणसंग्राम दोन वर्षें चालू होता. तेथील
किल्ल्यात आणि किल्ल्याबाहेर असलेल्या चर्चेसचा विध्वंस त्या लढाईत फार
मोठ्या प्रमाणावर झाला. त्या चर्चेसमधील येशू, मारिया आणि अन्य संत यांच्या
मूर्ती भग्न पावल्या; मात्र चर्चच्या मनोऱ्यावर असलेल्या घंटा चांगल्या
स्थितीत राहिल्या. मराठा सैनिकांनी किल्ले जिंकल्यानंतर चर्चच्या मनोऱ्यावर
असलेल्या घंटा काढून घेतल्या. पोर्तुगीज सैनिकांनी शरणागती पत्करताना वसई
किल्ल्यातील सात चर्चेसच्या मनोऱ्यांवर असलेल्या घंटा काढून घेतल्या.
मराठ्यांनी किल्ले जिंकल्यानंतर त्या त्या किल्ल्यातील शस्त्रास्त्रे,
दारूगोळा व पोर्तुगिजांची संपत्ती हे सारे मराठी सत्तेचा भाग झाला.
त्या भागातील चर्चेसमधील प्रचंड घंटा चिमाजी आप्पांनी त्या रणसंग्रामात
विशेष मर्दुमकी गाजवलेल्या सरदारांना भेट म्हणून दिल्या. त्यांनी त्या नेऊन
त्यांच्या त्यांच्या विभागातील मंदिरांत त्या बसवल्या. काही घंटा वितळवून
त्यांच्यापासून तोफा तयार करण्यात आल्या. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतील
नारोशंकर, तुळजापूर, भीमाशंकर, जेजुरी, मेणवली, येऊर, खंडोबा, ज्योतिबा,
श्रीवर्धन, हर्णे-मुरुड, मेसलिंग, अंबादेवी अशा तीस तीर्थक्षेत्रांत वसई
परगण्यातील पोर्तुगीज चर्चेसमधील चौतीस घंटा विराजमान झालेल्या आहेत.
त्यांपैकी सर्वात मोठी घंटा जालना येथील राजूर तीर्थक्षेत्रात आहे. तिची
उंची त्रेचाळीस इंच असून व्यास अडतीस इंच आहे. दुसरी घंटा नाशिक येथील
नारोशंकर (रामेश्वर) मंदिरात असून तिची उंची साडेबेचाळीस इंच तर घेरा अडतीस
इंच आहे.
त्या सर्व घंटांची निर्मिती भिन्न धातूंपासून विदेशात झालेली
आहे. काही घंटा वजनी इतक्या आहेत, की त्या हत्तीच्या पाठीवर ठेवून-वाहून
नेण्यात आल्या. त्यांपैकी अनेक घंटांवर तत्कालीन पोर्तुगीज धार्मिक
प्रथेप्रमाणे आयएचएस, येशूचे दया, पवित्र कूस, बाल येशूसह मारिया अशी
ख्रिस्ती धार्मिक चिन्हे, ख्रिस्ती वचने, निर्मितिवर्ष असा मजकूर कोरलेला
पहायला मिळतो.
चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही घंटा पहायचीय, तर मेणवली ला भेट नक्की द्या!
#अपरिचित_ऐतिहासिक_ठिकाण
#मेणवली #नाना_फडणवीस_वाडा #वाई #सातारा #महाराष्ट्र #भूमी_पराक्रमाची
No comments:
Post a Comment