भारतभर पसरलेली छोटी-छोटी संस्थाने आणि त्यांचे राज्यकर्ते हे स्वातंत्र्यपूर्व भारताचे वेगळेच वैभव होते. काही ठिकाणी राज्यकर्ते आणि आम जनता यांच्यामध्ये विसंगती, असंतुष्टता यांचे प्रमाण वाढलं तर काही संस्थानिक हे रयतेच्या भल्यासाठी खरोखरच झटले आणि जनतेच्या मानाचेही राजे झाले. महाराष्ट्रातही असे अनेक संस्थानिक उदार, कलासक्त, उच्च शिक्षित व रयतेवर ममता करणारे होऊन गेले.
इंग्रजांच्या काळात संस्थाने विलीन झाली आणि संस्थानांच्या ऐश्वर्याला व रूबाबाला उतरती कळा लागली. इंग्रजांच्या राहणीमानाचा प्रभाव संस्थानिकांनी तर फार अल्पकाळात अंगी रुजवला. त्यामुळे परंपरा व पाश्चिमात्य पगडा यांचे एकत्र रूप त्यांच्या राहणीमानातून व वास्तूकलेतून दिसून येते. पुण्यापासून जवळ औंध, सांगली, फलटण, जमखिंडी अशा संस्थानांचा वारसा अनेक कलाकृतींमधून जिवंत आहे. पुण्यापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर भोर संस्थानचं वैभव अजूनही वास्तुरूपानं सांभाळत
भोरचा राजवाडा उभा आहे. राजवैभव जरी सरलं तरी त्या काळाच्या ऐश्वर्याची व उच्च अभिरूचीची कल्पना वास्तूच्या अंतर्बाह्य़ रूपातून प्रतीत होते. पंतसचिव घराण्याच्या नवीन पिढीनेही त्याचे महत्त्व जाणून हा राजवाडा उमेदीनं सांभाळला आहे. दरवर्षी राजवाडय़ात रामनवमीचा सण मोठय़ा दिमाखात साजरा केला जातो.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पंतसचिव घराण्याच्या वंशवेलीचा उल्लेख रावसाहेब व्ही. जी. रानडे यांनी भोरचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांच्या कारकीर्दीवर लिहिलेल्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे.
घराण्याचा इतिहास व राजसाहेबांच्या कारकीर्दीमध्ये घडलेल्या घटनांची, त्यांनी संस्थानासाठी वेळोवेळी केलेल्या सुधारणांची, संस्थानास भेट दिलेल्या पाहुण्यांची तपशीलवार नोंद या ग्रंथामध्ये आहे. संस्थानाच्या विकासासाठी रस्ते, पूल, भाटघर धरण, शाळा, वाचनालय, व्यायामशाला वेळोवेळी बांधल्या गेल्या. तसेच महात्मा गांधीच्या स्वातंत्र आंदोलनासाठी अनेक वास्तू वापरण्यासाठी दिल्या गेल्या. भोर संस्थानची, पुणे शहरातील जुन्या वास्तूंची अनेक दुर्मीळ छायाचित्रे या ग्रंथामध्ये आहेत.
सहाव्या शतकातील नळ आणि मौर्य राजवटीपासून या भागाच्या इतिहासाचा मागोवा हाती लागतो. १२ व्या शतकात शीलाहार राजवट, १३ व्या शतकाच्या मध्यापर्यंत देवगिरीच्या यादवांचे राज्य, १३४७ नंतर बहामनी, १४ व्या शतकात अहमदनगरचा मलिक अहंमदपासून मुघलांचा अंमल सुरू झाला. त्यानंतर शिवाजीमहाराजांच्या दरबारी पैठणजवळील गंडापूरचे श्री शंकरजी नारायण गंडेकर यांची प्रथम पंतसचिवपदी नियुक्ती असा उल्लेख आढळतो. तिसरे पंतसचिव श्री. चिमाजी नारायण यांच्या कारकीर्दीत १७४० मध्ये राजवाडा बांधला.
१८५८ व १८६९ अशा दोन वेळा लागलेल्या आगीमध्ये त्याचे नुकसान झाल्यामुळे १८६९ मध्ये वाडय़ाची पुनर्बाधणी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून करण्यात आली. २००९ मध्ये राजवाडय़ाच्या वास्तूला १४० वर्षे पूर्ण होत आहेत.
राजवाडय़ाची पुनर्बाधणी ही इंग्रजांच्या काळात आल्यामुळे साहजिकच पेशवेकालीन शैली व व्हिक्टोरियन शैली यांची रसमिसळ वास्तुकलेमधून दिसून येते. चार मजली राजवाडय़ाचे क्षेत्रफळ सुमारे ४४ हजार चौरस फूट आहे. अप्रतिम लाकूडकाम, दगडकाम, वीटकाम यांचा मिलाफ वाडय़ाच्या वास्तुशिल्पामधून दिसून येतो. तीन चौकी प्रशस्त वाडय़ाची जमिनीवरील व्याप्ती इंग्रजी ‘एल’ अक्षराप्रमाणे आहे. पूर्वाभिमुख वाडय़ाचे प्रथमदर्शनी रूप मोठे वेधक आहे.
नगारखान्यासहित लाकूडकामातील महिरपींनी परिपूर्ण असे प्रवेशद्वार भव्य जरी असले तरी वाडय़ाच्या आकारमानाच्या तुलनेत सौम्य व पेशवेकालीन शैलीप्रमाणे अनुरूप आहे. त्यामध्ये प्रमाणबद्धता व लाकूडकामाच्या कारागिरीची सुबकता नजरेत भरते. प्रथम चौकात प्रवेश केल्यावर पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीची कलाकृती दिसून येते. उंच जोत्यासाठी पायऱ्यांची रचना, उभे खांब यातून रूबाबदार प्रवेशद्वाराची प्रतिमा अनुभवास येते.
दुसऱ्या चौकात प्रवेश केल्यावर मात्र वास्तुकलेचे नजर विस्फारणारे रूप दिसते. दुमजली चौकाच्या मध्यभागी दुप्पट उंचीचा दरबाराचा भव्य शामियाना ही क्वचितच दिसणारी संरचना आहे. एकसंघ लाकडातील दुप्पट उंचीचे खांब, महिरपी आणि शामियान्याच्या बाजूने चौकात झिरपणारा प्रकाश चौकाचे सौंदर्य द्विगुणीत करतात. शामियान्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये ओसऱ्या, पहिल्या मजल्यावरून नक्षीदार कमानीची गॅलरी शामियान्याच्या सौंदर्यात भर घालतात.
ओसऱ्यांमधील गुळगुळीत जमीन ही चुन्यामध्ये बाभळीच्या बिया घोटून तयार केली आहे व अनेक दशकांनंतरही ती शाबूत आहे. दक्षिणेकडील चौकाभोवती राहण्यासाठी दालने, स्वयंपाकघर व भोजनघर आहेत. चौकामध्ये उघडणाऱ्या कमानीच्या खिडक्यांमुळे दोन्ही मजल्यांवर भरपूर प्रकाश व खेळती हवा यांचा आनंद घेता येतो. तळमजल्यावरील ऐसपैस स्वयंपाकघरात धूर कोंडू नये म्हणून छतामधून अत्यंत कौशल्याने छोटी छोटी धुराडी सामावली आहेत. चार-चार धुराडी असलेल्या या मुदपाकखान्यात एकेकाळी पंचपक्वानांच्या लज्जतदार शाही भोजनावळी झडली असेल. आजही रामनवमीला गावभोजन असते.
त्यासाठी दक्षिणेकडील भागात मोकळे पटांगण राखून ठेवले आहे. या पटांगणाकडील भिंतीमध्ये काही नक्षीदार खाचा ठेवल्या आहेत. या खाचांची अनभिक्षिक्त मालकी हिरव्यागार डौलदार पोपटांच्या थव्याकडे आहे. वाडय़ाच्या पश्चिमेकडील दालने व चौक पार केल्यावर मागील बाजूस भलीमोठी विहीर आहे. विहिरीमध्ये टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या काळ्या पाषाणातील पायऱ्या आहेत. इथला परिसर जळात निवांतपणे पाय पसरून पहुडलेल्या बालकवीच्या औदुंबराची आठवण जागवणाऱ्या वृक्षराजीनी बहरला आहे.
शेकडो लोकांचा वावर एकेकाळी असणाऱ्या वाडय़ाची क्षुधाशांती करणारी विहीर कलात्मकतेने बांधली आहे. पूर्वेकडील पहिल्या मजल्यावरील दालनात सुरुदार खांबांनी बैठक सजली आहे. उत्कृष्ट लाकूडकामातील महिरपी वेलबुटय़ांनी सजलेले छत, हंडय़ा, झुंबरे ही सजावट गतकालीन उच्च अभिरुचीची आठवण जागवतात. तीन चौकाभोवती गुंफलेली राजवाडय़ाची संरचना प्रत्येक चौकाचं वेगळं वैशिष्टय़ राखून आहे. उत्कृष्ट प्रतीची लाकडातील कामगिरी व उत्तम प्रतीचे वीट व दगडकामाचे सौंदर्य राजवाडय़ाच्या संपूर्ण भागात दिसून येते.
मध्यवर्ती चौकामध्ये रामजन्माचा डोळे दीपवणारा सोहळा रामनवमीला साजरा होता. पंतसचिव घराण्याची नवीन पिढी पारंपरिक पोषाखात व परंपरेस अनुसरून या सोहळ्याचे प्रतिनिधित्व करते. पंतसचिव कुटुंबीय रामजन्माची पालखी खांदय़ावरून राजवाडय़ात घेऊन येतात. लोड-तक्के, जाजमांनी मध्यवर्ती चौक सजवला जातो. तेथे फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामजन्माचा सोहळा पार पडतो. गावातील सर्वसामान्य जनता, पंतसचिवांचे आप्त, मित्रमंडळी वाडय़ामध्ये हजेरी लावतात.
भजन कीर्तनाचा कार्यक्रमही होतो. फुलांच्या सजावटीने व माणसांच्या वावराने भल्या मोठय़ा राजवाडय़ात चैतन्य पसरते. वाडय़ाबाहेर जत्रा भरते. रामजन्मानंतर भोजनगृहात प्रसादाच्या पंगती उठतात.
एक एकरापेक्षाही जास्त बांधकाम असलेल्या वाडय़ाच्या राजस वास्तूची देखभाल हा एका कुटुंबासाठी यक्षप्रश्न आहे. काही काळ सरकारी कचेऱ्यांनी व्यापलेल्या भागाची नासधूस झाली आहे. ऊनपावसाच्या माऱ्याने व वयोमानामुळे काही भागांच्या डागडुजी अनिवार्य आहे.
संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे. न. चिं. केळकरांनी इथे काही काळ कारभाराची घडी बसवली, अनेक स्थानिक मान्यवर व्यक्ती तसेच विदेशी व्यक्तींनी राजवाडय़ाला भेटी दिल्या आहेत. रयतेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करणाऱ्या लोकप्रिय राजांनी इथून संस्थानाचा कारभार चालवला. अशा या वास्तूचं जतनसंवर्धन तर आवश्यक आहेच.
मराठी सिनेमा, धारावाहिक कार्यक्रमांसाठी वाडा जेव्हा चित्रीकरणासाठी वापरला जातो, तेव्हा विसंगत रंगरंगोटी करणे, खिळे ठोकणे, मूळ रूपाला बाधक बदल करणे व काम संपल्यावर वास्तू दुर्लक्षित करून पोबारा करणे या घटना अनेक जुन्या वास्तूंच्या बाबतीत घडतात. सध्याच्या काळात एका कालखंडाचा वारसा, शैली जपणाऱ्या वास्तू पुन्हा बांधणे होणार नाही.
आहे तो वारसा त्याचे मोल जाणून सजगतेनं जपायला हवा. त्या काळातील वास्तुकला व कारागिरी यांचे महत्त्व जाणून वास्तूचे मूळ सौंदर्य टिकवण्यावर भर दिला गेला पाहिजे. राजवाडा हे केवळ राजवैभवाचे प्रतीक नसून, एका यशस्वी अशा व्यवस्थापन कौशल्य राबवलेल्या कारभाराचेही प्रतीक आहे. अन्य संस्थानांच्या इमारतींची तसेच शहरातील वाडय़ांची थोडय़ाफार फरकाने हीच स्थिती आहे. वास्तूच्या जतनसंवर्धनाबरोबरच राजवाडय़ाचा काही भाग हा आधुनिक काळात उपलब्ध नसलेल्या व ‘वारसा’ या संकल्पनेकडे सकारात्मकतेने व आदराने पाहणाऱ्या कार्यक्रमासाठी करता येईल.
ठराविक काळासाठी वापर होईल अशा
आकर्षक योजना आखल्या तर वास्तुवैभवाची निगराणी राखणे सोयीचे होईल. पंचतारांकित वातानुकूलित आधुनिक वास्तूमध्ये अंतर्गत रचनेमध्ये जुन्या वारशाचा आभास निर्माण करून अनेक छोटेमोठे कार्यक्रम होतात. खराखुरा वारसा अत्यंत संवेदनशीलतेने वापरून ठरावीक चौकटीत बसणारे, वाडय़ाच्या मूळ रूपाला, स्थैर्याला, मालकीच्या हक्काला धक्का न पोहोचवणाऱ्या कार्यक्रमांची आखणी वाडय़ामध्ये झाली तर वास्तूचा वापर राहील.
कॉर्पोरेट जगातली काही संमेलने पुण्यापासून एक ते दीड तास अंतरावर असलेल्या अशा काही वाडय़ांमध्ये काही तासांसाठी आयोजित केल्यास त्यास एक वेगळे स्वरूप प्राप्त होईल. काही राजवाडय़ांच्या वास्तूचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘हेरिटेज’ या नावाखाली झाल्यावर त्याचा उपभोग विशिष्ट वर्गासच घेता येतो. राहणे-खाणेपिणे यांच्या सोयी राबवताना मूळ वारसा हळूहळू घासूनपुसून चकचकीत होतो व त्याचे ‘हेरिटेज’ मूल्य हळूहळू लुप्त होते. शाळेच्या सहली राजवाडय़ामध्ये आवर्जून नेल्या जातात.
त्याचे स्वरूप तसेच कायम राखून काही काळ, काही भाग महत्त्वाच्या बैठकांसाठी वापरणे सयुक्तिक ठरेल व गतकालीन वैभव हे फक्त संग्रहातील वास्तू अशा स्वरूपात न राहता त्याचा अनुभव सर्वाना निश्चितच आनंददायी ठरेल.
लिखाण:- अंजली कलामदानी
छायाचित्रे:- वरूण फाटक
No comments:
Post a Comment