विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 January 2021

बडोद्याचा लक्ष्मीविलास राजवाडा

 









बडोद्याचा लक्ष्मीविलास राजवाडा
- पवन साठे, वारणानगर
(७८८७३३२२२२)
महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द समजून घेण्याच्या प्रवासातील प्रत्येक दिवस महाराजांच्या व्यक्तिमत्वातील नव्या पैलूंचे दर्शन घडवितो. १४२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बडोद्याच्या जगप्रसिद्ध लक्ष्मीविलास राजवाड्याची पायाभरणी झाली होती. हा राजवाडा म्हणजे आधुनिक भारताचा नवा मानदंड निर्माण करणाऱ्या अनेक उपक्रमांची ‘पंढरी’ आहे. म्हणूनच यानिमित्ताने या राजवाड्याच्या इतिहासाची उजळणी आपल्याला उर्जा देणारी ठरेल.
लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामास १२ जानेवारी १८८० मध्ये सुरुवात झाली. दहा वर्षांनंतर १० फेब्रुवारी १८९० रोजी सयाजीराव या राजवाड्यात राहण्यास गेले. इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या Buckingham Palace, England च्या चौपट मोठा आहे. हा लक्ष्मीविलास राजवाडा एकूण ७४४ एकर इतक्या जागेवर विस्तारला होता. राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची अंदाजे २०४ फूट असून राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ ६०,००० स्क्वेअर फूट आहे. राजवाड्याची उत्तर दक्षिण लांबी ५१२ फूट असून पूर्व-पश्चिम रुंदी २०० फूट आहे. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामासाठी सुमारे पन्नास लाख रुपये खर्च आला. महाराजांच्या पहिल्या पत्नी लक्ष्मीबाई (महाराणी चिमणाबाई पहिल्या) यांचा यादरम्यान १८८५ मध्ये मृत्यु झाला. त्यांची आठवण म्हणून या राजवाड्याला ‘लक्ष्मीविलास’ हे नाव देण्यात आले.
इंडो-सार्सेनिक स्थापत्यशैलीवर आधारलेला लक्ष्मीविलास राजवाड्याचा आराखडा मेजर चार्ल्स मॉन्ट या ब्रिटीश अभियंत्याने तयार केला होता. हा आराखडा तयार करताना राजवाड्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची काळजी मॉन्ट यांनी घेतली होती. चार्ल्स मॉन्ट यांच्या नेतृत्वाखाली राजवाड्याचे बांधकाम चालू असतानाच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युनंतर बडोद्याचे इंजिनिअर रॉबर्ट चिस्लो यांना राजवाड्याचे उर्वरित काम सोपवण्यात आले.
१७० खोल्या असणारा लक्ष्मीविलास राजवाडा तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता. पहिल्या भागात दरबार हॉल, डॉक्टरांचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, बिलियर्ड रूम इ.चा समावेश होता. दुसरा भाग महाराजांसाठी राखीव होता. तर तिसऱ्या भागात महिलांसाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सयाजीरावांनी आपल्या राजवाड्यामध्ये भारतातील पहिली विजेवर चालणारी लिफ्टदेखील बसवली.
राजवाड्याच्या बांधकामासाठी आग्रा येथील लाल दगड, पुणे येथील निळे दगड आणि राजस्थानमधील संगमरवरी दगडांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. राजवाड्यातील भिंतीवर प्लास्टर करण्यासाठी मद्रासहून कामगार बोलवण्यात आले होते. दरबार हॉलमध्ये व्हेनेशियन पद्धतीचे संगमरवरी दगडावरील नक्षीकाम बसवण्याचे काम व्हेनिसमधील मुरानो कंपनीचे १२ कामगार १८ महिने करत होते. दरबार हॉलमधील खांब, दरवाजे आणि जिन्याच्या पायऱ्यांवर बसवण्यासाठी कारारा प्रकारचा संगमरवर दगड आयात करण्यात आला होता. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामात करण्यात आलेला काचेचा वापर हा तत्कालीन भारतातील एखाद्या वास्तूसाठीचा सर्वात जास्त वापर होता. रंगकाम केलेल्या या काचांवर भारतीय पौराणिक कथांची चित्रमालिका रेखाटण्यात आली होती.
राजा रवी वर्मा हे केरळमधील महान चित्रकार होते. बडोद्याचे दिवाण सर टी. माधवराव यांनी त्यांना बडोद्यात आणले. त्यावेळी लक्ष्मीविलास राजवाड्याचे बांधकामही संपत आले होते. राजवाड्याचा दरबारगृह सजवण्यासाठी महाराजांना राजा रवी वर्माकडून काही तैलचित्र तयार करून हवी होती. त्यात भारतीय संस्कृतीच दर्शन घडवणाऱ्या रामायण, महाभारत, पुराणे यातील कथांवर आणि प्रसंगांवर आधारलेली चित्रे त्यांना अपेक्षित होती. त्याच वेळी राजवाड्याच्या दरबार हॉलसाठी १२-१४ चित्रांची आवश्यकता सर टी. माधवरावांनी व्यक्त केली. ही चित्रे काढण्यासाठी भारतभर अभ्यास पर्यटन करावे लागणार होते. यासाठी राजा रवी वर्मा आपले बंधू राज वर्मा यांना सोबत घेऊन ३-४ महिने भारत भ्रमंती करून आपल्या मूळगावी किलीमानूरला आले. परंतु या चित्रांसाठीचा त्यांचा अभ्यास समाधानकारक झाला नव्हता. ते थोडे निराश झाले. परंतु त्यांचे चित्रकार मामा राज वर्मा यांनी त्यांना ‘तुझ्या कल्पनेप्रमाणे तू रामायण, महाभारत सादर कर’ असा सल्ला दिला.
राजा रवी वर्मांनी या कामाला स्वतःला झोकून दिले. पौराणिक कथेतले एक एक चित्र पूर्ण करत चौदा चित्रे पूर्ण झाली. त्यासाठी त्यांनी व्यास-वाल्मीकी, नल-दमयंती, अर्जुन-सभ द्रौपदीवस्त्रहरण, हरिश्चंद्र-तारामती, सीतास्वयंवर, देवकी-कृष्ण, असे अनेक विषय निवडले होते. ही चित्रे पूर्ण झाली तेव्हा त्या कलाकृतींची त्रिवेंद्ममध्ये खूप चर्चा झाली. त्रिवेंद्रम महाराज आणि बडोद्याचे महाराज यांच्या परवानगीने त्या चित्रांचे प्रदर्शन प्रथम त्रिवेंद्रममध्ये भरविले गेले या प्रदर्शनाला शेकडो लोकांची गर्दी झाली. येणाऱ्या लोकांनी देवांची चित्रे म्हणून भाविकपणे चित्रांसमोर डोके टेकवून नमस्कार केले. त्रिवेंद्रमनंतर राजा रवी वर्मा मुंबईला आले. महाराजा सयाजीरावांच्या परवानगीने त्यांनी मुंबईत त्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. मुंबईत हजारो लोकांनी ही चित्रे पाहिली आणि त्या चित्रांचे काढलेले फोटो भारतभर वाटले गेले.
ही चित्रे घेऊन राजा रवी वर्मा बडोद्याला आले. महाराजांनी त्यांना संपूर्ण राजवाडा फिरून दाखवला. ज्याठिकाणी ही चित्रे लावायची होती तो दरबार हॉलही दाखवला. दरबार हॉलमध्ये कोणते चित्र कोठे लावायचे हे स्वातंत्र्य महाराजांनी रवी वर्मांना दिले. राजा रवी वर्मांच्या इच्छेनुसार दरबार हॉलमध्ये चित्रे लावण्याअगोदर बडोद्यातील लोकांसाठी त्यांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले. महाराजांनी या कृष्णधवल चित्रांचे रंगीत करून विकण्याची कल्पना राजा रवी वर्मांना दिली. महाराजांची ही कल्पना किती महान होती याचा प्रत्यय आज येतो. कारण ही चित्रे आज भारताबरोबर सर्व जगभर प्रसिद्ध आहेत. या चित्र मालेत पुढील चौदा चित्रांचा समावेश होतो. १. श्रीरामचंद्राचा विवाह २. श्रीकृष्णाची दृष्ट ३. गंगा आणि शंतनू ४. कारागृहातून श्रीकृष्णाला वासुदेव घेऊन निघतो ५. मत्स्यगंधा ६. विश्वामित्र मेनका ७. कीचक आणि सैरंध्री ८. हरिश्चंद्र तारामतीच्या वधास उद्युक्त झाला आहे. ९. राधामाधव १०. भरत ११. कंस आणि माया १२. यतिवेषधारी अर्जुन आणि सुभद्रा, १३. नलदमयंती, १४. द्रौपदी वस्त्रहरण
राजवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळी असून, त्यावर अगदी छोटे सज्जे आहेत. ही जाळी बघताना आग्रा येथील ताजमहालाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तिथे खिडक्या असून त्यावर उत्कृष्ट दगडी कोरीवकाम केलेले दिसते. राजवाड्याचा दर्शनी भाग शिल्पकलेने ओतप्रोत भरला आहे. हे शिल्पकाम मिश्र स्वरूपात केलेले दिसते, त्यात हिंदी शिल्पकला पद्धत वापरली असून, यातील काही कमानीत व्हेनिसरची शिल्पकला व काही गॉथिक शिल्पकलेचा मिलाप बघावयास मिळतो. यामुळे याचा वास्तूवर परिणाम उत्तम साधला गेला आहे. मुख्य दरबाराच्या दिवाणखान्याची फरशी व्हेनिसच्या पद्धतीची असून त्यावर इटालियन शिल्पकार फेलिची याने चित्रकला, काव्यकला, मूर्तिकला व शिल्पकला या चार ललितकलांचे दर्शक पुतळे उभे केले होते, मुख्य दरवाजाला महिरप नोट आहे. त्यावरही सुंदर कोरीव काम केलेले आहे, दरवाजाची जी महिरप आहे तिच्यातील समांतरपणा, त्याच्यावर असलेले कोरीव काम अप्रतिम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन उंच मनोरे व त्याला असलेल्या चौफेर बालकन्या (Balconies) तर प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. मध्यभागी असलेल्या अर्धगोलाकृती घुमटाच्या टोकावर मध्यभागी असलेला काठीवरील डोलणारा भगवा झेंडा गायकवाड सरकार राजमहालात हजर असल्याची साक्ष देतात.
एकूण राजवाडा आतून किती भव्य आणि कलासंपन्न असेल याची मुख्य प्रवेशद्वारावरून कल्पना येते. पूर्वी सकाळ-संध्याकाळ या प्रवेशद्वारावर सनईचौघडांचे मंजूळ स्वर ऐकू येत असत. राजदरबाराचे मुख्य चार भाग आहेत. पहिला भाग राजदरबाराकरिता असून, दरबाराच्या लोकांना आत जाण्यासाठीचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे. दरबार हॉलची लांबी ९४ फूट व रुंदी ५४ फुट आहे. संपूर्ण राजवाडा दोन मजल्यांचा आहे, पूर्वेकडील बाजू ही सिंहासनाकरिता आहे. चर्चमध्ये जशा उंच उंच खिडक्यांना रंगीत काचा लावलेल्या असतात तशाच रंगीत काचा दरबार हॉलच्या पूर्वेकडील खिडक्यांवर देवांच्या तसबिरी पहावयास मिळतात. भव्य व प्रशस्त अशा मुख्य दरबारच्या दिवाणखान्यामध्ये एकही खांब नाही. लक्ष्मीविलास राजवाड्यातील वास्तुकलेचा हा अद्भुत नमुना आहे. याचबरोबर राजवाड्यामध्ये अजिंठा लेण्यांची छाप असणारा वीणा कक्ष उभारण्यात आला होता. दरबार हॉलच्या भिंतींना संगमरवरीसारखे गुळगूळीत प्लास्टर, राजवैभवास साजेसे मोझॅकचे काम, सोनेरी बर्खाने सुशोभित केलेले छतावरचे काम आणि राजा रवी वर्मांच्या पौराणिक रंगीत पेंटिंगमुळे दरबार हॉल भारतीय प्राचीन संस्कृतीच्या राजवैभवाने आकर्षित करतो.
लक्ष्मीविलास पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये संगीत मैफिली आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. हॉलच्या पहिल्या मजल्यावर तीन बाजूंच्या गॅलरी स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या गॅलरीमध्ये बसून राजघराण्यातील स्त्रियांनी झरोक्यातून दरबार हॉलमधील कार्यक्रम बघण्याची सोय होती. सयाजीरावांच्या विवाहानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी महाराणी चिमणाबाई (पहिल्या) यांच्यासोबत तंजावरमधील भरतनाट्यमच्या कलावंतांचा ताफा बडोद्यात आला होता. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये या कलावंतांचा कार्यक्रम अनेकदा आयोजित करण्यात आला होता.
युरोपप्रवासात सयाजीरावांनी पाहिलेल्या खाजगी वापराच्या विविध पाश्चात्य वस्तू व राहणीमानाच्या विविध पद्धतींचे राजवाड्यातील उभारणीसाठी फेब्रुवारी १८९० मध्ये खानगी अधिकारीपदी पेस्तनजी दोराबजी यांची नियुक्त झाली. राजवाड्यातील पाश्चात्य पद्धतीचे फर्निचर, ड्रेसिंग रूम, बाथरूम, डायनिंग टेबल, विजेचे दिवे, वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी या सर्व बाबी पेस्तनजींनी स्वत:च्या कारकिर्दीत अतिशय उत्तम पद्धतीने उभ्या केल्या. बांधकाम पूर्ण झाल्यावर लक्ष्मीविलास राजवाड्यातील फर्निचर तयार करण्याची सर्वात महत्वाची कामगिरी पेस्तनजी यांनीच पार पाडली.
सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत सत्यशोधक चळवळीला खंबीर पाठबळ दिले. महाराजांचे सत्यशोधक चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे सत्यशोधक एक नामांकित कंत्राटदार होते. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामाचे कंत्राट सयाजीरावांनी अय्यावारू यांना दिले होते. गुणवत्ता आणि विचारधारा हे दोन निकष महाराजांनी आपल्या कारकीर्दीच्या आरंभापासूनच जोपासल्याचा हा उत्तम पुरावा आहे.
लक्ष्मीविलास राजवाड्याच्या सभोवतालची ६५० एकर जागेतील बाग तयार करताना ब्रिटीश, युरोपियन, फ्रेंच, हिंदू, मुघल व रजपूत बाग निर्मिती शैलींचा विपुल प्रमाणात वापर केला होता. फ्रेंच बॅरोक शैलीतील बागेत स्थानिक वृक्षांचा वापर करून फ्रेंच देखावा तयार करण्यात आला. राजवाड्याची बाहेरील बाजू संपूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. सयाजीरावांनी लक्ष्मीविलास राजवाड्याच्या शिखरावर हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन यांसह ७ धर्माची तत्वे कोरून घेतली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सयाजीरावांनी या राजवाड्याचे केलेले कौतुकच लक्ष्मीविलास पॅलेसचे अनन्यत्व सिद्ध करते. महाराज म्हणतात, “पॅलेसचे बांधकाम व कलाकुसर मात्र उजवी आहे. अर्थात लक्ष्मी विलास पॅलेस हा भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारा झाला आहे, याचे आम्हाला समाधान आहे. आर्किटेक्ट्सने पॅलेसच्या बांधकामातील शिखर स्थानाच्या रचना अनुक्रमे हिंदू, शीख, मुस्लिम आणि ख्रिस्ती वास्तूकलेच्या प्रतिकांना अनुसरून केली आहे."
१६ मार्च १९०५ ला राजपुत्र धैर्यशीलराव आणि इतर सात मुलांची मुंज लक्ष्मीविलास राजवाड्यात झाली. २३ जानेवारी १९१० रोजी सयाजीरावांनी बडोद्यातील सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना राजवाड्यात मोठी मेजवानी दिली. १९११-१२ मध्ये अनाथ आश्रमातील ५ किंवा ६ मुलींना संगीत शिक्षणासाठी राजवाड्यावर पाठविण्यात यावे असा महाराजांनी हुकूम केला. १९१२ मध्येच सयाजीरावांनी अस्पृश्यांच्या सर्व मुलांना लक्ष्मीविलास राजवाड्यात जमवून खाऊ वाटला होता. यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांनी हा प्रकार आवडल्यामुळे एक हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी दिले. १९२५ मध्ये सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्यात सर्व जातीयांसाठी सहभोजनाचे आयोजन केले होते. सयाजीरावांनी वेगवेगळ्या प्रांतातील व जातीधर्मांचे पदार्थ राजवाड्यात बनवले जावेत यासाठी मुसलमान, पारसी, मद्रासी, हिंदुस्थानी आणि फ्रेंच इ. स्वयंपाकी राजवाड्यातील स्वयंपाकघरात नेमले होते. सामाजिक समन्वयाचा प्रयोग या स्वयंपाक्यांच्या माध्यमातून सयाजीरावांनी स्वत:च्या स्वयंपाक घरापासून आरंभिला होता.
१८९८ मध्ये सयाजीरावांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीविलास राजवाड्यामध्ये ‘ग्रंथ संपादक मंडळी’चा पहिला वार्षिक समारंभ साजरा झाला. १७ फेब्रुवारी १९३० रोजी महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्यांची व्याख्याने लोकांसाठी मुद्दाम ठेवली होती. त्यावेळी महाराज स्वत: हजर होते. यामध्ये एक सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून २०० रु. रोख दिले. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचे ‘क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व’ हे पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले.
महाराज म्हणजे ऐश्वर्य, काटकसर आणि दातृत्व यांचा अतिशय दुर्मिळ आणि क्रांतिकारक ‘संगम’ होते. महाराजांचे ऐश्वर्य जसे नजरेत भरणारे होते तसेच कुटुंबापासून ते राज्याच्या प्रशासनापर्यंत त्यांनी केलेल्या काटकसरीचे प्रयत्न आज विश्वास बसणार नाही इतके मुलभूत होते. या सगळ्याचा कळस म्हणजे महाराजांचे दातृत्व होय. आपल्या खाजगी आणि राज्याच्या संपत्तीतून निखळ मानवतावादी दृष्टीकोनातून फक्त भारतातच नव्हे तर जगभर जनकल्याणाच्या कामाला महाराजांनी दिलेल्या भक्कम आर्थिक आधाराला जगाच्या इतिहासात तोड नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे १८९८ ते १९०० या दोन वर्षांतील दुष्काळ कामांचा खर्च एक कोटी रुपयांहून अधिक झाला होता. एवढी रक्कम उभारताना सयाजीरावांनी खानगी खात्यातूनसुद्धा आर्थिक मदत केली. दिवाणखाण्याच्या मुख्यप्रवेशद्वारी सोन्याचे दोन सिंह होते. ते वितळून सोने विकले. ती रक्कम दुष्काळी कामाकडे वळवली. भारतात अनेक कल्याणकारी राजे झाले. परंतु दातृत्वाची ही परिसीमा गाठणारे सयाजीराव एकटेच.
राजा आणि ऐश्वर्य ही जणू जुळी भावंडेच होत. जगभर राजांचे राजवाडे, ऐश्वर्यातील जगणे आणि त्यांच्या संपत्तीचे किस्से आपण अनेकदा ऐकलेले असतात. परंतु महाराजांच्या ऐश्वर्याला असणारी भरघोस दातृत्वाची उदार किनार त्यांना इतर राजांपासून वेगळी करणारी आणि सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवणारी ठरते. या राजवाड्याच्या वैभवाच्या चर्चेबरोबर ती समजून घेणे आज फार गरजेचे आहे. कारण आज लोकशाहीत लोकप्रतिनिधी आपण देशाचे मालक आहोत या धुंदीत एखाद्या सम्राटालाही लाजवेल अशा थाटात वावरत आहेत. जनतेच्या सुख-दुःखाशी त्यांचे कोणतेच नाते नाही हे त्यांच्याकडे पाहिले तरी लक्षात येते.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बांधलेला लक्ष्मीविलास राजवाडा म्हणजे त्यांचा ध्येयवाद, विशाल दृष्टी आणि संपन्नतेचे प्रतिक आहे. परंतु अगदी सुरुवातीपासूनच या ऐश्वर्याला वैराग्याचे अधिष्ठान होते. महात्मा गांधींनी ‘विश्वस्त’ ही संकल्पना मांडण्याअगोदर महाराज ती शब्दश: जगले होते. राज्यसूत्रे हाती घेतली तेव्हा बडोदा संस्थान आर्थिकदृष्ट्या संकटात होते. महाराजांनी हे संस्थान कल्पकतेने, स्वकष्टाने, सर्वक्षेत्रातील ज्ञानी लोकांच्या सहकार्याने तसेच आर्थिक व्यवस्थापनाचा मानदंड निर्माण करून जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत नेऊन ठेवले. हे सर्व करत असताना मनाने मात्र ‘आपण या संपत्तीचे विश्वस्त आहोत’ हीच धारणा ते जगले. यासंदर्भात पुढील उदाहरण बोलके आहे. १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हिरक महोत्सवानिमित्त ‘सयाजीराव तिसरे डायमंड ज्युबली ट्रस्ट फंडा’ची स्थापना महाराजांनी केली. याद्वारे समाजविकास आणि मुख्यत: आदिवासी आणि अस्पृश्य यांच्या उन्नतीसाठी एक कोटी रुपयाचा निधी महाराजांनी आपल्या खाजगी फंडातून राखून ठेवला होता.
राजर्षी ही पदवीसुद्धा महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना फारच छोटी वाटते. कारण महाराजांनी ज्या-ज्या क्षेत्रात काम केले त्या-त्या क्षेत्रातील आदर्शांच्या प्रस्थापित मानदंडांच्या कक्षा इतक्या विकसित केल्या की त्यातून नवे मानदंड निर्माण झाले. महाराजांच्या सेवेत असणारे महत्वाचे अधिकारी रामचंद्रराव माने-पाटील यांच्या संदर्भातील एक आठवण यादृष्टीने फारच लक्षवेधी आहे. या चर्चेचा शेवट आपण त्या आठवणीने करुया.
...... लक्ष्मीविलास राजवाड्याच्या लॉनवर एका सकाळी महाराज कागदपत्र पाहत होते. ते पाहून झाल्यावर तेथून दिसणाऱ्या राजवाड्याकडे बघत जवळच उभ्या असलेल्या रामचंद्रराव माने पाटलांना सयाजीराव म्हणाले, “माने, एखादे वेळी असे वाटते की, एवढा मोठा राजवाडा आम्हाला काय करावयाचा आहे? येथेच एखादा बंगला बांधून आपण त्यात राहावे व या राजवाड्याचे म्युझियम किंवा लायब्ररीत रूपांतर करून आमच्या प्रजेला त्याचा उपयोग करुन द्यावा.”

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...