विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 October 2020

🚩राणी दुर्गावतिं 🚩

 🚩राणी दुर्गावतिं 🚩





राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ मधे राजा चंदेल यांच्या पोटी झाला.दुर्गावती या कालिंजर राज्याचे राजा कीर्तिसिंह चंदेल यांची एकुलती एक कन्या होत्या .चंदेल हे लोधी राजपूत घराण्याच्या शाखेचे होते .दुर्गाष्टमी दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव दुर्गा ठेवण्यात आले होते.अत्यंत हुशार, शोर्यशाली, साहसी आणि सुंदरते साठी दुर्गावती प्रसिद्ध होत्या.त्यांचे लग्न १५४२ मधे गोंडवन साम्राज्याचे राजा संग्रामशाह मडावी यांचा मुलगा दलपतसिंह यांच्या बरोबर झाले.
दुर्गावती या भारत देशातली एक खूप मोठ्या विरांगणा होत्या.
लग्नानंतर चारच वर्षात त्यांचे पती दलपतसिंह यांचे निधन झाले. त्यावेळी दुर्गावतीच्या मांडीवर फक्त तीन वर्षाचे वीरनारायण हे पुत्र होते. म्हणून राणीने स्वतः सत्ता हातात घेतली. सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी बरीच प्रगती केली.जबलपूर येथे बऱ्याच शासकीय इमारतींना राणी दुर्गावतीचे नाव देण्यात आले आहे.
मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. दुर्गावतीचे राज्य तीन बाजूंनी मुस्लिम राज्यांनी वेढले होते . पश्चिमेस निमार - मानवाचा सुजात खान सूरी होता, दक्षिणेस खान्देशचे मुस्लीम राज्य व पूर्वेस अफगाण. या तिघांनी असहाय्य राज्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती . दुर्गावतीने न घाबरता गोंडवन येथील राजपूत तरुणांना एकत्र केले ,आणि सैन्य तयार करून मुस्लिम राजांचा सामना केला .युद्धात दुर्गावतीने तीन मुस्लिम राज्यांचा वारंवार पराभव केला.पराभुत मुसलमान राज्ये इतकी घाबरली की त्यांनी गोंडवनकडे पाहणे देखील बंद केले.या तीन राज्यांच्या विजयात दुर्गावती यांना अपार संपत्ती मिळाली.
दुर्गावती अत्यंत शूर होत्या . कोठे सिंह जरी दिसला तरी त्या सिंहाची शिकार करीत. दुर्गावतीने नंतर नंतर गोंडवन मध्ये शांतता निर्माण केली.जनतेच्या सोयीसाठी विहिरी, तलाव,धर्मशाळा,लोकांच्या सुखासाठी मंदिरे बांधली. दुर्गावती प्रजेच्या मनावर राज्य करू लागल्या. लोक त्यांची देवी म्हणून पूजा करू लागले. गोंडवन हे समृद्ध राज्य झाले . संपूर्ण भारताची संपत्ती गोंडवन मध्ये येऊ लागली.
त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना अकबराने संदेश पाठवला. एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा. ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे मांडलिकत्व पत्करण्यास तयार होते.
या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती. ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप हे नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली.
या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !!
ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वत:चा जीव दिला.
गोंडवना राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरने सुद्धा अनेकवेळा आक्रमण केले होते. परंतु त्याला नेहमी अपयश आले. गोंडवन राज्यामध्ये धन संपत्तींची कमी नव्हती. त्यामुळे यावर अकबर बादशहाचा या राज्यावर कायमच डोळा होता. त्यामध्ये एका राणीने प्रस्ताव धुडकावून लावल्याने अकबर जास्तच चिडला होता.आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत हे राज्य संपवायचे होते.
२३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां) नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते) जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जून १५६४ रोजी पुन्हा मोगलांनी हल्ला चढवला परंतु यावेळी गोंडच्या सैन्याची वाताहात झाली, प्रचंड सैन्य मारले गेले. राणीला सुद्धा एक खांद्यावर आणि दुसरा डोळ्यावर असे दोन बाण लागले होते. अतिशय गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा ती लढत होती पण ज्यावेळी लढणे असह्य झाले त्यावेळी तिने तिचा सेनापती आधार सिंह याला हुकूम दिला की "मला मोगलांचा गुलाम बनायचं नाही, तू माझे डोके उडव आणि मला मारून टाक".... पण हा राणीचा हुकूम आधार सिंहने मानला नाही, हे त्याच्यासाठी अशक्य होते.
शेवटी राणीने स्वतःजवळची कट्यार स्वत:च्या छातीत खुपसून घेवून स्वतःचा जीव दिला.
हे एक भयंकर युद्ध होते. एक स्त्री मोगलांशी एवढ्या जोमाने लढत आहे याचे आश्चर्य खुद्द बादशहा अकबराला सुद्धा झाले होते.परंतु सैन्य संख्या मोगलांच्या तुलनेत फारच कमी असल्याने तिचा मोगलांच्या सैन्यापुढे टिकाव लागला नाही.
२४जुन १५६४मधे या राणीने आपली जीवन यात्रा संपवली.
१९८३ साली मध्यप्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपुर यूनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले. २४जून १९८८ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारत सरकारकडून एक पोस्टचा स्टँप काढून श्रद्धांजली वाहिली गेली. राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपुर जंक्शन व जम्मूतावी दरम्यान धावणारी ट्रेन दुर्गावती एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे .जबलपूर जवळच दुर्गादेवीचा महाल ऊंच टेकडीवर आहे

🙏🙏

लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...