किल्ले खानापुर (भवानीपुर)_एक अपरीचित गड़
अरे खानापुर हा किल्ला आहे?" वेड़बिड़ लागलंय का? आमच आयुष्य गावात गेलं.आम्हाला काही कळल नाही आणि तु म्हणतोय खानापुर हा किल्ला आहे"हे असचं काहीतरी कानावर पडल जेव्हा मी खानापुरच्या किल्याविषयी बोलतो.पण मी सांगीतलेली माहीती ऐकल्यावर मात्र समोरची व्यक्ती तोंडात बोटं घातल्यावाचुन राहत नाही खानापुरचा किल्ला भुईकोट प्रकारातील आहे मात्र सुरक्षेच्य दृष्टीने गाव बांधताना 40 ते 50 फुट ऊंचीचा ड़ोंगर तयार करून त्यावर गाव वसलेले आहे खानापुरचे जागतीक नकाशावर स्थान हे अक्षांश 17/17 उत्तर व रेखांश 75/45 पुर्व असे आहे खानापुर चा किल्ला 650 मी (1900 फुट )उंचीवर आहे.यांचे नेमके स्थान हे सह्याद्री पर्वतरांगेतील महादेवाला ड़ोंगर यांवर आहे याच महादेवाच्या ड़ोंगररांगेत अगदी शेवटी भुपाळगड़ (बाणुरगड़) किल्या आहे सध्या खानापुर हा सांगली जिल्ह्यातील तालुका आहे खानापुर किल्याची बांधुनी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.खानापुरात यायच असल तर चारही बाजून ड़ोंगर चढून यावं लागत .किल्ल्याची तटबंदि,बुरूज खंदा हे सर्व अगदि खोल अभ्यास करून बांधलेले आहेत गडाची तटबंदि जवळपास 30 ते 40 फुट उंचीची होती यामध्ये खालील 30 फुलाची दगडी तट वरील 5 ते 10 फुटाची तटबंदी मातीची होती .ही माती घाणीत मळलेली व चूना राख यांचे मिश्रण असलेली असल्याने दगड़ासारखी कठिण आहे या तटबंदिमध्ये 9 बुरूजांची रचना केलेली आहे किल्ला बांधताना सर्वप्रथम ही तटबंदि व बुरूज बांधुन घेतलेले आहेत नंतर यामध्ये पांढर माती भरली गेली ही माती भरत असतानाच अनेक पेव, आड़ ,विहित हे तयार केले गेले गावातील पेव जी धान्य पाठविण्यासाठी वापरली जात तिही अगदि पक्क्या बांधकामाची होती.ही माती भरत असतानाच गावाखालून पुर्व पश्चिम भुयार तयार केले गेले ज्याचा दरवाजा आजही गावातील राजवाड़्यात आहे तर अश्याप्रकारे माती भरल्यानंतर त्यावर वळवले गेले पड़लेल्या पावसाचे पाणी किल्यात थांबता कामा नये यासाठी ही माती भरताना तटाच्या बाजुला उतार केला गेला आजरोजी देखील गावात कोटेही पाणी थांबत नाही
वाडे:-
पुर्वी संपुर्ण खानापुरात वाडा पध्दत होती . क्वचित लोकांचि घरे हि साध्या बांधणिची होती. किल्ल्यातील बरेच वाडे पडलेले आहेत. बहुतेक वाडे एक चौकी तर काही वाडे दु चौकी होते. जवळजवळ प्रत्येक वाड्यात आड अथवा विहीर होती. किल्ल्यात पाण्याचा दुष्काळ कधिच नव्हता व आजही नाहि. सर्व वाड्यांच्या कमानी या अत्यंत सुंदर पध्दतीने तयार केल्या होत्या. दरवाज्याच्या वरिल भागात कुंभारी विटा वापरुन नक्षीकाम केल्याचे आढळते. सर्वात वरिल थरात किलवर आकाराची नक्षी,त्याखाली साखळी,त्याखाली दिवेलागणीसाठी देवड्या, देवड्यांच्या मधे कमानीच्या आकाराची नक्षी. या खाली मात्र पक्क्या घडिव दगडात मजबुत बांधणीचा दरवाजा असे या वाड्यांचे रुप होते. खालील थरात घोडी बांधण्यासाठी कड्या होत्या. यासाठी लागणारे सर्व दगड भडकेवाडी, घाटनांद्रे येथुन ऊपलब्ध झालेले असावेत. खाली दिलेले छायाचित्र हे किल्ल्यातील टिँगरे यांच्या वाड्याचे आहे. हा वाडा काही दिवसांपुर्वी रस्ता रुंदिकरणाच्या कारणाने पाडण्यात आला.
यालाच गावामध्ये आजरोजी हवेली म्हटले जाते किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी तोंड़ करून राजवाड़ा बांधलेला आहे किल्यावरील सर्वात उंच जागी राजवाड़ा असल्याने संपुर्ण किल्यातील हालचालीवर लक्ष ठेवता येते.याच राजवाड़्यात एक तळघर आहे जे दोनशे माणूस बसशील इतक मोठं आहे किल्ल्यावर राजवाड़ा ही एकमेव ईमारत दोन मजली होती पुर्वी राजवाड़्यावरूण प्रत्येक बुरूजावर संपर्क असायचा .याच कारणाने किल्ल्यात कोणत्याही मंदिरात कळस बांधायचा नाही व कोणीही आपल घर दोन मजली बांधायच नाही असा पुर्वी नियम होता याचं कारण म्हणजे बुरूज व राजवाड़ा यामध्ये काहीही येता कामा नये याच राजवाड़्याच्या तळघरातून भुयारात जाण्यासाठी दरवाजा आसे राजवाड़्याकड़े जाणार्या वाटा ह्या मुद्दाम अवघड वळणांच्या व लहाण केलेल्या आहेत जेणेकरून राजवाड़ा नवख्या व्यक्तीला सापड़तच नाही ही सर्व वैशिष्ट्ये या राजवाड़्यात आजही पहावयास मिळतात.
किल्ल्यातील रस्त्याची बांधुणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण केलेली आहे से रस्ते मिळून कसेही चौक तयार होत नाही समोरासमोरील दोन रस्ते यामध्ये थोड़ेतरी अंतर आहे यामूळे शत्रु हल्ल्यानंतर आपले लोक कूठे पळून गेले याच अंदाजच लागत नाही किल्ल्यावर पुर्वी वाड़ा संस्कृती होती जवळपास प्रत्येकाचा वाड़ा होता हे वाड़ेही आगदी खणकर बांधनीचे व नक्षीकाम असणारे होते प्रत्येक वाक्यामध्ये स्वतंत्र आड़ होता .किल्ल्यावर पाण्याची टंचाई कधीही नव्हती व आजही नाही किल्ल्यात धान्य साठवीण्यासाठी ठिकठिकाणी पेव तयार केलेली होती किल्ल्यात सरकार वाड़ा पुर्वी ईमारत होती या इमारतीचा वापर शाही पाहुण्यांच्या निवासा करीता केला जात होता हा वाड़ाही चिरेबंदि होता.किल्ल्याच्या बाहेर दोन चांगल्या स्थीतीतील समाध्या आहेत ज्या आज्ञात व्यक्तीच्या आहेत यापैकि एका समाधीवर छत्र आहे अशा समाध्या शक्यतो राजे लोकांच्या असतात
उदा.जिजाईसाहेब. (पाचाड़) शिवछत्रपती (रायगड़)
खंदक. :-
संपुर्ण गावाभोवती पुर्वी खंदक होता. किल्ल्याच्या शेजारून पापनाशी ओढा गेलेला आहे या ओढ्याचा वापरदेखील खंदकासारखा केलेला दिसतो. पुर्वी पापनाशी ओढ्याचे पात्र मोठे होते,सध्या अतिक्रमणामुळे ते लहान झालेले दिसते. हा ओढा पुर्व - पश्चिम असल्याने जवळपास अर्ध्या किल्ल्यास पापणाशीच्या रूपाने नैसर्गिक खंदक प्राप्त झालेला आहे ज्या बाजूस खंदक नाही त्या बाजूस मात्र 20-30 फुट रूंद व तितकाच खोल खंदक तयार केला गेला या खंदकात सतत पाणी खेळवलं जात. या मानवनिर्मीत खंदकाचे आजदेखील अवशेष सापडतात.
इतिहास :
किल्ला नेमका कोणी .केव्हा बांधला याबाबत पुरावा उपलब्ध नाही. पण खानापुर चा किल्ला पाचव्या शतकात अस्तित्वात होता याचा एक पुरावा सापडतो किल्ल्यात पाचव्या शतकातील ताम्रपट सापडला ज्यामध्ये रेठरे बुद्रुक.कुंतल या ठिकाणाच्या दिलेल्या दानांचा उल्लेख आहे .हा ताम्रपट राजा माधववर्मन पहिला यांचा आहे त्यामुळे खानापुर किल्ला 1500 ते 1600 वर्षांपूर्वी अस्तित्वात होता अस समजत.त्यानंतर 10 व्या ते 11 व्या शतकातील बसवेश्वरांच्या चिरित्रात किल्ल्याविषयी पुरावा सापड़तो 1631 मध्ये असदखनअनामक सरदाराच्या नेतृत्वाखाली विजापुरविरूद्ध मोहीम निघाली पण काही कारणानी असदखानाला माघार घ्यावी लागली त्यानंतर लगेचच निजामशाही सरदार सिध्दि रिहान मुहम्मद अदिलशाहाला जाऊन मिळाला. आदिलशाहाने त्याला खानापुर,कराड़ व कोल्हापूर जहाॅगीर म्हणून दिले 1678 मध्ये दिलेरखानाने संभाजी छत्रपतींबरोबर भुपाळगड़ाची मोहीम मांडली या दरम्यान खानापुरात संभाजी महाराज राहीले होते.फलटनच्या मुधोजी नाईक निंबाळकरांचा नातु अमृतराव नाईक निंबाळकर याला फलटण परगण्यातील या (खानापुराची व सावर्ड़े या गावची)देशमुखी होती संतजींचा खुन करणार्या नागोजी मोनेचा अमृतराव हा मेहुणा होता 1692 मध्ये राजाराम महाराजांनी फलटणचे वेतन याला दिले अमृतराव हा शुगर,पराक्रमी मतलबी व धुर्त होता ऐवारकुटीच्या लढाईत अमृतराव मारल गेला .
माती:-
माती कोणतीहि असो त्यामध्ये बिया रुजतातच.पण खानापुर किल्ल्याच्या बांधणीसाठी मातीचे जे मिश्रण वापरले आहे,त्यामध्ये गवत सुध्दा ऊगवत नाही.
बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीसाठी दगडांचा वापर केल्याचे आपण पाहतो. तटबंदी असो वा बुरुज भक्कम बांधकामासाठी ऊच्च प्रतीचा दगड वापरला जातो. याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी व बुरुज ढासळलेले आपण पाहतो. खानापुर हा असा दुर्ग आहे ज्याच्या बांधणीत फार कमी दगडांचा वापर केला आहे. गणेश बुरुजाची ऊंची जवळपास 60 फुट आहे त्यापैकी तळातील अंदाजे 10 फुट बांधकाम सोडले तर वरील सर्व बांधकाम मातीचे आहे.तटबंदिचीही अशीच अवस्था.ईतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरुन देखील त्यामध्ये गवत अथवा ईतर झाडे वाढली नाहीत हे आश्चर्यजनक आहे.जर का झाडेझुडुपे वाढली असती तर हा अजस्र गणेश बुरुज देखिल केंव्हाच ढासळला असता. ओढ्याशेजारील बुरुजावर झाडेझुडपे आहेत पण ती बुरुजावरील भुसभुशीत मातीत ऊगवली आहेत हेहि ध्यानात घ्यावयास हवे. प्रश्न असा निर्माण होते कि 1500-1600 वर्षांपुर्वी अस कोणत तंत्रद्नान या मातीच्या निर्माणासाठी वापरल होत कि ज्यामुळे हि माती दगडापेक्षाही दणकट बनवली गेली.आज ईतक्या वर्षांनंतरही या मातीत गवत देखील ऊगवत नाही.
या अप्रतिम दुर्गाच्या निर्माणकर्त्यांना मानाचा मुजरा.
पाचव्या शतकातील खानापूर ताम्रपट:-
खानापूर किल्ला किती प्राचीन असेल हे सिद्ध करण्यासाठी मला या ताम्रपटाचा आधार द्यावा लागेल. सदर ताम्रपट हा विष्णुकुंडीन वंशातील राजा माधव वर्मा प्रथम याचा आहे.महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा ताम्रपट खूप महत्वपूर्ण आहे. प्रा. मिराशी यांना हा ताम्रपट खानापूर गावातील श्री दादासाहेब माने यांचेकडे मिळाला. हा एकच ताम्रपट नसून त्याचे एकूण तीन पत्रे होते पैकी पहिला पत्रा गायब होता तर दुसरा व तिसरा पत्रा उपलब्ध होते. तिन्ही ताम्रपटाना जोडणारी कडी नसल्याने पहिला पत्रा गहाळ झाला.
ताम्रपटाचे वर्णन ( रूपरेषा) :-
पहिला पत्रा व त्याची कडी गायब आहे. दुसऱ्या पत्र्याच्या दोन्ही बाजूवर लेख आहे पण काळाच्या ओघात याचा वरचा व खालचा भाग मोडून नष्ट झाले आहेत. दुसरा पत्रा २७.६x१४.९ अशा मापाचा आहे. तिसऱ्या पत्र्याच्या एकाच बाजूवर लेख आहे व त्याचे माप १०.९x५.६ असे आहे. ताम्रपट वरील अक्षरे ओबडधोबड व निष्काळजीपणे लिहलेले आढळतात परिणामी यात बऱ्याच चुका आहेत. उदा. ऋ शब्दासाठी री तर च्छ साठी फक्त छ लिहला आहे.
ताम्रपटाचा सारांश :-
ताम्रपट म्हणजे एक दानपत्र आहे. विष्णुकुंडीन राजा माधव वर्मा याने काही ब्राम्हणांना गावे व घाट दान केलेले होते याचा उल्लेख सदर लेखात आहे. या सर्व गावांना व घाट यांना त्याकाळी वेगळी नावे होती. यातील गावांचे उल्लेख पाहू. कृष्णवेणा नदीच्या आग्नेयेस रेट्टरक हे गाव वांकतीर्थ , स्थंभतीर्थ व कदंबतीर्थ या घाटांसह दान केले होते.
त्याचबरोबर वेलवटिका, कोलिकावटिका आणि व वात्तरिका या वाड्या देखील दान केल्या होत्या.तसेच रेट्टरक गावाच्या वायव्येस मच्छदर्या, देविभिर्या आणि सेणवर्या आग्नेयेस कोलिका आणि पश्चिमेस मलखेटक ही गावे दान केली होती. वरील सर्व गावे व वाड्या आजही अस्तित्वात आहेत त्यांची सध्याची नावे पाहू.
रेट्टरक – रेठरे बुद्रुक
मच्छदर्या – राजमाची
सेणवर्या- शेणोली
कोलिकावटिका – कोलावडे
स्थंभतीर्थ- तांबवे
कदंबतीर्थ – खुबी
वेलवटिका – बेलवडे
कोलीका – कोला
वात्तरिका- वाठार
सर्व गावे व वाड्या ताम्रपटात दिलेल्या दिशेस आहेत. व त्याचमुळे त्यांचं स्थलनिर्देशन सोप होत.
ताम्रपट वर कुठेही तारखेचा उल्लेख नाही बहुधा तो पहिल्या पत्र्यावर असावा. ज्या ब्राम्हणांना हे दान दिले त्यांचे गोत्र यात दिले आहे, त्यापैकी बोलस्वामी नावाचा ब्राम्हण शालंकायन गोत्राचा होता तर केशवस्वामी हा भारद्वाज गोत्राचा होता. ताम्रपटाचा लेखक हा श्रध्दाळू व धर्मशील कायस्थ श्रीपाल होता. यात बोलस्वामीला श्रुतीस्मृतीविरहित सनातनधर्मकर्मनिष्ठ अस बिरूद लावलेले दिसते. महत्वाची गोष्ट अशी की सध्या प्रचलित असणाऱ्या #सनातन धर्माचा उल्लेख पाचव्या शतकातील खानापूर ताम्रपटात असणे उल्लेखनीय आहे.
ताम्रपटात माधववर्माने केलेल्या पराक्रमाचा उल्लेख आहे. राजा माधववर्माने १००० अग्निष्टोम, ११ अश्वमेध तसेच बहुसुवर्ण, प्रधिराज्य, राजसूय, वाजपेय , पुडरिक, पुरुषमेध, शोडशी, प्राजपत्या इत्यादी यज्ञ केल्याचे उल्लेख आहे.
राजा माधववर्मा:-
ताम्रपट मधील वर्णनावरून हा राजा पराक्रमी होता असे दिसते, कारण ११ अश्वमेध यज्ञ केलेला दुसरा कोणताच राजा नाही. याचा विवाह वाकटकांच्या राजकन्येशी झाल्याचा उल्लेख माधववर्मा च्या नातवाच्या ताम्रपटात आहे. वाकटकांचा शेवटचा राजा हरिषेन याच्या मृत्यूनंतर त्याचे संपूर्ण राज्य या माधववर्माला मिळाले. माधववर्माने स्वतःचे तसेच वाकाटक यांचे राज्य मोठ्या कर्तबगारीने सांभाळले. त्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रापासून ते आंध्रप्रदेश पर्यंत तसेच उत्तरेकडील छत्तीसगढ पर्यंत होते. माधववर्मा ला सार्वभौम, सूर्याप्रमाणे तेजस्वी, इंद्राप्रमाणे ऐश्र्वर्यवन, चार वर्ण आणि चार आश्रम यांच्या मधील धर्मकारमरूप सेतू, महाराजाधिराज अशी बिरुदे होती.
खानापूर गावी सापडलेला हा ताम्रपट अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या मुळे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील सामाजिक तसेच राजकीय घटनांवर प्रकाश पडतो.
मां साहेब दर्ग्यातील शिलालेख :-
खानापूर गावात मध्यभागी एक दर्गा आहे ( दर्गा की मंदिर याची चर्चा नंतर करू). या दर्ग्यात दोन दरवाज्यात दोन शिलालेख आहेत. यातील एक कन्नड तर दुसरा अरबी मध्ये आहे. पैकी अरबी चे वाचन करून त्याचा अर्थ समजून घेऊ. दर्ग्यात दक्षिणेला मां साहेबाचे थडगे तर पश्चिमेला ३६ दगडी खांबाचा सभामंडप आहे. संपूर्ण दर्गा हिंदू मंदिराच्या अवशेषांवर उभा आहे.
शिलालेख सुस्पष्ट व सुवाच्य आहे. अरबी आणि फार्सी मध्ये खूप अक्षर सारखी असतात त्यामुळे वेगळेपण ठरवणे तसेच नुक्ते(वेगळेपण दाखवणारी चिन्ह) दिलेले नसल्याने शिलालेख वाचणे अवघड जाते.
शिलालेखाचे मराठी भाषांतर:- साल ७२५ मध्ये झहीर – अल – अल्वी याचा उत्तराधिकारी शमसुद्दिन याच्या आज्ञेने सुलतान तुघलक शाह याचा मुलगा जो राष्ट्राचा मुकुटमणी आहे अशा महान सुलतान अबुल मुजाहिद मुहम्मद शाह याच्या जहागिरीत ही पवित्र आणि शुभदायक वास्तू बांधली. देवाच्या कृपेने मशीद चिरायू होवो.
शिलालेखाचा कालखंड:-
शिलालेखात तारखेचा एकच उल्लेख सापडतो तो ही त्या वर्षाचा. त्यात कोणताही दिवस अथवा महिना दिलेला नाही. शिलालेख अरबी असल्याने त्यातील सालही मुसलमानी पद्धतीचे आहे. यात दिलेले ७२५ हे अरबी साल आहे. त्याचे रूपांतर इसवी सनात करायचे तर ढोबळ मानाने ६०० मिळवावे लागते. म्हणजेच हा शिलालेख इसवी १३२५ मधील आहे.
लोकांत असलेले गैरसमज :-
इथली लोक सर्रास बोलतात की या दर्ग्यात मुहम्मद तुघलक ( गझनीचा येडा मुहम्मद) याची समाधी आहे . याला एकमेव कारण ASI (Archeological survey of India) यांची अपुरी माहिती आहे व इंग्रजीचे अज्ञान हे आहे. ASI सांगते “ The mosque was constructed in 14th century during paramount period of Muhammad tughalaq”. यातील mosque चा अर्थ प्रार्थनास्थळ अथवा मशीद असा न घेता तो समाधी असा घेतला गेला . खरे पाहता ही मशीद मुहम्मद तुघलक याच्या काळात बांधली पण त्याची इथे कोणतीही समाधी नाही, त्याची समाधी गुजरात मधील ठठ्ठा येथे आहे.
हिंदुस्थानवर सत्ता गाजवणाऱ्या प्रसिध्द मुस्लिम शासकांपैकी एक असणाऱ्या या मुहामदाचा हा शिलालेख मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधनात महत्वाची भूमिका बजावतो.
खानापुरात मिळालेले बहामनी नाणे
दिनांक ३१/१०/२०१६ रोजी खानापुर मध्ये एक नाणे माझ्याकडे आले. यात अरबी मध्ये मजकुर आहे. यातील मजकुर वाचल्यानंतर हे नाणे महम्मद शहा तिसरा लष्करी याचे आहे असे समजले. याचा जन्म ३० जुलै १४६३ व मृत्यु २६ मार्च १४८२ .
यालाच शम्स-ऊद-दिन-महम्मद शाह अस देखील म्हटल जायच. हुमायुन शहा याच्या वडिलाच नांव.
महम्मद शहा याच्या नाण्यात आलेला मजकुर पुढीलप्रमाणे
एक बाजू
"अल मुतासीम बिल्लाह शाम्स अल दुन्या वाल दिन"
दुसरी बाजू
"मुहम्मद शाह बिन हुमायुन शाह अल सुलतान"
अर्थ
सुलतान हुमायुन शाह याचा पुत्र मुहम्मद शाह याला देवाकडुन हे नांव व नाणे प्राप्त झाले.
त्याचा भाऊ निजाम-उद-दीन अहमद यांच्या मृत्यूनंतर त्याला राज्याच्या गादीवर बसावं लागलं. यावेळी तो ८ किंवा ९ वर्षांचा होता.
या महम्मद शहाचे लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झाले.
मलिक ऊत्तुजार महम्मद गवान हा यावेळी वजिर-ए-आलम होता . यावेळी बहामनी सत्ता यशाची शिखरे गाठत होती. याकाळात बहामनी सत्ता बंगाल पासुन ते अरबी समुद्रा पर्यंत होती. तर अशा या बहामनी सुलतानाचे नाणे खानापुर सारख्या गावात सापडणे ही संशोधनाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. १९२७ साली याच खानापुरात विष्णुकुंडीन राजा माधववर्मा याचा ताम्रपट सापडला ज्याने प्राचीन ईतिहासाच्या संशोधनात खुप मोठा वाटा दिला. अशा अनेक गोष्टी या मातीत सापडु शकतात गरज आहे ती शास्त्रीय पद्धति ने संशोधन करण्याची.
खानापुर भोवताली असणारी माती( रक्त स्तर ):
खानापुरच्या परिसरात आढळणाय्रा लाल मातीचा विचार करणे गरजेचे आहे . या मातीला शास्त्रीय भाषेत "रक्त स्तर" (Red Beds ) म्हणतात. हे रक्त स्तर फक्त याच भागात आढळतात. हे रक्त स्तर तृतीयक काळात तयार झाले. तृतीयक काळ म्हणजेच चार ते पाच कोटि वर्षांपुर्वीचा काळ. हवामान अर्धशुष्क असताना आद्य तृतीयक जांभा खडकापासुन अंशत: आणि नंतर उत्तर तृतीयक काळातील मृदा अवसादन प्रक्रियामुळे तयार झाले असावेत. यांना पुराभुआकार (Palaeogeomorphic), पुराहवामान (Palaeoclimatic), आणि विवर्तनकिय (Palaeotectonic) अभ्यासाच्या दृष्टिने महत्व आहे. या रक्त स्तरांमध्ये ढोबळ स्तरिकरण, क्रमित स्थर निर्मिती आणि अवसादिकरणाची इतर वैशिष्ट्ये दिसुन येतात. या थरांमध्ये माँटमोरोलिनाईट, नॅट्रोनाईट, केओलिनाईट, हेमटाईट, गोएथाईट आणि अल्कली मृत्तिकांचिही गाढता आढळते.
मुख्य म्हणजे हा रक्त स्तर फक्त खानापुर परिसरातच आढळतो. कोकणात अथवा ईतर ठिकाणी आढळणाय्रा खडकाला जांभा खडक म्हणतात.
खानापूर गावातील गणेशमूर्ती:
स्वदंत दक्षिंनम हस्ते परशुं चापरे करे।
उत्पलं वामहस्ते च मोदक तस्याध: स्थितं
उजव्या हातात एक दात त्याच्या वरच्या हातात परशु (कुऱ्हाड) वरच्या डाव्या हातात कमळ आणि त्याच्या खालील हातात लाडू धारण केलेला हा गणेश.
वरील श्लोकानुसार वर्णन असणारी ही मूर्ती खानापूर गावाच्या बाहेर तलावावर पडलेली आहे.
डोक्यावर मुकुट, पायात तोडे आणि अर्धपर्यकासनात ही मूर्ती आहे.
दगडी परात:-
काही वर्षांपूर्वी पांढऱ्या मातीच घर पाडलं आणि त्यात या दगडी परातीचे अवशेष सापडले ( शिवकालीन नाही😂). खानापूर गाव विष्णुकुंडीन काळातील असल्याने ही परत शिवकालामागे नेते. सध्या steel किंवा तत्सम धातूच्या पराती प्रचलित आहेत पण पूर्वी धातू पेक्षा दगड आणि लाकडी वस्तूं पासून या गोष्टी बनवल्या जात.
या परातीला काटवट देखील आहे. काटवट यासाठी की पूर्वी परातीत कणिक मळताना परातीवर पकड घट्ट व्हावी म्हणून दोन्ही बाजूला पायाचे अंगठे लावीत. हे अंगठे लावण्यासाठी ही काटवट. दुसरं कारण एक अस की परात मुळात गोल असते तर ती उभी करून ठेवल्यावर गोल फिरून पडत नाहीत व काटवट मुळे ती एका जागी राहते. या परातीच्या कडा उंच आतील भाग सपाट व मागील बाजू सपाट कोरीव आहे.
ओंकार खंडोजी तोडकर
No comments:
Post a Comment