शके १५८३ च्या माघ शु. १२ रोजी श्री शिवाजी महाराज यांनी तळकोंकण काबीज करून तेथे आपला अमल बसविला.
विजापूर दरबारने अफझलखानास आपल्यावर पाठविले याबद्दल शिवाजी राजांच्या मनात राग होता. त्याचा सूड घेण्यासाठी कल्याण पासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपले लक्ष वेधवून घेतले. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापाऱ्यांचाहि बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतु शिवाजी राजांचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादि धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्दीस मदत करीत. तेव्हा त्यांची ही ठाणे उठवणे अगत्याचे होते. म्हणून शिवाजी राजे आतां या उद्योगास लागले. कोंकणांतील श्रीमंत शहर व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणे हस्तगत केली. पुढे शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणाऱ्या सहा इंग्रजांना त्याने कैदेत ठेविलें. सर्व प्रदेश ताब्यात आल्यावर प्रचितगड, पालगड, मंडनगड हे किल्ले त्यांनी नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन 'तळकोंकण महाराजांस अर्जानी झाले.'
कोंकण हस्तगत झाल्यावर शिवाजी राजांची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरांत अफझलखानाची तीन जहाजे होती. ती घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला. खानाची तीन जहाजे इंग्रजांच्या आश्रयास गेली. इंग्रज सुखासुखी जहाजे शिवाजी राजांकडे देत नव्हते. अफझलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवाजी राजांचें नांव ऐकतांच भीतीने वखारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रांतून पळून गेला. पुढे रॅडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड इत्यादि इंग्रजांनी काही आगळीक केली म्हणून शिवाजी राजांनी त्यांना कैदेत ठेविलें. शिवाजी राजांच्या अधिकाऱ्याने इंग्रजांना कळविलें, "महाराजांस सिद्दीचे ताब्यांतून दंडा राजापुरी घ्यावयाची आहे, त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठे बक्षिस देऊ, नाही तर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाही.
- २१ जानेवारी १६६२
No comments:
Post a Comment