शके १७३८ च्या माघ शु. ६ रोजी मराठ्यांच्या राजधानीतील सातारचा 'अजिंक्य तारा' इंग्रजांनी जिंकला व त्यावर आपले निशाण उभारले.
मराठयांच्या राज्याचे सर्व सामर्थ्य त्यांच्या किल्ल्यांतून होते. तेव्हा इंग्रजांनी एकामागून एक असे किल्ले घेण्यास सुरुवात केली. सिंहगड व पुरंदर यांसारखे मोठे किल्ले इंग्रजांकडे आले. सर्वत्र फंदफितुरी माजून राहिली होती. सातारचा किल्ला सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा असा होता. सातारा मराठ्यांच्या राजधानीचे शहर असल्याने त्यास विशेष योग्यता प्राप्त झालेली होती. त्याकडे इंग्रजांचा मोर्चा वळला. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ आणि जनरल प्रिझलर यांच्या हाताखालील फौजा कोरेगांवजवळ एकत्र झाल्या, आणि माघ शु.५ रोजी त्यांचा मुक्काम साताऱ्याजवळ झाला. लागलीच किल्ल्यावर मारा करण्यास प्रारंभ होऊन सर्वत्र दाणादाण उडाली. किल्ल्यावर चारपांचशे लोक असून पंचवीस मोठाल्या.तोफाहि होत्या. परंतु त्या तोफांच्या पाठीमागें प्राण पणाला लावून लढणारे त्यागी वीर नव्हते. सर्व मुत्सद्दी लोक बाळाजीपंत नातूंच्या वशिल्याने इंग्रजांकडून स्वार्थ साधण्यास गुंतले होते. स्वत्वाची जाणीव कोणालाहि नव्हती. फितुरखोर व निमकहराम लोकांनी किल्ला अगोदरच पोखरून ठेविला होता. त्यावर इंग्रजांच्या तोफांचा प्रभाव चारसहा तासांतच झाला. सायंकाळीच किल्ल्याचा पाडाव झाला, आणि दुस-या दिवशी माघ शु. ६ ला सातारच्या 'अजिंक्यताऱ्या'वर इंग्रजांचे युनियन जॅक लागले. आणि क्रमाक्रमाने महाराष्ट्रांतील सर्व किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन झाले.
राज्याचे सर्व बळ याच किल्ल्यांत एकवटलेले होते. यांच्याच मदतीवर श्रीशिवाजी महाराजांनी हिंदुपदपातशाहीची स्थापना केली होती. त्यांच्यानंतरहि याच किल्ल्यांनी दोनतीन शतके देशाचे रक्षण केले. परंतु किल्ल्यावर वावरणारी माणसे मात्र स्वाभिमानी न राहिल्यामुळे महाराष्ट्राचे दुर्दैव उभे राहिलें ! शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता यांची कमतरता मुळीच नव्हती. वाण होती ती ऐक्याची, प्रामाणिकपणाची व स्वार्थत्यागाची. वाण होती राष्ट्रप्रेमाची.
११ फेब्रुवारी १८१८
No comments:
Post a Comment