विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 January 2021

संक्रांत आली की पानिपत आठवतं

 

पानिपत रणसंग्रामात वीरगतीस प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा 
लेखन 
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
१४जानेवारी पानिपताची लढाई झाली. एक लाख बांगडी फुटली ,२७ मोहोरा गळाल्या, २ मोती तुटले, पालखीचा गोंडा निखळला चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतिच नाही. या सर्व वीरांना आमचा मानाचा मुजरा

संक्रांत आली की पानिपत आठवतं...
पुर्वजांचं स्वराज्यासाठीचं तळहातावर शिर घेऊन केलेलं बलीदान अंगावर शहारे देऊन जातं...
अनेक शतके होऊनही ऊभे असलेले बुलंद किल्ले दिसतात...
धारातिर्थि पडलेल्या शुरांच्या वास्तु/ वाड्यांचे झालेले संग्रहालय, छातीत अभिमानासोबत वेदना देऊन जातात...
मनावरच्या जखमा पुन्हा भळभळून वहायला लागतात...😪
त्यामुळे नाही द्याव्याशा वाटत संक्रांतीच्या शुभेच्छा.....⛳
१४ जानेवारी १७६१, पानीपत रणसंग्राम.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेला स्वराज्याचा गाडा पुढे हाकत असताना अनेक सरदारांनी मराठ्यांच्या साम्राज्याकरिता आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. त्यात अनेक घराण्याच्या शाखा स्वराज्यकामी खर्ची पडल्या.
अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेल्या तिस-या पानिपत युद्धामुळे सारा मराठी मुलुख काळोखात गेला होता. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीसह नजिबखान रोहिला, सुजाउद्दोला, सुरजमल जाट यांनी दिल्लीच्या तख्तासाठी पानिपतच्या पलिकडे यमुनापार तळ ठोकला होता. त्याला विरोध करण्यासाठी मराठ्यांची फौज दिल्लीच्या रोखाने निघाली. पानिपतचे युद्ध हे दिल्लीचा मोगल बादशहा व अफगाण बादशहाच्या दरम्यान होत असताना त्यात मराठ्यांनी भाग का घ्यावा असा प्रश्न विचारला जातो. परंतु आपणास माहीत हवे की मराठे आणि दिल्लीच्या बादशहादरम्यान ‘अहमदिया करार’ झाला होता.
बादशहाकडून मराठ्यांना चौथाई -सरदेशमुखी मिळाली होती. त्याबदल्यात दिल्लीचे तख्त राखणे ही मराठ्यांची जबाबदारी होती. खरे तर मराठ्यांना हिंदुस्थानच्या सीमा पाकिस्तानच्या पलीकडे अटकेपार न्यायच्या होत्या. अब्दालीला विरोध करण्याकरिता भाऊसाहेब पेशवेंच्या नेतृत्वाखाली १ लाखाचे सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. त्यात बळवंतराव मेहेंदळे, नाना पुरंदरे, हरी शिवराम खासगीवाले या मुख्य सरदारांसोबत विठ्ठल शिवदेव, अंताजी माणकेश्वर, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, खंडेराव नाईक निंबाळकर, इब्राहिमखान गारदी या खासा सरदारांचा समावेश होता.
१४ जानेवारी १७६१ म्हणजे ऐन संक्रांतीचा दिवस असूनही युद्धाला तोंड फुटले. नजिबखान रोहिल्याने आपल्या तोफखान्याने मराठ्यांवर चाल करत मागे रेटण्यास सुरुवात केली. तेव्हा मराठे चवताळून उठले. इब्राहिम खान गारदीने आपल्या तोफांतून आग ओकायला सुरुवात केली. मराठ्यांच्या फौजेत हुजुरातीची म्हणजे घोडेस्वारांची ५२ पथके होती. यामध्ये अनेक सरदारांचा समावेश होता.
मराठ्यांच्या फौजेतील वेगवेगळे सरदार आपापल्या परीने पराक्रमाची शर्थ करत होते. त्यामुळे दुपारपर्यंत मराठ्यांचा विजय दृष्टिक्षेपात दिसत होता. या वेळी बळवंतराव मेहेंदळे घोड्यावर बसून आपल्या तुकडीला उत्तेजन देत पुढे सरसावत होते.त्याच वेळी शत्रूची एक गोळी मेहेंदळेंच्या छातीस लागून ते ठार झाले. त्यामुळे मराठ्यांच्या फौजेत एकच गोंधळ उडाला. बळवंतराव मेहेंदळेची तुकडी मागे सरकली तेव्हा त्यांचे शीर कापून अब्दालीस नजर करावे म्हणून रोहिले पुढे सरसावले. आपल्या सरदारांची विटंबना होऊ नये म्हणून खंडेराव नाईक-निंबाळकर या मराठा सरदाराने केवळ सती पडावे तसे बळवंतराव मेहेंदळेंच्या मुडद्यावर पडून त्यांचे शीर रोहिल्यास कापू दिले नाही. इतिहासात त्यांच्या पराक्रमाची नोंद करताना पुढील शब्दांत दखल घेतलेली आहे. खंडेराव नाईक-निंबाळकर हे निदान खानदानी माणूस याप्रमाणे कामास आले. त्यांना जखमा झाल्या तरी बळवंतराव मेहेंदळे यांचा मृतदेह ओढीत मराठी सैनिकांच्या गोटात आणून त्यास मूठमाती दिली.निदान खानदानी माणूस कामास आले. याप्रमाणे उल्लेख करून इतिहासाने त्यांचे धाडस, शौर्य स्पष्ट केले आहे.
पानिपतच्या रणसंग्रामाची चर्चा करत असताना पराक्रमासोबतच दैवाचा कौलही पाहावा लागतो. दुपारी २ वाजेपर्यंत मराठ्यांनी शत्रूच्या गोटात मुसंडी मारत आपला विजय दृष्टिक्षेपात आणला होता. हुजुरातीच्या पथकाने यात फार मोठी कामगिरी बजावली होती. हातघाईची लढाई चालू होती. त्याच वेळी मराठ्यांच्या मुख्य सरदारांपैकी एक विश्वासराव पेशव्यांना गोळी लागून ते अंबारीत कोसळले आणि मराठ्यांचे मुख्य शिलेदार भाऊसाहेब पेशव्यांचा तोल ढळून ते हत्तीवरून घोड्यावर बसून शत्रूवर चाल करून गेले व गर्दीस मिळाले. सा-या महाराष्ट्रावर संक्रांत कोसळली. मराठ्यांची एक लाख बांगडी फुटली. दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही .... त्या दिवशी झालेल्या नरसंहारात मुडद्यांच्या ३२ राशी युद्धभूमीवर पडल्या. या २७ मोहोरा मध्ये एक देह हा खंडेराव नाईक निंबाळकरांचा ही होता.
अब्दालीचा बंदोबस्त करण्याकरिता १७५८ साली राघोबादादांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजा लाहोरपावेतो जाऊन पोहोचल्या. या वेळी २० एप्रिल १७५८ साली मराठ्यांनी लाहोरचा कब्जा मिळविला होता. या वेळी खंडेराव नाईक निंबाळकरांनी मोठा पराक्रम गाजविला होता.
पानिपत युद्धाची कारण मीमांसा करताना यामध्ये मराठ्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला व मराठ्यांची एक पिढी गारद झाली असे म्हटले जाते. परंतु हेही वास्तव स्वीकारणे भाग पडते की, पानिपतावर मराठ्यांना अपयश जरूर आले असेल तरी हिंदुस्थानचा त्यातही मोठा फायदाच झालेला आहे. कारण मराठ्यांनी तुडविलेल्या भूमीतच आजचे हिंदू शिल्लक आहेत हेही कोणी विसरू नये. कारण पानिपतची रणभूमी वीरांच्या रक्ताने माखलेली असून केवळ आपल्या सरदारांच्या प्रेमाची विटंबना थांबविण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान त्या भूमीत रुतलेले आहे. या पराभवाचा सर्वांत मोठा फायदा जर कोणता झाला असेल तर अब्दालीसारखे अफगाणिस्तानातले मुस्लिम आक्रमक पुन्हा म्हणून हिंदुस्थानच्या भूमीत फिरकले नाहीत.
आजपासून २५८ वर्षांपूर्वी हरयाणातील पानिपतावर लाख सव्वालाख माणसं उपाशी बसलेली होती. महिन्याभरापासून त्यांची आबाळ सुरू होती. खायला पुरेसं अन्न नव्हतं की थंडीत ल्यायला पुरेसे कपडे नव्हते. तरीही अशा ह्या अर्धपोटी लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच एका प्रखर लढाईला सुरवात केली. त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या एका बलाढ्य शत्रूवर त्यांनी प्राणपणाने हल्ला चढवला.
मराठे, अनेक जातीचे मराठे होते त्यांच्यात. पाटील होते, देशमुख होते, शिरोळे,गायकवाड,मोहिते , पाटणकर ,चित्पावन होते, धनगर होते, देशस्थ, कऱ्हाडे, कुणबी, महार, माळी, तेली, कोळी, वंजारी सगळे होते. मुसलमानही होते.
अशी किती नावे घ्यावी.मराठी पठारावरचे असे एकही गाव नाही , एकही घर नाही, उंबरठा नाही, अशी एकादी जात, पोटजात,बलुता नाही सारा महाराष्ट्र पानिपतावर मौजुद होता.सार्या राष्ट्रालाच विधात्याने साकडे घातल्याचे पाहून आपलेसुद्धा नेत्र पाणावल्याशिवाय रहात नाहीत. या वीरांच्या आसवात आम्हाला वारणा, पंचगंगा , कृष्णा, कोयना , माण भीमा , मुळा, मुठा, इंद्रायणी मीना, कुकडी, गोदावरी या पवित्र नद्यांचे जल उभे राहिलेले दिसतात.
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असले शिवधनुष्य कधीच टाकले नसेल ! अशी झुंज ह्या आधी कधी झाली नसेल .असा प्रसंग ,असा पेच पुन्हा कधी होणार नाही . या लढाईत आपण सर्वांनी पवित्र राष्टधर्मरक्षणासाठी उडी घेतली आहे. आपला शत्रू कितीही मोठा असला तरी आपले ध्येय त्याहून महान, पवित्र आणि सच्चे होते. दिल्लीच्या रक्षणासाठी उभा महाराष्ट्र देश या पानिपतावर अवतरला होता.
महाराष्ट्र देशातून चालताना पुढे राज्यकर्त्यांना अनेक संकटे येत होती. पानिपतच्या प्रलयाने गावेच्या गावे झोडपली जात होती. वाटेतल्या प्रत्येक गावातले शंभर-दीडशे माणूस पानिपत वर गेले होते. जे जगून वाचून आले होते, ते देव्हारा धरून बसले होते.जे अंध जखमी होऊन आले, त्यांच्यावरून भातमुटके ओवाळून सारे घरदार त्यांचा सांभाळ करीत होते. परंतु काहींचा पत्ताच लागत नव्हता. युद्धात गमावले की पळाले, की भलत्याच वाटेला लागून साधू बैरागी झाले,कशाचीच दाद लागत नव्हती. पार्वतीबाईसारख्या कित्येक स्रिया मळवट भरून घरधन्याची वाट बघत बसल्या होत्या.कोणत्याही गावावरून लष्कर पुढे चालले की,निम्या गावाचे धावणे लष्कराच्या मागे लागायचे.'आमच्या पोराचे काय झाले?' म्हणून वृध्द आई वडील धाय मोकलून रडायचे. घरचा एक माणूस गेला तर येणारा एक सण टाळायचा ,हा मराठी मातीचा शिरस्ता. पानिपतावर संक्रांत ओढवल्यापासून मात्र आलेले सारेच सण वांझ गेले. गावोगावच्या चैत्री यात्रा भरल्या नाहीत. खोरीच्या खोरी मुकी झाली. ओल्या दुष्काळाप्रमाणे गारठलेला महाराष्ट्र देश बघून गलबलून गेला.
संक्रांतीला महाराष्ट्र एकजूट होऊन मराठा म्हणून लढला. बरोबर मध्यप्रांतालाही घेतलं. बुरांडी घाटावर पडलेल्या दत्ताजी शिंद्याचा अपमान पुण्यात बसलेल्या नानासाहेब पेशव्याच्या मनाला झोंबला. पेशव्याच्या नैतृत्वाखाली लढायला मल्हारबा होळकरांना वाईट वाटलं नाही. जरीपटक्याखाली जमलेल्या सैन्यात जाती पाळल्या जात नसतीलच असं नाही पण तरी त्या सैन्यात जातींच्या भिंती नव्हत्या.आयुष्य फार साध आणि
सरळ होतं.
१४ जानेवारी १७६१ च्या संध्याकाळी ज्यांची कत्तल झाली, ती मराठे म्हणून झाली. जे कैदी पकडून नेले गेले, त्यांना आजही मराठा बुगती आणि मराठा मारी म्हणतात.त्यांच्या जाती विरघळून गेल्यात, इतकंच काय धर्मही विरघळून गेलाय पण मराठा ही ओळख अजूनही कायम आहे.
पानपतच्या युद्धाला Third battle of Panipat म्हणतात, ती एक लढाई होती जी मराठे हरले. पण मराठे युद्ध मात्र जिंकले. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला की तो परत कधीच भारतात आला नाही. अफगाण सैन्याच इतकं नुकसान झालं की त्यांना भारतात राज्य करणे हा फायद्याचा व्यवहार वाटलाच नाही.
पानिपतानंतर अवघ्या दहा पंधरा वर्षात महादजी शिंद्यांनी नजीबखानाची कबर खोदून काढली. दिल्लीत पुन्हा मराठयांच्या शिक्याने बादशहा राज्य करू लागला. पानिपतानंतर कमीत कमी ३०,३५ वर्ष, मराठे - मराठे म्हणूनच लढले.
कोणतेही युद्ध हे खरेतर फसलेले राजकारण असते. युद्ध म्हणजे आपापल्या हितासाठी झगडणाऱ्या दोन विचारांचा संघर्ष. "मराठा" हा एक विचार होता, छत्रपतींनी दिलेला. ह्या विचारातूनच महाराष्ट्र घडला.
या संक्रांतीला जेंव्हा आपण, एकमेकांना तिळगुळ देऊ, गोड गोड बोला असं म्हणू, तेंव्हा 258 वर्षांपूर्वी त्या थंड मैदानावर खंदकात काकडून बसलेल्या, आणि दुसऱ्या दिवशी रक्ताळून तिथेच धारातीर्थी पडलेल्या तुमच्या नि माझ्या पूर्वजाची आठवण नक्की ठेवा. तो तिथे मराठा म्हणून गेला होता आणि मराठा म्हणूनच मेला होता.
कौरवपांडव संगरतांडव
द्वापरकाली होय अती ;
तसे मराठे गिलचे साचे
कलीत लढले पानपती ।।
🙏 अशा या पानिपताच्या रणांगणावर धारातिर्थीपडलेल्या शूर योद्ध्यांना आमचा मानाचा मुजरा 🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...