मराठा रियासतेच्या इतिहासात रणभूमीवर आलेले सर्वोच्च वीर मरण म्हणजे दत्ताजी शिंदेंचे हौतात्म्य ……………….
कराल रात्रीच्या जबड्यात यमुनेच्या काळ्याभोर पाण्याचा थापाथप आवाज आसमंतात सर्वदूर भरून होता. रोंरावणारे थंडगार वारे नदीच्या पात्रावरून स्वैर खिदळत होते. काळ्याकुट्ट अंधारात यमुना अतिविशाल अजगरासारखी भासत होती, त्या रात्री तिच्या काठी मृत्यूचे भयाण तांडव झालेलं होतं. त्या रात्रीचा कभिन्न अंधार दाटून आला तशी जाळवंडात दत्ताजीचं धड घेऊन लपलेला राजाराम चोपदार आणि त्याचे चार सोबती चोरासारखे बाहेर पडले.त्यांनी आजूबाजूची रानखांडं,डहाळ्या,वाळक्या फांद्या गोळा केल्या. नदीच्या पलीकडच्या अंगाला खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली. इकडे मराठी मुलखात सगळे गाढ झोपेच्या आधीन झाले होते तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता ! (repost)
म्हणूनच मला वाटते की मराठा रियासतेच्या इतिहासात रणभूमीवर आलेले सर्वोच्च वीर मरण म्हणजे दत्ताजी शिंदेंचे हौतात्म्य ……………….
दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र बंधु. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. …या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर वीरांनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता. त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापति करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला. जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला व पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली. नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले. पुढील सालीं दादासाहेब अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत. यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले . त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें “नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील” असे उद्गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला.
उज्जयनीहून निघून चुलतेपुतणे दिल्लीस आले. पेशव्यानें त्याला नजीबाचें पारिपत्य, बंगाल काबीज करणें, लाहोर सोडविणें, काशी प्रयाग घेणें व पुष्कळ पैसा घेऊन दादासाहेबानें केलेंले स्वारी कर्ज फेडणें वगैरे कामें सांगितली होती. पेशव्यांचा ‘दत्ताजी चित्तावर धरील तें करील’ असा त्याच्यावर पूर्ण भरंवसा होता, मध्यंतरी तोफांच्या प्रकरणावरून दत्ताजीचें व गाजीउद्दीनाचें भांडण झालें होते. नंतर त्याने अबदालीच्या सुभेदारापासून लाहोर घेतलें व परत यमुनाकाठी रामघांटास दाखल झाला. यावेळीं सरकारी कर्जाची ५० लाखांची वर्गत त्याच्यावर आली होती.
यावेळी दिल्ली मराठ्यांच्या ताब्यांत कायमची गेल्यासारखी झाल्याने नजीबाने व बादशहाने गुप्तपणें पत्रे लिहून अबदालीस ताबडतोब बोलाविलें व दत्ताजीस भागीरथीवर पूल बांधून देण्याच्या गुळचट थापा देऊन स्वस्थ बसविलें. याप्रमाणें नजीबाने सहा महिने (एप्रिल ते आक्टोबर) पुलाच्या थापेवर त्याला झुलविलें व त्याच्या विरुद्ध आपली सर्व तयारी चालविली आणि आंतून सर्व मुसुलमानांशी कारस्थानें करुन नोव्हेंबरांत अबदालीस दत्ताजीवर आणवून त्यास कैचीत पकडले.
आतां दत्ताजीस नजीबाचे कपट उमगले; परंतु आतां त्याचा कांही उपयोग नव्हता. गंगेचा पूल नजीबाच्या ताब्यांत होता आणि तो तर अबदालीला उघड मदत करीत होता. अशा वेळींहि दत्ताजीने एकाएकीं नजीबावर स्वारी करुन त्याला शुक्रतालाहून हांकलून गंगेपलीकडे रेटलें. ही लढाई मातब्बर होऊन तींत जनकोजी व दत्ताजी दोघेहि जखमी परंतु विजयी झाले (ऑक्टोबर१७५९). यावेळीं नजीबानें त्याच्याशी तात्पुरता तह केला; सुजाने हरिद्वाराच्या गंगेचे नाकें दाबून धरल्याने व अबदाली कुरुक्षेत्रास आल्याने, दत्ताजीनें गंगापार जाण्याचें रहित करुन कुरुक्षेत्री अबदालीची गांठ घेतली (२२ डिसेंबर). याप्रमाणें दत्ताजी हा घेरला गेला व हें सर्व कृत्य नजीबाने केले. त्याचप्रमाणें सुजानेहि एक कोट रु. खंडणी देण्याची थाप देऊन दत्ताजीस शुक्रतालास अबदाली येईपर्यंत अडकवून ठेविलें.
यावेळीं दत्ताजी मागें अबदाली व पुढें रोहिले अशा कैचींत सांपडला होता. जर मागें सरुन तो जयपूरकडे वळता तर प्रसंग टळता; परंतु मागें सरणे त्या शूर पुरुषास आवडेना. त्यानें जनकोजी व कबिले यांनी दिल्लीस पाठवून, शुक्रताल सोडून कुंजपुर्यास यमुना उतरुन अबदालीची गांठ घेतली, व त्या दिवशीं त्याचा पराभव केला (२४ डिसेंबर). परंतु लागलीच अबदाली कुंजपुर्यास यमुनापार होऊन नजीब, सुजा व अहंमद बंगश यांस मिळाला. याप्रमाणें एकंदर सर्व मुसुलमान एक झाले व दत्ताजी एकटा पडला. हें समजल्यावर मल्हाररावास त्याच्या मदतीस जाण्याबद्दल पेशव्यांनी अनेकदां हुकूम पाठविले, परंतु तो मुद्दामच जयपूरकडे रेंगाळत राहिला. तसेच पेशव्यांकडून मदत मिळेना परंतु माघार घ्यावयाचीच नाहीं या बाण्याने दत्ताजीनें लढायचे ठरवले . शेवटी दत्ताजी दिल्लीस येऊन (जाने. १७६०) जनकोजीस मिळाला. तेव्हांहि जनकोजीनें व पदरच्या सर्व मंडळीनें त्याला परत फिरण्याचा सल्ला दिला पण अपेश घेऊन श्रीमंतांस काय तोंड दाखविणें, असें म्हणून त्यानें तो नाकारला. नंतर युद्धाचा मुकाबला निश्चित करुन, पार होण्यासाठीं यमुनेचा ठाव पहातां तो लागेना व गिलच्यांचे लोक तर उलट नदी उतरुन अलीकडे येऊन हल्ले करुं लागले हें पाहून दत्ताजी चिडला.
शेवटी मनाची तयारी करुन हत्ती यमुनेंत घालून व त्यांच्या पायांत अंदू घालून, तीन घटका दिवसास दत्ताजीने गिलच्यांशी युद्ध सुरु केलें (१० जानेवारी १७६०). गिलच्यानें आपल्या तोंडावर असलेल्या जानराव वाबळे, बयाजी शिंदे व गोविंदपंत बुंलेदे या सर्वांनां मागे रेटून यमुना उतरुन व पांच घटकांत पांचशें मराठे ठार मारुन थेट जरीपटक्यावरच चाल केली. तेव्हां सर्वत्र धुंद झाली.
रणमदाने बेहोष झालेला दत्ताजी शिंदे लालमनीवर स्वार झाला, लालमणी थुईथुई नाचू लागला, मर्द मराठा जवान वीर, शिरावर शिरस्त्राण, पाठीवर ढाल, हातात तळपती तलवार असा दत्ताजी चा रणमर्दाचा अवतार पाहून मराठ्यांना नव-स्फुरण चढले.. “हर हर महादेव” चा जयघोष करत या मर्दाने जणू काळावर झेपावे तसा लालमणी गनिमांवर घातला..तलवारीच्या घावासरशी मुघली घुबडांचे मस्तक उडवू लागला.. बिनामुंडक्याच्या धडातून रक्ताची चिळकांडी उडत होती..
उडालेल्या मुंडक्याचा खच दिसत होता तसे मराठे बंदुकीलाही घाबरेना झाले अन आपसूक मुघली बंदुकीच्या टप्प्यात येऊ लागले.. हळूहळू मराठे निपचित पडून दिसेनासे होऊ लागले.. तसा दत्ताजीच्या जवळ येऊन तानाजी खराडे म्हणाला
“बाबा पडती बाजू झालिया.. कुनीबी दिसना गेलया, निशाण गुंडाळाव अन निघावं”
हे ऐकताच दत्ताजी जणू कडाडलाच….
”या रणांगणासाठीच अन या दिसासाठीच तर माझा जन्म आहे, दत्ताजी यमासमोर देखील उभा टाकील मग ह्या घुबडांना पाठ दाखवू ? शक्य नाही “
इतका वेळ निशाणापाशी झुंजत असलेला जनकोजी दंडावर गोळी लागल्याने घोड्यावरून खाली कोसळला, कुणीतरी घाबरून अन ते भयावह दृश्य पाहून दत्ताजींना म्हणाले
“बाबा, घात झाला….जनकोजीबाबा ठार झाले”
दत्ताजींच्या कानाच्या पाळ्या तप्त झाल्या, बाहू स्फुरण पावू लागले, अंगातले रक्त लाव्ह्याप्रमाणे उसळू लागले.. जगदंबे आज तुझे भुत्ये इथे राक्षसाचे मर्दन करणारच या भावनेने अन सुडाने दत्ताजी नुसता धगधगत होता… रागाने लालबुंद झालेला दत्ताजी हातात तलवार घेऊन पुढे झेपावत होता..
एव्हढयात डोळ्यासमोर हलकट नजीब दिसताक्षणी क्षणाचाही विलंब न लावता हातातील समशेर उंच उडवत “हर हर महादेव…. जय भवानी” च्या जयघोषात दत्ताजी आवेशाने नजीबाकडे झेपाऊ लागला आणि वाटेतल्या अफगानावर तुटून पडला.. समशेरीच्या दणक्यासरशी अफगाणी माकडांची मुंडकी उडवू लागला, सपासप बरगडीत तलवार घुसवू लागला..
इतक्यात अचानक एक जम्बुऱ्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीस छेदून लालमणीवर धडकला तसा दत्ताजी खाली पडला.. निपचित पडलेल्या आपल्या प्रिय लालमणी कढे पाहू लागला….
नजीबाला अन कुतुबशहाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले.. दोन्ही सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले..
दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे”
मराठा वीराची ही जिद्द, ही डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा कुत्र्यासारखा दत्ताजींच्या अंगावर बसला अन हातातल्या खंजिराने दत्ताजींच्या छातीची चाळणी करू लागला.. अंदाधुंद खंजीर छातीत घुसवू लागला.. अशातच अंगात संचारलेल्या हैवानासारखा नजीब हे दृश्य पाहून बेभान झाला अन झटक्यात हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला अन दत्ताजीची मान धडावेगळी केली.. दत्ताजीची मान खाली पडली तरीही चेहऱ्यावरचे ते सूर्यासारखे तेज अन डोळ्यातील अंगार पाहून नजीब आणखीन चेताळला..
दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने पूर्ण माखत माखत थंड पडू लागला..
या हरामखोर नजीबाने जवळच्या एका रोहील्याच्या हातातला भाला हिसकावून घेतला अन दत्ताजीचे मुंडके हातात घेऊन भाला त्यात खसकन खुपसला.. अन तो भाला हवेत उडवू लागला…..
आणि तसाच बेधुंद झालेला नजीब पळणाऱ्या मराठ्यांना अभय द्यायचे सोडून पाठलाग करून कत्तल करण्याचा आदेश देऊन तो मुंडके खोवलेला भाला घेऊन नाचत नाचत अब्दालीकडे निघून गेला…..
बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले…. नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली…. अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला…. हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..
आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला…. पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला……
हे वर्णन वाचून ज्याच्या धमन्यातील रक्त उसळत नाही तो मर्दही नव्हे अन मराठी तर खचितच नव्हे …।
मराठ्यांची याहून वाईट अवस्था या घटनेनंतर १ वर्ष ५ दिवसांनी पानिपतच्या रणांगणावर झाली तेव्हा तर महाराष्ट्रात असे एकही देवघर शिल्लक उरले नसेल की, जिथल्या देवी-देवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल! तेव्हा पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी-कार्तिकील
ा मराठा मातीतल्या साऱ्या दिंड्या-पताका एक व्हाव्यात तशा पानिपतावर शत्रूच्या बीमोडासाठी अन् राष्ट्राच्या संरक्षणासाठी एक झालेला मराठी मुलूख उभा होता!’
जेव्हा पुण्याची लोकसंख्या वीस-बावीस हजारांच्या वर नव्हती, तेव्हा लाखभर मराठे कंबर कसून इथे उभे ठाकले होते. त्यामध्ये भाऊसाहेब, विश्वासरावांसह सात-आठ ब्राह्मण सरदार आणि फक्त मराठा समाजातीलच नव्हे, तर बहुजन समाजातील, अठरा पगड जातीचे, मातीचे, साठ ते सत्तर बिन्नीचे सरदार त्या समरांगणात जिवापाड लढले होते. त्या वेळच्या शाहिरांच्या पोवाड्यातील फक्त आडनावांच्या यादीवरूनच नजर फिरवा, त्याचा जरूर पडताळा येईल.
शिवाजीमहाराजांच्या काळातील आणि शिवाजीमहाराजांच्या नंतरच्या काळातील सामान्य घरांतील सामान्य माणसे असामान्यपदाला पोचल्याची अनेक उदाहरणे पानिपतप्रसंगी आढळतात. पुणे जिल्ह्यातील नीरेकाठच्या होळच्या धनगराचा पोर मल्हारी सरदार मल्हारराव होळकर बनला. साताऱ्याकडचा कण्हेरखेडचा राणोजी शिंदे, त्याचा भाऊ दत्ताजी, पुणे जिल्ह्यातील दमाजी गायकवाड याच मंडळींनी पानिपतानंतर इंदूर, ग्वाल्हेर आणि बडोद्याकडे आपल्या पराक्रमाने राज्ये उभारली. एक प्रकारे आधी पानिपताच्या मातीला रक्ताचा नैवेद्य अर्पण केल्यावरच उत्तर हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या गुरुकिल्ल्या त्यांच्या हाती लागल्या.
पानिपत ही ऐन यौवनातल्या, मस्तवाल फाकड्या वीरांनी छेडलेली जीवघेणी जंग होती. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. या युद्धाच्या वेळी त्याची उमर अवघी बत्तीस होती; तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठ्ठावीस होते. दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड फुटल्या वयाची पोरे होती. जेव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते वा वाहतुकीची साधने नव्हती, तेव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणे, या खायच्या गोष्टी नव्हत्या.
आम्ही झुंजलो दिल्लीच्या बादशहासाठी, हिंदुस्थानाच्या अभिमानासाठी. मात्र, दुर्दैवाने उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. रजपूत राजे राजस्थानाच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवाने या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाट्टेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन् तेथूनच अवकळा सुरू झाली. तरीही भाऊसाहेब पानिपताच्या मातीत गाडून उभे होते. मात्र, श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रिया-पोरांचे, यात्रेकरूंचे लटांबर सोबत असणे हे काळरूढीनेच भाऊंच्या पाठीवर लादलेले ओझे होते; पण त्यामुळे मात्र हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्याने तिळभर विश्रांती घेतली नाही.
शेवटी अन्नानदशा झालेली मराठी सेना झाडांची पाने आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली. कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोणा ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्याविरुद्ध आम्ही जंग केली, त्या आमच्या महाशत्रूनेच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे ; “दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धादिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य!”
अगदी अलेक्झांडरपासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणे व्हायची ती याच रस्त्याने. अफगाणिस्तानातून, पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताच जणू अनादी काळापासून रक्तासाठी चटावलेला आहे. पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपताचे तिसरे युद्ध अफगाण घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार, तारीख १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडले. मध्ययुगीन कालखंडात सकाळी नऊ वाजल्यापासूनच संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अमेरिकन अणुबॉंब पडले. त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन एक-दीड लाख जीव मरायलाही दोन-तीन दिवस लागले होते.
दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानच्या रक्षणाच्या उद्देशाने १७५२ च्या “अहमदिया करारा’नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. इथेच आमच्या लक्षावधी माता-भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला.
याच विषयाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात “पानिपत’ नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या “काला आम’ नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, “”दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्ता-मांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे!”
आजच्या दिवशी १० जानेवारी १७६० रोजी घडलेल्या या अमर बलिदानास कोटी कोटी प्रणाम !
No comments:
Post a Comment